फक्त मराठीत वापरले जाणारे असे काही वाक्प्रचार आहेत जे मराठीचे अगदी ‘ओरिजिनल’ आहेत. इतर कोणत्याही भाषेत त्यांचे तंतोतंत भाषांतर होऊ शकत नाही. असाच एक तरुणाईचा लाडका पण इतरांना उद्धट वाटणारा वाक्प्रचार ‘फाटय़ावर मारणे’. ज्याने संपूर्ण तरुणाईच्या ‘अॅटिटय़ूड’ला दोन शब्दांत बांधलं आहे असा हा वाक्प्रचार. खरं तर याच पिढीने नव्हे तर प्रत्येकच पिढीने आपल्या तरुण वयात बाळगलेला हा अॅटिटय़ूड आहे. ‘माय लाइफ, माय रुल्स’ म्हणून आताच्या पिढीने त्याला हॅशटॅग आणि टॅगलाइन बनवून सोशल मीडियावर जाहीर केलं इतकंच काय ते या पिढीचं वेगळेपण!
इतरांच्या म्हणण्याला काडीमात्र किंमत न देता आपल्याच मनासारखं वागण्यासाठी हा वाक्प्रचार वापरला जातो. सरधोपट शिष्टाचार न पाळता, त्यात अडकून न पडता आपल्याच मर्जीने गोष्टी करणं म्हणजेच इतरांच्या म्हणण्याला परस्पर बगल देऊन आपल्याला हवा तो रस्ता पकडणं. शब्दश: फाटय़ावर मारणं म्हणजे आपल्या रस्त्यात येणाऱ्या सगळ्यांना कोणत्याही मार्गाने बाजूला करणं. तेच तरुणाई अनेकदा अवलंबताना दिसते. लोक नेहमी बोलतच राहणार, त्यामुळे आपण ऐकत राहिलो तर आपल्याला कोणतीच गोष्ट धड करता यायची नाही हे तरुण वयात सगळ्यांनाच कळत असतं. मात्र नंतर या कळलेल्या उघड सत्याचं काय होतं कोणास ठाऊक की ज्यामुळे प्रत्येक तरुण पिढी मोठी होऊन इतरांच्या आयुष्यात नाक खुपसायचा अधिकार स्वत:हून स्वत:कडे घेते. इतरांना फाटय़ावर मारणं याकडे अनेकदा तरुणाई स्वत:चं स्वातंत्र्य म्हणून पाहते. आपल्या स्वातंत्र्याच्या उपभोगावर इतरांचं नियंत्रण असू नये म्हणून इतरांना फाटय़ावर मारण्याचा पर्याय अवलंबला जातो.
मात्र प्रत्येक वेळी हे ‘फाटय़ावर मारणं’ सकारात्मक असतं असं नाही, किंबहुना बहुतेकदा ते सकारात्मक नसतंच! आपल्याला हवं तसं वागण्यासाठी सोयीस्करपणे इतरांना फाटय़ावर मारलं जातं. अनेकदा आपल्यापेक्षा मोठी माणसं आपल्या चांगल्यासाठी सांगत असूनही त्यांना किंमत न देता हट्टाने हवं तेच करणं एवढय़ापुरताच या फाटय़ावर मारण्याचा मतलब उरला आहे. ज्याला तरुणाई स्वत:चं स्वातंत्र्य आणि हक्क समजते तेच फाटय़ावर मारणं खरं तर स्वैराचाराच्या कक्षेत जातं. हे तरुणाईच्या लक्षात येईल तेव्हा आपल्या हक्कासाठी इतरांना फाटय़ावर मारण्यातला ‘पॉझिटिव्ह’ दृष्टिकोन वागण्यात येईल.
viva@expressindia.com