वेदवती चिपळूणकर

लहानपणापासून तिला स्पोर्ट्सची आवड होती. आऊटडोअर गेम्समध्येच ती रमायची. पुण्यात राहून तिने बारावी पूर्ण केलं. त्यानंतर केलेल्या हिमालयीन एक्स्पेडिशनमध्ये तिला तिची सायकलिंगची आवड प्रकर्षांने जाणवली आणि अशाच प्रकारचं आयुष्य जगायला आवडेल याची खूणगाठ तिने मनाशी पक्की बांधली. त्यानंतर स्पोर्ट्स मॅनेजमेंटची पदवी घेण्यासाठी ती युकेच्या ‘बर्नमथ’ युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाली. स्पोर्ट्स आणि खासकरून सायकलिंग आवडणाऱ्या तिने तो संपूर्ण देश सायकलवरून पाहिला. या सायकलच्या वेडातूनच तिने एक जगावेगळा ध्यास घेतला आणि दिवसरात्र एक करून तिने त्यासाठीची सगळी पूर्वतयारीही केली. ठाम निश्चय आणि बेधडक वृत्ती यांच्या जोरावर जगाला अविश्वसनीय वाटेल अशी असाध्य कामगिरी तिने साध्य केली.

जगातली सगळ्यात तरुण मुलगी जिने सायकलवरून पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली ती म्हणजे पुण्याची वेदांगी कुलकर्णी. सायकलिंगची आवड आणि काहीतरी धाडसी कामगिरी करण्याच्या तिच्या आवडीबद्दल ती म्हणते, ‘‘हिमालयात पार बॉर्डपर्यंत सायकलवरून जायची माझी इच्छा होती आणि प्लॅनही होता. त्यासाठी माझ्या आईबाबांनीही मला प्रोत्साहन दिलं. त्यांनीही तो परिसर पाहिला नव्हता. त्यामुळे त्यांनी मला सोबत म्हणून आणि त्यांची पर्यटनाची हौस म्हणून माझ्याबरोबर यायचं ठरवलं. मी सायकलवर आणि ते पाठीमागे कारमध्ये असे आम्ही या अ‍ॅडव्हेंचरसाठी निघालो. एका पॉइंटपर्यंत आम्ही गेलो. मात्र नंतर पुढे एलओसीपर्यंत जाण्यासाठी कंपल्सरी कारमधूनच जावं लागलं. तिथे आम्ही आपल्या जवानांना भेटलो. मराठा बटालियनशी आमच्या गप्पा झाल्या. या सगळ्यातून मला वेगळीच हिंमत आणि स्फूर्ती मिळाली. काहीतरी भन्नाट करून दाखवायची माझी इच्छा होती. खूप मोठीमोठी स्वप्नं बघण्याची माझी आवड आणि सवय होती. जवानांशी झालेल्या गप्पा आणि इतक्या दूरवर एकटीने केलेल्या सायकलिंगने मला आत्मविश्वास आणि प्रेरणा दोन्ही गोष्टी भरभरून दिल्या.’’

२०१६ मध्ये हे हिमालयीन एक्स्पेडिशन केल्यानंतर ती युकेला पुढील शिक्षणासाठी रवाना झाली. तिथेही तिची सायकलिंगची आवड तिने पुरेपूर जोपासली. तिथल्या अनुभवाबद्दल वेदांगी म्हणाली, ‘‘जवळजवळ सगळ्या वीकेंड्सना मी सायकलवरून भटकायला जायचे. इथलं वातावरण खूप मजेशीर आहे. कोणत्याही क्षणी इथलं वातावरण बदलतं. मगापर्यंत आकाश निरभ्र असेल तरी अचानक पाऊस पडू शकतो, दिवसभर ऊन असलं तरी अचानक गारठा वाढू शकतो. तिथे नाइट सायकलिंग ही माझी आवडती गोष्ट होती. कितीतरी ठिकाणं मी एकटीने भटकून पाहिलेली आहेत.’’ या तिच्या फिरण्यात तिला कधी कधी वाईट वातावरण तर कधी चोऱ्यामाऱ्या अशा प्रसंगांनाही तोंड द्यावं लागलं, मात्र ती कशालाच घाबरली नाही. त्यातून तिची स्वत:ची हिंमत आणि विश्वास वाढतच गेला आणि काहीतरी साहसी करून दाखवावं असं तिच्या मनाने घेतलं.

जगाला अचंबित करणाऱ्या या तिच्या सायकलवारीच्या निर्णयाबद्दल सांगताना वेदांगी म्हणाली, ‘‘वेड लागलेल्या माणसासारखी मी या पृथ्वीप्रदक्षिणेचा विचार करत होते. त्यासाठी भरपूर वाचत होते, माहिती घेत होते. नुसती कल्पना सुचणं आणि ती प्रत्यक्षात आणणं यात खूप फरक आहे. त्यामुळे मार्ग काय घ्यायचा इथपासून ते कुठे कुठे कोणाकोणाची मदत होऊ  शकते, काय काय परवानग्या घ्याव्या लागतील, त्यासाठी कोणाशी बोलावं लागेल इथपर्यंत सगळ्याच गोष्टी शोधायच्या होत्या. माझ्या डोक्यातली कल्पना मी कोणालाही सांगितली नव्हती. मी वर्ल्ड रेकॉर्ड मोडणार आहे असं थेट जाहीर करायची माझी हिंमत होत नव्हती. मात्र एक दिवस लंडनमधल्या अ‍ॅडव्हेंचर सिंडिकेट टॉकमध्ये मला माझ्या ‘गोल्स’बद्दल बोलायला सांगितलं आणि तिथे मी माझं हे उद्दिष्ट जाहीर केलं. तोपर्यंत फक्त प्लॅनिंगपुरतं मर्यादित असणारं माझं स्वप्न आता मात्र प्रत्यक्षात उतरवायचं होतं आणि ते एक मोठं चॅलेंज होतं. आय वॉज नो मोअर अ ड्रीमर, बट अ डूअर!’

तिने घेतलेल्या इतक्या मोठय़ा निर्णयाबद्दल ती अगदी आत्मविश्वासाने सांगते, ‘‘माझ्या निर्णयावर माझ्या जवळच्या माणसांपैकी कोणीही मला काही निगेटिव्ह बोललं नाही. कोणीच मला माझ्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या आईबाबांनीही मला भरभरून प्रोत्साहनच दिलं. काहीजण होते ज्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर ही मोहीम हाती घेण्याचा सल्ला दिला. तो सल्ला माझ्या शिक्षणाच्या काळजीपोटीच असला तरीही एकदा ठरवल्यावर मी मागे हटणारी नव्हते. माझा निर्णय झाला होता आणि तो कोणत्याही परिस्थितीत बदलणार नव्हता. जेव्हा मी एखादा निर्णय घेते तेव्हा त्यात तेव्हाच बदल करते जेव्हा तो निर्णय अमलात आणणं अशक्य असतं किंवा मलाच त्यात काही अडचण दिसत असते. एक तर या माझ्या मोहिमेत अशक्य असं काही नव्हतं आणि दुसरं म्हणजे मला त्यात कोणतीच मोठी अडचण दिसत नव्हती. त्यामुळे चाहे जो हो जाए, मी निर्णयावर ठाम होते. एखादं मोठं ध्येय डोळ्यासमोर असण्याचे माझ्या व्यक्तिमत्त्वाला होणारे फायदेही अनेक होते. त्या निमित्ताने मी स्वत:ला आहे त्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग बनवत होते, फिटनेससाठी कसून प्रयत्न करत होते, कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची मानसिक तयारी करत होते. एवढय़ा मोठय़ा प्लॅनिंगसाठी लागणाऱ्या छोटय़ा छोटय़ा गोष्टीही करत होते. पार्टनरशिप, स्पॉन्सरशिप मिळवत होते. काय वाट्टेल ते झालं तरी मागे फिरायचं नाही हे ठरवून काय काय अडथळे येऊ  शकतात याचा अंदाज घेत होते. या मोहिमेसाठी लागणारा वेळ आणि त्यानुसार त्या त्या देशातलं वातावरण आणि हवामान यांचाही अभ्यास करत होते, त्यानुसार तयारी करत होते. एकदा ठरवलं म्हटल्यावर त्यासाठी लागेल तेवढी सगळी, काही एक्स्ट्रासुद्धा तयारी करणं हा माझा स्वभाव आहे. काहीही प्रसंग आला तरी स्वत:ला मोटिव्हेटेड ठेवण्यासाठी मनाची तयारी करत होते. मोहीम पूर्ण झाली याबरोबरच मी स्वत:ला खूप डेव्हलप केलं याचाही मला आनंद आहे आणि त्यामुळे माझ्या निर्णयाचा अभिमानही आहे.’’

भारतातली सगळ्यात तरुण फुटबॉल कोच असलेली वेदांगी आता सायकलवरून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी जगातली सगळ्यात तरुण सायकलिस्ट ठरली आहे. तरीही तिच्या म्हणण्यानुसार या मोहिमेत तिचे काहीसेच देश पाहून झालेत. उरलेले सर्व देश पाहून जगभ्रमंती करण्याचं तिचं पुढील उद्दिष्ट आहे. मोठी स्वप्नं केवळ पाहणारीच नव्हे तर हिमतीने पूर्ण करणारी सायकलबहाद्दर!

एकदा ठरवलं म्हटल्यावर त्यासाठी लागेल तेवढी सगळी, काही एक्स्ट्रासुद्धा तयारी करणं हा माझा स्वभाव आहे. काहीही प्रसंग आला तरी स्वत:ला मोटिव्हेटेड ठेवण्यासाठी मनाची तयारी करत होते. मोहीम पूर्ण झाली याबरोबरच मी स्वत:ला खूप डेव्हलप केलं याचाही मला आनंद आहे आणि त्यामुळे माझ्या निर्णयाचा अभिमानही आहे.

एखादं मोठं ध्येय डोळ्यासमोर असण्याचे माझ्या व्यक्तिमत्त्वाला होणारे फायदेही अनेक होते. त्या निमित्ताने मी स्वत:ला आहे त्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग बनवत होते, फिटनेससाठी कसून प्रयत्न करत होते, कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची मानसिक तयारी करत होते. एवढय़ा मोठय़ा प्लॅनिंगसाठी लागणाऱ्या छोटय़ा छोटय़ा गोष्टीही करत होते.

viva@expressindia.com