अभिषेक तेली
कट्टयावरची धमाल, कॅन्टीनमधला कल्ला, कॅम्पसमधल्या चर्चा आणि लेक्चर्स बंक करून मित्रमंडळींसोबत फिरायला जाणे, हे महाविद्यालयीन आयुष्यातील दिवस प्रत्येकाच्याच जवळचे असतात. पण या सर्व गोष्टींच्या जोडीला दरवर्षी आयोजित केले जाणारे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांची जान आहेत. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ म्हणून आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांकडे पाहिले जाते आणि यातूनच त्यांच्यातील नेतृत्वगुण व व्यवस्थापन कौशल्य विकसित होत असते. करोनामधील टाळेबंदीमुळे विद्यार्थ्यांना हे महोत्सव दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करावे लागले होते आणि त्यांचा हिरमोड झाला होता. पण आता सर्व र्निबध हटवल्यामुळे पुन्हा एकदा महाविद्यालयांचा कॅम्पस गजबजू लागला आहे. आंतरमहाविद्यालयीन महोत्सव प्रत्यक्ष स्वरूपात साजरे करण्यासाठी विद्यार्थ्यांची जय्यत तयारी सुरू झाली आहे, तर काही महाविद्यालयांचे महोत्सव नुकतेच पार पडले आहेत.
मुंबई आणि परिसरातील महाविद्यालयांमध्ये आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांचा सर्वाधिक माहौल पाहायला मिळतो. आपला महोत्सव वरचढ ठरण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांची समिती अहोरात्र मेहनत घेत असते. सुरुवातीला महोत्सवासाठी थीम आणि त्यानुसार इव्हेंट्स ठरवले जातात. त्यानंतर सर्व महाविद्यालयांच्या परीक्षांच्या तारखा पाहून वेळापत्रकाची आखणी करणे, हे सर्वात मोठे आव्हान विद्यार्थ्यांपुढे असते. मग विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थी प्रतिनिधींची एक बैठक घेऊन महोत्सवाबाबतची सर्व माहिती त्यांना दिली जाते. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने महोत्सवाचा रंग कॅम्पसमध्ये चढायला सुरुवात होते. करोनानंतर पुन्हा एकदा आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांमधला तरुणाईचा सळसळता उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळतो आहे. सर्वच महाविद्यालयांच्या तालीम हॉलमध्ये सरावाची लगबग आणि महोत्सवाच्या दिवशी जेतेपद मिळवण्यासाठी विविध महाविद्यालयांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळते. करोनानंतर पुन्हा एकदा आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांमधला तरुणाईचा सळसळता उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळतो आहे. ‘अरे.. जिंकून जिंकून जिंकणार कोण, आमच्याशिवाय आहेच कोण? आणि ‘आर यू आय ए.. रुईया रुईया’, ‘से डी से जी.. से रुपारेल’ अशा विविध महाविद्यालयांच्या स्वतंत्र घोषणांचा नाद महाविद्यालयांच्या सभागृहात घुमतो आहे. साहित्य कला, ललित कला, नाटय़, नृत्य, संगीत, मैदानी खेळ, ऑनलाइन गेमिंग आदी प्रकारांतल्या तब्बल ५० हून अधिक स्पर्धा एकाच महोत्सवांमध्ये जल्लोषात पार पडत आहेत.
करोनाच्या खडतर दोन वर्षांनंतर आंतरमहाविद्यालयीन महोत्सव प्रत्यक्ष स्वरूपात होत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सूकता होती. कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी हे महोत्सव पाहिलेच नसल्याने, पदवी महाविद्यालयात आल्यावर त्यांना खऱ्या अर्थाने या महोत्सवांचा आनंद अनुभवता येतो आहे. दुरदृश्य प्रणाली माध्यमातून पार पडलेल्या महोत्सवांमुळे एकमेकांशी नीटशी ओळख नसल्याने विद्यार्थी आता प्रत्यक्ष भेटून एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
‘आमची नवीन टीम आहे आणि टाळेबंदीनंतर प्रत्यक्ष होणारा हा पहिलाच आंतरमहाविद्यालयीन महोत्सव असल्याने आम्ही सर्वप्रथम आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘कुरुक्षेत्र’ या आपल्या महोत्सवाबद्दल माहिती देत आहोत. तसेच माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घेत सर्व गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्नही करत आहोत’, असे डहाणूकर महाविद्यालयाचा ‘कुरुक्षेत्र’ व्यवस्थापन प्रमुख श्रेयस शिंदे सांगतो.
‘करोनापूर्वी आमच्या स्वयंसेवकांची संख्या ही ६०० होती, पण विद्यार्थ्यांमधील प्रचंड उत्सुकता व उत्साहामुळे ती आता १२०० वर जाऊन पोहोचली आहे. यात कनिष्ठ व पदवी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे’, असे मुलुंडच्या व्ही. जी. वझे महाविद्यालयाच्या ‘डायमेन्शन्स’ महोत्सवाचा प्रमुख शुभंकर देखणे याने सांगितले. तर ‘इतर महाविद्यालयांच्या महोत्सवांना जाऊन खूप काही शिकायला मिळते आणि त्याचा फायदा स्वत:च्या महाविद्यालयाच्या महोत्सवाचे व्यवस्थापन करताना होतो’, असे एस. के. सोमय्या महाविद्यालयाच्या ‘उत्कर्ष’ महोत्सवाचा सदस्य अथर्व परब सांगतो.
प्रायोजक मिळवताना करावी लागतेय कसरत..
मुंबईतील अनेक महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे बजेट हे लाखोंच्या घरात असते. पण महाविद्यालयांकडून उपलब्ध करून दिला जाणारा आर्थिक निधी कमी असतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रायोजकांवर अवलंबून राहावे लागते. करोनापूर्वी आर्थिक निधी देणाऱ्या काही प्रायोजकांच्या कंपन्या या टाळेबंदीमुळे बंद पडल्या आणि विद्यार्थ्यांपुढे यंदा आर्थिक पेच निर्माण झाला. पण आता विद्यार्थ्यांच्या मदतीला करोनाकाळात छोटे-मोठे व्यवसाय सुरू केलेले उद्योजक धावून आलेले आहेत, त्यांच्या नव्या व्यवसायाला प्रसिद्धी हवी असल्यामुळे ते आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांना आर्थिक निधी देत आहेत.
आतापर्यंत झालेले महोत्सव
मुंबई विद्यापीठाच्या ‘युवा महोत्सवा’चे विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक आकर्षण असते. यंदा या महोत्सवाचे ५५ वे वर्ष असून त्याची प्राथमिक फेरी ही १३ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट आणि अंतिम फेरी ही १२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान पार पडली. दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध महोत्सवांपैकी एक असलेला सेंट झेविअर्स महाविद्यालयाचा ‘मल्हार’ हा आंतरमहाविद्यालयीन महोत्सव २८ व २९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. विविध २२ इव्हेंट्समध्ये विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते. विलेपार्लेच्या एन. एम. महाविद्यालयाचा ‘उमंग’ हा महोत्सव १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ६० हून अधिक स्पर्धामध्ये भारतातील २५० हून अधिक महाविद्यालये सहभागी झाली होती. मध्य मुंबईतील प्रसिद्ध महोत्सवांपैकी एक असलेले पोद्दार महाविद्यालयाचे ‘एनिग्मा’ व ‘ऋतुरंग’ हे महोत्सव या वर्षी २२ ते २५ सप्टेंबर दरम्यान आयोजित केले होते. प्रसिद्ध श्रीलंकन गायिका योहानी हिने या महोत्सवांना हजेरी लावली आणि तिचे गाणे ऐकण्यास विद्यार्थ्यांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. त्याचसोबत लाला लजपतराय महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचा ‘सह्याद्री’ हा महोत्सव २४ ते २७ ऑगस्ट आणि सिडनॅहम महाविद्यालयाचा ‘जल्लोष’ हा महोत्सव १२ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पार पडला.
आगामी महोत्सवांची खबरबात..
माटुंग्याचे रुईया महाविद्यालय हे सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असते. मुंबईतील महत्त्वाच्या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांमधील एक असलेला रुईयाचा ‘आरोहण’ हा महोत्सव यंदा डिसेंबरच्या मधल्या आठवडय़ामध्ये पार पडेल. साहित्य कला, ललित कला, सादरीकरण कला, इन्फॉर्मल, खेळ अशा विविध विभागांमधील ४० हून अधिक स्पर्धा ‘आरोहण’मध्ये असतील. तर डहाणूकर महाविद्यालयाचा ‘कुरुक्षेत्र’ हा महोत्सवसुद्धा डिसेंबरच्या मध्यालाच आयोजित केला जाईल. यंदा या महोत्सवाचे १० वे वर्ष असून ४५ हून अधिक निरनिराळय़ा स्पर्धा घेण्यात येतील. या महोत्सवासाठी ३०० हून अधिक स्वयंसेवकांची टीम कार्यरत आहे. मुलुंडच्या व्ही. जी. वझे महाविद्यालयाच्या ‘डायमेन्शन्स’ महोत्सवाचे यंदा २८ वे वर्ष आहे आणि हा महोत्सव १९ व २० डिसेंबर रोजी असेल. तर एस. के. सोमय्या महाविद्यालयाचा ‘उत्कर्ष’ हा महोत्सव जानेवारीच्या सुरुवातीलाच होईल. तर मुंबईतील प्रसिद्ध आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांपैकी एक असलेला एच. आर. महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळांचा ‘नांदी’ हा मराठमोळा महोत्सव जानेवारीत आयोजित करण्यात आला आहे. यात १५ हून अधिक स्पर्धा होणार असून विविध कलाकारसुद्धा हजेरी लावणार आहेत.
viva@expressindia.com