श्रावणातील उपवासानंतर सलग उपवासाचा काळ म्हणजे नवरात्र. सलग नऊ  दिवस उपवास करणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. खास नवरात्राचे औचित्य साधून नवरात्राच्या नऊ  दिवसांसाठी उपवासाच्या पदार्थाच्या रुचकर पाककृती खास ‘व्हिवा’च्या वाचकांसाठी शेफ विष्णू मनोहर यांनी दिल्या आहेत.

उपवासाची इडली

साहित्य : वरई तांदूळ चार कप, हिरव्या मिरच्या ३/४, वाटलेलं आलं अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, मीठ, तूप, खाण्याचा सोडा.

कृती : वरई निवडून चार तास भिजत ठेवा. भिजवलेली वरई, मिरच्यांचे तुकडे व जिरं मिक्सरमध्ये बारीक करा. बारीक झाल्यावर या मिश्रणात मीठ, वाटलेलं आलं व आवश्यकतेनुसार दाण्याचे कूट घालून मिश्रण एकजीव करा. आपलं इडली पीठ इथे तयार होईल. मग इडली पात्र घेऊ न साच्यांना तुपाचा हात लावा. इडली पिठात आवश्यकतेनुसार सोडा घाला. साच्यात आवश्यकतेनुसार मिश्रण ओतून इडल्या वाफवून घ्या. वाफवलेल्या तयार इडल्या, वाटीभर दह्यात चिमूटभर मीठ व चिमूटभर जिरेपूड टाकून सव्‍‌र्ह करा.

उपवासाचा उपमा

साहित्य : वऱ्याचे तांदूळ एक वाटी, शेंगदाणे अर्धी वाटी तूप ४ चमचे, जिरे एक चमचा, ५-६ हिरवी मिरची, मीठ, साखर चवीनुसार, लिंबाचा रस एक चमचा, ओलं खोबरं ४ चमचे, कोथिंबीर.

कृती : एका पातेल्यात तूप घालून त्यात जिरे, शेंगदाणे व हिरवी मिरची फोडणीला घाला. नंतर यात वऱ्याचे तांदूळ घालून खरपूस भाजा. त्यात चवीनुसार मीठ, साखर, लिंबाचा रस घालून त्यावर कडकडीत गरम पाणी घाला व छान वाफ येऊ दय़ा. कोथिंबीर, ओलं खोबरं घालून खायला द्या.

साबुदाणा वडा

साहित्य : साबुदाणा २ वाटय़ा, उकडलेला बटाटा एक, दाण्याचा कूट अर्धी वाटी, दही पाव वाटी, जिरे एक चमचा, मीठ चवीनुसार, ५-६ हिरवी मिरची, कोथिंबीर.

कृती : २ वाटय़ा भिजवलेला साबुदाणा घेऊन त्यामधे एक कुस्करलेला बटाटा, दाण्याचे कूट, दही, जिरे, मीठ, साखर, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून त्याचे हलक्या हाताने गोळे करून डीप फ्राय करा.

इंदोरी उपवासी चाट

साहित्य : भिजलेला साबुदाणा एक वाटी, शिंगाडय़ाचे पीठ एक वाटी, एक किसलेला बटाटा, दाण्याचा कूट अर्धी वाटी, हिरवी मिरची एक चमचा, कोथिंबीर, भाजलेलं जिरे एक चमचा, मीठ, लिंबू, साखर चवीनुसार, ओलं खोबरं २ चमचे.

कृती : शिंगाडय़ाचे पीठ भिजवून त्यात चवीनुसार मीठ, तिखट घालून त्याची शेव पाडून घ्यावी. नंतर किसलेला बटाटा तळून घ्यावा. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यावर चाळणी किंवा कापड बांधा. त्यात साबुदाणा टाकून वर झाकण ठेवा. सव्‍‌र्ह करतेवेळी त्यातला गरम साबुदाणा घ्या, दाण्याचा कूट, मीठ, लिंबू, साखर, कोथिंबीर एकत्र करा. वरून शेव, बटाटय़ाचा किस व ओलं खोबरं पसरवून खायला द्या.

उपवासाचे फ्रुट चाट

साहित्य : मोठी रताळी २, संत्र, अननस, द्राक्ष, पपई यांच्या फोडी एक वाटी, मनुका अर्धी वाटी, संधव मीठ अर्धा चमचा, हिरवी मिरची- जिरे- कोथिंबीरची चटणी अर्धा चमचा, बटाटय़ाचा किस अर्धी वाटी, भाजलेले दाणे २ चमचे.

कृती : रताळे स्वच्छ धुऊन त्याचे पातळ काप करून ते आरारोटमध्ये बुडवून मंद आचेवर डीप फ्राय करा. त्यावर बारीक कापलेली फळे ठेवून हिरव्या मिरचीची चटणी, दाण्याचा कूट, लिंबाचा रस, मनुका, संधव मीठ मिसळून तयार केलेली चटणी घाला. वरून बटाटय़ाच्या सळय़ा घालून सव्‍‌र्ह करा.

उपवासाचे दही बोंडे

साहित्य : तीन कप साबुदाणा, बारीक चिरलेल्या मिरच्या ३/४, जिरे अर्धा चहाचा चमचा, जरुरीइतके दही, तूप, मीठ

कृती : प्रथम साबुदाणा निवडून घ्या. धुवा आणि दह्यामध्ये एक तास भिजत घाला. त्यानंतर त्यात चिरलेली मिरची, मीठ, जिरे टाकून मिश्रण कालवून घ्या. कढईत तूप गरम करा. तयार मिश्रणाची लहान-लहान बोंडे करून तळून घ्या व गरमागरम सव्‍‌र्ह करा.

 

उपवासाचे मुटकुळे

साहित्य : साबुदाणा पीठ एक वाटी, वऱ्याच्या तांदुळाचे पीठ एक वाटी, शिंगाडय़ाचे पीठ एक वाटी, मीठ, लिंबू, साखर चवीनुसार, हिरवी मिरची, दाण्याचा कूट पाव वाटी, जिरे एक चमचा, उकडलेला बटाटा एक.

कृती : सर्व प्रथम एक वाटी साबुदाणा, एक वाटी वऱ्याच्या तांदूळाचे पीठ व एक वाटी शिंगाडय़ाचे पीठ एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ घालून त्याच्या भाकऱ्या बनवून घ्या. नंतर त्या भाकऱ्या बारीक करून त्यात बटाटा मिसळा. नंतर मिश्रणाचे मुटकुळे बनवून एक वाफ आणून घ्या. त्यावर जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर याची फोडणी घालून बोराच्या भाजीबरोबर खायला द्या.

संकलन : मितेश जोशी

Story img Loader