आसिफ बागवान
वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीच्या विश्लेषणातून त्याला अपेक्षित असलेल्या उत्पादनांची जाहिरात करणाऱ्या कंपन्या किंवा त्यांच्या जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचवणारी माध्यमे आपल्या ‘प्रायव्हसी’त सर्रास घुसखोरी करत आहेत. या घुसखोरीवर गेल्याच आठवडय़ात या सदरातून भाष्य केले होते. मात्र, त्याहीपेक्षा घातक असा जाहिरातींचा प्रकार या तंत्रयुगात आपल्याला गिळण्यासाठी आ वासून बसला आहे तो म्हणजे, फसव्या जाहिराती.
डिजिटल अॅडव्हर्टायझिंग हे आजघडीला जाहिरातीचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. स्मार्टफोनच्या रूपाने वापरकर्त्यांचा २४ तास इंटरनेटशी संपर्क निर्माण झाला आहे. त्यामुळे वेबसाइट, अॅप, गेम, सोशल मीडिया अशा वेगवेगळय़ा वाटांनी त्यांच्यावर सातत्याने जाहिरातींचा मारा होतो आहे. वापरकर्त्यांच्या आवडीनिवडी, सवयी, वैयक्तिक माहिती या आधारावर केल्या जाणाऱ्या ‘वर्तनाधारित’ अर्थात ‘बिहेविअरल अॅडव्हर्टायझिंग’ने तर कंपन्यांना व्यक्तीनुरूप जाहिराती करण्याचं साधन मिळवून दिलं आहे. अशा जाहिरातींच्या माध्यमातून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा कंपन्यांचा हेतू साध्य होतोच; पण ग्राहकांनाही बसल्या जागी किंमत, दर्जा, गुणवत्ता अशा निकषांवर उत्पादनांच्या खरेदीचा निर्णय घेता येतो. मात्र, हीच उपयुक्तता अलिकडच्या काळात धोकादायक ठरू लागली आहे.
वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीच्या विश्लेषणातून त्याला अपेक्षित असलेल्या उत्पादनांची जाहिरात करणाऱ्या कंपन्या किंवा त्यांच्या जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचवणारी माध्यमे आपल्या ‘प्रायव्हसी’त सर्रास घुसखोरी करत आहेत. मात्र, त्याहीपेक्षा घातक असा जाहिरातींचा प्रकार या तंत्रयुगात आपल्याला गिळण्यासाठी आ वासून बसला आहे तो म्हणजे, फसव्या जाहिराती.
‘तुम्हाला एक कोटी रुपयांचं बक्षिस लाभलं आहे’, ‘माझी २५ कोटींची इस्टेट तुमच्या नावावर करायची आहे’ इथपासून ते ‘तुमच्या संगणकात व्हायरस शिरलाय’, ‘तुम्हाला प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठवली आहे’ इथपर्यंत नाना प्रकारच्या फसव्या जाहिरातींनी इंटरनेट नावाचं महाजाल सध्या पछाडलं गेलं आहे. वापरकर्त्यांना कधी लालूच दाखवून तर कधी भय दाखवून तर कधी मोहात ओढून त्यांना एखाद्या वेबसाइटवर येण्यास भरीस पाडणे आणि त्या वेबसाइटच्या माध्यमातून त्यांची वैयक्तिक माहिती मिळवणे आणि मग त्यांची आर्थिक फसवणूक करणे, या प्रक्रियेत फसव्या जाहिराती बनवणाऱ्या चोरटय़ांनी कसब कमवलं आहे. इंटरनेट आणि एकूणच तंत्रज्ञानाबाबत आजही आपल्याकडे पुरेशी सतर्कता बाळगली जात नसल्याने अशा फसव्या जाहिरातींच्या जाळय़ात ओढले जाणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे.
यातलाच एक प्रकार म्हणजे भीती घालणाऱ्या जाहिराती. तुमच्या फोनमध्ये किंवा पीसीमध्ये व्हायरस शिरला आहे, तुमची खासगी माहिती चोरली जाते आहे, कुणी तरी तुमच्या ईमेल्सवर पाळत ठेवून आहे, इन्कम टॅक्स विभागाने तुम्हाला करचुकवेगिरीची नोटीस बजावली आहे, अशाप्रकारचे मेसेज झळकवणाऱ्या जाहिराती वापरकर्त्यांच्या मनात शंका उपस्थित करतात आणि मग त्या भीतीतून तो समोर दिसलेल्या लिंकवर क्लिक करून मोकळा होतो. लॉटरी लागल्याच्या, अॅमेझॉन- फ्लिपकार्टचं कूपन जिंकल्याच्या, परदेशातल्या कुणा व्यक्तिनं त्याची प्रॉपर्टी तुमच्या नावावर केल्याच्या जाहिरातींची तर आता सवयच झाली आहे. पण तरीही इंटरनेटशी नव्याने परिचित झालेली मंडळी या सापळय़ात अडकतातच. कॉम्प्युटरमधील सॉफ्टवेअरच्या इंटरफेससारख्या दिसणाऱ्या विंडोत आलेल्या मेसेजच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे प्रकारही वाढले आहेत.
नामांकित कंपन्या किंवा ब्रॅण्डच्या नावाने मेल किंवा मेसेज पाठवून नोकरी, डिस्काऊंट, ऑफर देऊ करणाऱ्या जाहिरातींचा प्रकार तर अतिशय चिंताजनक आहे. काही दिवसांपूर्वीच ‘अमूल’ने याचप्रकरणी गुगलला कायदेशीर नोटीस धाडली. कारण काय तर, ‘अमूल’ या ब्रॅण्डच्या नावाने नोकरी किंवा फ्रँचायझी देण्याचा दावा करणाऱ्या फसव्या जाहिराती गुगलच्या सर्च इंजिनवर प्राधान्याने प्रसिद्ध केल्या जात आहेत. या जाहिरातींना बळी पडून आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी घेऊन अनेक नागरिक ‘अमूल’कडे गेले तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला. गुगलने अशा जाहिरातींवर नियंत्रण आणलं पाहिजे. मात्र, तसं करण्याऐवजी आपला महसूल वाढवण्यासाठी ‘गुगल’ कोणतीही खातरजमा न करता अशा जाहिराती स्वीकारते आणि त्यातून मग सर्वसामान्यांची फसवणूक होते, असं अमूलचं म्हणणं. यावर गुगलने अजून तरी काही उत्तर दिलेलं नाही. पण फसव्या जाहिरातींबाबतचा ‘अमूल’चा आरोप रद्दबातल करण्यासारखा नाही.
जाहिराती हेच इंटरनेट कंपन्यांचं उत्पन्नाचं साधन आहे. त्यामुळे मिळेल त्या गोष्टीची जाहिरात घेण्याचा सपाटा या कंपन्या लावतात. हे करताना फेसबुकसारख्या कंपन्या वापरकर्त्यांची माहितीचा जाहिरातदारांना पुरवतातच, पण गुगलही याला अपवाद नाही. मध्यंतरी मुंबईतील एका सेवानिवृत्त व्यक्तीने आपल्या बँकेच्या घाटकोपर शाखेचा दूरध्वनी क्रमांक शोधण्यासाठी गुगलवर सर्च केलं. तेथे त्याला जो क्रमांक दिसला त्यावर त्याने फोन केला. पलिकडून बोलणाऱ्या व्यक्तीने या ज्येष्ठ नागरिकाकडून त्याच्या बँक कार्डाचे तपशील आणि ओटीपी मिळवले आणि त्याच्या खात्यातून परस्पर पैसे लंपास केले. यात गुगलचा दोष हा की अशाप्रकारच्या जाहिराती किंवा मजकूर कोणतीही खातरजमा करण्याची तसदी त्या कंपनीने घेतलीच नाही. जिथे मजकुरावर नियंत्रण ठेवलं जात नाही, तिथे जाहिरातींचं नियमन कसं होणार? अर्थात गुगलकडून दरवर्षी अमूक लाख-कोटी फसव्या जाहिराती हटवल्याचे आकडे जाहीर केले जातात. (गेल्या वर्षी कंपनीने एक अब्ज फसव्या जाहिराती हटवल्याचं नुकतंच जाहीर केलं). पण अशा फसव्या जाहिराती आपल्या पोर्टलवर येऊच नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेतल्यास सर्वसामान्यांची अजिबात फसवणूक होणार नाही.
राहता राहिला प्रश्न आपल्या सतर्कतेचा तर, प्रत्येकानेच इंटरनेटचा एकंदर वापर जागरुकपणे केला पाहिजे. विशेषत: जाहिरातींच्या बाबतीत तर अधिक काळजीपूर्वक निर्णय घ्यायला हवेत. ‘अॅमेझॉनवर प्रत्येक वस्तू ९९ रुपयांत’ असा मेसेज असलेली लिंक जेव्हा व्हॉट्सअॅपवर येते तेव्हा ‘असं कसं होईल’ हा प्रश्न आपली विवेकबुद्धी विचारत असतानाही खरेदीच्या मोहाने आपण त्या लिंकवर बोट लावतो. परदेशातला कुणी आपल्याला त्याची प्रॉपर्टी का देईल, असा प्रश्न स्वत:ला विचारण्याची तसदीही आपण घेत नाही. एवढंच कशाला, अनेकदा तर नामांकित कंपन्यांच्या ऑफर्सच्या खऱ्याखुऱ्या जाहिरातींचा सापळाही आपण जाणून घेत नाही. ‘५० टक्के डिस्काऊंट*’ अशा स्वरुपाच्या जाहिरातीवर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा त्या सवलतीत आपल्याला हवी ती वस्तू नसल्याचं लक्षात आल्यानंतरही आपण पुढेपुढे जाण्याचा मोह टाळू शकत नाही. नेटकरींच्या लोभ, भीती, बेफिकिरी आणि अविचारीपणा या वृत्तींच्या आधारावरच फसव्या जाहिरातींचा पिंजरा बनवला जातो. या पिंजऱ्यात अडकायचं नसेल तर ‘जागो ग्राहक जागो’.
viva@expressindia.com