गेल्या काही दिवसांपासून ड्रेक या गायकाचे ‘इन माय फिलिंग’ हे गाणे सांगीतिक कारणांऐवजी धाडसासाठी जगभर प्रसिद्ध झाले. कुणीतरी चालत्या गाडीतून उतरून ‘कीकी डू यू लव्ह मी’ हा या गाण्याचा मुखडा समाजमाध्यमावर प्रसिद्ध केला आणि मेंढरासारखे त्याचे अनुकर्ते बनले. गेल्या काही दिवसांत भारतातील रेल्वे डब्यांतील प्रवाशांपासून नृत्यनिपुण गाडीधारकांनी या गाण्यावरच्या स्वचित्रित व्हिडीओवर धांगडधिंगा घातला. दिल्लीपासून डहाणूपर्यंत हे गाणे मुखडय़ापलीकडे ऐकले गेले नाही अन् तरीही त्याचा प्रचार आणि प्रसार आपल्याकडे तरी अजून थांबलेला नाही. जगभरातील वाहतूक पोलिसांमध्ये या ड्रेकधारी गानअस्त्राने दहशत माजविली आहे. अन् या ‘कीकी’ गाण्यावरून समाजमाध्यमांवर झालेल्या ‘खीखी’ टवाळखोरीदरम्यान ड्रेक या गायकाची क्रेझ अमेरिकी तरुणाईने आपल्या डोक्यातून उतरवून टाकली आहे. गेल्या रविवारी अमेरिकेत ‘टीन चॉइस अ‍ॅवॉर्ड’ पार पडले, त्यात याचेच पडसाद उमटलेले दिसले. या पुरस्कारांच्या संगीत विभागामध्ये नामांकन असलेल्या ड्रेकला डावलून तरुणाईने लुई टॉमलिन्सन या गायकाला आपली सारी मते देऊन टाकली. फॉक्स नेटवर्कतर्फे दरवर्षी होणाऱ्या या पुरस्काराचे वैशिष्टय़ म्हणजे देशभरातील तरुणाईकडून संगीत, सिनेमा आणि इतर अनेक घटकांमधील आपल्या आदर्शाबाबतची मते मागवली जातात. यात गंमत असते, ती प्रचंड गाजत असलेल्या आणि पुरस्कारांमागून पुरस्कार घेत असलेल्या इन्स्टण्ट हिट गायकांबाबत देशभरातील तरुणाईची खरोखरची मते समोर येत असतात. म्हणजे एखाद्या कलाकाराच्या अल्बम विक्रीचे आकडे, बिलबोर्ड लिस्टमधील सर्वोत्तम स्थान या उघड दिसणाऱ्या बाबी दिसत असल्या, अन् ती व्यक्ती अतिप्रसिद्धीच्या आहारी गेलेली असली, की तो बाज या पुरस्कारामध्ये टिकण्याची चिन्हे नसतात.

गिनेस बुकमध्ये आपल्या गाण्यांचे विक्रम नोंदविणारा आणि यंदाच्या ग्रॅमी पुरस्कारांवर छाप पाडणारा ब्रुनो मार्स, बिलबोर्ड चार्टद्वारे आपल्या गाण्यांचा विश्वविक्रम रचणारा ड्रेक आणि अगदी अलीकडेपर्यंत तरुणींच्या कानांतील अंजन असलेला एड शीरन या तिघांऐवजी अमेरिकी तरुणाईने लुई टॉमलिन्सन या ब्रिटिश गायकाला या पुरस्कारासाठी निवडले.

‘वन डायरेक्शन’ नावाच्या आयरिश/ब्रिटिश बॅण्डमध्ये दिशाहीन भटकत असलेल्या या गायकाने स्वतंत्र गाणी देण्यास सुरुवात केली आणि त्याचा काही वर्षांत बराच उत्कर्ष झाला. या गायकाला किंवा त्याच्या पूर्वाश्रमीच्या बॅण्डलाही आपल्याकडे ऐकणारे फार कमीच सापडतील. पण टीन चॉइस अ‍ॅवॉर्ड पटकावण्याइतपत त्याचा वकुब असल्याने, त्याची काही उत्तम गाणी ऐकायलाच हवीत अशा गटात मोडणारी आहेत. यूटय़ूबवर त्याच्या नावाने सर्च करायला गेलात, तर बिबी रेक्सासोबतचे त्याचे ‘बॅक टू यू’ हे गाणे पहिल्यांदा सापडेल. उडत्या चालीचे हे गाणे रोखठोक शब्दांमुळे हिट झाले आहे. स्टीव्ह अयोकी या कलाकारासोबतचे त्याचे ‘जस्ट होल्ड ऑन’ नावाचे गाणे उत्साहवर्धक आणि लक्षात राहणारे आहे. फुटबॉल वर्ल्डकपला वाजविल्या जाणाऱ्या गाण्यांसारखा तालवाद्यांचा मेळ असलेले हे गाणे कुणालाही सहज आवडेलसे आहे. त्याची बाकीची सारी गाणी एकसारख्याच धाटणीची आणि चालीची वाटत असली, तरी त्या गाण्यांच्या चाहत्यावर्गाची निव्वळ यूटय़ूबवरील आकडेवारी थक्क करणारी आहे. लुई टॉमलिन्सनच्या वन डायरेक्शन या बॅण्डमध्ये मात्र काही उत्तम गाणी सापडू शकतात. अर्थात, हा बॅण्ड आला तो काळ बॅकस्ट्रीट बॉइज किंवा बॉयझोनइतका सुपीक नसल्यामुळे त्यांची गाणी आपल्याकडे कमी अपरिचित आहेत. या मिसरूड अवस्थेतील बॅण्डने आफ्रिकेतील गरिबी हटाव मोहिमेत सहभागी होऊन मोठा मदतनिधी उभारला होता. त्यासाठी ब्लॉण्डी या न्यू व्हेव्ह म्युझिकचा आरंभ करणाऱ्या बॅण्डचे ‘वन वे, ऑर अनदर’ या गाण्याचे वन डायरेक्शनने केलेले व्हर्शन ऐकण्यासोबत पाहण्यासारखेही आहे. कारण त्यांनी या म्युझिक व्हिडीओचा खर्च टाळून स्वत:च तो तयार केला आहे. लुई टॉमलिन्सनची  इतकी प्रेमगाणी या लेखात एकत्र घेण्याचे कारण तो आगामी काळातील एड शिरन आणि ड्रेक आहे. अत्यंत लहान वयात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चुणूक दाखवून त्याने पुढील काळ गाजविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आपल्याकडे आलेल्या मेंढरासारख्या किकी फिव्हरला आवरता घेण्यासाठी या नव्या कलाकाराच्या वाटेला जाण्याचा पर्याय उत्तम आहे. संगीतभानासोबत नव्या शैलीची स्वरावट कानांवर पडू शकेल.

viva@expressindia.com