गरबा हा एक अनोखा आणि मोहक नृत्य प्रकार आहे. अभ्यासायला गेलं तर त्याला जवळपास ५००० वर्षांपेक्षाही जास्त जुना असा समृद्ध वारसा आहे. मुक्त गुजराथी संस्कृतीतून पुढे आलेला हा प्रकार आता अख्या जगालाच हळू हळू भुरळ घालायला लागला आहे. गरब्यावर थिरकण्याचे, डोलण्याचे दिवस आता सुरू झाले आहेत. या नवरात्रीत गरबा खेळायचा म्हणून जवळपास महिना-दोन महिने आधीपासून गरबा क्लासेस, वर्कशॉप्स, कोरिओग्राफी अशी सगळी जय्यत तयारी करून मंडळी खेळाच्या मैदानात उतरली आहेत. गुजराथी पोशाखात गरबा आणि दांडिया खेळण्याची मजाच काही और असते. हल्ली प्रत्येक सोसायटीमध्ये, अगदी सगळ्यांच्या ऑफिसमध्ये, गरब्याच्या स्पर्धा आणि इतर बरेच कार्यक्रम नवरात्रात आयोजित केले जातात. त्या सगळ्यात तरुण पिढी अगदी हौसेने आणि जोमाने भाग घेत असते. या गरब्याचा फीवर तरुणाईला नेमका कसा भुरळ घालतोय त्याबद्दल आज आढावा घेऊया.

गरब्याची गाणी चालू झाली की शरीर आपोपच ठेका धरायला लागतं. काळानुरूप सण साजरे करण्याची तरुणाईची हटके पद्धत असतेच, त्यांचा एक वेगळा टच असतो. गरबा हे पारंपारिक नृत्य असले तरी आता त्याची व्याख्या थोडीशी बदललेली दिसते. त्याला थोडे आधुनिक रूप आले आहे. पुण्यात गेली ५ वर्ष गरबा वर्कशॉप घेणारी किंजल वखारिया सांगते, ‘गरबा नृत्य प्रकाराला आता समकालीन रूप आले आहे. रास गरबा, फ्युजन म्युझिक, बॉलिवूड थीम या सगळ्यांची सरमिसळ गरब्यात पाहायला मिळते. गुजराथी गाण्यांबरोबरचं हिंदी-मराठी गाण्यांना सुद्धा गरब्याचे बिट्स देऊन हल्ली डान्स बसवता येतो. गरब्याचे वर्कशॉप्स आयोजित करताना काही लोकांचे स्वत:चे बँड्स सुद्धा असतात, ज्यामध्ये ते लाईव्ह म्युझिक देतात. मुळातच हा डान्सचा प्रकार असल्याने लोकांना आणि विशेषत: तरुणाईला हा प्रकार जास्त आकर्षित करतो’.

stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Loksatta viva Bollywood faces of International brands Brands actress
विदेशी ब्रॅण्ड्सचे बॉलिवूड चेहरे
Romita Majumdar
फेनाम स्टोरी: टेलिंग हर ‘फॉक्स’टेल
diwali preparation at home
Diwali 2024 : आली माझ्या घरी ही दिवाळी!
corporate gifting gift trend on diwali occasion diwali gifts ideas for friends diwali gifts for family zws 70
भेटवस्तूंचा ट्रेण्ड
Loksatta viva safarnama health Tourism Sleep tourism trend
सफरनामा: झोपेसाठी पर्यटन!
loksatta viva article Blouse type Boat neck blouse Blouse type Saree Fashion
नव्याकोऱ्या चोळीचा साज
environment protection from debris
फेनम स्टोरी: भंगारातून पर्यावरण रक्षण

हेही वाचा >>> फेनम स्टोरी: डोळस संशोधक

पुण्यातल्याच रोहिणी ग्रुपच्या स्नेहल जैन सांगतात, ‘गरबा फक्त डान्स नसून ते एक गोष्ट सांगण्याचे सुद्धा माध्यम आहे. आजकाल मोठमोठ्या गरब्याच्या स्पर्धांमध्ये गरबा नृत्यातून एखादी पौराणिक, काल्पनिक, सामाजिक कथासुद्धा सांगितली जाते. गरब्याच्या आधुनिक ट्रेण्ड्सबद्दल बोलायचे झाले तर हिप-हॉप, बॅले डान्स, साल्सा, रॉक, अशा प्रकारच्या डान्स व गाण्यांमध्ये सुद्धा आता गरब्याच्या स्टेप्स बसवता येतात. किंबहुना तसं असेल तरच लोकांना ते आवडतं’. गरबा हा प्रकार सगळ्याप्रकारच्या लोकांमध्ये प्रचलित असल्याने त्यातून एक सांस्कृतिक देवाण-घेवाणही होते. आमच्याकडे समाजातील सर्व स्तरातील आणि वयोगटातील स्त्री-पुरुष हौसेने गरबा शिकायला येतात, असेही जैन यांनी सांगितले.

तरुणाईचे सेलिब्रेशन ट्रेण्ड्स हे मुख्यत: सोशल मीडियाच्या प्रभावातून बनतात. गरबासारखा दिलखुलास नृत्यप्रकारही त्याला अपवाद नाही. त्याबद्दल किंजल सांगते, ‘इन्स्टाग्राम, टिक-टॉक, युट्यूब सारख्या माध्यमांमुळे लोकांना सगळंच अगदी सहज बघता आणि अनुभवता येतं. गरबा, दांडियाचे असंख्य व्हिडीओ लोकांना उपलब्ध होत आहेत, त्यातूनच त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा आणि हौस निर्माण होते. तसंच इंटरनेटवर अशा अनेक कम्युनिटी असतात, ज्या विविध छंद आणि आवडी-निवडींबद्दल एकत्र येऊन काहीतरी करत असतात. सोशल मीडियामुळे गरबा हे नृत्य फक्त एका समाजाचं राहिलेलं नसून सातासमुद्रापार त्याची आवड आपल्याला पहायला मिळते. परदेशात जिथे जिथे भारतीय नागरिक आहेत, तिथे नवरात्रात गरबा हा प्रकार नक्कीच होतो आणि भारता इतकाच उत्साहाने होतो’.

‘गरबा शिकणाऱ्यांच्या नव्हे तर शिकवणाऱ्यांच्या हौसेलाही सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. लोकांना आपली कला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे आणि त्यासाठी सोशल मीडिया हे एकमेव माध्यम आहे. तुमची कला लोकांना किती खिळवून ठेवते हे गणित तुम्हाला कळले की तुम्ही सोशल मीडियाचे राजे झालात. गरब्याचा सध्या सोप्या स्टेप्स, थिरकायला लावणारी गाणी, ट्युटोरिअल्स असे तुम्ही सातत्याने तुमच्या पेजवर टाकत राहिलात तर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो’ अशी माहितीही किंजलने दिली.

गरब्याबद्दल बोलताना फॅशनचा मुद्दा वगळून चालणारच नाही. किंबहुना त्याला पूर्णत्व येणार नाही. गरबा हा प्रकार खऱ्या अर्थाने खुलून येतो तो त्याच्या दिलखेचक पेहराव किंवा पोषाखामुळे. पारंपरिक गरब्याचा पोषाख पाहिला तर चनिया चोळी, धोती असा असतो, परंतु त्यालाही आता ट्रेण्डी, आधुनिक टच देण्यात आला आहे. इंडो-वेस्टर्न स्टाईल तरुणाईला कायमच आवडते. त्यामुळे तशापद्धतीचे फ्युजन फॅशन स्टेटमेंट ठरतील असे पोशाख, त्यांची विस्मयकारक रंग-संगती यामुळे अधिक ट्रेण्डी ठरतात. त्यातही वैयक्तिक अभिरुची अधिक महत्त्वाची ठरते. त्यामुळे घागरा-चोली, धोती-शर्ट, स्कर्ट-टॉप आणि दुपट्टा, डबल सारी लेहेंगा, धोती विथ जॅकेट असे अनेक आधुनिक आणि नावीन्यपूर्ण प्रकार आपल्याला सध्या पाहायला मिळतात.

सध्या बाजारात पाहिलं तर ठिकठिकाणी रास-दांडियाचे कपडे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. हे कपडे तुम्ही भाड्यानेसुद्धा घेऊ शकता. पुण्याची मधुरा हुबळीकर ही भरतनाट्यम आणि गरब्याचे क्लासेस घेते. ती फॅशन बद्दल सांगते, ‘लोकांनी स्वत:चेच ब्रॅण्ड्स उभे करून कस्टमाइज्ड गरबा कॉस्च्युम बनवायला सुरुवात केली आहे. लोकांना आवडेल ती स्टाईल सध्या ट्रेण्ड झाली आहे’. तर किंजल वखारियाच्या मते, गरब्याचे कपडे म्हणजे मस्त ब्राईट रंग! जेवढे सुंदर रंग कपड्यांमध्ये असतील तेवढे तुम्ही अप्रतिम दिसता. पारंपरिक पद्धतीत स्त्रियांसाठी चनिया चोळी आणि पुरुषांची धोती हेच प्रचलित आहे, पण आता कंटेम्पररी (समकालीन) फॅशनमध्ये स्त्रियाही धोती-शर्ट किंवा टॉप असा पेहराव करू शकतात.

गरब्यामध्ये फक्त कपडेच नाही तर दागिने, मेकअप या सगळ्याच गोष्टी फार महत्वाच्या असतात. तरुण मुली इतक्या बारकाईने आणि हौशीने अगदी महिनाभर आधीपासून या सगळ्याची तयारी करतात. गरबा किंवा दांडिया खेळताना खूप घाम येऊ शकतो, त्यामुळे त्यासाठी काय काळजी घ्यायची हेसुद्धा गरबा क्लासमध्ये शिकवले जाते.

गरब्याची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत कमालीची वाढली आहे. कोरिओग्राफर्सच्या मते, गरब्याला आंतरराष्ट्रीय दर्जा हळूहळू मिळत चालला आहे. संस्कृती, आधुनिकता आणि तांत्रिक प्रगती यांचा मिलाफ गरबा नृत्यात पाहायला मिळतो आहे. आधुनिक युगात आपल्या संस्कृतीचं जतन करण्यात गरब्यासारख्या लोकनृत्यांचा मोठा वाटा आहे. त्याचं रूप कालानुरूप बदलत गेलं असलं तरी त्याचा गाभा, मनातील उत्साह, ऊर्जा मात्र आजही टिकून आहे.

viva@expressindia.com