विनय जोशी
वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण अशा मानवनिर्मित प्रदूषणात अजून भर पडली आहे ती प्रकाश प्रदूषणाची. याची सोपी व्याख्या म्हणजे नैसर्गिक अंधारावर कृत्रिम प्रकाशाचं अतिक्रमण. व्यावहारिक दृष्टया कृत्रिम प्रकाश आवश्यक आहेच, पण या प्रकाशाची तीव्रता जेव्हा पर्यावरण आणि मानवी आरोग्याला घातक होईल इतकी वाढते तेव्हा त्याला ‘प्रकाश प्रदूषण’ म्हटलं जातं.
एक होता आदिमानव. त्याला लख्ख प्रकाश फक्त सूर्यापासून मिळे. सूर्य मावळताच गुडूप अंधार होई. सूर्य उगवला की उठावं, कामं करावी, अंधार होताच थोडा वेळ चांदण्यांनी गच्च भरलेलं आकाश पाहात झोपी जावं. पुढे आगीचा शोध लागला, गुहेत शेकोटी पेटू लागली, पण हरकत नव्हती. गुहेबाहेर तर काळीभोर रात्र होती. आदिमानव सुसंकृत झाला. दिवटया, मशाली, दिवे, कंदील लावू लागला. तरी प्रकाश-अंधाराचं चक्र मात्र सुरळीत सुरू होतं. त्याप्रमाणे त्याचं आणि निसर्गाचं जैविक घडयाळ अगदी व्यवस्थित टिकटिक करत होतं. मग मात्र एक गडबड झाली. एकोणिसाव्या शतकात थॉमस अल्वा एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला आणि बघता बघता घरदार, गाव – शहर सारं उजळून निघालं. यामुळे काही नव्या समस्या सुरू झाल्या.
हेही वाचा >>> सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
प्रकाशाच्या झगमगाटामुळे ‘अर्बन ग्लो’ तयार होऊन रात्रीचं आकाश झाकोळून जातं. परिणामी मिट्ट काळोखी रात्र आणि टिपूर चांदणं आपल्या जीवनातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. लहानपणी पाहिलेले सप्तर्षी, मृग असे ठळक तारकासमूह देखील आता शहरातून दिसत नाहीत. मंदप्रकाशी ध्रुवतारा तर केव्हाच क्षितिजाजवळील प्रकाशपट्टयाने झाकोळला गेलाय. आपल्याच आकाशगंगेचा पट्टा बघण्यासाठीही बऱ्याच दुर्गम भागात जावं लागतं आहे. वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण अशा मानवनिर्मित प्रदूषणात अजून भर पडली आहे ती प्रकाश प्रदूषणाची. याची सोपी व्याख्या म्हणजे नैसर्गिक अंधारावर कृत्रिम प्रकाशाचं अतिक्रमण. व्यावहारिक दृष्टया कृत्रिम प्रकाश आवश्यक आहेच, पण या प्रकाशाची तीव्रता जेव्हा पर्यावरण आणि मानवी आरोग्याला घातक होईल इतकी वाढते तेव्हा त्याला ‘प्रकाश प्रदूषण’ म्हटलं जातं. प्रखर लाईटने उजळून निघालेली शहरं प्रकाश प्रदूषणास सर्वात जास्त कारणीभूत ठरत आहेत. रस्त्यावरचे मोठमोठे हायमास्ट लाइट्स, वाहनांचे लाइट, विद्युत रोषणाई, घरातले लाइट, जाहिरातींसाठीचे इलेक्ट्रॉनिक होर्डिग हे याला कारणीभूत आहेत. हे लोण आता खेडयांपर्यंतही पोहोचू लागलं आहे. आणि यातून पर्यावरण आणि मानवी आरोग्याच्या समस्या गंभीर होत आहेत.
अब्जावधी वर्षांपासून प्रकाश आणि अंधाराचं चक्र अव्याहतपणे सुरू आहे. यामुळे पृथ्वीवरील प्राणी, पक्षी, वनस्पती आणि आपल्यावर देखील याचा एक अदृश्य परिणाम दिसून येतो. तो म्हणजे दैनिक तालबद्धता (Circadian rhythm). बहुतांश सगळया सजीवांच्या शरीरात एक जैविक घडयाळ (Biological clock) टिकटिकतं आहे. हे दिवसाच्या वेळेप्रमाणे शरीरातील जैविक क्रियांचं नियमन करतं. मेंदूच्या तळाशी असणाऱ्या ‘हायपोथॅलॅमस’ भागात ‘सुप्रा- कायसमॅटिक- केंद्र’ Suprachiasmatic nucleus ( SCN) या घडयाळाला नियंत्रित करतं. हे घडयाळ प्रकाश आणि अंधाराच्या चक्रावर कार्य करत असतं. डोळयांमध्ये असणाऱ्या गँग्लियन पेशी प्रकाशासाठी संवेदनशील असतात. या पेशी सूर्य उगवल्यावर निर्माण होणारा प्रकाश आणि मावळल्यावर होणारा अंधार यांची नोंद घेतात आणि सुप्रा – कायसमॅटिक केंद्राकडे. पाठवतात. आणि यावरून शरीरात कॉर्टिसॉल किंवा मेलॅटोनीन हे संप्रेरक ( hormone) कार्य करतात.
हेही वाचा >>> फॅशन वीकचा डार्क समर
दिवस मावळून जसजशी रात्र होत जाते, तसं मेंदूतील‘पिनिअल’ ग्रंथीं मधून मेलॅटोनीन हॉर्मोनची निर्मिती होऊ लागते. मध्यरात्री ती सर्वोच्च िबदूपर्यंत जाते. त्याची पातळी वाढायला लागली की कार्यक्षमता कमी होते. शरीराचं तापमान कमी होऊ लागतं. आळसावल्या सारखं वाटतं आणि मग विशिष्ट पातळीला मेंदूकडून संदेश येतो, ‘चला आता सगळी कामं थांबवा आणि गुपचूप झोपी जा’. मग आपण झोपल्यावर ‘ग्रोथ हॉर्मोन’चं कार्य जोमाने सुरु होतं. पेशींची दुरुस्ती, स्निग्ध पदार्थाचं ज्वलन, प्रथिनांची निर्मिती, वाढीच्या वयात हाडांची आणि स्नायूंची वाढ अशी महत्वाची कामं हे हॉर्मोन गुपचूप करून टाकतं. दिवसभर झालेली शरीराची झीज भरून येऊ लागते. मग पुन्हा सकाळ होऊ लागताच रक्तातली मेलॅटोनिनची पातळी कमी होते. कॉर्टिसॉलची पातळी वाढू लागते. भरपूर विश्रांती घेऊन ताजातवाना झालेला मेंदू संदेश देतो ‘चला उठा कामाला लागा’. प्रकाश वाढू लागताच कॉर्टिसॉलची पातळी वाढते आणि शरीराला पुढील दिवसासाठी तयार करते. संध्याकाळ होऊन प्रकाश कमी होऊ लागतो तशी कॉर्टिसॉलची पातळी कमी होते आणि पुन्हा मेलॅटोनीन पाझरू लागत. दिवस-रात्र, प्रकाश -अंधार या चक्रावर हे सगळं घडयाळ व्यवस्थित कार्य करतं.
पूर्वी रात्री गरजेपुरत्या प्रकाशामुळे दैनिक तालबद्धता अगदी व्यवस्थित सांभाळली जात होती. ‘लवकर निजे लवकर उठे’ ही जीवनशैली शरीराच्या या तालाशी आणि हॉर्मोन निर्मितीच्या चक्राशी अगदी सुसंगत होती. आता सूर्य मावळताच रस्त्यावर मोठे हायमास्ट झळकतात. घरात प्रखर लाईट लागतात. हॉटेल्स, मॉल्स लाइटिंगनी उजळून निघतात. त्यात िबज वॉचिंग, नाईट शिफ्ट्स किंवा उगाच लेट नाईट चॅटिंग करायच्या नादात डोळयांवर कायम स्क्रीनचा उजेड पडतच असतो.
डोळयांमध्ये गँग्लियन पेशी या प्रकाशाची जाणीव मेंदूला करून देतात. आणि फसगत झालेला मेंदू म्हणतो ‘अरेच्चा अजून तर दिवसच सुरू आहे, चला काम करत रहा’. परिणामी मेलॅटोनीनचं उत्पादन रोखलं जातं. शरीरातल्या पेशी दमलेल्या असतात, पण मेंदूकडूनच कार्यरत राहण्याचा हुकूम असतो. मग बिचारं शरीर ‘चला रे माझ्या थकल्या पायांनो, हला रे माझ्या हरल्या हातांनो, दमायचं नाही.. बसायचं नाही, मेंदूवरती रुसायचं नाही’ असं गाणं गात उगाच कार्यरत राहतं. अगदी झोपेची वेळ झाली म्हणून सगळे लाइट बंद करून झोपायला जावं तर मेलॅटोनीनची पुरेशी निर्मिती न झाल्याने झोप येत नाही. झोप येत नाही म्हणून आपण पुन्हा मोबाईल बघत बसतो. स्क्रिनमधून पाझरणारा निळा प्रकाश मेलॅटोनीनची निर्मिती पुन्हा कमी करतो. तरीही कसंबसं झोपावं तर झोपेची गुणवत्ता ढासळते. गाढ झोपेत सक्रिय होणारे ग्रोथ हार्मोन नीट काम करू शकत नाहीत. दिवसभर मरगळ जाणवते.
अशी फसवणूक रोज होत राहिली की मग शरीराचं घडयाळ बिघडतं, दैनिक ताल बेताल होतो. मेलॅटोनीनच्या कमी पातळीमुळे फक्त झोपच नाही तर शरीराच्या इतर क्रियांवर देखील परिणाम होतो. भूक लागणं, पोट भरल्यासारखं वाटणं , आतडयांची हालचाल यांच्यावर देखील मेलॅटोनीनचा प्रभाव असतो. परिणामी पचनसंस्था गडबडते. आणि अॅसिडिटी, अल्सर, ‘इरीटिबल -बॉवेल -सिंड्रोम’ असे पचनसंस्थेचे विकार डोकं वर काढतात. शरीरातल्या स्निग्ध पदार्थाचं ज्वलन पूर्ण होत नाही आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. नव्या संशोधनानुसार सततच्या कृत्रिम प्रकाशाचा शरीरातील इन्शुलिन स्त्रवणावर देखील नकारात्मक परिणाम घडतो. टाईप-२ मधुमेहाची शक्यता वाढते. मेलॅटोनीनचा रोगप्रतिकार शक्ती नेटकी राखण्यात देखील महत्त्वाचा वाटा आहे. पुरेशा मेलॅटोनीन अभावी रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होत इतर अनेक समस्यांची भर पडते. बरं या सगळयाचे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक परिणाम देखील आहेत. विस्कळीत जैविक लयबद्धतेमुळे नैराश्य (depression ), चिंता (anxiety disorder), स्मृतिभ्रंश, बोधनक्रियेमध्ये अडथळे (Cognitive Impairment) अशा मानसिक आजारांची शक्यता देखील बळावते.
फक्त माणसालाच नाही तर पृथ्वीवरच्या इतर घटकांनाही या प्रकाश प्रदूषणाची झळ बसते आहे. प्राण्यांमध्ये शिकार, पुनरुत्पादन, झोप, स्थलांतर अशा महत्त्वाच्या जैविक क्रिया पृथ्वीच्या प्रकाश आणि अंधाराच्या दैनंदिन चक्रावर अवलंबून असतात. रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशाचा उभयचर प्राणी, पक्षी, सस्तन प्राणी, कीटक आणि वनस्पतींसह अनेक प्राण्यांवर नकारात्मक आणि घातक परिणाम होतो असे वैज्ञानिक पुरावे मिळाले आहेत. प्रकाश प्रदूषणामुळे निशाचर जीवांच्या जीवनात अडथळा निर्माण होतो. स्थलांतर करणारे अनेक पक्षी चंद्र आणि ताऱ्यांच्या प्रकाशाच्या संदर्भाने प्रवास करत असतात. प्रकाश प्रदूषणामुळे या पक्ष्यांची दिशाभूल होते. प्रकाश प्रदूषणामुळे जंगली भागातील कीटक प्रकाशाकडे आकर्षित होऊन त्यांची संख्या कमी झाल्याचंही संशोधनात आढळलं आहे.
सुदैवाने आता प्रकाश प्रदूषणाबाबत जागरूकता वाढते आहे. यात तरुणाई मोठया प्रमाणात कार्यरत असल्याचं दिसतं. इंटरनॅशनल डार्क-स्काय असोसिएशन सारख्या जागतिक संघटनांनी या प्रयत्नांना सूत्रबद्ध रूप दिलं आहे. या कार्यात लोकसहभाग वाढवण्यासाठी या संघटनेद्वारे दरवर्षी एप्रिल महिन्यात अमावास्येच्या आसपास इंटरनॅशनल डार्क-स्काय वीक साजरा केला जातो. इतर वेळीही काही सोप्या उपायातून प्रकाश प्रदूषण बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकतं. सगळयाच लाइटची गरजेपेक्षा जास्त तेजस्विता टाळता येऊ शकते. रस्त्यावरच्या लाइटवर लॅम्प शेड लावून प्रकाश फक्त जमिनीच्या दिशेला वळवता येऊ शकतो. घरातील अनावश्यक लाइट बंद करणं, मंद प्रकाशाचा वापर करणं असे उपाय आपण वैयक्तिक स्तरावर करू शकतो. आणि आपल्या आरोग्यासाठी झोपण्याआधी काही तास मंद प्रकाशात घालवणं आणि स्क्रीनटाइम पूर्णपणे टाळणं हेदेखील करायला हवं.
९०च्या दशकातील लोकप्रिय मालिका ‘शक्तिमान’ मधील व्हिलन तमराज सतत अंधेरा कायम रहे म्हणत असे. त्याची ही नकारात्मक इच्छा आजच्या काळाची गरज कधी बनली कळलंच नाही. प्रकाशाची ओढ माणसात उपजतच असते. लख्ख प्रकाशा इतकाच गडद अंधार हादेखील निसर्गचक्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपलं आणि पर्यावरणाचं भविष्य अंधकारमय होऊ द्यायचं नसेल तर प्रकाशाचा अतिरेक टाळायलाच हवा. viva@expressindia.com