गेल्या काही दिवसांपासून ड्रेक या गायकाचे ‘इन माय फिलिंग’ हे गाणे सांगीतिक कारणांऐवजी धाडसासाठी जगभर प्रसिद्ध झाले. कुणीतरी चालत्या गाडीतून उतरून ‘कीकी डू यू लव्ह मी’ हा या गाण्याचा मुखडा समाजमाध्यमावर प्रसिद्ध केला आणि मेंढरासारखे त्याचे अनुकर्ते बनले. गेल्या काही दिवसांत भारतातील रेल्वे डब्यांतील प्रवाशांपासून नृत्यनिपुण गाडीधारकांनी या गाण्यावरच्या स्वचित्रित व्हिडीओवर धांगडधिंगा घातला. दिल्लीपासून डहाणूपर्यंत हे गाणे मुखडय़ापलीकडे ऐकले गेले नाही अन् तरीही त्याचा प्रचार आणि प्रसार आपल्याकडे तरी अजून थांबलेला नाही. जगभरातील वाहतूक पोलिसांमध्ये या ड्रेकधारी गानअस्त्राने दहशत माजविली आहे. अन् या ‘कीकी’ गाण्यावरून समाजमाध्यमांवर झालेल्या ‘खीखी’ टवाळखोरीदरम्यान ड्रेक या गायकाची क्रेझ अमेरिकी तरुणाईने आपल्या डोक्यातून उतरवून टाकली आहे. गेल्या रविवारी अमेरिकेत ‘टीन चॉइस अॅवॉर्ड’ पार पडले, त्यात याचेच पडसाद उमटलेले दिसले. या पुरस्कारांच्या संगीत विभागामध्ये नामांकन असलेल्या ड्रेकला डावलून तरुणाईने लुई टॉमलिन्सन या गायकाला आपली सारी मते देऊन टाकली. फॉक्स नेटवर्कतर्फे दरवर्षी होणाऱ्या या पुरस्काराचे वैशिष्टय़ म्हणजे देशभरातील तरुणाईकडून संगीत, सिनेमा आणि इतर अनेक घटकांमधील आपल्या आदर्शाबाबतची मते मागवली जातात. यात गंमत असते, ती प्रचंड गाजत असलेल्या आणि पुरस्कारांमागून पुरस्कार घेत असलेल्या इन्स्टण्ट हिट गायकांबाबत देशभरातील तरुणाईची खरोखरची मते समोर येत असतात. म्हणजे एखाद्या कलाकाराच्या अल्बम विक्रीचे आकडे, बिलबोर्ड लिस्टमधील सर्वोत्तम स्थान या उघड दिसणाऱ्या बाबी दिसत असल्या, अन् ती व्यक्ती अतिप्रसिद्धीच्या आहारी गेलेली असली, की तो बाज या पुरस्कारामध्ये टिकण्याची चिन्हे नसतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा