कीर्ती पाटसकर, मुंबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खाद्यसंस्कृतीची विविध रूपे आजवर पुस्तकांतून, दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमातून उलगडलेली आपण पाहिली आहेत. पण सोशल मीडियामुळे आजच्या तरुणाईला ब्लॉगसारखं सशक्त आणि कालसुसंगत माध्यम मिळालं आहे. तरुणाईनेसुद्धा या माध्यमाला आपलेसे करत यावर अभिव्यक्ती केली आहे. गेल्या दोन वर्षांतील ट्रेंड पाहता खाद्यसंस्कृती विषयी भरभरून लिहिले जाण्यात, मांडले जाण्यात सोशल मीडिया अग्रेसर आहे. त्यातही फूड कल्चरला प्राधान्य देण्यात आलेली फेसबुक पेजेस आणि ब्लॉगची संख्या प्रचंड आहे. त्यातून काही निवडक ब्लॉगर आपल्या खाद्यवेडय़ा सफरीचे अनुभव ‘फूड.मौला’ या सदरातून मांडणार आहेत..

काही वर्षांपूर्वी एका हिंदी फूड चॅनेलने आपल्या एका ‘टी टाइम’ रेसिपी शोसाठी गेस्ट म्हणून बोलावलं होतं. तेव्हा शेफने काही स्मूदी आणि कॉन्टिनेन्टल स्नॅक्स दाखवले होते. मला शोदरम्यान त्याला मदतही करायची होती शिवाय शूट झाल्यावर हातात स्मूदीचा ग्लास घेऊन फोटोही द्यायचा होता! ब्लॉगिंगची ठिणगी अगदी तेव्हाच पडली असं म्हणायला हरकत नाही आणि आधी सुरू असलेला फूड ब्लॉगर म्हणून माझा प्रवास अजूनच जोरात सुरू झाला.

‘फूड ब्लॉगिंग’ या कन्सेप्टला धरून आपल्याकडे लोकांमध्ये अजूनही बरेच गैरसमज आहेत. बहुतांशी लोकांना फूड ब्लॉग म्हणजे रेसिपी वाटतात तर काहींना फक्त फूड रिव्हय़ू. खरं तर फूड ब्लॉगर म्हणजे नुसताच रेस्टॉरंट रिव्हय़ू किंवा नुसत्याच रेसिपी किंवा नुसतंच फूड शोवर सहभाग घेणं, एखाद्या हॉटेलियरची मुलाखत घेणं हे नसून प्रत्येक खाद्यसंस्कृतीचा अभ्यास हा याचा मूळ गाभा आहे. टूरला जाताना जशी आपण लांबची ठिकाणं आधी शोधतो आणि जवळची सुंदर ठिकाणं विसरून जातो तसं नवीन नवीन ब्लॉगिंग करायला लागल्यावर माझं झालं. मी भारताबाहेरील खाद्यसंस्कृतीचाच अधिक अभ्यास करायला लागले. मग लक्षात आलं, तिथल्या लोकांना आपल्या जेवणाबद्दल खूप आकर्षण आहे. मग दिंडी भारतीय खाद्यपदार्थाकडे वळवली. विविधतेत एकता याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारतातील प्रांतीय खाद्यसंस्कृती. प्रत्येक राज्याचं खाणं, खाण्याच्या पद्धती, पदार्थ बनवण्याच्या कृती, वापरले जाणारे जिन्नस हे राज्यपरत्वे विभिन्न आहे. हा अभ्यास करताना बऱ्याच अमराठी रेस्टॉरंट, शेफ, खवय्ये मित्रमैत्रिणी संपर्कात आले आणि एक धक्कादायक गोष्ट आपल्या महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीविषयी जाणवली. ती म्हणजे या लोकांना ‘महाराष्ट्रीय क्यूझिन’ म्हणजे फक्त मालवणी क्यूझिन वाटतं किंवा ठाऊक होतं. बहुतांशी लोकांना मराठी जेवण म्हणजे कांदा, खोबरं आणि लसूण घालून बनवलेलं जेवण असं वाटतं होतं.

मग मी माझी दिंडी अजूनच जवळच्या तीर्थक्षेत्री म्हणजे महाराष्ट्राकडे वळवली! आणि तेही ब्राह्मणी क्यूझिनकडे. ब्रह्मांडाला फेरी मार असं सांगितल्यावर कार्तिकाने संपूर्ण पृथ्वी फिरून यावं तसं माझं झालं. आपल्या जवळच इतक्या अभ्यासपूर्ण आणि वैविध्यपूर्ण गोष्टी असताना आपण उगीच ब्रह्मांडात फिरत बसलो असं वाटलं! या अभ्यासात किंवा संशोधनात काही गोष्टी लक्षात आल्या. त्या म्हणजे ज्या मानाने महाराष्ट्रीय ब्राह्मणी जेवण अमराठी लोकांपर्यंत पोहोचायला हवं होतं तेवढं ते पोचलं नाहीये. मग मी माझ्या पंजाबी, ख्रिश्चन, उत्तर भारतीय मित्रमैत्रिणींना महाराष्ट्रातील प्रांतीय विविधता आणि खाद्यविविधता सांगू लागले. त्यांना जेव्हा मी सांगितलं, वुई हॅव स्लाइटली स्वीटिश फूड दॅन रेस्ट ऑल पीपल.. तर त्यांनी मला तुम्ही गुजराती आहात का?, असं विचारलं. मग मात्र म्हटलं, आता हद्द झाली. त्यांना एक दिवस घरी जेवायला बोलावलं आणि पूर्वीच्या काळी ब्राह्मणी लग्नाच्या पंगतीत जो पारंपरिक बेत असायचा तो केला आणि ‘सव्‍‌र्ह’ही अगदी त्याच क्रमाने केला. आधी पानात मीठ वाढलं. मग डाव्या बाजूला लिंबाची फोड, कोशिंबीर, ओली चटणी वाढली. उजव्या बाजूला उकडलेल्या बटाटय़ाची भाजी आणि वाटीत अळूचं फदफदं. मग गरमागरम पांढरा भात, गोडं वरण आणि साजूक तुपाची धार वाढली. त्यानंतर पुरी, श्रीखंड आणि मग शेवटी मसाले भात, त्यावर ओलं खोबरं, कोथिंबीर, पापड, जिलेबी आणि नंतर मठ्ठा अशी पंगतीची भैरवी केली. वाढत असताना त्यांना त्यातले हेल्थ बेनेफिट्सही समजावून दिले. वरण भातावर लिंबू म्हणजे व्हिटॅमिन सी, तूप म्हणजे स्निग्ध पदार्थ, बटाटय़ाची भाजी, पुरी ही पिष्टमय पदार्थ. पूर्वी सगळीकडे आता इतकी सधनता नसल्याने लोकांना अशा जेवणाचं अप्रूप असायचं. लग्न समारंभ, दिवाळी दसरा सणांच्या निमित्ताने असे पदार्थ बनवले जात व खाल्ले जात. सगळे जण पानावरून अगदी तृप्त होऊन उठले. जेवणाचा पहिला घास खाल्ल्यावर त्यांना जाणवलं होतं या सगळ्याच पदार्थामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ मिसळला आहे पण गुजराती पदार्थाइतके हे पदार्थ गोड नाहीयेत आणि मालवणी, कोल्हापुरी, वैदर्भीय पदार्थाइतके तिखटही नाहीयेत हेही त्यांच्या लक्षात आलं.

गोडा मसालाही वेगवेगळा असतो प्रत्येक ठिकाणचा हे सांगितल्यावर तर ते चाटच पडले. नागपूर, अकोल्यात याच मसाल्याला काळा मसाला म्हणतात आणि तो जरा ‘शार्प’ असतो, तेच पुण्याकडचा मसाला हा तितका तीव्र नसतो आणि तो ‘गोडा’ मसाला म्हणूनच ओळखला जातो हेही त्यांनी ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ ताईप्स ऐकून घेतलं. मग त्यातील एक जण बोलता झाला. त्याच्या म्हणण्याचा मथितार्थ इतकाच होता की चवीपासून ते बनवण्याच्या कृतीपर्यंत देशस्थ, कोकणस्थ, कऱ्हाडे क्यूझिननेही आपलं काही तरी वेगळेपण आणि समतोल इतकी र्वष साधून ठेवलं आहे. फक्त ते इतके दिवस इतरांना एक्सप्लोर झालं नाही एवढंच.

मध्यंतरी फूड चॅनेलवरच्या एका ‘थाळ्यांच्या उत्सवात’ मालवणी थाळी महाराष्ट्राची प्रातिनिधिक थाळी म्हणून दाखवली गेली होती पण प्रत्यक्षात अशी एकच एक थाळी महाराष्ट्राची ओळख नाही. ब्राह्मणी क्यूझिन पूर्वी पंगतीतून तरी जिवंत होती. आता पंगतीच गायब झाल्या आणि बुफे पद्धत आली. त्यात मग बटाटय़ाच्या भाजीची जागा पनीर मखनी आणि मसाले भाताची जागा जिरा राइस किंवा फ्राइड राइसने घेतली आहे. खरं पाहता, महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य म्हणता येईल जिथे पश्चिम, पूर्व, उत्तर आणि दक्षिण प्रांतात खाद्यसंस्कृती बदलत जाते. विदर्भ म्हटलं की पुडाच्या वडय़ा आणि झणझणीत सावजी चिकन डोळ्यांसमोर येतं. कोकण म्हटलं की माशांचे चविष्ट प्रकार आणि कोंबडी-वडे जिभेवर नाचू लागतात, जळगाव, धुळे म्हटलं की झणझणीत वांग्याचं भरीत भाव खाऊन जातं. मग पुण्यापासून सोलापूपर्यंत आणि पश्चिम घाटमाथ्यापासून इतर काही कोपऱ्यात अजूनही तग धरून असलेलं गोडं वरण-भात, साजूक तूप आणि इतर अनेक सिग्नेचर पदार्थ कधी पुढे येणार. पण आताशा खाद्यसंस्कृती आणि त्याचे विवेचक यांना ‘बरे’ दिवस आले आहेत. मुद्रित माध्यमांपासून समाजमाध्यमांपर्यंत अनेकांनी फूड इंडस्ट्रीतील बदलत्या ट्रेण्डची दखल घेत वाचकांना अपडेट ठेवायचा उपक्रम हाती घेतला आहे, याबद्दल त्यांचे कौतुकच! फक्त फूड ब्लॉगर म्हणून माझी झालेली फजिती ही ‘काखेत कळसा गावाला वळसा’ अशी नावाजली गेली हे मात्र निश्चित!

संकलन साहाय्य : भक्ती परब

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about bloggers experience your food travel experience