विनय जोशी

रात्रीच्या आकाशात चंद्राखालोखाल सर्वात तेजस्वी दिसतो तो टपोरा शुक्र. त्याच्यावर असलेल्या दाट वातावरणाच्या आच्छादनामुळे निरीक्षणातून अंदाज लागत नव्हता, पण ४०हून अधिक मोहिमांनी पृथ्वीच्या या जुळय़ा भावंडाची अनेक रहस्ये उजेडात आणली आहेत.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
Sun Planet Transit In Makar | surya gochar 2025
१४ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींना सोन्याचे दिवस; सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाने सुख-संपत्तीत होईल प्रचंड वाढ
Samsaptak Yog 2025
मिथुन राशीमध्ये निर्माण होतोय समसप्तक, ‘या’ ३ राशींच्या लोक जगतील सुख-समृद्धीचे जीवन, आयुष्यात होईल आनंदी आनंद
a unique sanyog created on paush Purnima after 144 years
१४४ वर्षानंतर पौष पौर्णिमेच्या दिवशी ग्रहांचा दुर्लभ संयोग, या चार राशींवर पडणार पैशांचा पाऊस
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….
Mars Transit 2025 In Gemini
२१ जानेवारीपासून ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात निर्माण होणार अडचणी; मंगळाच्या वक्री चालीने उद्भवणार आर्थिक समस्या

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेची घटना आहे. एकदा पहाटे जर्मन सैन्याने पूर्वेला आकाशात एक अत्यंत तेजस्वी वस्तू पाहिली. शत्रूने हेरगिरी करण्यासाठी सोडलेले हे काही तरी वैज्ञानिक उपकरण असावे असा समज झाला आणि त्याला नष्ट करायला त्यांनी तोफा डागल्या. तासभर गोळाबारी केल्यानंतर साक्षात्कार झाला की तो आकाशात उगवलेला शुक्र ग्रह आहे! शुक्राविषयी असे गैरसमज अगदी प्राचीन काळापासून आहेत. तेजस्वितेमुळे अनेकदा याला तारा समजले जाते. ग्रीक लोकांना ल्युसीफर (पहाटतारा) आणि हेस्पेरस (सायंतारा) हे दोन वेगळे तारे आहेत असं वाटायचं. याच्या तेजस्वी सौंदर्याला भाळून रोमन लोकांनी याला सौंदर्याची देवता व्हीनस मानले. शुक्रतारा.. शुक्राची चांदणी म्हणत कवी मंडळींना हा प्रेमाचे प्रतीक वाटतो. रात्रीच्या आकाशात इतर ग्रहांच्या मानाने टपोरा शुक्र लगेच लक्ष वेधून घेतो.

हा ग्रह फक्त दिसायलाच नाही तर वागायलासुद्धा इतर ग्रहांपेक्षा वेगळा आहे. बाकीच्या ग्रहांची कक्षा जरी लंबवर्तुळाकार असली तरी शुक्राची कक्षा मात्र जवळपास वर्तुळाकार आहे. स्वत:भोवती फिरायला २४३ दिवस तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २२५ दिवस लागतात. म्हणजेच शुक्रावर दिवस हा वर्षांपेक्षाही मोठा आहे. ‘सूर्य पश्चिमेला उगवणे’ ही म्हण तिथे रोजची आहे. शुक्र पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो, परिणामी शुक्रावर सूर्य पश्चिम दिशेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो. शुक्र दाट, अपारदर्शक वातावरणाने आच्छादिलेला आहे. ग्रहमालेतील सर्वात दाट वातावरणसुद्धा इथेच आहे. परिणामी सर्वात तप्त ग्रहदेखील हाच. याचे परम इनांतर (gretest elongation) ४५ ते ४७ अंश असल्याने तो पहाटे पूर्व आकाशात किंवा संध्याकाळी पश्चिम आकाशात जास्तीत जास्त तीन तास दिसू शकतो. आकार व वस्तुमानाच्या बाबतीत जुळी भावंडं शोभावीत इतके पृथ्वी आणि शुक्र सारखे आहेत. यामुळे इथं जीवसृष्टी असावी असं शास्त्रज्ञांना वाटत होतं.

१७ व्या शतकाच्या सुरुवातीस इटालियन खगोलशास्त्रज्ञ गॅलिलियो गॅलिली यांनी चंद्राप्रमाणे शुक्राच्या कला पाहिल्या. १७६१ मध्ये रशियन शास्त्रज्ञ मिखाईल लोमोनोसोव्ह यांनी सूर्यावरून होणारं शुक्राचं अधिक्रमण पाहून शुक्रावर वातावरण आहे असं दाखवून दिलं. या दाट वातावरणामुळे शुक्राच्या पृष्ठभागाविषयी फक्त निरीक्षणाने माहिती मिळवणं कठीण जात होतं. २० व्या शतकात स्पेक्ट्रोस्कोपिक आणि अल्ट्राव्हायोलेट निरीक्षणांच्या विकासामुळे त्याच्या या बुरख्याआडची काही रहस्यं उघड झाली.

स्पेस रेसच्या दरम्यान अमेरिका आणि सोव्हिएत रशियाच्या दरम्यान शुक्रावर यान पाठवण्याची स्पर्धा सुरू झाली. रशियाने व्हेनेरा (रशियन भाषेत अर्थ शुक्र) ही मोहीम हाती घेतली. १९६० मध्ये अमेरिकेचं पायोनियर- ५ शुक्राकडे झेपावलं, पण बिघाड होऊन सूर्याभोवती फिरत राहिलं. पुढच्याच वर्षी रशियाची व्हेनेरा- १ मोहीम संपर्क बंद पडून अयशस्वी ठरली. आणि अखेर १९६२ मध्ये नासाच्या मरिनर- २ यानाने शुक्राजवळून यशस्वी प्रवास करत त्याची निरीक्षणं नोंदवली. मरिनर मोहिमेने शुक्राविषयीच्या रमणीय कल्पनांना छेद देत प्रखर वास्तव मांडलं. त्याच्या पृष्ठभागाचे ४८० अंश एवढं प्रचंड तापमान नोंदवलं गेलं. तसंच तिथं पृथ्वीपेक्षा ९० पटीने अधिक वातावरणीय दाब असल्याचं सिद्ध झालं. इथल्या ढगातून तीव्र सल्फ्युरिक अ‍ॅसिडचा पाऊस पडतो. त्यामुळे शुक्रावर रोमँटिक मंद वारा नसून अ‍ॅसिडच्या धारा आहेत हे कळलं. या सगळय़ा प्रतिकूल वातावरणामुळे शुक्रावर जीवसृष्टी असण्याची शक्यता मावळली.   

अमेरिकेच्या यशानंतर रशियाच्या झोंड १, कॉसमॉस २७ , व्हेनेरा- २,  व्हेनेरा- ३ अशा मोहिमांना अपयशाला सामोरे जावे लागले, पण अखेर १९६७ मध्ये व्हेनेरा- ४ मोहिमेला यश मिळालं. शुक्राच्या वातावरणात थेट उतरून अभ्यास करणं हा या मोहिमेचा उद्देश होता. एखाद्या ग्रहाच्या वातावरणात प्रवेश करणारं ते पहिलं मानवी यान ठरलं. व्हेनेरा- ४ ने इथल्या वातावरणाचं रासायनिक विश्लेषण करून शुक्राचे वातावरण मुख्यत: कार्बन डाय ऑक्साइड्सचं बनलं असून काही टक्के नायट्रोजन आणि ऑक्सिजन असल्याचं दाखवलं. याच्या लँडरला वातावरणातून जाताना वातावरणाचे अनेक थर जाणवले तसेच वेगवेगळय़ा उंचीवर तापमान आणि दाबामध्ये लक्षणीय फरकदेखील आढळला. १९६९ साली पाठवलेल्या व्हेनेरा ५ आणि ६ मोहिमेतदेखील वातावरणात उतरून अभ्यास चालू राहिला. शुक्राच्या  वातावरणातील प्रचंड दाबामुळे या मोहिमेतील एकही शोधकुपी शुक्राच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकली नाही. या मोहिमेतील पुढच्या व्हेनेरा ७ यानाने डिसेंबर १९७० मध्ये शुक्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे शोधकुपी उतरून दाखवली. हे मानवी इतिहासातील एखाद्या ग्रहावरचं पहिलं यशस्वी सॉफ्ट लँिडग ठरलं. वेनेरा- ७ शुक्राच्या कठोर वातावरणाला बळी पडण्यापूर्वी त्याच्या पृष्ठभागावर अंदाजे २३ मिनिटं कार्यरत होतं. या मोहिमेने शुक्राच्या पृष्ठभागाची रचना खडकाळ असल्याची पुष्टी केली. १९७२ ते ७५ दरम्यान वेनेरा- ८, ९, १० यानांनी  शुक्रावर यशस्वी स्वारी करत हाच कित्ता गिरवला. व्हेनेरा- ८ च्या फोटोमीटर उपकरणांनी दाखवलं की शुक्राचं ढगांचं दाट आच्छादन पृष्ठभागापासून ३५ किमी उंचीपासून सुरू होतं. याखाली पृष्ठभागापर्यंत वातावरण तुलनेने स्वच्छ आहे. व्हेनेरा- ९ व व्हेनेरा- १० या दोन अवकाशयानांनी शुक्राच्या पृष्ठभागाचं पहिल्यांदा चित्रण केलं.

पायोनियर व्हीनस प्रकल्पाअंतर्गत १९७८ मध्ये पायोनियर व्हीनस ऑर्बिटर आणि पायोनियर व्हीनस मल्टीप्रोब ही दोन याने शुक्राकडे रवाना केली. पायोनियर व्हीनस ऑर्बिटरने ४ डिसेंबर १९७८ रोजी शुक्र ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि त्याच्याभोवती फिरत शुक्राचं वातावरण आणि पृष्ठभाग यांचा १९९२ पर्यंत अभ्यास केला. पायोनियर व्हीनस मल्टीप्रोबने ९ डिसेंबर १९७८ रोजी शुक्राच्या वातावरणात चार लहान प्रोब उतरवले. १९८१ ते ८३ दरम्यान व्हेनेरा मोहिमेतील  व्हेनेरा १३, १४, १५, १६ अशा व्हेनेरा मोहिमांच्या यशानंतर रशियाने काही युरोपीय देशांच्या सहकार्याने वेगा प्रकल्प राबवला. डिसेंबर १९८४ मध्ये वेगा १ आणि वेगा २ ही जुळी याने शुक्रकडे पाठवली गेली. ऑर्बिटर आणि लँडरव्यतिरिक्त व्हेगा मिशनअंतर्गत दोन बलून एरोबॉट्स शुक्राच्या पृष्ठभागापासून ५४ किमी अंतरावर  ढगांच्या सर्वात सक्रिय थरात तरंगण्यासाठी डिझाइन केले होते. त्यांनी शुक्राच्या वातावरणातील विविध उंचीवर तापमान, दाब आणि ढगांचे गुणधर्म अभ्यासले.

४ मे १९८९ रोजी नासाचे मॅगेलन यान अटलांटिसस्पेस शटलद्वारे शुक्राकडे झेपावलं. सिंथेटिक अ‍ॅपर्चर रडार (SAR) तंत्रज्ञानाचा वापर करून शुक्राच्या संपूर्ण पृष्ठभागाचा नकाशा तयार करणं हे त्याचं प्राथमिक उद्दिष्ट होतं. ऑगस्ट १९९० मध्ये शुक्राजवळ पोहोचून त्याच्याभोवती प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. शुक्राभोवती प्रदक्षिणा घालत रडारच्या साहाय्याने त्याने शुक्राच्या ९८ टक्के भागाचं सखोल निरीक्षण केलं. पुढे ‘एरोब्रोकिंग’चा उपयोग करत मॅगेलनची कक्षा कमी केली गेली. परिणामी ते फक्त ९४ मिनिटांत शुक्राभोवती फिरू लागलं. १९९४ मध्ये याच्या सहाव्या व शेवटच्या शुक्र प्रदक्षिणेत याची कक्षा अजून कमी करत  ‘विंडमिल’ प्रयोग करण्यात आला. मॅगेलनची सौरतावदाने एखाद्या पवनचक्कीप्रमाणे ठेवून शुक्राच्या पृष्ठभागालगतच्या वातावरणाचे निरीक्षण केलं गेलं. अखेरीस ऑक्टोबर ९४ मध्ये याच्या कक्षेत पुन्हा एकदा बदल करून यान शुक्रावर कोसळवून नष्ट केलं गेलं. मॅगेलनने शुक्राची अनेक वैशिष्टय़े उजेडात आणली. याला शुक्राच्या पृष्ठभागावर डोंगर, दऱ्या, सपाट मैदाने, विवरं दिसली. इथं सक्रिय ज्वालामुखी असल्याची चिन्हं आढळली. शुक्राचा पृष्ठभाग प्रामुख्याने बेसाल्टिक खडकांनी बनला असल्याचा अंदाज लावला गेला.

मॅगेलननंतर तब्बल ११ वर्षे शुक्राच्या निरीक्षणासाठी एकही मोहीम आखली गेली नाही. दरम्यान, गॅलिलिओ, कॅसिनी आणि मेसेंजर या मोहिमांनी आपल्या निर्धारित ग्रहांकडे जाता जाता शुक्राची फेरी मारत काही निरीक्षणं नोंदवली. ९ नोव्हेंबर २००५ मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘व्हीनस एक्स्प्रेस’ या यानाचं पृथ्वीवरून उड्डाण झालं. शुक्रापर्यंतचा जवळजवळ ४० कोटी किलोमीटरचा प्रवास १५३ दिवसांत पूर्ण करत ११ एप्रिल २००६ ला ते शुक्राच्या कक्षेत फिरू लागलं. शुक्राच्या वातावरणाचं दीर्घकालीन निरीक्षण करणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. या यानावर निरीक्षणं आणि प्रयोग करण्यासाठी वैज्ञानिक उपकरणांचा संच होता. यात प्रामुख्याने पृष्ठभागाची आणि ढगांची वैशिष्टय़े टिपण्यासाठी व्हीनस मॉनिटिरग कॅमेरा (VMC), चुंबकीय क्षेत्र मोजण्यासाठी मॅग्नेटोमीटर (MAG), काही स्पेक्ट्रोमीटर यांचा समावेश होता.

शुक्रावरील कार्बन डाय ऑक्साइडच्या दाट आवरणामुळे उष्णता अडकून या ग्रहाचं तापमान वाढतं. व्हीनस एक्स्प्रेसने या ग्रीनहाऊस इफेक्टचा सखोल अभ्यास केला. त्याचबरोबर इथल्या ढगांची निर्मिती, त्यांचे प्रकार, हालचालीं यांचं निरीक्षण केलं गेलं. या निरीक्षणानुसार या ढगातून सल्फ्युरिक अ‍ॅसिडचा पाऊस पडतो, पण हे थेंब जमिनीवर पोहोचण्यापूर्वीच तापमानामुळे त्यांची वाफ होऊन ती पुन्हा वर जात वातावरणात मिसळली जाते. शुक्रावर अधूनमधून विजा चमकत असल्याचा पुरावाही व्हीनस एक्स्प्रेसला मिळाला. ही मोहीम जवळपास दोन शुक्र वर्षांसाठी आखली होती, पण त्याला पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली. आणि अखेर २०१४ मध्ये मिशन कंट्रोलचा व्हीनस एक्स्प्रेसशी संपर्क तुटला आणि  ESA ने व्हीनस एक्स्प्रेस मोहीम संपल्याची घोषणा केली.

सध्या जपानचं अकात्सुकी हे यान शुक्राभोवती फिरतं आहे. २० मे २०१० रोजी अकात्सुकी लाँच केलं गेलं. प्रणोदन प्रणालीच्या अपयशामुळे ही मोहीम लांबत अखेर २०१५ मध्ये यानाने शुक्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. तेव्हापासून अकात्सुकी शुक्राचं वातावरण, हवामान आणि पृष्ठभागाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पाठवत आहे. येत्या काही वर्षांत अनेक देशांनी शुक्रासाठी मोहिमा आखल्या आहेत. नासाची दा व्हिन्ची प्लस आणि व्हेरिटास ही दोन याने २०२९ च्या आसपास शुक्राकडे रवाना होतील. याचदरम्यान रशियाची व्हेनेरा- डी मोहीमदेखील राबवली जाईल. इसाने एनव्हिजन हे मिशन घोषित केलं आहे. तर भारतदेखील शुक्रयान  या महत्त्वाकांक्षी योजनेतून शुक्रावर स्वारी करायला सज्ज होतो आहे. या मोहिमांतून शुक्राविषयी नवी माहिती मिळत जाईल. तोपर्यंत अरुण दातेंच्या आवाजातील ‘शुक्रतारा मंदवारा’चे स्वर ऐकत शुक्राला ‘तू असा जवळी राहा’ म्हणायला हरकत नाही! viva@expressindia.com

Story img Loader