विनय नारकर
प्राचीन भारत वस्त्रनिर्मितीत प्रगत होता. वर्षांनुवर्षांची परंपरा निर्माण होताना काळानुरूप या वस्त्ररचनेमध्ये काही बदल होत गेले व काही घटक अबाधित राहिले. टेक्स्टाइल डिझायनिंगद्वारे वस्त्रांच्या रचनेमध्ये, दृश्यात्मकतेमध्ये, दर्जामध्ये बदल केले जातात. वस्त्रांची सजावट ते अधिक सुंदर बनवण्यासाठी तर बदलली जातेच, पण वस्त्र परंपरेमध्ये एकसुरीपण येऊ नये म्हणूनही हे गरजेचे आहे. वस्त्रांच्या उपयुक्ततेहून ‘आणखी काही तरी’ मिळवण्यासाठी हा खटाटोप असतो. वस्त्रांमध्ये अवतरणारी चिन्हे आणि रचना या फक्त सजावटींची साधने नसतात. त्यांना विशिष्ट असा प्रतीकात्मक गर्भितार्थ असतो. या चिन्हांच्या निवडीमागे कधी जाणीवपूर्वक, तर कधी सुप्त प्रेरणा असतात. या प्रेरणांचा प्रवास सांस्कृतिक, पौराणिक, सामाजिक अशा व्यापक संदर्भातून वैयक्तिक निवडीपर्यंत होतो. वस्त्र परंपरेतील ही प्रतीके दृश्यात्मक सौंदर्य आणि अभिव्यक्ती या दोन्ही स्तरांवर काम करतात. त्यामुळे ही एक कला परंपरा बनते.
भारतीय वस्त्र परंपरेमध्ये सापडणारं पहिलं चिन्ह म्हणजे सिंधू संस्कृतीतलं, मोहंजोदडोमधील ‘पुरोहित/राजाच्या’ शिल्पावरील शालीवरचे तीन पानांचे चिन्ह. हे एक अतिशय लोकप्रिय चिन्ह होते व आजही आहे. बनारसमध्ये हे ‘तीन पतीया’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे मेसोपोटेमिया, इजिप्त येथून आले असे समजले जाते. या प्रतीकाला काही तरी धार्मिक संदर्भ होता. त्या काळातील आजही वापरात असलेली आणखी काही चिन्हे म्हणजे सूर्य-चंद्राचे प्रतीक असणारी गोल बुट्टी. अजिंठय़ाच्या चित्रांमध्येही अशी वस्त्रे पाहता येतात. चंद्राच्या कला दाखवणारी चिन्हेही तेव्हा अस्तित्वात होती.
त्यानंतरच्या काळातील खास भारतीय विणकरांनी वापरलेली चिन्हे, जी आजही वापरली जाताहेत ती म्हणजे, वैभव, विपुलता दाखवणारा कुंभ, शुद्धता आणि बुद्धिमत्ता दर्शविणारा हंस, आध्यात्मिक ऊर्जेचं प्रतीक असणारे कमळ, सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष, वैभव आणि स्थैर्य दाखवणारे हत्ती, शक्तीसाठी सिंह, शिवाय वेली, मोर आणि काही भौमितिक आकार इत्यादी. दोन हजार वर्षांपासून ही चिन्हे वापरात आहेत. अर्थात, त्यात वेळोवेळी भर पडत गेली.
त्यात जाणवण्याइतके बदल मात्र दहाव्या शतकापासून दिसू लागले. मुस्लीम शासकांच्या संवेदनांचे प्रतिबिंब भारतीय वस्त्रांमध्ये उमटू लागले. त्यांच्या गरजाही वेगळ्या होत्या. सल्तनत काळातील, मध्य आशियातील शासकांनी विणकरांच्या दरबारी कार्यशाळा सुरू केल्या. त्यांनी मध्य आशियातून हजारो विणकर भारतात आणले. या शासकांनी त्यांच्या पोशाख परंपरा इथे आणल्या व त्यांच्या गरजांनुसार हे विणकर काम करू लागले. सीरिया, इजिप्त, टर्की, पर्शिया या महत्त्वाच्या विणकाम केंद्रावरून मोठय़ा प्रमाणात तिथली वस्त्रे येऊ लागली; परंतु त्या काळातील वस्त्रांचे नमुने उपलब्ध नसल्यामुळे तेव्हाची चिन्हे किंवा रचना पाहता येत नाहीत. हा काळही तसा खूप धामधूमीचा होता. त्या काळातील वास्तूंवरून मात्र तेव्हाच्या चिन्हांबद्दल अंदाज बांधता येतो. यावर बराच अरबी प्रभाव होता, जाळ्यांची, फुलांच्या जाळ्यांची नक्षी, सुलेखन, द्राक्षाच्या वेली, पाम वृक्षाची पाने, रेषांच्या नागमोडी रचना (झिगझॅग) ही सर्व चिन्हे, रचना मध्ययुगीन आहेत.
त्यानंतर समरकंदहून येऊन बाबरने १५२६ मध्ये मुघल साम्राज्याची स्थापना केली. हा काळ भारतात कला आणि कारागिरीसाठी बहराचा होता. मुघल वंशातील राजांनी मध्य आशिया, पर्शिया (इराण) आणि भारतातील संस्कृतींचा मिलाफ करून रसिक जीवनशैली अंगीकारली. अकबरापासून सुरुवात होऊ न, मुघल कला जहाँगीर आणि शहाजहानच्या काळात शिखरावर पोहोचली. एक प्रकारे पर्शियन कलेशी चढाओढ करू लागली होती.
मुघल बादशहांनी विणकामाच्या खास दरबारी कार्यशाळा अहमदाबाद, दिल्ली, लाहोर, फतेहपूर सिक्री आणि आग्रा येथे उभ्या केल्या. या कार्यशाळांमधून भारतीय तसेच परदेशी विणकर बादशहाच्या प्रतिनिधींच्या निगराणीखाली काम करायचे. या कालखंडाची विशेषत: म्हणजे, स्वत: बादशाह सर्व प्रकारच्या वस्त्रांच्या डिझायनिंग व उत्पादनात लक्ष घालायचा. अबूल फजलने ‘आइन-ए-अकबरी’मध्ये सांगितले आहे की, परदेशी कुशल कारागिरांनी तिथली विणकामाची पद्धत येथे चांगल्या प्रकारे रुजवली. तिथल्या तज्ज्ञ विणकरांची इथल्या विणकरांसोबत त्यांच्या कौशल्याची देवाणघेवाण सुरू झाली. पर्शिया, टर्की, इराक, मध्य आशिया व युरोपमधून आयात केल्या जाणाऱ्या मौल्यवान जरीकाम (ब्रोकेड) वस्त्रांची जंत्रीच त्याने दिली आहे. ही सर्व वस्त्रे विणकरांना बघता यायची. त्याचा प्रभाव त्यांच्या कामावर पडायचा.
सोन्याचांदीच्या तारांचा भरपूर वापर, रंगीबेरंगी चिन्हे आणि रचना यामुळे मुघलकालीन वस्त्रांना वेगळीच झळाळी मिळाली. वस्त्रांच्या डिझायनिंगसाठी व रंगसंगतीसाठी इतर कलाकार, रचनाकार, दरबारी चित्रकार यांची मदत घेतली जायची. या वस्त्रांवर मुख्यत: मुघल दरबारी चित्रकारांच्या चित्रांतील रचना अंकित केल्या जायच्या. या चित्राच्या अलंकृत नक्षीदार चौकटी, ज्यांना ‘हशिया’ म्हटलं जातं, त्यातल्या फुलांच्या आणि भौमितिक रचना वस्त्रांमध्ये वापरल्या जायच्या. अशा गोष्टींमुळे मुघलकालीन वस्त्रे दर्जेदार कला म्हणून मान्य झाली.
वेगवेगळ्या देशांतील, संस्कृतींतील विणकरांच्या सर्जनशील देवाणघेवाणीतून नवीनच वस्त्र परंपरा आकार घेऊ लागली. गुजरातचे विणकर पानांचे, फुलांचे आकार, प्राणी, पक्षी विणण्यात माहीर होते. पर्शियन प्रभावाने या चिन्हांमध्ये वेगळीच नजाकत आली आणि रचनाही पूर्ण बदलली. त्यातून लतिफा, कुयरी यांसारख्या बुट्टय़ा जन्माला आल्या. मुघल वस्त्रांवर प्रामुख्याने पर्शियन वस्त्र परंपरेचा प्रभाव होता. बादशाह हुमायून बरीच वर्षे (१५२४-१५७६) पर्शियात, ताहमास्प सम्राटाच्या दरबारात राहिला होता. हे पर्शियन कलेचे, कारागिरीचे सुवर्णयुग होते. त्याच्यावर याचा प्रभाव पडणे स्वाभाविक होते. हुमायूनने तिथून येताना मीर सय्यद अली आणि अब्दूस समाद या दोन दिग्गज चित्रकारांना भारतात आणले. त्यांनीच येथे मुघल चित्रकलेची मुहूर्तमेढ रोवली. यांच्या चित्रातल्या बऱ्याच रचना वस्त्रांमध्ये अवतरल्या.
पर्शियन कलेपेक्षा मुघल कलेत अलंकरण कमी होते व वास्तववाद जास्त होता. पर्शियन साहित्यामध्ये जन्नतमधील बगिच्यांचा, ज्यामध्ये पऱ्यांचा, मानवाचा, तिथल्या झाडांचा, पक्ष्यांचा उल्लेख येतो. हे सगळं नजाकतीने व मुघल अदबीने इथल्या वस्त्रांवर विणकामाने रेखले गेले. मद्याचे पेले ही एक खास जहाँगीर काळातील रचना. पक्षी, मानवी आकृत्या, मद्याचे पेले हे सर्व फुलांच्या पाश्र्वभूमीवर मिसळून जातं, ही खास जहाँगीर काळाची ओळख ठरली. लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियम’मध्ये बादशाह जहाँगीरच्या काळातील घोडेस्वारी करताना परिधान करण्याचा एक अंगरखा आहे. त्यावर प्राणी, पक्षी, झाडे, वेली, वाघ असं साधारण जंगलातील शिकारीचे चित्रण असलेलं अतिशय सुबक विणकाम आहे. नंतरच्या काळात सुप्रसिद्ध झालेली व आजतागायत लोकप्रिय असलेली ‘शिकारगाह’ रचना ती हीच. जहाँगीर बादशहाची मुक्त विचारसरणी, नावीन्याची ओढ यातून मुघल वस्त्रकलेला निराळी उंची मिळत गेली.
मूळ भारतीय वस्त्र परंपरेमध्ये सुती पोत व त्याला रेशमी काठ, रेशमी पदर अशी रचना होती. या रेशमी काठांवर व पदरावर बुट्टीचे विणकाम असायचे. वस्त्राचा मधला भाग मोकळा असायचा. पूर्ण रेशमी वस्त्रे विणली जाऊ लागल्यानंतरही या रचनेत फारसा बदल झाला नाही. न शिवलेले अखंड वस्त्र हीच परिधानाची पद्धत होती. मुघलांचे पोशाख मुख्यत: शिवलेले. त्यामुळे त्यांच्या वस्त्रांच्या गरजा वेगळ्या होत्या. सुरुवातीच्या मुघल विणकामात बुट्टी बरीच विरळ आणि ठसठशीत असायची. जहाँगीर काळात ही नाजूक होत गेली आणि छोटय़ा नाजूक बुट्टय़ांनी, भौमितिक आकारांनी मधली जागा व्यापली जाऊ लागली.
मुघल कलेतील आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे ‘फुलांचे चित्रण’. भारतीय टेक्स्टाइल डिझाइनचे हे अविभाज्य अंग बनले आहे. मुघल पद्धतीच्या फुलांचा वापर वस्त्रांसहित अन्य कारागिरी, वास्तुकला असा सर्वत्र झाला. जहाँगीर बादशहा १६२० मध्ये काश्मीरभेटीवर गेला असता तिथल्या फुलांच्या सौंदर्याने वेडावून गेला. त्याने त्याचा दरबारी चित्रकार मन्सूरला काश्मीरमधली फुले चितारायला सांगितले. ही फुले मुघल कलेतील अभिन्न अंग बनली.
शाहजहान बादशहाच्या काळात चिन्हांच्या, रचनांच्या सुबकतेवर खूप लक्ष दिले गेले. या काळात प्रमाणबद्धता आणि सममितीच्या बाबतीत मुघल वस्त्रकला सर्वोच्च स्थानी पोहोचली. शाहजहान कारागिरांना, कलाकारांना स्वत: भेटून कामांची पाहणी करायचा. या काळात मुख्यत: विविध प्रकारची फुले व त्यांच्या रचना चितारल्या गेल्या. गुलाब, पॉपीज, नरगिस, मोगरा, झेंडू, चाफा अशी फुले अत्यंत सुबकपणे वस्त्रांवर विणण्यात किंवा छापण्यात येत. शाहजहानच्या धार्मिक कट्टरतेमुळे, मानवी वा प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या प्रतिमांवर त्याने बंदी घातली. त्याने वडिलांच्या म्हणजे जहाँगीरच्या कलादृष्टीला जुनाट व कमी दर्जाचे ठरवले. शाहजहानच्या राजवटीवर लिहिल्या गेलेल्या ‘पादशाहनामा’मधील चित्रांवरून मुघल परिधान तसेच दरबारात सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्त्रांचे वैभव पाहून डोळे विस्फारल्याशिवाय राहात नाहीत.
औरंगजेबाच्या काळात, शाहजहान काळातील चिन्ह, रचनांचा वापर झाला; पण ते वैभव मात्र हरवत गेले. त्याच्या बदलत्या दृष्टिकोनामुळे, कट्टरतेमुळे एकूणच मुघल कला व कारागिरी उतरणीस लागली.