मनीष खन्ना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नारळाचा भारतात सर्वाधिक वापर धार्मिक विधींसाठी केला जातो. पूजेमध्ये नारळाला फार महत्त्व आहे. नारळ हा सर्वगुण संपन्न आहे. नारळाच्या पाण्यापासून ते सुक्या खोबऱ्याच्या वाटय़ांपर्यंत त्याचा वापर या ना त्या प्रत्येक गोष्टीत केला जातो. नारळापासून मिळणारं खोबर डेझर्ट म्हणून वापरण्यात महाराष्ट्र फार पूर्वीपासून पुढे आहे. आज आपण या लेखातून कोकोनट डेझर्टचे ट्रेंड्स व त्याच्या हटके रेसिपी पाहूयात.

नारळाच्या बहुगुणी घटकांमुळे स्वयंपाकात त्याचा सर्रास वापर केला जातो. नारळाचे पदार्थ हे स्वाद आणि पोषक घटक यांचे अफलातूनमिश्रण आहे. नारळामुळे शरीराला सुलभ पचन, योग्य प्रतिकारशक्ती, सुदृढ हृदय, प्रथिने आणि फायबर जे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते, असे फायदे मिळतात. यापूर्वी कदाचित आपण विचार केला नसेल, परंतु नारळाचा स्वाद अनुभवण्यासाठी अनेक पर्याय आहेत.

किसलेल्या ओल्या नारळाचा वापर सर्रास चटपटीत करीमध्ये, सुपमध्ये आणि करंजीसारख्या मधुर मिठाईमध्ये केला जातो. ओला नारळ वाटून त्यापासून आपल्याला दूध मिळतं. नारळाचं दूध हे व्हेगन लोकांमध्ये भलतंच प्रसिद्ध आहे. व्हेगन मंडळी गाई, म्हशीचं दूध स्वयंपाकात वापरत नाहीत. अशा वेळी ही मंडळी नारळाचं दूध स्वयंपाकात वापरतात. त्याचबरोबर ज्यांना दुधाची अ‍ॅलर्जी आहे त्यांच्यासाठी सुद्धा नारळाचे दूध हा एक आश्चर्यकारक पर्याय आहे. महाराष्ट्रीय लोकांमध्ये नारळाच्या दुधापासून अनेक चविष्ट खाद्यपदार्थ बनवले जातात. सांगायला आनंद वाटतो की ते सर्व पदार्थ व्हेगन पंथात मोडतात.

नारळाच्या पाण्याची बरोबरी औषधाशी केली जाते. ऊर्जा आणि उत्साहवर्धक अशा या पेयाचे नाना फायदे आहेत. आजकालच्या तरुण मुलांचे केस वयापेक्षा लवकर पांढरे होत आहेत. ज्याला प्रदूषण, त्यांची लाइफस्टाइल व त्यांचं खाणंपिणं जबाबदार आहे. अशा तरुणांना माझा सल्ला आहे की तुम्ही किमान आठवडय़ातून दोनदा नारळ पाण्याचं सेवन करा. ज्यामुळे तुमचे केस घनदाट व काळे राहण्यास मदत होईल. नारळापासून मिळणारं तेल हे स्वयंपाक आणि तळण्यासाठी वापरले जाते.

नारळामध्ये फॅट जास्त प्रमाणात असल्यामुळे ते क्रीमयुक्त पदार्थासाठी एक आदर्श पर्याय आहे. नारळाच्या क्रीमयुक्तपणामुळे ते शाकाहारी डेझर्ट, आईस्क्रीम आणि कुकीजसाठी एक परिपूर्ण घटक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नारळापासून तयार होणाऱ्या मिठाईला खवय्ये चांगला प्रतिसाद देत आहेत. यंदाच्या वर्षी तो प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे. नारळापासून तयार होणाऱ्या पारंपरिक पदार्थाबरोबर खवय्यांना फ्युजन खाण्याची हौस अधिक आहे. त्यामुळे नारळापासून तयार होणारे अनेक फ्युजन पदार्थ यंदाच्या वर्षी खवय्यांना जिव्हातृप्ती देणार आहेत. यंदाच्या वर्षी नारळापासून तयार होणारे स्मूथ बॉल्स, स्पार्कलिंग मिनरल वॉटर आणि हेल्दी डेझर्टस ट्रेंडिंग आहेत. मी वैयक्तिक नारळाचा चाहता असून माझ्या खूप रेसिपीमध्ये नारळाचा सर्रास वापर करतो. उदा. कोकोनट मॅकॅ रून, कोकोनट क्रीम केक, कोकोनट रवा केक, बॉउंटी के क, पिना कोलाडा केक, कोकोनट टार्ट, कोकोनट पन्नाकट्टा, टेन्डर कोकोनट मुस आणि फ्रेश कोकोनट पाई.

नारळ आणि चॉकलेट हे एक चांगले कॉम्बिनेशन आहे ज्याचा वापर बॉन चॉकलेट आणि चॉकलेट लेयर्स के कमध्ये वापर केला जातो.

कोकोनट सॅमोलिना केक

साहित्य : साखर पाणीसाठी -२०० ग्रॅम साखर, १२० मिली पाणी, १/२ लेमन ज्युस, १ चमचा गुलाब पाणी.

केकसाठी : ३०० ग्रॅम रवा, २ टीस्पून बेकिंग पावडर, १०० ग्रॅम साखर, ११५ ग्रॅम बटर, ३६० मिली दूध, १०० ग्रॅम सुके खोबरे, ३० ग्रॅम बदाम.

सिरप कृती : साखर पाणी २ मिनिटे गरम करून घ्या. नंतर त्यात लेमन ज्यूस आणि गुलाब पाणी टाकून बाजूला ठेवून द्या.

केक कृती : ओव्हनला १८० डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम करून घ्यावे. ९ बाय ९ चे चौकोनी टिन ग्रीस करून घ्यावे. एका मोठय़ा भांडय़ात रवा, बेकिंग पावडर, साखर, बटर आणि दूध यांचे मिश्रण एकजीव करून घ्यावे. नंतर त्यात सुके खोबरे मिक्स करावे. मिश्रण ग्रीसिंग केलेल्या टिनमध्ये टाकून त्यावर बदामाचे डेकोरेशन करून १५ मिनिटं बाजूला ठेवून द्या. ३० ते ३५ मिनिटं मिश्रण गरम ओव्हनमध्ये बेक करून ( शिजवून) घ्या. नंतर त्यात टूथपिक टाकून केक व्यवस्थित शिजला आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. ओव्हनमधून केक बाहेर काढल्यानंतर त्यावर सिरप टाकून एक तास बाजूस ठेवून द्यावे. सिरप केकमध्ये मुरल्यानंतर त्याचे काप करून सव्‍‌र्ह करा.

कोकोनट क्रीम केक

साहित्य : १ व्हॅनिला स्पाँज केक ६ इंच व्यास ( गोल), २५० ग्रॅम व्हीप क्रीम, एका नारळाचं ओलं खोबरं, १२० ग्रॅम शेंगदाणा चिक्की, साखर पाणी.

कृती : केकचे दोन समान गोल काप करून घ्या. शेंगदाणा चिक्कीचे बारीक तुकडे करून घ्या. केकचा एक गोल काप घ्या. त्यावर साखरपाणी शिंपडून ओला करून घ्या. त्यावर व्हीप क्रीम लावून घ्या. त्यावर ओलं खोबरं व चिक्कीचे तुकडे पसरवा. दुसऱ्या गोल कापावरसुद्धा साखरपाणी शिंपडून ओला करून समान कृती करा. काही काळासाठी केक फ्रिजमध्ये ठेवा आणि थंड सव्‍‌र्ह करा.

कोकोनट स्नोबॉल्स

साहित्य : चॉकलेट स्पाँज केक ६ इंच डायमीटर (१), चॉकलेट गनाश २०० ग्रॅम्स, कोकोनट कुकींज पावडर ५० ग्रॅम्स, सुके खोबरे १०० ग्रॅम्स, १५० ग्रॅम्स वितळलेले व्हाइट चॉकलेट

कृती : स्पाँज केकचे बारीक तुकडे करून त्यात चॉकलेट गार्निश मिक्स करून घ्या त्याचे नरम मिश्रण करून घ्या. मिश्रणाचा एक गोळा घेऊन त्यास खोलगट आकार बनवावे. त्या खोलगट भागात कोकोनट कुकींज पावडर टाकून वरून बंद करून घ्यावे आणि त्याचे गोलाकार बनवावे. बनविलेले गोलाकार बॉल्स फ्रिजमध्ये २० मिनिटे ठेवून थंड करून घ्यावे. वितळलेले व्हाइट चॉकलेटमध्ये थंड केलेले गोलाकार बॉल्स डीप करून घ्यावे आणि लगेचच सुऱ्या खोबऱ्यावरून फिरवून घ्यावे म्हणजे सुके खोबरे त्याला चिकटेल. पुन्हा त्यास १० ते १५ मिनिटस फ्रिजमध्ये ठेवून थंड करून घ्यावे आणि नंतर सव्‍‌र्ह  करावे.

व्हेगन कोकोनट मॅकॅरून

साहित्य : २ कप सुके खोबरे, १ कप नारळाचं क्रीम, ६० ग्रॅम साखर, १ टेबलस्पून सुक्या नारळाचे पीठ. (मिक्सरमधून सुक्या खोबऱ्याचं पीठ करणे), १ टेबलस्पून बदामाची पावडर, १ टीस्पून वॅनिला एस्सेन्स

कृती : एका भांडय़ात नारळाचं दूध आणि साखर गरम करून घ्या. त्यात नारळाचं पीठ आणि बदामाची पावडर एकत्र मिश्रण करून घ्या. मिश्रणात गुठळी होणार नाही याची खात्री करून घ्या. मिश्रण घट्टसर होईपर्यंत गरम करून घ्या. नंतर मिश्रणात वॅनिला इस्सेन्स आणि सुकं खोबरं टाकून मिक्स करा. एका ग्रीस केलेल्या बेकिंग ट्रेमध्ये चमच्याच्या साहाय्याने गोलाकार आकाराचे मिश्रणाचे गोळे ठेवावेत. १७० डिग्री सेल्सिअस गरम ओव्हनमध्ये १४ ते १५ मिनिटांसाठी गोल्डन ब्राउन होईपर्यंत शिजवून घ्यावे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about coconut desert