‘द व्होग वेडिंग शो’ या भारतातील सगळ्यात मोठय़ा, लोकप्रिय लग्न फॅशन सोहळ्याचे सहावे पर्व नवी दिल्ली येथे पार पडले. ज्यामध्ये नामांकित फॅशन डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, स्किनकेअर तज्ज्ञ, ज्वेलरी डिझायनर, गिफ्टिंग ऑप्शन देणारे अनेक मोठे ब्रॅण्ड असे सगळेच एकाच ठिकाणी आपल्याला भेटतात. प्रत्येक मुली-मुलासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी लग्न म्हणजे आयुष्यातील मोठा सोहळा असतो. तो नीट आणि उत्तमरीत्या पार पडावा असं सगळ्यांनाच वाटतं. लग्न म्हटलं की अनेक गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठी आपल्या बजेटमधला सगळ्यात उत्तम पर्याय निवडण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. या सगळ्यामध्ये वेडिंग ड्रेस हा महत्त्वाचा भाग आहे. लग्नात डिझायनर कपडे घालायला कोणाला नाही आवडत. अगदीच डिझायनर कपडे घालता आले नाहीत तरी डिझायनरने सेट केलेले ट्रेण्ड फॉलो करायचा आणि त्याचप्रमाणे वेडिंग ड्रेस निवडायचा प्रयत्न आजची पिढी करताना दिसते. यंदाच्या लग्नसोहळ्यात कोणते ट्रेण्ड असणार, कोणती फॅशन, कपडे, रंग यंदा वापरले जाणार या सगळ्या गोष्टींवर ‘व्हिवा’ने थेट नामांकित फॅशन डिझायनर्सनाच बोलतं केलं..
इंटरनॅशनल फॅशन विश्वात आपला ठसा उमटवणाऱ्या फॅशन डिझायनर राहुल मिश्राचं कलेक्शन मुघल आर्किटेक्चर, मुघल मिनिएचर पेंटिंग यावरून प्रेरित झालं होतं. याबद्दल राहुल सांगतो, ‘भारतीय लग्न म्हणजे मस्ती, परंपरा, कुटुंब अशा अनेक गोष्टींचा मिळून एक सोहळा असतो. संपूर्ण जगभरातून भारतीय लग्न आणि त्यात घालण्यात येणाऱ्या कपडय़ांविषयी नेहमीच चर्चा होते. आपल्या कपडय़ातून आपलं भारतीय कल्चर दिसून येतं. आणि तेच भारतीय कल्चर मला वेडिंग ड्रेस बनवण्यासाठी नेहमीच प्रेरणा देतं. यंदाचा लग्नातील कपडय़ाचा ट्रेण्ड हा इंटरनॅशनल असला तरी त्याला भारतीय टच असणार आहे. केप, जॅकेट्स, लेअरिंग, फ्लेअर्स असं सगळंच यंदा ट्रेण्डमध्ये आहे. यावरती केली जाणारी एम्ब्राएडरीचे मोटिफ जरी ट्रॅडिशनल असले तरी एम्ब्राएडरी मेटल, ब्राइट सीक्वेन्सपासून केली जाणार आहे. रंगांमध्ये यंदा पेस्टल रंग ट्रेंडिंगमध्ये असतील. नववधूचं आउटफिट नेहमीच हेवी असते पण आता सगळे लाइटवेट कपडे ट्रेण्डमध्ये आले आहेत. आणि नवरदेवाच्या फॅशनमध्ये याआधी ट्रेण्डमध्ये नसलेले सॉफ्ट पेस्टल पिंक, पिस्ता ग्रीन असे रंग ट्रेण्डमध्ये असतील.’ डिझायनर प्रत्येक कलेक्शन बनवताना ते कलेक्शन कशासाठी वापरलं जाणार आहे, त्यामागे काय स्टोरी आहे याचा विचार करतो. याचबद्दल राहुल म्हणतो, आपण बनवीत असलेला प्रत्येक ड्रेस कोणत्या कारणासाठी, कोणत्या जागी, कोणत्या कार्यक्रमासाठी वापरला जाणार आहे याचा विचार करून बनवला जातो. मला नेहमीच ट्रॅडिशनल आणि मॉडर्न या दोघांचा मेळ घालून डिझाइन करायला आवडतं.
अनेक मोठय़ा फॅशन मासिकं, शो, इव्हेंट्ससाठी काम केलेला आणि एम्ब्राएडरीज मध्ये नेहमीच वेगळे प्रयोग करणारा फॅशन डिझायनर गौरव गुप्ताचं ‘द व्होग वेडिंग शो’ मधलं तिसरं वर्ष आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याने वेडिंग ड्रेसेसमध्ये अनेक नवीन प्रयोग केले. वेडिंग ड्रेसबरोबरच कॉकटेल पार्टी, साखरपुडा, रिसेप्शन अशा कार्यक्रमासाठी यंदा त्याने कलेक्शन बनवलं आहे. ‘भारतीय लग्न हे त्यातील स्टाइलसाठी ओळ्खलं जातं. आताच्या काळातील नवरा-नवरी फॅशन कॉन्शस आहेत, आणि त्यांना नक्की आपल्याला काय हवंय ते माहीत असतं. आताची नवरी अनेक वर्षांपासून चालत आलेले ब्राइट रंग सोडून बोल्डपणे पेस्टल रंगाकडे वळली आहे,’ असं ठाम मत गौरव गुप्ता व्यक्त करतो. ‘रफ्फ्ल्स, लेअर स्कर्ट्स असे सिल्हाऊट्स. पेस्टल रंगांमध्ये ग्रे, इंग्लिश ग्रीन आणि पिंक हे रंग ट्रेण्डमध्ये असतील तर कापडामध्ये शिफोन, नेट, क्रे प असे कापड ट्रेण्डमध्ये असेल,’ असं तो सांगतो.
खास वेडिंग कलेक्शन बनवण्यासाठी फेमस असणारी फॅशन डिझायनरची जोडी म्हणजे शाल्मल आणि भूमिका. ही जोडी अनेक वर्षांपासून ‘व्होग वेडिंग शो’ मध्ये आपलं कलेक्शन सादर करते आहे. अनेक ट्रेण्डही या जोडीने सेट केले आहेत. यंदाच्या लग्नाच्या सीझनमध्ये कोणते ट्रेण्ड असणार याबद्दल त्या सांगतात, जुन्या काळापासून चालत आलेल्या डिझाइन, एम्ब्राएडरीचा वापर अजूनही भारतीय लग्नात केला जातो. त्यामुळे आम्हीही ट्रॅडिशनल गोष्टी पूर्णपणे बाजूला ठेवून कधीही काम करत नाही. ट्रॅडिशनल डिझाइनला मॉडर्न तडका लावायला मात्र आम्ही विसरत नाही. यंदाही ट्रेण्डमध्ये पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही गोष्टीतून साकारलेली फॅशन ट्रेण्डमध्ये असणार आहे. रंगांमध्ये ब्लश रोझ, हॅपी ब्लू, पावडर कोरल, माइल्ड मिंट असे नव्या धाटणीचे रंग तर ज्वेलरीच्या रंगामध्ये डार्क शेड उदाहरणार्थ रेड, ग्रीन, डीप ब्लू असे रंग असतील. ड्रेसवर क्रिस्टल आणि सिक्वेन्स एम्ब्राएडरी बघायला मिळेल.
काय मग यंदा लग्नसोहळ्यात काय काय ट्रेण्डमध्ये आहे आणि कोणती फॅशन यंदा गाजणार आहे याची माहिती तुम्हाला मिळालीच असेल. त्यामुळे तुम्ही बोहल्यावर चढणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवाच आणि यंदा कर्तव्य नसलंच तरी लग्न सोहळ्यात मिरवतानाही शॉपिंग करताना ट्रॅडिशन आणि मॉडर्न यांचा मेळ घालणाऱ्या आउटफिट्सचाच आवर्जून विचार करा!
viva@expressindia.com