तेजश्री गायकवाड
मिस्टर इंडिया, मिस्टर वर्ल्ड प्रमाणेच ‘मिस्टर सुपरनॅशनल’ ही स्पर्धा होते. या ‘मिस्टर सुपरनॅशनल’ स्पर्धेमध्ये प्रत्येक देशातील एक प्रतिनिधी आपापल्या देशाचं नेतृत्व करतो. यंदा भारतातून प्रथमेश मौलिंगकर या तरुणाने भारताचं नेतृत्व केलं आणि ‘मिस्टर सुपरनॅशनल’चा किताबही देशाच्या नावावर केला. ‘मिस्टर सुपरनॅशनल २०१८’ हा किताब मिळवणारा प्रथमेश हा मुळचा फुटबॉलपटू आहे. आशिया खंडातून ‘मेन्स हेल्थ मॅगझिन’च्या मुखपृष्ठावर झळकणारा हा पहिला फुटबॉलपटू आहे. गोव्यामध्ये स्वत:ची जिम असणारा, टीव्हीवर काही शोज केलेल्या प्रथमेशने त्याचा हा प्रवास आणि मॉडेलिंग व अशा सौंदर्यस्पर्धाबद्दलचे अनुभव खास व्हिवासोबत शेअर के ले आहेत.
‘मी २०१७ साठी ‘मिस्टर इंडिया’ स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर मी पोर्नियातील क्रिनिका-जाद्रोज येथे ‘मिस्टर सुपरनॅशनल २०१८’साठी भारताचे प्रतिनिधित्व केले आणि हा किताब जिंकलाच. मी यासाठी पूर्ण वर्षभर मेहनत करत होतो. स्पर्धेत मला सगळं बरोबरच करायचं होतं, कुठेही तयारीत कमी ठेवायची नव्हती’, असं प्रथमेशने सांगितलं. मी माझ्या बॉडीबरोबरच लोकांसमोर भाषण देणे, डान्स, स्वत:चं ग्रुमिंग या सगळ्या गोष्टींवर कसून मेहनत घेतली. आणि वर्षांखेरीस मी मोठा किताब माझ्या आणि आपल्या देशाच्या नावाने करू शकलो. या प्रवासात मी अनेक नवीन लोकांना भेटलो आणि त्यांच्याकडून शिकलो, असं तो सांगतो. सौंदर्यस्पर्धेत स्वत:ची पूर्ण तयारी करणे आणि त्यानुसार आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरणे हा नाही म्हटलं तरी मोठाच प्रवास असतो आणि त्यात अडचणीही तितक्याच येतात, असं प्रथमेश सांगतो. ‘मुळात या स्पर्धेसाठी स्वत:ला पूर्पपणे तयार करणं हेच मोठं आव्हान होतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट अचूक करायची तर त्यात अनेक अडथळे येणारच हे लक्षात ठेवून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आणि त्यावर कायम राहणे हेच मोठं आव्हान होतं’, असं त्याने सांगितलं.
दरवर्षी अशा मॉडेलिंगच्या, टायटलच्या आणि सौंदर्य स्पर्धा वेगवेगळ्या पातळीवर किंवा स्तरावर होतात. पण त्याचंही स्वरूप आता बदलू लागलं आहे. पूर्वीप्रमाणे फक्त गोरे गोमटे चेहरे, चांगली देहयष्टी असणारेच याच स्पर्धेत भाग घेऊ शकतात, असं अजिबात राहिलेलं नाही. आता यातही नवनवीन ट्रेण्ड येऊ लागले आहेत. हा बदल स्पष्ट करताना तो म्हणतो, आधीच्या मॉडेलिंग क्षेत्रात आणि आताच्या क्षेत्रात खूप बदल झाला आहे. आताच्या काळात अनेक स्पर्धामुळे जास्तीत जास्त संधी मिळतायेत. आणि यापुढेही त्या मिळत राहतील. तुम्हाला फक्त येणाऱ्या प्रत्येक संधीकडे नीट लक्ष ठेवून त्याचा वापर करून घ्यायचा आहे. सौंदर्यस्पर्धामधील बदल तर नेक्स्ट लेव्हलचा आहे. यामध्ये भाग घेलेल्यांना साधीशीही चूक महागात पडू शकते एवढं लक्ष या स्पर्धेत द्यावं लागतं, असं प्रथमेश म्हणतो. तुम्हाला प्रत्येक मिनिट अन् मिनिट तुमचे शंभर टक्के द्यावेच लागतात. या स्पर्धाच्या पॅटर्नमध्येही थोडे बदल झाले आहेत. पर्सनल इंटरव्ह्यू, प्रायमरी स्टेप्स, आणि काही सब कॉटेस्ट्स याची भर पडली आहे’, असं त्याने सांगितलं. या स्पर्धाच्या येणाऱ्या ट्रेण्डबद्दल तो ठाम मत व्यक्त करतो की सगळेचजण आपल्या लूकबद्दल, हेल्थबद्दल जागरूक होऊ लागले आहेत. मुली किंवा स्त्रिया या आधीपासूनच स्वत:च्या दिसण्याचा, राहणीमानाचा विचार करतात तसंच आता पुरुषही स्वत:च्या लूकचा, अपिअरन्सचा विचार करू लागले आहेत. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षांपासूनच मुलं स्वत:च्या शरीराकडे लक्ष देऊ लागतात, जिमला जायला सुरुवात करतात. या गोष्टींमुळे महिलांच्या स्पर्धेप्रमाणे पुरुषांच्या स्पर्धेतही अगदी तगडा संघर्ष करावा लागतो, असं तो सांगतो.
याशिवाय, बाह्य़सौंदर्याबरोबरच आंतरिक सौंदर्याचाही यात कस लागतो, असं त्याने सांगितलं. आंतरिक सौंदर्य, तुमचे विचार, तुम्ही समाजासाठी काय करता अशा अनेक गोष्टींचा या स्पर्धामधून जाणीवपूर्वक विचार होऊ लागला आहे, या गोष्टीकडे प्रथमेशने लक्ष वेधले. आपण ज्या देशाचे प्रतिनिधीत्व करतो तिथली संस्क-ती, सामाजिक परिस्थिती आणि तुमचा त्याबद्दलचा विचार-कृती महत्वाचे ठरू लागले असून आंतरिक विकासाला वाव देणारे असे अनेक ट्रेण्ड यापुढे या स्पर्धामध्ये येतील, असे तो ठामपणे सांगतो.
‘मिस्टर सुपरनॅशनल’ ही स्पर्धा म्हणजे सुपर मॉडेल आणि हाय फॅशन टेलिव्हिजन प्रॉडक्शन करण्यासाठी सुरु केलेली स्पर्धा असल्याचं मानलं जातं. दरवर्षी साधारणपणे ३६ देश आणि प्रांत यात भाग घेतात. मॉडेलिंग आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीजसाठी नवीन प्रतिभा शोधणे हा या स्पर्धेचा हेतू असल्याचेही प्रथमेशने सांगितले.