– वेदवती चिपळूणकर
निखळ हास्याने आणि नॅचरल अभिनयाने आबालवृद्धांच्या मनात घर करणारी लाघवी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. ललित कला केंद्रातून नृत्याचं शिक्षण घेऊन, भरतनाटय़ममध्ये पदवी आणि मास्टर्सची डिग्री घेतलेली प्राजक्ता नेहमीच वेगवेगळय़ा रूपांत प्रेक्षकांना भेटली आहे. मात्र पहिल्यांदा ती प्रेक्षकांच्या गळय़ातील ताईत बनली ते ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतली मेघना म्हणून!
भारतात केवळ वीस व्यक्तींना दिली जाणारी भारत सरकारची कला क्षेत्रातली शिष्यवृत्ती भरतनाटय़मसाठी प्राजक्ताला मिळाली होती. ‘शिकत असतानाच मला भूमिकांच्या ऑफर्स येत असायच्या, मात्र शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी थांबले होते. ‘तांदळा- एक मुखवटा’ हा माझा पहिला चित्रपट होता,’ असं प्राजक्ता सांगते. त्यानंतर ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ ही माझी पहिली मालिका. ‘गुड मॉर्निग महाराष्ट्र’च्या माध्यमातूनसुद्धा मी काही काळ घराघरांत पोहोचले होते. लोकांच्या परिचयाची झाले होते, मात्र सगळय़ात जास्त लोकप्रियता मला मिळवून दिली ती ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने.. असं सांगताना खरं तर हे क्षेत्रच आपल्याला रुचत नाही आहे असं सुरुवातीला वाटत होतं, असं ती स्पष्ट करते. ‘माझ्या एकदम पहिल्या मालिकेच्या वेळी मला सारखं असं वाटत होतं की, हे आपल्याला सूट होत नाहीये, एवढं हेक्टिक वेळापत्रक, धावाधाव, घरापासून लांब राहणं आणि एकंदरीत ते काम माझ्यातल्या नर्तिकेला फारसं रुचत नव्हतं; पण त्याच काळात मला खूप काही शिकायला मिळालं. घेतलेलं काम पूर्ण करायचं, ते अर्धवट सोडायचं नाही, हा माझा विचार आणि तत्त्व असल्यामुळे मी ते करत राहिले. या सगळय़ात माझ्या आईने मोठी भूमिका पार पाडली आहे. तू चांगलं काम करतेस, तुला जमतंय, लोकांना आवडतंय, असं तिने सतत प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मी सातत्याने पुढे जात राहिले, काम करत राहिले,’ असं ती म्हणते. आईचं प्रोत्साहन हाच प्राजक्तासाठी महत्त्वाचा क्लिक पॉइंट ठरला आहे, हे ती आवर्जून सांगते.
नाटकासाठी रंगमंचावर वावरलेली, वेब सीरिजमध्येही दिसलेली, दैनंदिन मालिकांमधून आपल्या घरची झालेली प्राजक्ता चित्रपटातही प्रेक्षकांना भेटली. कधी ‘खो-खो’मधली सुमन असेल, तर कधी ‘हम्पी’मधली गिरिजा! ती कायमच स्वत:चा वेगळा ठसा उमटवत आली आहे. मात्र ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेला लोकप्रियता मिळाल्यानंतरच या क्षेत्रात पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतला, असं प्राजक्ता म्हणते. ‘लोकांना ज्यासाठी खूप मेहनत करावी लागते अशी प्रसिद्धी मला त्या मालिकेने मिळवून दिली. मीही मेहनत केली, पण मेहनत करूनही अनेकांना लोकांचं हे प्रेम मिळू शकत नाही आणि मला ते खूप आपसूक मिळालं होतं. मला ज्या अर्थी ते मिळालं आहे, त्या अर्थी ते सोडून जाण्यासाठी नव्हे. त्यामुळे मी हे क्षेत्र सोडता कामा नये असं मला वाटलं. नृत्य माझ्या अंगात भिनलेलं आहे. त्यामुळे ते माझ्यासोबत आयुष्यभर असणार आहे. अभिनय हे क्षेत्र मात्र मर्यादित काळासाठी खुलं आहे, त्यामुळे जोपर्यंत करता येतं आहे तोपर्यंत काम करत राहावं, असा विचार मी केला,’ हेही ती मनमोकळेपणाने सांगते. अभिनयाच्या क्षेत्रातील अस्थिरता लक्षात घेऊनही तिने आनंदाने आणि पूर्ण तयारीनिशी पुढची वाटचाल आजपर्यंत सुरू ठेवली आहे.
आपलं काम आपल्यातल्या कलाकाराला सतत आव्हान देणारं असावं अशा पद्धतीने नेहमी भूमिकांची निवड करणारी प्राजक्ता करिअरच्या इतर पर्यायांबद्दल म्हणते, ‘मी काहीच करायचं नाही, असंही करून पाहिलं. मात्र मला कंटाळा येतो. किंवा दुसरं कोणतंही काम करणं मला पसंत पडलेलं नाही. त्यामुळे मी माझ्याच कामात वैविध्य कसं येईल हे बघते.’ सध्या ‘रानबाजार’ या वेबसीरिजमधील तिच्या भूमिकेमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. रोजची मळलेली वाट सोडून काही तरी वेगळी, तिच्या रूढ प्रतिमेपेक्षा नवी भूमिका करण्याचं धाडस तिने दाखवलं. ‘चॅलेंज घ्यायला मला आवडतं म्हणूनच मी ‘रानबाजार’मधली रत्नाची भूमिका स्वीकारली. प्रेक्षकांना कदाचित आवडणार नाही याची कल्पना होती तरीही मला अभिनेत्री म्हणून ही भूमिका आवडली होती आणि मी ती केली. मालिकांचे भाग कोणी पुन:पुन्हा पाहत नाही. चित्रपटात अनेकदा लोणचं असल्यासारख्या तोंडी लावण्यापुरत्या भूमिका मिळण्याची शक्यता असते. मात्र वेबसीरिजला वेळेची मर्यादा नसते. त्यामुळे तेही वेगळं माध्यम आहे,’ असं मत तिने स्वानुभवातून व्यक्त केलं. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून वेगळं काही करण्याची संधी फार कमी कलाकार घेतात. प्राजक्ताने ती आनंदाने घेतली, त्यामुळे एका अर्थी ‘रानबाजार’मधली तिची ही भूमिकाही तिच्या करिअरच्या दृष्टीने एक क्लिक पॉइंट ठरली असंच म्हणावं लागेल. यापुढेही अशाच वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्राजक्ता बहरत राहील, यात शंका नाही.
viva@expressindia.com