राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन अगदी काही दिवसांवर येऊ न ठेपलं आहे. भावा-बहिणीच्या नात्याचा जल्लोष साजरा करणारा हा एक भावनिक सण. बदलत्या काळात या नात्यातील भावना त्याच असल्या तरी या नात्याच्या परिसीमा बदलत चालल्या आहेत. परिणामी पूर्वीचा कडक दादा आता मित्र आणि कुल ब्रो झालाय आणि त्याचंच प्रतिबिंब म्हणजे राखीचं बदलणारं स्वरूप. राखी पौर्णिमा साजरी करताना भावाला आकर्षक व ट्रेंडी राखी बांधावी याकडे हल्ली तरुणींचा कल जास्त असतो. हाच कल पाहता बाजारात वेगवेगळ्या स्वरूपातील राख्यांची रेलचेल सुरू झाली आहे.
यंदा सगळ्यात जास्त ‘कूल ट्रेंड’ आहे तो म्हणजे ‘वीर’, ‘भाई’, ‘दादा’, ‘ब्रो’ लिहिलेल्या आणि धाग्यात गुंफलेल्या राखीचा. अॅक्रेलिक आणि लाकूड या दोन प्रकारांत या राख्या उपलब्ध आहेत. अॅक्रेलिकला सोनेरी रंग असणारी आणि राखीवर कोरलेल्या शब्दाने त्याचं व्यक्तिमत्त्व सांगणारी ‘सोन्याची राखी’ बाजारात मोठय़ा प्रमाणात दिसत आहे. या राख्यांची किंमत साधारण १०० ते १५० च्या घरात असून त्यांचा खपही मोठय़ा प्रमाणावर होतो आहे. ऑनलाइन मार्केट म्हणजे इन्स्टाग्राम, फ्लिपकार्ट किंवा तत्सम साइट्सवरही या राख्या उपलब्ध आहेत.
प्लॅटिनम बँड्स हे राखीचं एक नवं रूप आता भाऊ रायांच्या हातात दिसू लागणार आहे. धाग्याने गुंफलेल्या राखीपेक्षा भावांना प्लॅटिनम बँड्स देऊन/ बांधून बहिणी त्यांना खूश करत आहेत. यांच्या किमती अर्थातच जास्त आहेत, मात्र हा एक नवीन ट्रेंड रक्षाबंधन गाजवणार आहे.
कस्टमाइज्ड गोष्टी सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी भावांना त्यांच्या नावाची राखी बांधणं बहिणी पसंत करताहेत. नावं वेगवेगळ्या फॉण्ट आणि स्टाइलमध्ये कोरून अॅक्रेलिक, लाकूड किंवा मग धातूवर तयार केलेली ही राखी सगळ्यांनाच भावते आहे. बाजारात अशा राख्यांचं प्रमाण तितकंसं नसलं तरी ऑनलाइन अशा राख्या खास बनवून घेण्याला पसंती मिळते आहे. साधारण २०० ते २५० रुपये किंवा राखीच्या गुणवत्तेच्या आधारावर थोडय़ाफार कमी-जास्त पैशात अशा राख्या ऑनलाइन मार्के टमध्ये उपलब्ध आहेत.
राखीची रूपं कितीही बदलली तरी आजही फुलांच्या नक्षीवर खडे, कुंदन, विणकाम इत्यादी सजावट करून तयार केलेली राखी अनेकांना भावते. बाजारात या जुन्या पद्धतीच्या राख्या नव्या रूपात पाहायला मिळताहेत. राखीचा आकार आता छोटा झाला असून त्यावर केलेलं आकर्षक नक्षीकाम आणि गुजरात, राजस्थान प्रदेशातील संस्कृतीची छटा असणाऱ्या राख्या बाजारात आवडीने घेतल्या जात आहेत.
एक साधा रंगीत दोरा आणि त्याच्या मध्यात असलेलं एका बक्कलच्या आकाराचं प्लॅटिनम, अॅक्रेलिक किंवा धातूपासून बनवलेलं डिझाइन असं ‘सिम्पल आणि स्वीट’ प्रकरण आजही अनेकांना भुरळ घालतं आहे. मग त्यात ‘ओम’, ‘स्वस्तिक’, ‘सरस्वती’, ‘सूर्य’ अशा अनेक नक्षी पाहायला मिळतात. यांची किंमत अर्थातच साधारण ५०० ते २००० रुपयांच्या दरम्यान असून ऑनलाइन बाजारात या राख्यांची फार चलती आहे.
बच्चेकंपनीला कार्टून्स कॅरेक्टर्सबद्दल कायम उत्सुकता असते. शाळेच्या बॅगवर, कंपास बॉक्सवर अन् टिफिनवर कार्टून्स असतील तर बच्चेकंपनी अधिक खूश होते. बच्चेकंपनीची हीच आवड हेरत यंदा मोटू-पतलू, छोटा भीम, बालगणेश, डोरेमॉन, शिनचॅन या कार्टून्स कॅरेक्टर्सच्या आणि स्पिनरच्या राख्यांनी आणि बँड्सनी बाजारपेठा सजल्या आहेत. काही दिवसांवर आलेल्या रक्षाबंधनानिमित्त या राख्यांचा नवा ट्रेंड हिट झाला आहे.
राखीला प्रेमाची झालर म्हणून चक्क भावाबहिणीचे फोटोच राखीवर पिट्र करून घेणं हा एक नवीन प्रकार रुजू पाहत आहे. रखीतही आता डिजिटलायझेशन येत आहे याचं हे उत्तम उदाहरण. या राख्या बाजारात स्वत जाऊन अजूनतरी विकत घेता येत नाहीयेत मात्र ऑनलाईन आणि डिजिटल स्टुडिओज मध्ये या राख्या उपलब्ध आहेत.
viva@expressindia.com