संकलन : मितेश जोशी

कोंबडीचा रस्सा, मटणाची साथ, मच्छीची आमटी आणि बिर्याणीचा भात, बोंबलाची कढी असं भरलेलं ताट खाऊन घ्या सगळं ‘श्रावण’महिना यायच्या आत!

सोशल मीडियावर नॉनव्हेज खाबूगिरीचे मेसेज या ग्रुपमधून त्या ग्रुपमध्ये धिंगाणा घालू लागले की गटारीची चाहूल लागते. बहुतांश तरुणवर्ग श्रद्धेने व निष्ठेने श्रावण महिना पाळतो. यात प्रामुख्याने दोन गट पाहायला मिळतात. एक श्रावण संपल्या संपल्या पुन्हा नॉनव्हेज खायला सुरुवात करणारे आणि दोन गणपती विसर्जनानंतर नॉनव्हेज खाणारे. त्यामुळे सध्या चटकमटक व पारंपरिक अशा दोहोंची नॉनव्हेज पदार्थाची फोडणी घरोघरी दरवळते आहे. आईच्या हातची मालवणी व कोकणी लज्जत घरी नेहमीच अनुभवली जाते. परंतु गोवन खवय्येगिरी ही क्वचितच किंबहुना हॉटेलला जाऊ नच अनुभवायला मिळते. अशाच पारंपरिक गोवन पदार्थाची चव चिकन, मटण व निवडक मासे यांच्या साहाय्याने अनुभवण्यासाठी खास व्हिवा वाचकांसाठी गोवन फूड स्पेशालिस्ट शेफ पराग जोगळेकर यांनी गोवन फूड रेसिपी शेअर केल्या आहेत.

चिकन काफ्रेल

साहित्य : चिकनचे तुकडे १ किलो, खसखस, आलं, लसूण, हळद, चवीनुसार मीठ, तेल, कोथिंबीर, धणे, जिरं, दालचिनी, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो

कृती : खसखस, आलं, लसूण, हळद, चवीनुसार मीठ, धणे, जिरं, दालचिनी, हिरवी मिरची यांची मिक्सरमधून एक पेस्ट तयार करा. चिकनच्या तुकडय़ांना ही पेस्ट लावा व काही वेळ बाजूला ठेवा. एका पॅनमध्ये तेल गरम करा. गरम तेलात हे तुकडे फ्राय करा. चिकन शिजलं की त्यात वरून हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घालून सव्‍‌र्ह करा गरमागरम चिकन काफ्रेल..

प्रॉन्स बलचाओ

साहित्य : कोळंबी २५० ग्रॅम, आलं, लसूण, जिरं, गरम मसाला, साखर चिमूटभर, मीठ चवीनुसार, तेल, कडीपत्ता, २ कांद्याचे काप, २ टोमॅटोचे काप, लाल मिरची, मॉल्ट व्हिनेगर, खसखस

कृती : कोळंबी स्वच्छ धुऊ न घ्या. लाल मिरची, आलं, लसूण, गरम मसाला एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. मंद आचेवर गॅस ठेवा. गरम तेलात थोडंसं जिरं घाला. जिरं तडतडल्यावर पुढे त्यात कडीपत्ता व कांद्याचे काप घाला. कांदा तांबूस रंगाचा झाला की त्यात वर तयार केलेली मसाल्याची पेस्ट व टोमॅटोचे काप घालून मिश्रण एकजीव करा. मिश्रण तेल सोडू लागल्याची चिन्हे दिसू लागली की त्यात कोळंबी, मॉल्ट व्हिनेगर, चिमूटभर साखर व चवीनुसार मीठ घालून मिश्रण १० मिनिटं शिजवा व सव्‍‌र्ह करा गरमागरम प्रॉन्स बलचाओ..

मटण विंदालू

साहित्य : बारीक तुकडे केलेलं मटण, बटाटय़ाचे उभे काप, कांद्याचे उभे कप, टोमॅटोचे उभे काप, कोथिंबीर, साखर, मीठ, व्हिनेगर, लसूण, आलं, हळद, लवंग, वेलची, दालचिनी, धणे, जिरं, खसखस, लाल काश्मिरी पावडर

कृती : लवंग, वेलची, दालचिनी, धणे, जिरं, खसखस, लसूण, आलं व व्हिनेगर मिक्सरमधून वाटून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा ५ मिनिटं परतून घ्या. कांदा तांबूस रंगाचा झाला की त्यात वर मिक्सरमधून तयार केलेली पेस्ट व टोमॅटोचे काप घालून एकजीव करा. तयार मिश्रणात लाल काश्मिरी पावडर घाला. आता मिश्रण तेल सोडू लागेल. त्यानंतर या मिश्रणात बारीक तुकडे केलेलं मटण व बटाटय़ाचे उभे काप घाला व १५ मिनिटं शिजवून घ्या. मटण मऊ  झालं की त्यात चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करा मटण विंदालू..

मटण सागोती

साहित्य :

१ किलो उक डलेलं मटण, तेल, कांद्याचे उभे काप, गरम मसाला, मिरच्या, खसखस, ओलं खोबरं, किसलेलं आलं, लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, धणे, दालचिनी, वेलची

कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. गरम तेलात उभ्या चिरलेल्या कांद्याचे काप घाला. त्यांनतर त्यात गरम मसाला, मिरच्या, खसखस, धणे, दालचिनी, ओलं खोबरं, वेलची, किसलेलं आलं व लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घालून फोडणी एकजीव करा. मोठय़ा आचेवर गॅस ठेवून फोडणी १० मिनिटं शिजवून घ्या. १० मिनिटांनी हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या. एका मोठय़ा पॅनमध्ये हे मिश्रण व आधीच्या पॅनमधलं उरलेलं तेल घाला. कमीत कमी १५ मिनिटं मंद आचेवर हे मिश्रण शिजवा. तयार मिश्रणाच्या आजूबाजूला तेलाचे तवंग येऊ  लागले की त्यात १ किलो उकडलेलं मटण, चवीनुसार मीठ व कोथिंबीर घाला. १० मिनिटं मटण शिजवून घ्या व सव्‍‌र्ह करा.

सुरमई आमोटिक

साहित्य : सुरमई २५० ग्रॅम, लाल मिरच्या, लसूण, खसखस, आलं, पेपर कॉर्न, तेल, कांद्याचे काप, टोमॅटोचे काप, हिरवी मिरची, कोथिंबीर, व्हिनेगर, मीठ, पाणी १ कप

कृती : सुरमई स्वच्छ धुऊ न घ्या. लाल मिरच्या, पेपर कॉर्न, आलं, लसूण, खसखस यांची मिक्सरमधून पेस्ट तयार करून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. मंद आचेवर गॅस ठेवा. गरम तेलात कांद्याचे काप घाला. कांदा तांबूस रंगाचा झाला की त्यात वर तयार केलेली मसाल्याची पेस्ट, चवीनुसार मीठ, टोमॅटोचे काप घालून मिश्रण एकजीव करा. तयार गरम मिश्रणात सुरमई व १ कप पाणी घालून, सुरमई १० मिनिटे शिजवून घ्या. सुरमई शिजल्यावर त्यात वरून कोथिंबीर, हिरवी मिरची, व्हिनेगर घालून मिश्रण एकजीव करा व सव्‍‌र्ह करा सुरमई आमोटिक.

पापलेट कॅल्डीन

साहित्य : पापलेट १, ओलं खोबरं, बारीक चिरलेल्या मिरच्या, व्हिनेगर, लसूण, हळद, मेथ्या, तेल, १ कप पाणी, खसखस, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा

कृती : आलं, लसूण, मेथ्या, ओलं खोबरं, खसखस याची मिक्सरमधून बारीक पेस्ट  तयार करून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा ५ मिनिटं परतून घ्या. कांदा तांबूस रंगाचा झाला की त्यात वर मिक्सरमधून तयार केलेली पेस्ट, बारीक चिरलेल्या मिरच्या, १ कप पाणी घालून मिश्रण १० मिनिटं शिजवून घ्या. १० मिनिटांनी त्यात पापलेट व व्हिनेगर घालून १५ मिनिटं पापलेट एकजीव करून शिजवून घ्या. त्यानंतर वरून कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करा.