विनय नारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विणायला अवघड, वेळखाऊ, किमती साहित्य वापरलेली, किचकट रंगकारी केलेली ही खास दरबारी वस्त्रे त्या त्या राज्याची ओळख असायची. राजांचे वैभव दर्शवणारी आणि राजांना भूषण असावीत अशी असायची. परदेशी प्रवाशांच्या वर्णनांमधून व इथल्या चरित्रांमधून, सल्तनत काळापासून मुघल काळापर्यंतच्या दरबारी वस्त्रांचे वैभव व प्रचंड आवाका जाणून घेता येतो.

स्त्री-पुरुषांनी दैनंदिन व खास प्रसंगी नेसण्याच्या वस्त्रांशिवाय इतरही काही वस्त्रपरंपरा भारतात विकसित झाल्या. त्यातील काहींबद्दल आधी आपण जाणून घेतले आहे. धार्मिक श्रद्धा आणि रिवाजांमधून किती संपन्न वस्त्रपरंपरा निर्माण झाल्या हे आपण पाहिले. मंदिरे, मठ यांनी या वस्त्रपरंपरांना मोलाचा आश्रय दिला, त्यातून वैभवशाली वस्त्रनिर्मिती झाली. परंतु श्रेष्ठतम वस्त्रनिर्मितीसाठी तितक्याच तोलामोलाचा आश्रय लाभणे गरजेचे असते. भारतीय विणकरांना त्याहून श्रेष्ठ अशी वस्त्रं बनवणे शक्य होते. अशा अतुलनीय कारगिरीला राजाश्रय मिळाल्यामुळेच ‘दरबारी वस्त्रां’ची गर्वित परंपरा भारतात निर्माण होऊ शकली.

प्राचीन भारतातही वस्त्रपरंपरेला राजाश्रय होता. कौटिल्याने अर्थशास्त्रात दरबारी कारखान्यांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तेव्हाही खास दरबारी वस्त्रे विणली जात होती. बाणभट्टाने ‘हर्षचरित’ या सम्राट हर्षांच्या चरित्रात अनेक वस्त्रांचा उल्लेख केला आहे. हर्षांच्या बहिणीच्या, राजश्रीच्या लग्नात सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या पुलकबंध, पुष्पपट, चित्रपट, नेत्रा आदी दरबारी वस्त्रांबद्दल लिहिले आहे. ‘नेत्रा’ या शुभ्र वस्त्राबद्दल अकराव्या शतकातील ‘तिलक मंजिरी’ या धनपाल रचित संस्कृत ग्रंथातही राज मंडपासाठी वापरण्यात येणारे वस्त्र असे वर्णन केले आहे.

विणायला अवघड, वेळखाऊ, किमती साहित्य वापरलेली, किचकट रंगकारी केलेली ही खास दरबारी वस्त्रे त्या त्या राज्याची ओळख असायची. राजांचे वैभव दर्शवणारी आणि राजांना भूषण असावीत अशी असायची. परदेशी प्रवाशांच्या वर्णनांमधून व इथल्या चरित्रांमधून, सल्तनत काळापासून मुघल काळापर्यंतच्या दरबारी वस्त्रांचे वैभव व प्रचंड आवाका जाणून घेता येतो.

सल्तनत काळातही दरबारी वस्त्रांचे खूप महत्त्व होते. तुघलकाच्या दरबारी कारखान्यात चार हजार विणकर होते. त्यातले बहुतांश विणकर त्याने मध्य आशियातून आणले होते. हे विणकर मानाचे दरबारी पोशाख व अन्य दरबारी वस्त्रे विणायचे. त्याकाळातील वस्त्रांचे काहीही अंश शिल्लक नाहीत, परंतु मोगलांच्या थोडय़ा आधीच्या काळातील काही लंपास पद्धतीने विणलेले पट संग्रहालयांमध्ये पहायला मिळतात. त्यावरून त्या काळातील अप्रतिम कारागिरीचा थोडासा अंदाज येतो.

मुघल काळात दरबारी वस्त्रांना अपूर्व वैभव प्राप्त झाले. त्याचे काही नमुने अनेक संग्रहालयांमध्ये पाहता येतात. प्रवास वर्णनं व ग्रंथांशिवाय मुघल काळातील चित्रांमधूनही हे सारे वैभव समोर येते. अकबरनामा, पादशहानामा यांमधून हे दरबारी वस्त्रे यांचे नयनरम्य दर्शन होते.

मुघल वास्तूंमध्ये अंतर्गत सजावटीसाठी वस्त्रांच्या वापराला खूप महत्त्व होते. राजदरबारात आणि महालांमध्ये मोठमोठे पट, छतबंदी, पडदे, पंखे, गालिचे, चांदवे, तक्क्यांचे अभ्रे हे मुबलकपणे वापरले जायचे. या वस्त्रांमुळे वास्तूचे वैभव वाढायचे आणि पाहिजे तिथे खासगीपणाही निर्माण करता यायचा.

मुघलांच्या दरबारी वस्त्रांमध्ये जरीकाम आणि मीनाकाम करीत विणलेल्या आणि कशिदा केलेल्या वस्त्रांचा प्रामुख्याने वापर होत असे. दख्खनमधील सुलतान आणि राजे मुख्यत: रंगकारी केलेली सुती वस्त्रे दरबारासाठी उपयोगात आणीत. कोरोमण्डल किनारपट्टीवरील गावं रंगकारी करण्यात जगप्रसिद्ध होती. कृष्णा नदीकाठच्या गोवळकोंडा राज्याचे सुलतान सिरनौज आणि बुरहानपूरच्या रंगकारीची दरबारी वस्त्रे वापरीत. हैद्राबादचे निजाम त्या भागातल्या इकत पद्धतीच्या वस्त्राचा आणि तेलंगणातल्या विविध वस्त्रपरंपरांचा दरबारी वस्त्रांसाठी सुरेख वापर करत.

मराठा आणि राजपूत या हिंदू राजांचीही स्वतंत्र अशी दरबारी वस्त्रांची धाटणी असायची. त्या त्या भागातील वस्त्रपरंपरांच्या वापरासोबत त्यांचावरचा मुघल प्रभाव अटळ होता. राजपुतांनी पत्करलेल्या मुघलांच्या मांडलिकत्वामुळे ते मुघल दरबारात उपस्थित असायचे. त्यामुळे त्यांच्या दरबारी वस्त्रांवर मुघल प्रभाव बराच होता. राजस्थानातल्या ब्लॉक प्रिंटिंग, बांधणी या वस्त्रपरंपरांचा आणि मुघल प्रभावाचा सुरेख संगम तिथल्या दरबारी वस्त्रांमध्ये झाला.

मुघलांना शामियाना आणि कनातींचा खास शौक होता. तो शौक त्यांनी त्यांचा रसिकतेने विकसित केला आणि त्याला वैभवशाली बनवले. ती परंपरा भारतात आणली मुस्लीम सुलतानांनी. मुघलांनी ती परंपरा त्यांचा मध्य आशियायी वारसा म्हणत मिरवली. या कनातींची रचना म्हणजे घुमटाकार छत, जाळीच्या, घडीच्या भिंती अशी मध्य आशियायीच राहिली. मुघल काळात हे शामियाने आणि कनाती यांना बरेच विस्तृत स्वरूप आले. मुघलांनी आणि राजपुतांनी याला अतिशय दिमाखदार बनवले. या काळात हे फिरते महालच बनले. शिकारीला, युद्धाला, तीर्थयात्रेला किंवा अन्य प्रवासाला जाताना बादशहा, राजे कित्येक दिवस यात मुक्काम करत. भारतीय हवामानही कनातींमध्ये राहण्यासाठी पूरक आहे.

मध्यभागी बादशहा व बाजूंनी अन्य दरबारींच्या कनाती अशी रचना असायची. या लवाजम्यासाठी प्रचंड प्रमाणात वस्त्र लागायची. मुघलांच्या कनाती ब्रोकेड आणि मखमलीच्या तर राजपुतांच्या ब्लॉक प्रिंटिंग, कशिदा केलेल्या असायच्या. यावर भरपूर अलंकरण केलेले असायचे. या कनातींमध्ये मोठमोठे पट लावलेले असायचे. मुघल कनातींमध्ये लावलेल्या लंपास या अस्तंगत झालेल्या अतिशय अवघड अशा विणकामातील पटांचे, अद्भुत कारीगरीतील तीन अवशेष शिल्लक आहेत. तामिळनाडूतील सतराव्या शतकातला, नायक राजांच्या काळातला एक कलमकारीचा पट जीर्ण अवस्थेत शिल्लक आहे. हा कलमकारीचा सर्वोत्तम आविष्कार समजला जातो. यात नायक राजांचे जीवन, दरबार, मिरवणूक आदी चित्रण करण्यात आले आहे.

ब्रिटिशांनी आपल्या सोबत नेलेला टिपू सुलतानाचा (१७८२-९९) शामियाना हा या वस्त्रपरंपरेचा झगझगीत आविष्कार इंग्लंडमधील संग्रहालयात आजही दिमाखात उभा आहे. सुती वस्त्रावर ठळक रंगकारी केलेला हा शामियाना या परंपरेचे वैभव दाखवण्यासाठी पुरेसा आहे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about king palaces garments