पंकज भोसले

आपल्या नाटक आणि सिनेमांना संगीताची भली-थोरली परंपरा असली, तरी वाईट गोष्ट ही की इथे संगीताची खरी गोडी लावणाऱ्या नियतकालिकांची कधीच उपलब्धी राहिली नाही. त्यामुळे संगीत पत्रकारिता ही स्मरणरंजनाच्या पलीकडे फारशी मजल मारू शकली नाही. अमुक गायिकेने शंभर ताप असताना गायलेले गाणे कसे अजरामर झाले आणि अमुक संगीतकाराने तीव्र दु:खांतही कशी मेलडी जुळवली, हे न थकता घोटणारी व्यक्तिपूजक संगीतमीमांसा आपल्याकडे सदैव राहिली. परिणामी अपवाद वगळता गाण्याचे सौंदर्य आणि माधुर्य यांच्याबाबत ‘अवीट गोडीची’, ‘दैवी सुरांची’ असल्या भंपक उपमांपलीकडे आपल्या संगीत पत्रकारितेने मोलाचे योगदान दिल्याची नोंद नाही. याउलट ब्रिटन, अमेरिकेत सिनेसंगीतबाह्य़ सुगम संगीताचा प्रवाह नियतकालिकांनी वाढविला. व्यक्तिपूजेसह संगीतातील प्रयोगांवर आणि गाण्यातील आंतर्बाह्य़ सौंदर्यावर विवेचन करणारी पत्रकारिता साठोत्तरी काळात तयार झाली. ‘रोलिंग स्टोन’ हे त्यामधील सुपरिचित आणि आपल्याकडे परिचित असलेले नाव असले तरी स्पिन, एनएमई, क्यू, मोजो, शतकी परंपरा असलेले बिलबोर्ड या नियतकालिकांनी संगीतश्रोत्यांची आणि वाचकांची पिढी घडविली. उपमांच्या पलीकडे जाऊन गाण्यातला कोणता घटक आपल्याला आवडतो, का आवडतो, याचा वाचकांना शोध लावून देण्याचे काम या संगीतप्रचारकांनी केले. म्हणजे आपल्याकडच्या कोणत्याही संगीत समीक्षकाला आर डी बर्मन यांनी गाण्यांमध्ये वापरलेली कॉर्डयंत्रणा मुलाखतीत खोदून विचारता आली नाही, किंवा जतीन-ललितच्या गाण्यातील मेलडीचा शोध घ्यावासा वाटला नाही. संगीतबाह्य़ जगतातील या कलाकारांच्या आयुष्याची माहिती, कारकीर्दीचा चढता आलेख यांच्यापुरतीच इथली पत्रकारिता मर्यादित राहिली. एमटीव्हीने लोकप्रिय संगीत जगातील घराघरांत पोहोचले आणि रेडिओ वाहिन्यांच्या भरभराटीसोबत संगीत मासिकांना, नियतकालिकांना नवसंगीताच्या भाष्यकारांची गरज भासू लागली. रोलिंग स्टोनसारख्या पारंपरिक संगीत मासिकांनी गंभीर पत्रकारिताही करायला सुरुवात केली. इंटरनेट आल्यानंतर संगीत अनियतकालिकांचा आणि संगीताची उत्तमरीत्या चिरफाड करणाऱ्या तरुणांचा वर्ग तयार झाला. एका रेकॉर्ड स्टोअरमध्ये क्लर्कचे काम करणाऱ्या आणि हायस्कूल उत्तीर्ण झालेल्या रायन श्रायबर या अवघ्या विशीतील तरुणाने ‘पिचफोर्क’ नावाची संगीताच्या समीक्षेचे संकेतस्थळ उभारले. या वेबसाइटने आजच्या संगीत पत्रकारितेमध्ये प्रचंड मोठी घुसळण केली. एखाद्या गाण्यावर, अल्बमवर चार-पाच ते दहा हजार शब्दांचे प्रदीर्घ आणि रसपूर्ण लेख वाचण्याची शिस्त या संकेतस्थळाने वाचकांना लावली. अल्पावधीतच या संकेतस्थळाने मांडलेले संगीत परीक्षण आणि अल्बमवर दिलेले रेटिंग हा अंतिम निवाडा ठरायला लागला आणि छापील नियतकालिकांपेक्षा पीचफोर्कच्या नावाचा दबदबा संगीत वर्तुळात वाढला. गेल्या २२ वर्षांत या संकेतस्थळाने संगीतज्ञान वाटपाचे प्रचंड मोठे कार्य केले आहे. याच्या आरंभीचे काही लेखक आज सेलेब्रिटी संगीत समीक्षक आहेत. सध्या ‘न्यू यॉर्कर’ या साप्ताहिकात संगीतावर लिहिणाऱ्या अमॅण्डा पॅत्रूसिच या लेखिकेचेही विस्तृत लेखन या संकेतस्थळावर मिळेल. या संकेतस्थळाने काही वर्षे ‘पिचफोर्क रिव्ह्य़ू’ हे छापील नियतकालिकही काढले होते. या संकेतस्थळाचे आणखी एक योगदान म्हणजे इण्डिपेण्डण्ट कलाकारांना आणि त्यांच्या गाण्यांना मोठय़ा प्रमाणावर पुढे आणण्याचे काम आपसूक झाले. या संकेतस्थळाचा प्रचंड मोठा चाहता वर्ग असून, दर वर्षी त्यांचा संगीतजलसा चालतो. या संकेतस्थळावर ताज्या ऐकणीय अल्बमच्या यादीत तुम्हाला कार्डी बीपासून लॉर्डपर्यंत सारेच सुपरिचित आणि सातत्याने सगळीकडे ऐकले जाणारे कलाकार तळात दिसतील. तर आपल्याकडे जराही न ऐकल्या गेलेल्या नावाच्या कलाकारांना पुढे केलेले आढळेल. यातील सोफी हंटर या गायिकेचे या यादीत दिलेले गाणे तिच्या डान्स अल्बममधील सर्वात मंद लयीत चालणारे गाणे आहे. पिचफोर्क संकेतस्थळावर या संपूर्ण अल्बमला का ऐकायचे याचे विस्तृत विवेचन करण्यात आले आहे. स्नेल मेल या बॅण्डने पाचेक महिन्यापूर्वी पहिलाच अल्बम काढला. त्या बॅण्डच्या ‘प्रिस्टिन’ या गाण्याचे कौतुक करीत या बॅण्डच्या साऱ्याच गाण्यांचे विच्छेदन वाचताना उपमाविरहितही उत्तम लिहिता येऊ शकते, याचा परिचय होऊ शकेल.

गेल्या दोन-तीन वर्षांत ब्रिटन आणि अमेरिकेतील नियतकालिकांना लागलेल्या ओहोटीमध्ये कित्येक संगीत मासिके गतप्राण झाली आहेत. काहींनी ऑनलाइन वाट पकडली आहे, तर काही पुरती गोंधळली आहेत. पिचफोर्क संकेतस्थळाकडून मात्र संगीतज्ञानाचा धबधबा अविरत कोसळत आहे. कानांना सातत्याने चांगला संगीतसाठा पुरवायचा असेल, तर या धबधब्याची ओळख करून घेणे महत्त्वाचे आहे.

viva@expressindia.com

Story img Loader