गायत्री हसबनीस
भारतीय परंपरेतला ठेवा म्हणून ओळखले जाणारे अलंकार आजही तितक्याच प्रेमाने आणि आत्मियतेने परिधान केले जातात. दागिन्यांचे मोहक रुप कुणाला भावले नाही तरच नवल! जुन्या काळातील दागिन्यांची कथा, त्यांचे महत्त्व, त्यांचे त्या काळातील स्थान, दर्जा, ओळख, नाविन्य आणि त्यावरील नक्षीकाम हे मागील दहा–वीस वर्षांपासून सिनेमा, मालिका आणि नाटक अशा विविध माध्यमातून पुन्हा लोकांसमोर आले आहे. त्यामुळे पुन्हा जुनेच दागिने ट्रेण्ड होऊ लागले आहेत.
बदल हा येणाऱ्या काळानुसार अटळच आहेस पण परंपरेला नवतेचा साज चढवत दागिन्यांना एक नवाकोरा लुक देण्याचे काम आजचे कारागीर, ज्वेलरी डिझायनर करत आहेत. गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात अभिनेत्री कंगना राणावतला झाशीची राणी म्हणून लोकांसमोर आणताना त्या काळातील दागिने, आभूषणे यांचा वापर करण्यात आला. सोनं, चांदी, कुंदन, मणी यांपासून बनवलेले अस्सल पारंपरिक दागिने या चित्रपटात पहायला मिळतात. जुन्या काळातील राजेशाही थाट म्हणजेच सरपेच, मराठमोळी नथ, कंगन, पैंजण, बाजूबंद, हार, कंबरपट्टा, कोल्हापूरी साज, ठुशी, मिनाकारी चोकर, राणीहार, माठा पट्टी, वेणी फुल, कड असे राजेशाही दागिने या चित्रपटामुळे पुन्हा ट्रेण्ड इन झाले आहेत. चित्रपटासाठी ‘आम्रपाली‘ या ब्रॅण्डकडून हे दागिने डिझाईन करून घेतले गेले.
पद्मवत, मणिकर्णिका, बाजीराव मस्तानी, आनंदी गोपाळ, काकस्पर्श, मुघल–ए–आझम, कटय़ार काळजात घुसली, बालगंधर्व, जोधा अकबर, देवदास, परिणिता, रमा माधव अशा चित्रपटातून नेहमीच दागिने आणि परंपरा यांना चालना मिळाली आहे. चित्रपटच नाही तर स्वराज्यरक्षक संभाजी, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवा बाजीराव, जय मल्हार, विठू माऊली, बाजी अशा मालिकांतूनही जून्या पारंपरिक दागिन्यांना नवाकोरा लुक मिळत गेला आहे आणि त्याचा मोठा फायदा, बदल आणि परिणाम ग्राहकांवर आणि एकूणच बाजारात पाहायला मिळाला?. ‘बॉलीवूडमुळे नेहमीच पारंपरिक दागिने, फॅशनला वाव मिळाला आहे. ‘बाजीराव मस्तानी‘ ते आताच्या ‘मणिकर्णिका‘ या चित्रपटापर्यंत त्यातून आलेले दागिन्यांचे नवे रूप हे आजच्या घडीला बाजारातील सर्वात मोठे ट्रेण्डसेटर आहेत याचा परिणाम म्हणून ट्रॅडिशनल ज्वेलरीही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होईल, असं मत ‘क्वर्कस्मिथ‘ या ब्रॅण्डची सहसंचालिका आणि डिझाईन हेड दिव्या बत्रा हिने व्यक्त केले.
तिच्या मते जुन्या पद्धतीच्या मोटिव्हस (Motivas) मधील देवदेवतांची प्रतिकं आणि डिझाईन असलेल्या दागिन्यांची खासियत परत अनुभवायला मिळणार आहे. ज्यात त्रिशूल, तलवार, शील अशा पद्धतीचे डिझायनर दागिने गेल्या वर्षांंपासून ट्रेण्डमध्ये येत राहिले आहेत. ट्रॅडिशनली हाताने केलेली तयार ज्वेलरी आज लोकांना खूप भावते आणि मोठय़ा प्रमाणात ती वापरली जाते. मणिकर्णिका, पद्मवत आणि अगदी जोधा अकबरसारख्या चित्रपटांमधून ज्या पद्धतीने दागिन्यांचा वापर झाला त्याचप्रकारच्या जड दागिन्यांचे फ्युजन ब्रायडल ज्वेलरीमध्ये पहायला मिळते आहे. नुसतेच दागिने नाही तर दागिन्यांसकट हा पूर्ण लूक सध्या ब्राइडल वेअरमध्ये फॉलो केला जातोय आणि जात राहिल, असेही तिने सांगितले.
जेव्हा नव्या रूपात जुन्या पारंपरिक दागिन्यांना महत्त्व प्राप्त होते तेव्हा जनमानसात दागिन्यांकडे पाहाण्याचा दृष्टिकोनही बदलतो. फक्त सिनेमाच नाही तर आज अशी अनेक स्टार्ट–अप्स आहेत जी जुन्या पारंपरिक दागिन्यांना परत नव्याने बाजारात आणतात. ‘एक वेळ अशी होती जेव्हा चांदीचा लुक डिझाईन करणं आव्हानात्मक गोष्ट होती, कारण दैनंदिन आयुष्यात कोणी चांदीचे दागिने घालत नाहीत. चांदीची नथ किंवा नोझ रिंग तर कुणीच वापरत नव्हतं.? जेव्हा आम्ही ‘इतिहास‘ नावाचे कलेक्शन करायचं ठरवलं तेव्हा ठुशी आणि वजट्रीक आम्ही नव्या रूपात आणले. जुन्या दागिन्यांद्वारे विशेष करून चांदीचे दागिने आम्हाला ग्राहकांना सहज उपलब्ध करून द्ययचे होते. पारंपरिक दागिन्यांचा विचार करत नथीसारखा आकाराने मोठा दागिना आम्ही चांदीच्या मण्यांपासून डिझाईन केला. २०१६ मध्ये आम्ही पहिली चांदीची नथ बाजारात आणली. कारवार, धारवाड, बंगलोर इत्यादी ठिकाणीसुद्धा नथीचे प्रकार आढळतात. लग्नात जास्त करून ते वापरले जातात त्यामुळे महाराष्ट्राबरोबर तेथील नथसुद्धा आम्ही चांदीत आणली. अशा चार प्रकारच्या नथी आम्ही आणल्या आणि दोन नथी आम्ही बकुळहारप्रमाणे बकुळीच्या फुलाच्या डिझाईनच्या आणल्या. तेव्हा इतर ब्रॅण्डसने देखील चांदीच्या नथी आणण्यास सुरुवात केली, अशी माहिती सुप्रसिद्ध ज्वलेरी ब्रॅण्ड ‘आद्य‘ची सर्वेसर्वा सायली मराठे हिने दिली.
महाराष्ट्रीय पारंपरिक दागिने आज परत बनवण्यास सुरुवात झाली आहे. गावाकडील बायका ज्यापद्धतीने वर चंद्रकोर त्याखाली एक आडवी रेष आणि रेषेखाली बारीक टिकलीचा गोलाकार आकार ठेवतात, त्या रचनेचे आम्ही पेन्डंट तयार केले. ग्राहकांना जूने पारंपरिक दागिने प्रचंड आवडतायेत हे आमच्या या प्रयोगाला आलेल्या तूफान प्रतिसादामुळे लक्षात आले. काही दिवसांपूर्वी ग्राहकांनी आम्हाला असं सुचवलं की नथ आम्हाला रोज घालावीशी वाटते पण कुर्त्यांवर रोज नथ घालता येत नसल्यामुळे नोझ रिंग घालायला जास्त आवडतील. त्यामुळे आम्ही मिनिएचर नथी तयार केल्या ज्या दोन सेंटीमीटरपेक्षा आकाराने जास्त नाहीत. ग्राहकांना असे दागिने खूप आवडतायेत जे वेस्टर्न लुकवरही परिधान करता येतात, असंही तिने सांगितलं.
जुनेच दागिने नव्याने येताना त्यांना एखाद्य कारागिरीची माहिती नव्याने कळते. कुंदन म्हणजे व्हाईट स्टोन असं लोकांना वाटत आलं होतं पण कुंदन हा शब्द कोंदणं या शब्दातून आलाय ज्यात खडा कोंदून बसवणं या प्रRियेला कुंदन असं म्हणतात. हे समजल्यावर लोकांना आश्चर्य वाटतं. चांदीच्या कुडय़ा लहान मोठय़ा असतील तर त्यांची किंमत त्या वजनाची नसून ती त्या कारीगिरीची असते, अशी माहिती ग्राहकांना मिळत जाते तशी त्यांची उत्सूकता आणखी वाढते, असं सायलीने सांगितलं.
चित्रपटातून आलेल्या जुन्या पारंपरिक दागिन्यांचे महत्त्व आजच्या काळात कसे आणि कितपत बदलले आहे याबद्दल बोलताना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे आनंद पेडणेकर यांनी सांगितले, पुर्वीचे दागिने हे अतिजड आणि अतिवजनी असायचे त्यामुळे आजच्या काळाशी अनुरूप असे राजेशाही थाटाचे पण वजनाने हलके असलेले असे मराठमोळे पारंपरिक दागिने आम्ही आणले. झुमके हे लाईट वेटमध्ये आल्याने ते आता मोठय़ा प्रमाणात चालतात. नेकपीसही आता बारिक चेनप्रमाणे आपण घालू शकतो. सोन्याचे पैंजण आहेत त्यातही ते १०–१२ ग्रॅमचे आले आहेत जे पुर्वी २५–३० ग्रॅमचे असायचे. ७–८ ग्रॅमचे इन्डो वेस्टर्न दागिने आता ट्रेण्डमध्ये आहेत‘. बाजीराव मस्तानी‘ चित्रपटानंतर तरूण मुलं पोकळ हत्तीमुखाचे, सिंहमुखाचे कडे घालू लागले. मोहनमाळेत पुर्वी एकच माळ घालायचे आणि तिचे वजन ५० ग्रॅमचे असायचे तर आता त्याचे वजन ३०, २०, १८ ग्रॅम एवढे कमी झाले आहे. त्याचबरोबर आता चपलाहार, च्रंदहार, बकुळीच्या फुलाचा हार हे आता चार पदरी घातले जातात. जे पुर्वीच्या काळी १०० ग्रॅमच्या खाली बनत नव्हते. पायातल्या दागिन्यांपासून ते नथीपर्यंत आज कित्येक प्रकार तरूणी पसंत करतात.? पंजा, ठुश्या, नथी, वजट्रिका या मराठी मालिकांद्वारे नव्याने समोर आल्या. हे सगळे पारंपरिक दागिने रोजच्या वापरातील असून तरूण पिढी हे दागिने बनवून घेते, असं त्यांनी सांगितलं.
वाघनखांचे पेन्डन्ट तयार करून त्याच्याबाजूला गोफ तयार करून मुलं घालतायेत. मासोळीसुद्धा विविध रंगात आणि आकारात यायला लागल्या आहेत. चांदीचा कुठलाही प्रकार ऑफिस वेअरवर तरूणी घालू शकतात.त्यामुळे चांदीचे ट्रेण्डी दागिने मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाले असल्याचेही पेडणेकर यांनी सांगितले.
जुन्या पारंपरिक दागिन्यांना नवाकोरा लुक देणारी हॅन्डक्रार्फटेड ज्वेलरीची परंपरा आजतागायत टिकून राहण्यासाठीचे प्रय सुरू आहेतच. त्याला आता लोकांकडूनही प्रतिसाद मिळतोय. आधुनिकतेची वाट धरून जुन्या पारंपरिक दागिन्यांना नवाकोरा लुक देणारी आजची पिढी हक्काने परंपरेला आपसूकच उत्साहाने जवळ करते आहे हे विशेष!
भारतीय संस्कृतीच्या अतिशय जवळ जाणारे मोटिव्हस (Motives) जे पिढय़ानपिढय़ा चालत आलेले आहेत ज्यात मोर, कमळ, चंद्रकोर, शेवंतीचे फूल, शेषनाग, लक्ष्मी हे दागिन्यांमध्ये आजही पाहायला मिळतात तसेच काळानूसार ते बदलतही आहेत. मोर हा प्रकार पाहिला तर पुर्वी मोरपीसाचे रंग ठेवून ते दागिन्यांवर दिसायचे पण आता लोकांना सिंगल, सटल आणि मोनोकलर आवडत असल्याने चांदीचे आणि सोन्याचे नक्षीदार मोर असलेले दागिने भावतात. कमळ आणि चंद्रकोरीच्या बाबतीतही तेच आहे. जुन्या दागिन्यांची रू पं कदाचित कालपरत्वे बदलत जातील पण त्यांची फॅशन कधीच चौकटीबाहेर जाणार नाही याची खात्री नक्कीच आहे. सध्या नाकातील ज्वेलरीमध्ये सर्व प्रकारच्या डिझाईन्स टॉप ट्रेण्डी आहेत. आज लग्नसराईच्या सीझनमध्ये तरू ण मुली आनंदाने नखशिखान्त नटतात?. खोप्यातले दागिने, चांदीचा मोगरम्य़ाचा गजरा, मेखला, छल्ला, तन्मणी, चिंचपेटी, ठुशी, चपलाहार, लक्ष्मीहार, पुतळीहार, मोहनमाळ हे सर्व काही आजची पिढी आनंदाने परिधान करते आणि ग्रेसफुली मिरवते.
– सायली मराठे, आद्या ज्वेलरी