भक्ती परब

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संवादातून विचारांचे धागे जुळत जातात आणि मग त्यातून कधी बोध होतो, तर कधी विरंगुळा मिळतो. मात्र सध्या हा संवाद मोबाइलच्या स्क्रीनमध्येच गुंतून पडला आहे. मोबाइल गेमच नव्हे तर त्यावर सहजी उपलब्ध होणारा हरएक आशय तरुणाईला एकलकोंडे करत चालला आहे..!

प्रेमाने, आपुलकीने उच्चारलेला एक शब्दसुद्धा कुणासाठी तरी प्रेरणा ठरू शकतो. आणि हाच संकेत ठरून आपल्या आणि इतरांच्या जीवनात तो आनंद घेऊन येतो. पण आपुलकीचा हा शब्द आपल्यापर्यंत येण्यासाठी मुळात आपला इतरांशी संवाद तर असायला हवा. संवादातून विचारांचे धागे जुळत जातात आणि मग त्यातून कधी बोध होतो, तर कधी विरंगुळा मिळतो. मात्र सध्या हा संवाद मोबाइलच्या स्क्रीनमध्येच गुंतून पडला आहे. मोबाइल गेमच नव्हे तर त्यावर सहजी उपलब्ध होणारा हरएक आशय तरुणाईला एकलकोंडे करत चालला आहे..!

गल्लोगल्ली उपलब्ध असलेले फ्री वाय-फाय स्पॉट्स, स्वस्त किमतीत मिळणारे इंटरनेट यामुळे आजूबाजूचे भान विसरून त्यात जग हरवत चालले आहे हे सहजी दिसणारे चित्र. प्लॅटफॉर्मवर लोकलचेही भान नसणारी मंडळी, सणासमारंभात एकत्र आलेले पण आपापल्या मोबाइलमध्ये गढलेले कुटुंबीय हे रोजचे चित्र आहे. मात्र हे चित्र मुलांच्या बाबतीत फारच धोकादायक ठरते आहे. आधी फक्त मोबाइल गेम खेळण्यात मग्न असलेली तरुण मंडळी सध्या वेबसीरिज, वेबफिल्मसारख्या आशयाच्या आहारी चालली आहे. आधी टीव्ही बघताना एक एपिसोड पाहिला की पुढच्या एपिसोडची उत्सुकता असायची. आता मात्र एखादी वेबसीरिज बघायला आलेल्या प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यासाठी बिंज वॉचिंगचा पर्याय दिला जातो. त्यामुळे एकापाठोपाठ एक भाग बघणे चालूच राहते, कधी रात्र संपते, कधी सकाळ होते, कळत नाही. अशा प्रकारे ऑनलाइन आशयाच्या आहारी जाणे हे फार घातक आणि गंभीर प्रकरण असल्याची माहिती मानसशास्त्रज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी दिली.

‘आधी मुले पुस्तके वाचणे, मैदानी खेळ खेळणे आणि टीव्ही बघणे या गोष्टी करत होती. पण गेल्या दोन-तीन वर्षांत हे चित्र बदलले आहे. मुले दिवसाचे १० ते १५ तास हल्ली मोबाइलवर ऑनलाइन वेबसीरिज किंवा त्यांना आवडणारा आशय बघतात. यात गेमिंग आणि पोर्न सोडून ते इतर वेबसीरिजसारख्या आशयाला जास्त खिळलेले असतात. हे ऑनलाइन कंटेन्ट पाहण्याचे व्यसन इतर कुठल्याही व्यसनांपेक्षा वाईट आहे. अशा मुलांचे जग त्यांच्यापुरते सीमित होऊन जाईल की काय, अशी भीती ते व्यक्त करतात. या मुलांच्या वागण्यात विचित्र बदल होताना दिसतात, असे ते सांगतात. ही मुले कोणामध्ये मिसळत नाहीत. असे व्यसन लागलेली मुले अभ्यास सांभाळून हे सगळे बघतो, असेही कारण देतात. पण काही मुलांच्या अभ्यासावरही यामुळे परिणाम झाला आहे. काही मुले कंटाळ्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ऑनलाइन राहत असल्याचे कारण देतात, असे ते त्यांच्याकडे आलेल्या केसेसच्या अनुभवातून सांगतात. यामुळे १० ते ४० वयोगटातील लोकांच्या मानसिक आजारांच्या तक्रारीचे प्रमाण मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्याकडे समाजमाध्यमांविषयी सकारात्मक मत व्हायला २०१५ साल उजाडले. तोवर आपण ते टाइमपासचे साधन म्हणूनच त्याकडे बघत होतो. परंतु हल्लीची तरुण पिढी या माध्यमाचा ब्लॉगलेखनापासून ते त्यांच्याकडे असलेल्या एखाद्या टॅलेंटचा प्रचार-प्रसार करून त्याचा व्यावसायिक माध्यम म्हणून वापर करू लागले, त्यालाही आता दोन वर्षे लोटली. ही स्थिरता या माध्यमात येतच होती, तेवढय़ात मार्केटिंगचा वापर इतका वाढला की ही माध्यमेही त्यात भरकटली. तोवर वेबसीरिजने भारतात मूळ रोवायला सुरुवात केली होती. वेबसीरिजच्या जाहिराती वगैरेसाठी पुन्हा समाजमाध्यमांचाच वापर केला जाऊ  लागला. त्यामुळे समाजमाध्यमे आणि त्यांना जोडून घेत विस्तारणाऱ्या वेबसीरिजच्या विश्वाने तरुणाईला पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली आहे. याबद्दल आपले अनुभव मांडताना केईमच्या मानसशास्त्रीय विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर म्हणाल्या, आमच्याकडे केईएम रुग्णालयात १२ ते २० वयोगटातील मुलांना समुपदेशनासाठी त्यांचे पालक घेऊन येतात. पण थेट वेबसीरिज कंटेन्ट अ‍ॅडिक्शन किंवा मोबाइलचे व्यसन अशा स्वरूपात त्या तक्रारी आमच्याकडे येत नाहीत. तर नेहमीच्या वर्तणुकीत बदल अशा अनुषंगाने येतात. मुलगा अभ्यास करत नाही ही त्यामध्ये एक प्रामुख्याने पालकांची तक्रार असते. त्याचबरोबर मुलांची चिडचिड होणे, स्वत:मध्येच गुंग असणे, एकलकोंडा होणे, सतत मोबाइल हाती असणे ही लक्षणे त्यांच्यामध्ये पालकांना दिसतात. थोडक्यात मुलांच्या वागण्यात होणारा बदल आणि अभ्यासात कमी पडणे या दोन गोष्टींमुळे अशा प्रकारच्या मानसिक समस्यांना आपली मुले बळी पडली आहेत हे ओळखता येते. अशा वेळी पालकांना आधी समुपदेशन करावे लागते, असे डॉ. पारकर म्हणाल्या. पालकांना समजावून सांगितल्यावर मग मुलांशी बोलायला सुरुवात करतो. यात जास्तीत जास्त मुलेही मोबाइल ऑनलाइन आशय बघत त्यातच गुंग असणारी असतात. मग त्यांना समजून सांगावे लागते. अभ्यासाच्या वेळा आणि मोबाइलवर वेबसीरिज बघण्याच्या वेळा ठरवून घ्या. त्यानुसार हळूहळू बदल करा. अशी मुले हट्टी, उर्मट, चिडचिडी आणि अधिक टोकाची म्हणजे कधी कधी हिंसक होतात. किंवा स्वत:त गुंग होऊ न जातात. त्यांचे व्यसन कुठल्या पातळीपर्यंत गेले आहे हे लक्षात घेऊन किती सेशन्स घ्यावी लागणार हे ठरते, अशी माहिती त्यांनी दिली.

आजच्या आधुनिक काळाशी अपडेट नसलो तर मागे पडू असे वाटणारे भय तरुण पिढीला सतावत असते. याच चिंतेतून मुक्ती मिळावी यासाठी विरंगुळा म्हणून ऑनलाइन काही आवडते ते पाहावे म्हटले तर तेही आपल्याला व्यसनाच्या अंधकारमय जगात ढकलू लागलेय. यामध्ये कुठे तरी समतोल साधायला हवा, असा विचार मानसोपचारतज्ज्ञ राजेंद्र बर्वे मांडतात. ते म्हणतात की, तरुणाईच नाही तर विविध वयोगटांतील माणसांना ऑनलाइन माध्यमाची सवय झाली आहे. ज्यांच्याकडे वाय-फाय, डेटा पॅक या गोष्टी सहज उलपब्ध आहेत, अशी सगळ्या वयोगटातील माणसे या व्यसनाला बळी पडतात.

रिकाम्या वेळेत, लांबच्या प्रवासात पूर्वी आपण पुस्तके वाचायचो. त्याची जागा आता आजच्या काळाच्या माध्यमांनी घेतलीय. त्यामुळे मुले ऑनलाइन गोष्टींत मन रमवताना दिसतात. आधी मोकळा वेळ मिळाला की मित्रांबरोबर गप्पांमध्ये रंगून जाणं, बागेत फिरायला जाणं अशा गोष्टी करायचो. त्याची जागा आता ऑनलाइन माध्यमांनी घेतलीय. आपण रोजच्या धकाधकीत काही तरी विरंगुळा, मनाला भावेल असे शोधत असतो. नेमक्या त्याच गाफील क्षणी आपल्याला हा ऑनलाइन आशय आकर्षित करतो, आणि आपण त्यात हरवून जातो. कारण ही सुविधा आपल्या हाताच्या बोटावर उपलब्ध आहे. इतर गोष्टींमुळे कंटाळलेले, उडालेले मन रमवण्यासाठी असा ऑनलाइन वेळ व्यतीत करण्याची सवय लागलीय. पण या सवयीचे व्यसनात रूपांतर न होऊ देणे याकडे लक्ष द्यायला हवे आहे, असे बर्वे सांगतात.

ज्या गोष्टीत आपण जास्त लक्ष घालतो, ती गोष्ट वाढते, फळते आणि फुलते. आज काळामुळे आपल्या नात्यात आलेल्या दुराव्यावरचा उतारा आपण ऑनलाइनवर स्वत:ला रमवून शोधू पाहतोय का.. याची उत्तरे आपल्या माणसांशी बोलून सापडतील असे वाटत नाही का? थोडे थांबू, थोडा वेळ घेऊ . विचार करू..

ज्यांच्याकडे पाहून आपल्याला आपल्या ध्येयाची आठवण होईल किंवा ज्यांच्या संपर्कात आल्यावर खरे प्रेम आणि आनंदाचा दिवा मनात उजळेल अशा व्यक्तींचा शोध घेणे, त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणे गरजेचे आहे. पण हेही जर पुन्हा ऑनलाइन माध्यमातच शोधू लागलो तर कठीण आहे राव..

मुलांच्या वागण्यात होणारा बदल आणि अभ्यासात कमी पडणे या दोन गोष्टींमुळे अशा प्रकारच्या मानसिक समस्यांना आपली मुले बळी पडली आहेत हे ओळखता येते. अशा वेळी पालकांना आधी समुपदेशन करावे लागते.

– डॉ. शुभांगी पारकर

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about finding online recreation