प्रियंका वाघुले
‘शिमगा’ चित्रपटातून फिट जवान म्हणून समोर येणारा अभिनेता भूषण प्रधान त्याचा फिटनेस फंडा कसा सुरू झाला, यामागची एक आठवण असल्याचं सांगतो. शाळेचे दिवस संपून कॉलेजला जायला लागल्यावर प्रत्येकाला वाटतं आपण छान दिसावं. छान राहावं. अनेकांप्रमाणे भूषणही आपली शाळा संपवून कॉलेजमध्ये शिक्षणासाठी प्रवेश करता झाला. पण त्या वेळी त्याला कावीळ झाली. काविळीतून मी बरा झालो. मात्र त्यामुळे तब्येत दिवसेंदिवस बिघडतच गेल्याचं भूषणने सांगितलं. कॉलेजमध्ये आल्यावर मात्र त्याला आपली शरीरयष्टी बघून कसंसंच वाटू लागल्याचं तो सांगतो. त्यामुळे त्या वेळी तब्येत पुन्हा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्याने केला.
आपली उंची आणि आकारमान यानुसार आपण घातलेले कपडे व्यवस्थित बसायला हवेत, असं वाटू लागल्याने भूषणने पहिल्यांदा जिमला जाण्यास सुरुवात केली. त्याआधी खरं तर शाळेपासूनच त्याला सायकिलग, स्विमिंगची आवड होती. त्याचा फायदा झालाच, पण जिमला जाऊ लागल्यानंतर खऱ्या अर्थाने फिटनेसकडे लक्ष वेधलं गेलं, असं तो म्हणतो. कारण ठरावीक दिवसाचे टार्गेट ठेवून शरीरात हवा तो बदल घडवून आणावा, असं त्याआधी कधीच वाटलं नव्हतं असं त्याने सांगितलं.
जिममध्ये रोजचा व्यायाम करताना त्यात लेग एक्सरसाईझला जास्त प्राधान्य देत असल्याचे तो सांगतो. त्यात स्कॉट्स, लंजेस, डेडलिफ्टससारखे प्रकार असतात. कारण त्यातूनदेखील पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. आणि त्यातून शरीरातील फॅ ट्सची योग्य झीज होण्यासही मदत होते आणि आपली क्षमता वाढते. तर त्यात फंक्शनल ट्रेनिंग क रत असताना टायर पाठीवर घेऊन पुश अप्स करणं, दोरीच्या उडय़ा मारणं, या अशा वेगळ्या गोष्टीही आपल्या फिटनेसमध्ये अंतर्भूत केल्या असल्याचं त्याने सांगितलं.
सहा महिन्यांत बॉडी बनवणं, हा अतिशय विचित्र प्रकार आजकाल अनेक जण करताना दिसतात, पण अशापद्धतीने शरीरावर काम केलं तर त्याचा जितका लवकर रिझल्ट शरीरावर दिसतो, तितक्याच लवकर त्याचे वाईट परिणामही दिसू लागतात. त्यामुळे संयम ठेवून प्रयत्न करत राहणं अतिशय महत्त्वाचं असल्याचं भूषण म्हणतो. अनेक जण सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी लवकर रिझल्ट मिळणाऱ्या गोष्टी करतात, पण त्याने शरीराला, मनाला होणारा त्रासही त्या व्यक्तींनी लक्षात घ्यायला हवा, असं तो आवर्जून म्हणतो. कारण आपल्या वयासोबत आपली क्षमता, आपलं शरीर, आपलं मन सबळ होत असते. त्यामुळे योग्य पद्धतीने, आवश्यक तेवढे श्रम घेऊन संयमाने फिटनेससाठी प्रयत्न करणंच योग्य असल्याचं त्याने सांगितलं.
viva@expressindia.com