वेदवती चिपळूणकर

ती डॉक्रच, पण माणसांची नाही, प्राण्यांची! स्वत:चं हॉस्पिटल असावं असं तिचं ध्येय नक्कीच आहे, पण ते प्राण्यांसाठी! आईसारखी काळजी घेते ती प्राण्यांची! पाळीव प्राण्यांवर उपचार करून पैसे कमवायची तिची इच्छा कधीच नव्हती. वन्य प्राण्यांसाठी काही करावं म्हणून व्हेटर्नरी डॉक्टर झालेली ती आज मुंबईच्या राणीच्या बागेत पेंग्विन्सची संपूर्ण देखभाल करते. परदेशातून आलेल्या या पाहुण्यांची घरच्यांसारखी काळजी घेणं हे ती तिचं कर्तव्य समजते. पेंग्विन्सची काळजी घेणाऱ्या संपूर्ण टीमचं ती नेतृत्व करते. लहानपणापासून असलेली आपली आवड जपणारी आणि त्यातच करिअर करणारी ती डॉक्टर मधुमिता काळे!

ठरवून व्हेटर्नरीला जायच्या निर्णयाबद्दल मधुमिता म्हणते, ‘सामान्यत: मेडिकलला, एम.बी.बी.एस.ला, अ‍ॅडमिशन मिळाली नाही की लोक डेन्टलला, म्हणजे बी.डी.एस.ला जातात. त्यालाही प्रवेश मिळाला नाही तर फिजिओथेरपी, फार्मसी, इत्यादी सगळे पर्याय पाहिले जातात. सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून व्हेटर्नरी निवडलं जातं. मात्र माझं खूप आधीपासून व्हेटर्नरीला जायचं पक्कं असल्याने मी इतर कुठल्या अ‍ॅडमिशनसाठी प्रयत्नच केला नाही. मला मेडिकलला जायचंच नव्हतं. घरच्यांना माझ्या निर्णयावर कोणताच आक्षेप नव्हता. मात्र आजूबाजूचे लोक, नातेवाईक यांचं मत असंच होतं की, व्हेटर्नरी करून पुढे काय करणार? पुढे करिअर काय? त्यातून पैसे कितीसे मिळणार? पाळीव प्राण्यांसाठी दवाखाना किंवा हॉस्पिटल काढून बऱ्यापैकी उत्पन्न होऊ  शकतं, पण वन्य प्राण्यांवर उपचार करून पोट कसं भरणार?, या सगळ्या प्रश्नांची त्या क्षणी माझ्याकडे उत्तरं नव्हती. पण आई-बाबांचा सप्पोर्ट आणि माझी प्राण्यांची प्रचंड आवड या जोरावर मी व्हेटर्नरीला जायच्या माझ्या निर्णयापासून जराही बधले नाही,’ असं ती म्हणते.

सामान्यत: पदवी घेऊन झाल्यानंतर मास्टर्ससाठी यूएसची निवड केली जाते. मात्र ‘ट्रेण्ड’ फॉलो न करता न्यूझीलंडला जाण्याबद्दल मधुमिता ठाम होती. तिने सांगितलं, ‘न्यूझीलंडची इको सिस्टीम आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आढळतात. मात्र न्यूझीलंडमध्ये जास्त करून पक्षी आणि सरपटणारे प्राणी, अर्थात रेप्टाइल्स, हेच दोन घटक मिळून इको सिस्टीम बनते. त्यामुळे त्यांच्याकडे प्राण्यांचं शिक्षण घेणं हे विशेष इंटरेस्टिंग ठरलं असतं. व्हेटर्नरीमध्ये स्पेशलायझेशन आणि मास्टर्स ऑफर करणारा तो एकच देश मला दिसत होता. आपलं वाइल्डलाइफ आणि त्यांचं वाइल्डलाइफ यांच्यातला फरक हाही शिकण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा भाग होता. त्यामुळे यूएसचा वगैरे विचारच माझ्या कधी डोक्यात आला नाही.’

न्यूझीलंडच्या शिक्षणपद्धतीबद्दल मधुमिताने आपला अनुभव सांगितला. आपली शिक्षणपद्धती आणि तिथली शिक्षणपद्धती यात खूप फरक आहे. आपल्याकडे हुशारी खूप असते, पण शिक्षण घेण्याच्या आणि देण्याच्या पद्धतीत असलेल्या काही त्रुटींमुळे आपण रिसर्चकडे फारसे वळत नाही. तिथे शिक्षण हे अ‍ॅप्लिकेशनवर आधारित असतं. प्रत्यक्ष वाइल्डलाइफमध्ये जाऊन, प्राणी हाताळून, त्यांच्यावर उपचार करून हे शिक्षण दिलं जातं, असं ती सांगते. प्राण्यांबरोबर राहून, त्यांच्यावर लक्ष ठेवून, त्यांचा अभ्यास करून ज्ञान मिळवण्याकडे तिथल्या शिक्षणाचा कल असतो. रिसर्च कसा करावा आणि कसा लिहावा या सगळ्याचं ट्रेनिंग तिथे दिलं जातं. रिसर्चसाठी आधी किती वाचन आणि निरीक्षण गरजेचं आहे हे तिथल्या रिसर्चच्या कडक नियमांवरून कळतं. दुसऱ्या कोणाच्याही आधीच्या रिसर्च पेपरची आपण चुकूनसुद्धा कॉपी करत नाही ना याची संपूर्ण खबरदारी आपल्याला घ्यावी लागते. तिथे आम्हाला वाइल्डलाइफ हॉस्पिटल्समध्ये जाऊ न त्यांच्यावर उपचार करायला शिकवलं गेलं. क्लासरूम थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलवर त्यांचा अधिक विश्वास आहे. वेगवेगळ्या प्राण्यांचे स्वभाव, सवयी या सगळ्याबद्दल सखोल ज्ञान मिळवण्यासाठी त्यांच्यात जाऊन राहणं गरजेचं असतं आणि तेच आम्ही तिथे करत होतो, असं मधुमिता सांगते. वन्य प्राण्यांवर उपचार करून त्यांना पुन्हा निसर्गात सोडण्याचीही जबाबदारी पार पाडायची असते आणि तेही तिथे त्यांनी आपल्याला शिकवलं, हे सांगतानाच जखमी किंवा आजारी वन्य प्राणी निसर्गात पुन्हा तग धरू शकतील इथपर्यंत त्यांची हेल्थ रिस्टोअर करावी लागते. या सगळ्यातून जे शिक्षण मिळालं ते आयुष्यभरासाठीचं आहे, याबद्दल ती समाधान व्यक्त करते.

अनेकदा डिग्रीनंतर मास्टर्ससाठी एखादी व्यक्ती जेव्हा देशाबाहेर जाते तेव्हा पुन्हा भारतात येण्याऐवजी त्याच देशात करिअर घडवायची स्वप्नं बघते आणि तिथेच पाय रोवायला सुरुवात करते. त्यात वाइल्ड लाइफसाठी मेडिकल सुविधा आणि कामाची संधी या दोन्ही गोष्टी परदेशातच अधिक, असं असतानाही मधुमिताने भारतात परत यायचं ठरवलं. मायदेशी काम करण्याच्या तिच्या या ओढीबद्दल ती म्हणते, ‘भारतात परत यायचं हे तर मी आधीच ठरवलं होतं. परत येऊ न इथे नक्की काय काम करायचं, किती संधी मिळेल, कोणत्या संधी मिळतील हे माहीत नव्हतं. मात्र भारतात झूमध्ये किंवा एकंदरीतच प्राण्यांच्या शेल्टर्स किंवा कॅप्टिव्हमध्ये असणारा मॅनेजमेंटचा अभाव मला दिसत होता. वन्य प्राण्यांच्या घ्याव्या लागणाऱ्या काळजीत आपण थोडे कमी पडतोय हे मला माहीत होतं. त्यावरच काही काम इथे येऊन करावं अशी माझी इच्छा होती. कोणतं काम, कशा प्रकारचं काम याबद्दल काहीही निश्चित नव्हतं. मात्र आत्ता जे काम मी करते आहे ते मिळण्यात मी माझ्या नशिबाला जास्त क्रेडिट देईन, हेही ती मनमोकळेपणाने कबूल करते. मी जेव्हा परत आले तेव्हा माझा तिथला रिसर्चचा थिसिस पूर्ण व्हायचा होता. काम सगळं संपवलं होतं, मात्र लिखाण मी इथे येऊ न करत होते. जॉब शोधायला मी सुरुवातही केली नव्हती तेव्हा माझ्याकडे ही राणीच्या बागेतली संधी चालून आली. त्यामुळे इथे आल्यावर मला काहीच स्ट्रगल करावा लागला नाही, असं तिने सांगितलं.

पेंग्विन्सची आई म्हणून त्यांची देखभाल करणारी मधुमिता तिच्या या मुलांबद्दल म्हणते, ‘वन्य प्राणी असे असतात की ते कोणत्याही आजाराची लक्षणं लवकरच्या स्टेजमध्ये दाखवत नाही. तशी लक्षणं दिसली तर भक्षकांचा धोका असतो. त्यामुळे आजार शेवटच्या टप्प्यात असतानाच अनेकदा लक्षात येतो. यासाठी आम्ही दोन प्रकारची खबरदारी मुख्यत्वे घेत असतो, एक म्हणजे दर थोडय़ाथोडय़ा वेळाने त्यांना तपासत राहणं आणि दुसरं म्हणजे त्यांच्या भोवतीचं वातावरण इतकं स्वच्छ ठेवणं की त्यांना कोणत्या आजाराची बाधा होणारच नाही.’ माणसाच्या लहान बाळासारखेच हे पेंग्विन्सही वागतात, हाताला लागेल ती वस्तू सरळ उचलून तोंडात टाकतात. त्यामुळे त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावं लागतं, अशी आईसारखीच तक्रार ती करते. याबाबतीत खबरदारी म्हणून पेंग्विन्सच्या आसपास कोणतीच धोकादायक वस्तू असणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागते. माझ्या टीममध्ये अजून ३ डॉक्टर्स आहेत, जेणेकरून आम्ही २४ तास पेंग्विन्सवर लक्ष ठेवू शकतो. त्यांच्यातला मोल्ट हा पेंग्विन तर न्यूजपेपरमधूनही प्रसिद्ध आहे. तो खरंच सगळ्यांचा लाडका आहे, आता तर त्याची आणि माझी छान ओळखही झालेली आहे, असं ती आनंदाने सांगते.

पेंग्विन्ससारख्या वेगळ्याच प्राण्यावर स्पेशलायझेशन केलेल्या मधुमिताला भविष्यात स्वत:चं वाइल्डलाइफ रेस्क्यू सेंटर आणि रीहॅबिलिटेशन सेंटर सुरू करायचं आहे. मात्र सध्या तरी तिच्या या आठ बाळांवरच तिने सगळं लक्ष केंद्रित केलं आहे.

‘आपली शिक्षणपद्धती आणि न्यूझीलंडमधील शिक्षणपद्धती यात खूप फरक आहे. आपल्याकडे हुशारी खूप असते, पण शिक्षण घेण्याच्या आणि देण्याच्या पद्धतीत असलेल्या काही त्रुटींमुळे आपण रिसर्चकडे फारसे वळत नाही. तिथे शिक्षण हे अ‍ॅप्लिकेशनवर आधारित असतं. प्रत्यक्ष वाइल्डलाइफमध्ये जाऊन, प्राणी हाताळून, त्यांच्यावर उपचार करून हे शिक्षण दिलं जातं.’

सामान्यत: मेडिकलला, एम.बी.बी.एस.ला, अ‍ॅडमिशन मिळाली नाही की लोक डेन्टलला, म्हणजे बी.डी.एस.ला जातात. त्यालाही प्रवेश मिळाला नाही तर फिजिओथेरपी, फार्मसी, इत्यादी सगळे पर्याय पाहिले जातात. सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून व्हेटर्नरी निवडलं जातं. मात्र माझं खूप आधीपासून व्हेटर्नरीला जायचं पक्कं असल्याने मी इतर कुठल्या अ‍ॅडमिशनसाठी प्रयत्नच केला नाही.