पंकज भोसले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय चित्रसंगीताचा कर्ता आणि श्रोतृवर्ग भयरस स्वरापासून कधीच दूर नव्हता, मात्र गाण्यांतील प्रेमधुमाकुळात त्याच्याकडे हवे तितके कानलक्ष गेले नाही. ‘महल’ सिनेमातील ‘आयेगा आनेवाला’, ‘पुनम की रात’मधील ‘तुज बिन जिया उदास’, ‘गुमनाम’ सिनेमातील ‘गुमनाम है कोई’ या भयमात्रा असलेल्या चित्रपट गीतांमधील वाद्यावळ आणि स्वररचना खास पटकथेशी जुळणाऱ्या आहेत. गाणी शोधली तर बरीच सापडतील. भूतरहित सिनेमांपैकी ‘जलबिन मछली नृत्यबिन बिजली’ नामक चित्रपटात गुड, बॅड अग्लीच्या लोकप्रिय धूनवर आधारलेले ‘तारो में सजके’ आणि वाद्यावळींशी खेळणाऱ्या सलील चौधरी यांनीच संगीतबद्ध केलेले ‘अन्नदाता’ चित्रपटातील ‘रातो के साये घने’ रात्रीवरची उत्तम गाणी आहेत (मराठीत ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘काजळ राती’ने सारखी किती गाणी सेकंदांत आठवतील?). सिनेसंगीतातील अलीकडचे उदाहरण हवे असेल, तर ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ मालिकेतील ‘काला रे’ या गाण्याचा एकांतात आस्वाद घ्यायला हवा. सुरुवातीच्या कमी वाद्यांपासून विस्तारत जाणारा त्याचा परिणाम अद्भुत आहे. अर्थात गाणी ऐकताना कुणी रससिद्धांताचा विचार करीत नसला, तरी एखादे गाणे विशिष्ट मन:स्थितीतच ऐकायला फार छान वाटण्याची अवस्था प्रत्येकाने कळत-नकळत अनुभवलेली असते.

हे सगळे आठवण्याचे कारण या आठवडय़ात शॉरोन व्हॅन इटन या गायिकेचे प्रसिद्ध झालेले ‘ज्युपिटर फोर’ हे गाणे. या गाण्याच्या पार्श्वभागी उमटणारे सारे स्वर हे एखाद्या भीतीपटामध्ये सहज खपून जातील असे आहेत. शॉरोन व्हॅन इटन या गायिकेची सारी गाणी ऐकणारा वर्ग आपल्याकडे फार नाही. कारण अर्थात आपल्यासह जगभरातील पॉप वर्तुळाला आवडणाऱ्या उडत्या चालींशी या गायिकेला घेणे देणे नाही. तिने जी गाणी तयार केली आहेत, ती खासच लोकसंगीत आणि लोकप्रिय संगीताच्या सीमेवरचे आहे. पुढील महिन्यात तिचा नवा अल्बम प्रसिद्ध होणार असून त्याआधीची तयारी म्हणून काही गाणी या महिन्यातच ऐकण्यासाठी उपलब्ध झाली आहेत. ‘ज्युपिटर फोर’ ठीकठाक वाटले, तर ‘अफ्रेड ऑफ नथिंग’ हे तिचे जुने गाणे ऐकून पाहा (अर्थात भयरसासाठी नाही). चाल आणि वाद्यावळीतील साधेपणाही किती चांगला परिणाम देऊ शकतो, हे त्यातून समजू शकेल.

भयसिनेमा- टीव्ही मालिकांच्या थिम्स आणि काही गीत-संगीतकर्त्यांना असलेल्या भयाकर्षणामुळे काही सुंदर भयरस स्वरांची निर्मिती झाली आहे. काही वर्षांपूर्वी ‘युटोपिया’ नावाची ब्रिटिश मालिका प्रचंड गाजली होती. या टीव्ही मालिकेसाठी तयार करण्यात आलेली थीम शोधून पुन:पुन्हा ऐकावी अशी आहे. या थिममध्ये इलेक्ट्रॉनिक संगीताचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. पण सर्वात लक्षखेचक ठरते ती शिटीवर वाजविलेला मुख्य धूनतुकडा. या धूनची लोकप्रियता इतकी होती की, फक्त या टय़ुनला विस्तारून लांबुडकी व्हर्शन्स तयार करण्यात आली आहेत.

ख्रिस्तोफर तपिया द वीर या संगीतकाराने या धूनसोबतच आणखी एका टीव्ही मालिकेसाठी दिलेले संगीत चर्चेत राहिले. ‘ह्य़ुमन्स’ या कृत्रिम मानवावर आधारलेल्या मालिकेमधले संगीतही युटोपियाच्या तोडीचे आणि डाऊनलोड करून ऐकत राहावे असे आहे. या काहीशा भय-थ्रिलर मालिका पाहिल्या तर त्यातील संगीताचा त्यांच्या लोकप्रियतेतला वाटा काढता येऊ शकणार नाही.

‘रोझमेरीज बेबी’ या चित्रपटामधील अंगाईगीताने त्या चित्रपटाच्या प्रकृतीला अधिक परिणामकारकता मिळालेली पाहायला मिळेल. ‘ट्वेण्टी एट डेज लेटर’ या डॅनी बॉयलच्या झॉम्बीपटासाठी वापरण्यात आलेल्या संगीताचा बाज आणखी वेगळा आहे.

लेडी गागापासून मॅडोना, बियॉन्से यांच्या काही पॉप गाण्यांमध्ये भयरसाचा मारा आढळतो. ‘स्कायफॉल’ या बॉण्डपटातील गाण्याने आपल्याकडे परिचित असलेली आणि बऱ्याच ग्रॅमी पुरस्कारावर नाव गोंदवणारी ब्रिटिश गायिका अडेल हिच्या ‘चेझिंग पेव्हमेण्ट’मधील भयरसासाठी त्याचा व्हिडीओही पाहावा लागेल. अर्थातच ते तिचे लोकप्रिय गाणे नाही.

सोबत दिलेल्या संगीत तुकडय़ांना अनुभवताना भयरसाने ओथंबलेली आपल्याकडची नेमकी किती गाणी आपण आत्तापर्यंत ऐकली याचा एक डोक्याला ताण देणारा संगीत व्यायाम करता येईल.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about fear music formatting