मिर्झा गालिब मार्गावरील भायखळा जिल्हा कारागृहाच्या समोरच्या फुटपाथला लागूनच एक मजली मजबूत दगडी इमारत तुमचं लक्ष वेधून घेते. त्यावर सिमेंटनेच ठळक अक्षरात लिहिलेलं आहे ‘अमेरिकन एक्स्प्रेस बेकरी’.

कायमच ब्रिटिशांचा अंमल राहिलेल्या भारतात आणि विशेषत: मुंबईत ‘अमेरिकन’ हा शब्द उत्सुकता चाळवतो. बाहेरून एकमजली वाटणारी ही इमारत दरवाज्यातून आत शिरल्यावर ताबडतोब तुमच्या पहिल्या ठोकताळ्याला छेद देते. कारण इथे दिसतात जमिनीपासून छतापर्यंत एकसंध असलेले पिवळ्या रंगाने रंगवलेले जाड लोखंडी खांब, छताला लटकणारे जुन्या पद्धतीचे पंखे, समोरच्या भिंतीला टेकून उभी असलेली लाकडी कपाटं आणि भिंतीवर आपल्या इतिहासाची साक्ष पटवून देणाऱ्या बेकरीच्या जाहिराती. फार पूर्वी विक्रम डॉक्टरसारख्या नामवंत खाद्य समीक्षकाने बेकरीवर लिहिलेल्या आर्टिकलच्या फ्रेम्स, लाकडी आणि लोखंडाची तीन-चार मोजकीच टेबलं आणि खुच्र्या. बेकरी काऊं टरच्या मागे असलेल्या मोठाल्या खिडक्यांना लावलेल्या पांढऱ्या-निळ्या काचांमधून बाहेरील सूर्यप्रकाश सहज आत डोकावत असतो. लोकांची गर्दी-गोंधळ नाही. त्यामुळे तुम्ही क्षणातच या जागेच्या प्रेमात पडता.

पहिल्या भेटीत छोटेखानी कॅफे वाटणारी ही जागा पूर्वीपासून बेकरीच आहे. ते सुद्धा संपूर्ण विसावं शतक मुंबईची जडणघडण अगदी जवळून पाहणारी. गोव्यातील म्हापसापासून अवघ्या वीस मिनिटांच्या अंतरावर असलेल्या अलडोना गावच्या कारव्हालो कुटुंबाचं हे अपत्य.  कारव्हालो कुटुंबच सुरुवातीपासून बेकरीचे सर्वेसर्वा असले तरी याच्या नावात अमेरिकन हा शब्द कुठून आला याचा शोध घ्यायचा कधी फारसा प्रयत्न केला नसल्याचं रॉस कारव्हालो प्रांजळपणे कबूल करतात. रॉस यांचे आजोबा फ्रान्सिस्को कारव्हालो हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी १९०८ साली फॉकलंड रोडवर ‘अमेरिकन एक्स्प्रेस बेकरी’ची सुरुवात केली.

कारव्हालो कुटुंबीयांनी १९३५ साली ‘मॅकबेथ ब्रदर्स’ या ज्यू इंजिनीअर्सकडून आता ‘अमेरिकन एक्स्प्रेस बेकरी’ ज्या इमारतीत आहे ती इमारत खरेदी केली. इंजिनीअरिंगची कामं या इमारतीत होत असल्याने त्या वेळी जमिनीचा पृष्ठभाग कॉबलस्टोनने तयार केलेला होता. बेकरीच्या कामासाठी तो अगदीच बिनकामाचा असल्याने ते जाड दगड काढून त्या जागी लाद्या बसवण्यात आल्या. ही संपूर्ण इमारत जमिनीपासून छतापर्यंत एकसंध अशा लोखंडी खांबांवर उभी आहे आणि बाजूच्या भिंती जवळपास तीस इंच जाडीच्या.

पुढे व्यवसाय कुलाबा, कंबाला हिल, सांताक्रूझ आणि बांद्रय़ापर्यंत विस्तारला. १९४४ पर्यंत ते बॉम्बे डॉक येथे बांधलेल्या अमेरिकन बोटींना मांस, ब्रेड आणि बटरची डिलिव्हरी बेकरीतून केली जायची. सर्वात जलद डिलिव्हरी ही बेकरीची ओळख होती. कदाचित म्हणूनच की काय बेकरीचं नाव ‘अमेरिकन एक्स्प्रेस बेकरी’ पडलं असावं. बेकरीच्या ब्रेडची प्रत इतकी चांगली होती की इथले ब्रेड वांद्रे जिम आणि रॉयल बॉम्बे यॉट क्लबलाही जायचे. मात्र याच काळात सुरू असलेल्या दुसऱ्या महायुद्धाचा फटका व्यवसायाला बसला. साखर, पीठ, ब्रेड पॅकिंगचे पेपर या सगळ्यांच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे कुलाबा येथील दुकान बंद पडले.

पुढे १९४७ ते १९५४ या काळात तीनही कारव्हालो भावंडांचं एकामागोमाग एक निधन झालं. त्या वेळी जोसेफ यांची पत्नी बेर्था कारव्हालो यांनी व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली आणि बेकरीला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून दिलं. वेगवेगळे पदार्थ तयार करण्यात बेर्था यांचा हातखंडा होता. किचनसोबतच त्यांनी बेकरीचे आर्थिक व्यवहारही सांभाळले.

रॉस कारव्हालो सांगतात, १९३९च्या पूर्वी आम्ही लंडन, जर्मनीमधून आयात केलेले पदार्थ विकत असू. त्यामध्ये हॅम आणि वेगवेगळी बिस्किटं असायची. ‘होविस’ हा ब्रेडचा लंडनमधील १३० वर्षे जुना ब्रॅण्ड. त्यांचे प्रॉडक्टही इथे विकले जात. आमच्याकडे हॅम स्लाईस करायची मोठी मशीन होती. त्या वेळी हॅमचा मोठा तुकडा येत असे. आम्ही त्याच्या चकत्या करून विकत असू. एवढंच काय बर्फसुद्धा आयात केला जायचा. ब्रेडसोबत बेकरीमध्ये इतर पदार्थही तयार केले जात असत. मात्र स्वातंत्र्यानंतर काही काळ विशिष्ट प्रकारचे केक आणि स्वीस रोल बनवायला देखील परवानगी नव्हती. तेव्हा बटर क्रीमचे केक बनवले जात. साठच्या दशकात फ्रेश क्रीमचे केक बनवायला सुरुवात झाल्याचं रॉस सांगतात.

दुसऱ्या महायुद्धानंतर १९७१च्या युद्धाच्या वेळीही काही पदार्थाच्या आयात-निर्यातीवर परिणाम झाला. तेव्हा गोड पदार्थातील बदामाची जागा शेंगदाण्यांनी घेतली होती. तर अलीकडे काश्मीरमध्ये आलेल्या जलप्रलयामुळे बाजारातून अक्रोड गायब झाले होते. सत्तरच्याच दशकात बेकरी स्वत:चं इस्ट तयार करत असे. परंतु इस्ट तयार करताना येणारा आंबलेला वास दारूच्या वासासारखा वाटत असल्यामुळे पोलिसांच्या धाडीही बेकरीवर पडल्याची आठवण रॉस सांगतात.

मल्टीग्रेन ब्रेड हे आता फॅड झालं आहे. पण एकेकाळी असे ब्रेड तयार करायला परवानगी नव्हती. याबाबत एक भन्नाट किस्सा रॉस यांनी सांगितला. ‘टाटा ऑइल मिल’ ही भुईमुगाच्या शेंगापासून तेल तयार करायची. त्या तेल काढलेल्या शेंगदाण्यापासून ते पीठ तयार केलं जात असे. त्याचा आम्ही ब्रेडमध्ये वापर करावा असं त्यांचं म्हणणं होतं. त्याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास चांगला ब्रेड तयार होई. पण अशाप्रकारे ब्रेड तयार करण्याला बंदी होती. त्या वेळी रॉस यांनी ‘टाटा ऑइल मिल’ला ‘एफडीए’कडून परवानगी मिळवून द्या, आम्ही ब्रेड बनवू असं सांगितलं होतं. पण त्यांनी ती परवानगी कधी घेतलीच नाही आणि तो प्रयोग बारगळला.

१९९२च्या दंगलीमध्ये संपूर्ण मुंबई शहरात संचारबंदी लागू होती. पण त्या काळातही लोकांची गैरसोय होऊ  नये म्हणून कारव्हालो कुटुंबीयांनी दररोज एक तास बेकरी सुरू ठेवली होती. लोक त्यासाठी बेकरीच्या बाहेर शिस्तीत रांग लावत. त्यानंतर २००५ साली मुंबई पाण्याखाली गेली असतानाही सर्व कामगारवर्ग मिळेल त्या मार्गाने बेकरीत पोहोचला आणि प्रॉडक्शन सुरू ठेवलं. २००८च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या काळातही आजूबाजूच्या परिसरात तैनात सुरक्षारक्षकांना सायकलवरून ब्रेड पोहोचविण्याचं काम आम्ही केल्याचं रॉस अभिमानाने नमूद करतात.

रॉस यांनी साठच्या दशकात बेकरीची सर्व जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर ‘आम्ही तुमच्या गरजेप्रमाणे ब्रेड तयार करतो’ हे स्लोगन आणि शेफची हॅट घातलेला गुबगुबीत हसऱ्या चेहऱ्याच्या शेफचा मॅस्कॉट बेकरीला दिला. त्याकाळी चौकोनी बॉक्स असलेल्या हातगाडीवरून आणि व्हॅनमधून घरोघरी जाऊ न बेकरीचे प्रॉडक्ट विकले जायचे. बेकरीच्या आत शिरल्यावर आपल्याला केवळ छोटा कॅ फे आणि बेकरी काऊंटर दिसतं. पण खरा खजिना तर बेकरीचे पदार्थ जिथे तयार होतात तिथे आहे. अर्थात सामान्य ग्राहकांना जाण्याची तिथे परवानगी नाही. कॅ फेच्या डाव्या बाजूला ऑफिस आहे आणि ऑफिसच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या प्रचंड जागेत बेकरीचे सर्व पदार्थ बनवण्याचं काम चालतं.

शंभर र्वष जुन्या बेकरीचं चालू किचन पाहायला मिळणं हा खरंतर नशिबाचाच भाग म्हणायला हवा. इथे पीठ मिक्स करण्याची ‘बेकर पर्किन्स वर्क्‍स – लंडन, इंग्लंड’ असं ठळक अक्षरात नोंदवलेली जुनी बंद पडलेली मशीन अजूनही ठेवलेली आहे. पूर्वी इथे तीन मोठाले फायर वूड ओव्हन होते. त्यानंतर मुंबईतले पहिले डिझेलवर चालणारे ओव्हनसुद्धा याच बेकरीमध्ये आले. आता ते सुद्धा जाऊ न इलेक्ट्रिक ओव्हन पाव आणि इतर पदार्थ बनवण्याचं काम करतात.

हल्ली लोक खूप प्रवास करतात त्यामुळे त्यांच्या चवी बदलल्या आहेत. आजही ब्रेड हे बेकरीचं प्रमुख उत्पादन असलं तरी बदलत्या काळानुसार क्रॅस्टीनी, लवाश, वाइन मॅक्रॉन, प्लम केक, ग्रॅनोला बिस्किटे, मल्टीग्रेन ब्रेड आणि इतर गोड पदार्थही मोठय़ा प्रमाणात तयार केले जातात. चहा-कॉफीची सुरुवात तर दहा-पंधरा वर्षांपूर्वी झालेली. मुंबईत सर्वच मोक्याच्या ठिकाणी बेकरीच्या जागा असल्या तरी कुठेही त्या परिसराचे दर पदार्थाच्या दरात प्रतिबिंबित होत नाहीत. आता तर नाक्यानाक्यावर बेकऱ्या उघडल्या आहेत. त्यामुळे बेकरीचं आपल्याला फार अप्रूप वाटत नाही. पण मुंबईची जडणघडण पाहिलेली बेकरी पाहायची असेल तर ‘अमेरिकन एक्स्प्रेस बेकरी’ला आवर्जून भेट द्यायला हवी.

viva@expressindia.com