विनय नारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मानव आपल्या मूलभूत गरजा भागवत हळूहळू त्यामध्ये प्रगती साधत जातो. त्या गरजेच्या गोष्टींमध्ये मानव इतकी प्रगती साधतो की त्याचे रूपांतर तो कलेमध्ये करतो. एका अर्थाने सौंदर्यदृष्टीच्या अंगांनी विकसित होणे हीच मानवाची मूलभूत गरज आहे. वस्त्रकलेनेही मानवी मनाला हजारो वर्षांपासून भुरळ घालून त्यात विलक्षण प्रगती साध्य केली. भारतीय समाजाच्या अनेक अंगांना वस्त्रकलेने स्पर्श केला आहे. या सदरातून आपण याचाच वेध घेत असतो. प्राचीन भारतीय साहित्यात वस्त्र परंपरेचे उल्लेख येणं हे स्वाभाविक होतं. त्यातून काही महत्त्वाचे संदर्भही मिळतात.

महाकवी कालिदासाच्या काही रचनांमध्ये काही प्रकारच्या वस्त्रांचा उल्लेख येतो. ‘कुमारसंभव’ (साधारण पाचवे शतक) मध्ये एका प्रसंगात वेशांतर केलेला शंकर पार्वतीला शंकराशी लग्न करण्यास उद्युक्त करीत असतो. तो त्या दोघांच्या वस्त्रांची तुलना करतो. त्या वेळेस तो पार्वतीला म्हणतो, तू नेहमी उच्च दर्जाचे हंसाची प्रतिमा असलेले ‘हंस-दुकुल’ हे वस्त्र परिधान करतेस, तुला हत्तीच्या चामडय़ाचे वस्त्र परिधान करणारा शंकर उत्तम जोडीदार होईल. नंतर शंकर त्याच्या हत्तीच्या चामडय़ाच्या वस्त्राचे ‘दुकुला’मध्ये रूपांतर करतो. या ‘दुकुल’ वस्त्राचे काठ हंसद्वयाच्या बुट्टीने सजवले आहेत. याला ‘हंस मिथुन’ असेही म्हटले गेले आहे. या दुकुल वस्त्राचा उल्लेख कालिदासाने ‘विक्रमोर्वशीय’ आणि ‘ऋतुसंहार’ या साहित्यकृतींतही केला आहे. यामध्ये त्याने याचा थंडीच्या दिवसांत वापरण्यायोग्य रेशम असा उल्लेख केला आहे. कालिदासाला भुरळ पाडलेल्या या दुकुलाचा आपण कधीही उल्लेख ऐकलेला नसतो. हे वस्त्र काय होते, रेशीम होते की आणखी काही, कुठे विणले जायचे, याची विशेषता काय होती, याचे पुढे काय झाले, असे स्वाभाविक प्रश्न पडतात.

‘गुप्त’ काळा (४ ते ६ वे शतक) मधल्या अन्य साहित्यामध्येही हंस बुट्टी असलेल्या ‘दुकुल’ या वस्त्राचा त्यावेळच्या सर्वोत्तम वस्त्रांपैकी असा उल्लेख सापडतो.

सातव्या शतकात बाणभट्टाने कनौजचा सम्राट हर्षवर्धन याचे ‘हर्षतरित’ हे चरित्र लिहिले. या ग्रंथात त्यावेळच्या अनेक वस्त्रांचा सविस्तर उल्लेख आला आहे. बाणभट्ट हा सम्राट हर्षवर्धन याचा दरबारी कवी होता. त्यामुळे त्याच्या लिखाणाला विशेष महत्त्व आहे. बाणभट्टाने सम्राट हर्षवर्धन याच्या बहिणीच्या, राजश्रीच्या लग्नप्रसंगाचे सविस्तर वर्णन केले आहे. या समारंभासाठी केलेल्या विशेष सजावटीचे वर्णन करताना बाणभट्टाने तिथे वापरल्या गेलेल्या विविध वस्त्रांविषयी लिहिले आहे. त्यात क्षौमा (लिनन), बदरा (सुती), दुकुल (झाडाच्या सालीपासून बनवलेले रेशम), अंशुक (मसलीन) आणि नेत्रा (दोन रंगांच्या मिश्रणाने बनलेले रेशम) आणि लतातंतू (रेशीम किडय़ापासून बनवलेले रेशीम) या विविध प्रकारच्या वस्त्रांची माहिती मिळते.

यामध्ये दुकुल हे वस्त्र एक प्रकारच्या झाडाच्या सालीपासून बनवलेल्या रेशमाचे होते, असा उल्लेख आहे. याबद्दल अधिक माहिती शोधली असता, जॉन आयर्विन या अभ्यासकाने नोंदवले आहे की, बाणभट्टाने सांगितलेली ही वनस्पती म्हणजे ‘मदार’ होय. याला वनस्पतिशास्त्रात उं’३१स्र््र२ ॠ्रॠंल्ल३ीं असे म्हणतात. आपण याला मंदार वृक्ष म्हणून ओळखतो. कालिदासाचे मंदारप्रेम सर्वश्रुतच आहे. कुमारसंभव, रघुवंश, अभिज्ञान शाकुंतल, विक्रमोर्वशीय, मेघदूत या सर्व कलाकृतींमध्ये कालिदासाने मंदार वृक्ष आणि मंदार पुष्प यांचा वापर केला आहे. अशा विलक्षण रीतीने ही शृंखला पूर्ण होते.

मंदार पुष्प हे देवतांचे प्रिय समजले जाते. ‘रघुवंश’मध्ये इंद्रायणी आपल्या केसांमध्ये मंदार पुष्प माळत असते. अलकापुरीच्या अभिसारिका रात्री प्रियकराला भेटायला जाताना केसांमध्ये मंदार पुष्पच धारण करतात. ‘अभिज्ञान शाकुंतल’मध्ये सांगितलंय की, इंद्राने दुष्यंताला मंदारमाला दिली होती. मंदारचे झाड छोटे असते. ‘मेघदूत’मध्ये यक्ष मेघाला आपल्या घराचा पत्ता देताना, त्याच्या प्रियेने जोपासलेल्या छोटय़ा मंदार वृक्षाला विसरत नाही. कालिदास असेही म्हणतो की, रमणींच्या नर्म शब्दांनी मंदार वृक्ष फुलांनी डंवरतो. या मोहक फुलांबद्दल स्त्रियांना विलक्षण प्रेम असते. शिवाच्या पूजेसाठी मंदार पुष्प हे महत्त्वाचे मानले आहे. इंद्राच्या नंदनवनातील पाच फुलांपैकी हे एक आहे. कुमारसंभवमध्ये कालिदासाने इंद्र आणि मंदार या दोघांचा ‘शिवचरणाश्रित’ असा उल्लेख केला आहे.

शंकराला आणि सुंदर स्त्रियांना प्रिय असणाऱ्या मंदार वृक्षापासून बनवलेल्या हंस-दुकुल या वस्त्राचा वापर कालिदास शिव-पार्वतीच्या प्रेमकथेसाठी करतो. यात ‘हंसद्वय’ ही प्रणयरम्य प्रतिमाही महत्त्वाची आहे. कालिदासाने याच वस्त्राचा उल्लेख करण्यामागे तसेच काही कारण असावे हे माझे गृहीतक असे सिद्ध झाले.

बाणभट्टाने असेही सांगितले आहे की, हे वस्त्र ‘पुंद्र देश’ म्हणजे आजचा बंगाल, इथे विणले जायचे. हे वस्त्र अगदी रेशमासारखे दिसायचे. पाचव्या-सहाव्या शतकापासून चीनचे रेशीम विपुल प्रमाणात भारतात येऊ  लागले. एकोणिसाव्या शतकात प्रयोग करून पाहिला असता टेक्सटाइल तज्ज्ञांना लक्षात आले की, हे अगदी रेशमासारखेच दिसते, आणि आजच्या काळात बनवणे हे अव्यवहार्यसुद्धा आहे. त्यामुळे असे प्रयत्न पुन्हा झाले नाहीत.

बाणभट्टाने सांगितले आहे, सम्राट हर्षवर्धन याने त्याच्या राज्यारोहणासाठी हंस-दुकुल हेच वस्त्र वापरले होते. असे देवतांना आणि राजांना प्रिय असणारे ‘हंस-दुकुल’ कालिदासाने अमर केले.

शब्दांकन : तेजश्री गायकवाड

viva@expressindia.com