मितेश रतिश जोशी

भारत हा कृषीप्रधान देश असून देशाच्या विकासामध्ये शेतीचा प्रमुख वाटा आहे. शेतीप्रधान भारतातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीपूरक व्यवसायांबरोबरच त्यापलीकडे जात धाडसी पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. शेती हे देशातील सर्वात मोठे झपाटयाने विकसित होत चाललेले क्षेत्र असले तरी अनेकदा शेती उत्पादनाला हमीभाव मिळत नाही. शेतीसाठी लागणारा खर्च मात्र वाढतो आहे. त्यामुळे शेतातून मिळणारं उत्पन्न हळूहळू कमी होतं आहे. परिणामी, काही जण नोकरीचा पर्याय शोधू लागले आहेत. अशा वेळी शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणं आवश्यक ठरतं. पारंपरिक शेतीपूरक व्यवसायाबरोबरच शाश्वत उपाय म्हणून कृषी पर्यटन हा एक पर्याय पुढे आला आहे. कृषी पर्यटनाचा उगम व्यावसायिक पातळीवर जगात प्रथम ऑस्ट्रेलियात झाला. महाराष्ट्रात सर्वप्रथम बारामतीतील प्रगतिशील शेतकरी अप्पासाहेब पवार आपल्या शेतावर नावीन्यपूर्ण कृषी संशोधन प्रयोग दाखविण्यासाठी इतर शेतकऱ्यांना बोलावीत. त्यांची त्या ठिकाणी नि:शुल्क राहण्याची, जेवणाची सोय केली जात असे. कालांतराने शुल्क आकारून इको टुरिझमच्या माध्यमातून हे कृषी पर्यटन केंद्र नावारूपाला आलं. हीच संकल्पना शेतकऱ्यास आर्थिकदृष्टया फायदेशीर आणि त्याच जोडीने प्रतिष्ठा मिळवून देऊ शकते, हे नेरळ येथील सगुणा बागच्या चंद्रशेखर भडसावळे यांनी स्वत:च्याच शेतात सप्रमाण सिद्ध करून दाखवलं. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकरी आपली शेती फायदेशीर आणि प्रयोगशील करू लागले आहेत. कृषी पर्यटनामुळे पर्यटन व्यवसायाला बळकटी मिळू लागली आहे.

Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
Artificial Intelligence, Sugarcane Farming, Lokshiwar ,
लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
Mission Bhagirath Prayas
नाशिक : मिशन भगीरथ प्रयासमुळे भूजल पातळीत वाढ, काठीपाडा परिसरास लाभ
successful journey Anushka Jaiswal vegetable cultivation farming
कुत्सित बोलणी ते ‘मॅडम के खेत की मिरची’…अनुष्का जयस्वालचा यशस्वी प्रवास

प्रत्येकाच्या फिरस्तीची काही उद्दिष्टं असतात. कृषी पर्यटनाची मूळ उद्दिष्टं कोणती याविषयी सांगताना, दापोली येथील अमृते निसर्ग सहवासचे आशीष अमृते म्हणाले, ‘कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून राज्याचा विकास साधणं हे कृषी पर्यटनाचं मूळ उद्दिष्ट आहे. शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं. कृषी पर्यटनाला कृषी पूरक व्यवसाय म्हणून प्रोत्साहन देणं. ग्रामीण भागातील लोककला आणि परंपरा यांचे दर्शन घडविणं. ग्रामीण महिला व तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं. शहरी भागातील लोकांना, विद्यार्थ्यांना शेती आणि शेती पद्धती तसंच कृषी संलग्न व्यवसायाची माहिती उपलब्ध करून देणं. ग्रामीण भागातील राहणीमान उंचावणं. पर्यटकांना प्रदूषणमुक्त शांत व निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा, प्रत्यक्ष शेतातील कामाचा अनुभव देणं. शेतावरील कृषी मालाच्या प्राथमिक प्रक्रियेस प्रोत्साहन देणं. ग्रामीण भागातील पडीक गायरान आणि क्षार जमिनी उपयोगात आणणं इत्यादी उद्दिष्टं केंद्राने डोळयासमोर ठेवायला हवीत’.    

हेही वाचा >>> क्रिकेटपलीकडचे आयपीएल

कृषी पर्यटन केंद्रांनाही सोयीसुविधा उपलब्ध करताना मर्यादा पाळाव्या लागतात. त्याविषयी सांगताना शिळिंब येथील अंजनवेल कृषी पर्यटन केंद्राचे राहुल जगताप सांगतात, ‘कृषी पर्यटन केंद्र चालविताना शेती हा प्रमुख व्यवसाय असणं गरजेचं असून पर्यटन हा पूरक व्यवसाय असणं आवश्यक आहे. कृषी पर्यटन केंद्र हे शहराच्या हद्दीपासून एक किलोमीटर बाहेर आणि शक्यतो खेडेगावांमध्ये असतं. केंद्र शेती आणि शेती संलग्न बाबींवर आधारित असल्यामुळे कृषी पर्यटन सुरू करण्यासाठी कमीत कमी एक एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेतीक्षेत्र असावं लागतं. ज्या कृषी पर्यटन केंद्रात शालेय सहली आयोजित करण्यात येणार आहेत अशा कृषी पर्यटन केंद्राचं क्षेत्र कमीत कमी पाच एकर असायला हवं. केंद्राच्या ठिकाणी २४ तास पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्र चालकाची असते. पर्यटन केंद्र चालविणारी व्यक्ती ही वैयक्तिक शेती करणारी असावी. तसंच शेती त्यांच्या स्वत:च्या अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे असणं आवश्यक असतं. सातबारा उतारा कुटुंबाच्या नावे असणं बंधनकारक आहे’.    

अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटन केंद्रांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. विशेष म्हणजे यामध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. कृषी पर्यटन केंद्रातील आर्थिक तसंच व्यावसायिक संधी ओळखून अनेक युवा शेतकरी हा मार्ग निवडत असल्याचं दिसून येतं आहे. आपल्या समृद्ध कृषी संस्कृतीचं प्रतिबिंब असणारी अस्सल कृषी पर्यटन केंद्रं आणि तद्दन गल्लाभरू मानसिकतेतून उभारलेली केंद्रं याची पुसट सीमारेषा लक्षात येण्यासाठी कृषी विभाग किंवा पर्यटन विभाग यांच्या माध्यमातून शासकीय पातळीवर देखील प्रयत्न होणं गरजेचं आहे, असं मत राहुल यांनी मांडलं. ‘शेती आणि ग्रामीण संस्कृती हा खरंतर कृषी पर्यटन संकल्पनेचा मूळ गाभा आहे. शहरी पर्यटक ज्यांचा ग्रामीण संस्कृती, ग्रामीण जीवन, गावातील माणसं आणि ग्रामीण जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांशी तसा थेट संबंध आता राहिलेला नाही अशांसाठी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून हा ग्रामीण जीवनाचा स्पर्श शहरी पर्यटकांना व्हावा, नवीन पिढीला आपलं धान्य, भाज्या, फळं हे शेतात नेमकं कसं तयार होतं, याची माहिती घेणं, त्यादृष्टीने अभ्यास-प्रयत्न करणं हे कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून शक्य झालं आहे, असंही त्यांनी सांगितलं. मात्र त्याचबरोबर या पर्यटनाशी जोडल्या गेलेल्या चुकीच्या पद्धतीवरही त्यांनी बोट ठेवलं. ‘आपलं ग्रामीण जीवन, पर्यावरण आणि जैवविविधता याबतीत सजगता निर्माण करण्याचं सामर्थ्य कृषी पर्यटन संकल्पनेत आहे. त्यामुळे निव्वळ मनोरंजन हा उद्देश असलेल्या हॉटेल किंवा रिसॉर्ट्स व्यवसायाच्या चौकटीत कृषी पर्यटन केंद्रांनी अडकू नये. बऱ्याचदा ‘कृषी पर्यटन केंद्रा’च्या नावाखाली निव्वळ धंदेवाईक पद्धतीने व्यवसाय चालवला जातो. शेती, ग्रामीण संस्कृती, स्थानिक माणसं यांचा किंचितही स्पर्श नसलेली नुसतीच खान पान – धूम्रपान, मद्यपान सेवा दिली जाते. या सुंदर पर्यटन पद्धतीची नकारात्मक प्रसिद्धी होणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे, असा आग्रही मुद्दा राहुल यांनी मांडला.     

हेही वाचा >>> फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत

वैयक्तिक शेतकरी, कृषी सहकारी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था किंवा अन्य अशासकीय संस्था यांबरोबरच कृषी विज्ञान केंद्रं, कृषी महाविद्यालयं अथवा विद्यापीठेदेखील कृषी पर्यटन केंद्रं सुरू करू शकतात. या केंद्राकरिता महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येतं. छोटयातला छोटा शेतकरी किंवा मोठयातला मोठं कृषी विद्यापीठ असेल या सर्वांना आता कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र सुरू करता येऊ शकतं. या पर्यटनाच्या माध्यमातून पर्यावरणाच्या जतन – संवर्धनाबरोबरच कृषी संस्कृतीविषयीही जनजागृती होते आहे. शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण झालेला आहे. स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. महिला बचत गटांचे पदार्थ असतील किंवा गावातील कारागिरांनी केलेले पदार्थ असतील अशा व्यापक दृष्टिकोनातून कृषी आणि ग्रामीण पर्यटनाचं महत्त्व हे आज चांगल्यापैकी वाढताना दिसतं आहे .     

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून खास गावरान मेव्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो. शेतात फिरणं, बैलगाडीतून रपेट मारणं, प्रत्यक्ष शेतात काम करण्याचा अनुभव घेणं यातून एक वेगळाच आनंद मिळतो. पावसाळ्यात  गुडघाभर चिखलात रोप लावणी कशी केली जात असेल याचं कुतूहल लोकांच्या मनात असतं. विशेष म्हणजे शहरी फिरस्तींना चिखलात माखून घेण्याची खुमारी चाखायची असल्याने काही कृषी पर्यटन केंद्रांवर चिखल महोत्सवाचंही आयोजन केलं जातं. भात कापणी, मळणी, भाताला वारे देणं, रास तयार करणं, ती पोत्यात भरणं, बैलगाडीतून आणलेले धान्य घरात घेताना घरच्या सुहासिनीकडून बैलांचे पूजन करणं ही संस्कृती पाहता येत असल्याने कृषी पर्यटन केंद्रावर सहकुटुंब येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. याशिवाय, झाडावर चढून हंगामातील फळं काढणं, शेतातील घरात मुक्काम करणं, घरगुती जेवणाचा आस्वाद घेणं यातून पर्यटकाला शहरी, धकाधकीच्या जीवनापासून काहीसा आराम आणि मन:शांती मिळत असल्याच्या सुखद प्रतिक्रिया आहेत.

कृषी पर्यटन हा पर्यटनाचा नवीन ट्रेण्ड आहे. शिक्षण आणि करमणूक हे दोन्ही हेतू मनात ठेवून पर्यटक कृषी पर्यटनाकडे आकर्षित होत आहेत. शहरी लोकांना निसर्ग आणि संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच खेड्य़ातील शेतकरी वर्गाला उत्पन्न, रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा व्यापक दृष्टिकोन कृषी पर्यटनाच्या उपक्रमामागे आहे. आपल्याकडे विविध प्रकारचे शेतकरी आहेत, त्यामुळे कृषी पर्यटनातही वैविध्य टिकवलं जात आहे.

viva@expressindia.com

Story img Loader