तेजश्री गायकवाड
देशातल्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या अनेकांना प्लस साइज फॅशन शोमुळे आपणही फॅशन इंडस्ट्रीमध्ये मॉडेल म्हणून पाय रोवू शकतो, असा विश्वास वाटला होता. आता इंडस्ट्री आणि मार्केटमध्ये प्लस साइज फॅशन सर्वमान्य झाली असली तरी मॉडेल्सना मात्र मानही नाही आणि धनही मिळत नाहीये..
दोन वर्षांपूर्वी ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या विंटर फेस्टीव सीझनमध्ये ‘ऑल : द प्लस साइज स्टोअर’ आणि फॅशन डिझायनर शिल्पा चव्हाण यांनी मिळून पहिलावहिला प्लस साइज फॅशन शो केला. या शोसाठी खास लॅक्मेने प्लस साइज मॉडेलचे ऑडिशन घेतले होते. देशातल्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या अनेकांना या प्लस साइज शोमुळे आपणही फॅशन इंडस्ट्रीमध्ये मॉडेल म्हणून पाय रोवू शकतो, असा विश्वास दिला होता. आता इंडस्ट्री आणि मार्केटमध्ये प्लस साइज फॅशनसर्वमान्य झाली असली तरी मॉडेल्सना मात्र मानही नाही आणि धनही मिळत नाहीये..
आपल्या देशात अनेक प्रकारची शरीरयष्टी असलेले लोक आहेत. फॅशनविश्वात सडपातळ बांध्याला मान असला तरी गेल्या काही वर्षांत विविध देशांतील माणसांच्या गरजांनुसार वाढत्या अंगाची फॅशन ही मार्केटची गरज ठरली आहे. आपल्याकडेही तुलनेने स्थूल बांध्याचे प्रमाण जास्त असताना प्लस साइज फॅशन हा दुर्लक्षित विषय होता. मात्र बाजारातील गरज पाहता ‘ऑल’ या ब्रॅण्डनंतर ‘पँटलून’सारख्या अनेक मोठय़ा फॅशन ब्रॅण्ड्स आणि डिझायनर्सनी खास प्लस साइज कपडय़ांचं कलेक्शन बनवायला सुरुवात केली. बाजारात येणारी प्रत्येक नवीन गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि विकली जाण्यासाठी जाहिरात केली जाते. प्लस साइज कपडय़ांच्या जाहिरातीसाठीही प्लस साइज मॉडेलची गरज भासणं साहजिक होतं. त्यानुसार प्लस साइज मॉडेल्सनाही प्लॅटफॉर्म मिळाला खरा मात्र जितक्या वेगाने प्लस साइज ब्रॅण्ड्स आणि त्यांचं कलेक्शन बाजारात येतंय तितकीच प्लस साइज मॉडेल्सना मान मिळण्याऐवजी त्यांची परवड होते आहे. एकीकडे फॅशन डिझायनर नवनवीन कलेक्शन बाजारात आणतायेत पण त्यांच्यासाठी मॉडेलिंग करणाऱ्यांना धड वागणूकही मिळत नाही की, त्यासाठी लागणाऱ्या बेसिक गोष्टीही त्यांना पुरवल्या जात नाहीत, अशा तक्रारी या तरुण
मॉडेल्सक डून येत आहेत. याबद्दल गेले चार सीझन सतत प्लस साइज फॅशन शोमध्ये भाग घेणारी नेहा परुलकर सांगते, ‘मी लॅक्मेच्या पहिल्याच प्लस साइज ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाले होते. मी पहिल्यांदा फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक केला. त्या वॉकने मला खूप विश्वास मिळाला, माझ्यासाठी फॅशन इंडस्ट्रीमध्ये येण्याची ही नवीन संधी आहे असं मला वाटलं. पहिल्या वर्षी काहीच माहिती नसल्यामुळे आम्हा मॉडेल्सनाही रॅम्पवॉक करण्यासाठी मानधन मिळतं हे माहिती नव्हतं. त्या वेळी फक्त आपल्याला एवढी मोठी संधी मिळाली आहे, मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे, मोठय़ा फॅशन डिझायनरचे डिझायनर कपडे घालायला मिळतायेत एवढंच कळत होतं. पण आपण केलेल्या किंवा करत असलेल्या कष्टाचा आपल्याला मोबदलाही मिळायला हवा हे नंतर लक्षात आलं.
प्लस साइजचं क्षेत्र आता कुठे नावारूपाला येतं आहे. त्यामुळे फॅशन डिझायनर्सना किंवा शो आयोजकांना आपणच मॉडेल्सना काम देऊन त्यांची प्रसिद्धी करतो आहोत, असं वाटतं आहे. मॉडेल मग ती सडपातळ असो किंवा प्लस साइड असो कोणीही रॅम्पवर वॉक केलं तरी त्याचे कष्ट सारखेच असतात आणि त्यांनाही मोबदला मिळायला हवा. बाकीच्या स्लिम मॉडेल्सप्रमाणेच आम्हालाही मोबदला मिळायला हवा असं अजिबात नाही, पण आम्ही घेतलेल्या कष्टांचा आम्हालाही काहीएक मोबदला मिळायला हवा, अशी अपेक्षा नेहाने व्यक्त केली. मी प्लस साइज मॉडेलसोबतच एक बॉडी पॉझिटिव्ह इन्फल्यूएन्सर आहे, माझे अनेक हजारांच्या घरात फॉलोअर्स आहेत. परंतु तरीही सुरुवातीच्या काळात माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक ब्रॅण्डबरोबर मी विनाशुल्क काम केलं, कारण अशा ब्रॅण्ड्सना आमच्यावर विश्वासच नव्हता, त्यांना आमच्यावर इन्व्हेस्टमेंट करायची भीती वाटते, त्याने जास्त फायदा होणार नाही असं त्यांना वाटतं. पण ते हे विसरतात की आपल्या देशातील पन्नास टक्के महिला या प्लस साइजमध्ये येतात,’ असं ती म्हणते.
‘प्लस साइज मॉडेल’ या संकल्पनेमुळे अनेकांना विश्वास दिला आहे. कधीकाळी स्वत:च्या प्लस साइजला नाकारणारे स्वत:हून फॅशन आपलीशी करू पाहतायेत. तरीही प्लस साइज मॉडेल्सची ओळख फक्त स्टेज, रॅम्पपर्यंतच मर्यादित राहिली आहे, असं ठाम मत स्वत: व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेली दीप्ती भरवनी व्यक्त करते. ‘डिझायनर आणि फॅशन विकणाऱ्यांच्या मते ते आम्हाला खूप मोठी संधी देत आहेत. पण ती संधी त्या स्टेजपर्यंतच मर्यादित राहते आहे, कारण अजूनही भारतात प्लस साइजसाठी कपडे बनवणारे एवढे ब्रॅण्ड आलेले नाहीत. आम्ही आमच्या कामाचा मोबदला मागितला तरी त्यांच्याकडून तुमच्यासारखे अनेक प्लस साइज मॉडेल आहेत त्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे का देऊ , असा प्रश्न उपस्थित केला जातो. सोशल साइट्सवरती माझे खूप फॉलोअर्स आहेत, जे आमच्यासारख्या प्लस साइज लोकांना बघून प्रेरणा घेतात. त्यांच्यासाठी चांगले फोटो काढून अपलोड करणं माझं काम आहे. यासाठी अनेक फोटोग्राफर स्वत: माझ्याकडे येतात, मात्र त्यांनाही आम्हाला मानधन द्यायचं नसतं. लॅक्मेसारख्या मोठय़ा शोमध्ये दरवर्षी प्लस साइज मॉडेलचं ऑडिशन होतं. त्यांना सतत कोणी ना कोणी नवा चेहरा मिळतो त्यामुळे मोफत काम करून घेण्याकडेच त्यांचा कल आहे, अशी खंत दीप्तीने व्यक्त केली.
‘कामाच्या बदल्यात पैसे तर नाहीच मात्र मॉडेल्ससाठी साध्या सोयीसुविधाही दिल्या जात नाहीत, अशी तक्रार फॅशन ब्लॉगर, प्लस साइज मॉडेल आणि नामांकित फॅशन कॉलेजमध्ये प्रोफेसर असलेल्या नीलाक्षी सिंगने केली. ‘आम्हाला साधा ट्रॅव्हलिंग पे मिळतो. मला असा अनुभव मी एका कंपनीत ब्रॅण्ड मॅनेजर म्हणून काम करत असतानाही आला. मी ज्या कंपनीत काम करत होते त्या कंपनीचं फोटोशूटही होत असे. मी तेव्हा फॅशन आणि स्टायलिंग ब्लॉग लिहायचे. म्हणून ते माझ्या या टॅलेंटचा वापर करून घेऊ लागले. पण त्यासाठी मला कधीही माझ्या पगारापलीकडे केलेल्या या एक्स्ट्रा कामासाठी पैसे दिले गेले नाहीत. लॅक्मेसाठी पहिल्यांदा जेव्हा प्लस साइजचं ऑडिशन झालं तेव्हा मी ते बघायला गेले होते. प्लस साइज मॉडेल्स सहज मिळत असल्याने निवडक मॉडेल्सना घेऊन त्यांना पुढे नेण्यासाठी प्रयत्नच केले जात नाहीत. ज्या पद्धतीने प्लस साइज फॅशन मार्केटमध्ये जोर धरतेय ते पाहता प्लस साइज मॉडेलिंग आणि फॅशनविश्वातही व्यावसायिकपणा येणं गरजेचं असल्याचं मत तिने व्यक्त केलं. मात्र त्याऐवजी अनेक ब्रॅण्ड्स काही मॉडेल्ससोबत एकत्र काम करतात, पण त्यांनी काही मागणी केली की दुसऱ्यांचा शोध घेतला जातो. यासाठी प्लस साइज मॉडेल्सनी एकत्र येऊन विनामोबदला काम करण्यास विरोध दर्शवला पाहिजे, अशी अपेक्षाही नीलाक्षी व्यक्त करते. एकंदरीतच काही प्लस साइज मॉडेल्सची कारकीर्द या क्षेत्रात उभी राहिली असली तरी अनेक जण या इंडस्ट्रीत स्थिरावण्यासाठी धडपड करत आहेत. फॅशनविश्वात आपलं वजन निर्माण करू पाहणाऱ्या या इंडस्ट्रीला योग्य दिशा मिळणं गरजेचं आहे, असा सूर या मॉडेल्सनी व्यक्त केलाय.