आसिफ बागवान

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने एक आदेश जारी करून देशातील ८५७ पोर्न अर्थात अश्लील संकेतस्थळांवर बंदी आणली. लहान तसेच किशोर वयातील मुलामुलींवर विपरीत परिणाम होऊ नये, म्हणून ही बंदी आणल्याचे जाहीर करताना दूरसंचार विभागाने सर्व इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांना (आयएसपी) याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची तंबीही दिली. देशातील युवा पिढी भरकटू नये, याकरिता लागू करण्यात आलेल्या या बंदीचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात आले. इथपर्यंत सारं ठीक. पण गेल्याच महिन्याच्या सुरुवातीला ‘क्वार्ट्झ’ या आंतरराष्ट्रीय न्यूज पोर्टल व संशोधन संस्थेचा अहवाल आणि ‘गुगल ट्रेंड्स’ या गुगलच्या विश्लेषणात्मक संकेतस्थळावरील माहितीने भयानक वास्तव समोर आणलं आहे. त्यापैकी ‘क्वार्ट्झ’च्या अहवालाकडे नंतर वळता येईल.

digital arrest
‘डिजिटल अरेस्ट’चा मुद्दा पंतप्रधानांकडून अधोरेखित
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
nude painting
अन्वयार्थ: असभ्य, म्हणून अश्लील!
fraud of 46 lakh with women by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून महिलांची ४६ लाखांची फसवणूक
cyber crime
सायबर गुन्हेगारांकडून खरेदीसाठी आमिष दाखवून फसवणूक
Fraud of 34 lakh rupees by getting caught in a honey trap vasai crime news
‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकवून वृध्दाची फसवणूक; एका अश्लील क्लिपसाठी उकळले ३४ लाख रुपये
young boy dance obscenely in front of mother
बापरे! आईसमोर अश्लील डान्स करणं पडलं महागात; गावासमोर दिला बेदम चोप, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “याची मस्ती…”
Woman obscene dance video viral on social media is from Madhya Pradesh where police officer and Councilor did obscene act
“टिप टिप बरसा पानी…”, महिलेचा अश्लील डान्स पाहून पोलिसांनी ओतलं अंगावर पाणी तर नगरसेवकाने… VIDEO एकदा पाहाच

जगभरातील वापरकर्त्यांकडून गुगलवर सर्च केल्या जाणाऱ्या शब्द, व्यक्ती किंवा अन्य कोणत्याही गोष्टींचे पृथ्थकरण करून कोणता शब्द अधिक शोधला जात आहे, याची आलेख रूपातील माहिती ‘गुगल ट्रेंड्स’वर उपलब्ध असते. ० ते १०० अशा मूल्यांकनात गुण देऊन वापरकर्त्यांचे कोणते ‘सर्च इंटरेस्ट’ अधिक ट्रेंडमध्ये आहेत, याची नोंद या आलेखावर केली जाते. या नोंदीवर नजर टाकल्यावर असे लक्षात येते की, केंद्र सरकारने पोर्न संकेतस्थळांवर बंदी घातल्यानंतर, म्हणजेच ऑक्टोबरमध्ये ‘पोर्न’ बाबत सर्च करणाऱ्यांचे प्रमाण ९२वर पोहोचले होते. केंद्र सरकारने बंदी आणल्यानंतर पोर्न पाहणाऱ्यांनी पर्यायी संकेतस्थळांचा शोध घेण्यासाठी तसे केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, गेल्या तीन महिन्यांत ‘पोर्न’बद्दलचा भारतीयांचा ‘इंटरेस्ट’ हा सातत्याने ८० ते ९५ या घरात राहिला आहे (डिसेंबरच्या २ तारखेला तो १०० इतकाही होता!) एकूणच अश्लील वा अ‍ॅडल्ट संकेतस्थळांवर बंदी येऊनही पोर्न पाहणाऱ्यांचे व त्याच्यासाठी शोधाशोध करणाऱ्यांचे काही एक बिघडलेले नाही, हे यावरून स्पष्ट होते.

भारतीयांचं पोर्नबद्दलचं आकर्षण वाढत चालल्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी क्रिकेट किंवा बॉलीवूडशी संबंधित विषयांपेक्षाही पोर्नबद्दलच्या सर्चचे प्रमाण दहा पटीने जास्त असल्याचा ‘गुगल ट्रेंडस’चा आलेख सांगतो. एवढंच नव्हे तर, जगभरातील वापरकर्त्यांनी गुगलवरून केलेल्या पोर्न शोधामध्येही भारताचा क्रमांक पाचवा लागतो (भारताआधी बांगलादेश, नेपाळ, इथोपिया आणि त्रिनिदाद अशा छोटय़ा देशांचा क्रमांक आहे). हे कमी म्हणून की काय, ‘पोर्नहब डॉट कॉम’ या संकेतस्थळावरील नोंदीनुसार पोर्न संकेतस्थळांवर सरासरी जास्त वेळ घालवणाऱ्यांमध्ये भारताचा अमेरिका आणि ब्रिटननंतर तिसरा क्रमांक लागतो. भारतातील वापरकर्ते (बहुतांश पुरुष) अशा संकेतस्थळांवर दररोज सरासरी आठ मिनिटे घालवतात. हे सगळं पाहिल्यानंतर भारतात पोर्नचं प्रस्थ कसं वाढत चाललं आहे, याची कल्पना येते. लैंगिक गोष्टींबद्दलचं आकर्षण हे यामागचं प्रमुख कारण असलं तरी, गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये पोर्न पाहणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे. प्रत्येकाच्या हातात आलेला स्मार्टफोन आणि स्वस्त झालेलं इंटरनेट याला जबाबदार आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

पूर्वी कॉम्प्युटरवर उघडपणे पोर्न किंवा अश्लील संकेतस्थळे पाहणे शक्य नव्हते. ही ‘गैरसोय’ स्मार्टफोनने दूर केली. त्यातच देशातील ‘जिओ’ क्रांतीनंतर जवळपास प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये दिवसाला किमान एक जीबी इतका इंटरनेट डेटा चण्या फुटाण्याच्या दरात उपलब्ध झाला. मग काय, पोर्नप्रेमींना मोकळं रानच मिळालं आहे. ‘पोर्नहब’च्याच अहवालानुसार भारतातील पोर्न पाहणाऱ्या ९० टक्के लोकांचं प्रमुख माध्यम हे स्मार्टफोनच आहे. यावरून स्मार्टफोन आणि पोर्न यांचा संबंध लक्षात येतो. पोर्न पाहणाऱ्यांची वयोगटानुसार वर्गवारी अजूनही अधिकृतपणे जाहीर नसली तरी, १६ ते ३५ वयोगटातील तरुण मंडळी यात आघाडीवर असल्याचं चित्र सहज दिसून येतं. किशोरवयातच हाती आलेला मोबाइल आणि त्यात जोडीला मिळालेला भरघोस इंटरनेट डेटा यामुळे तारुण्यसुलभ कुतूहल शमवण्यासाठी या पिढीला आयतं साधन मिळालं आहे. सुरुवातील कुतूहलापोटी चाळलेल्या या संकेतस्थळांवरील फेऱ्या हळूहळू सवयीचा भाग बनू लागतात. याचे विपरीत परिणाम दाखवणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. आपल्या देशात लैंगिक शिक्षणाबद्दल अजूनही नाकं मुरडली जात असल्याने त्याबद्दल उघडपणे बोलणंही वादग्रस्त ठरतं. घरातली वडीलधारी मंडळी असोत की शाळा-कॉलेजातला शिक्षकवर्ग असो, या विषयावर स्पष्ट आणि मोकळेपणाने तरुणाईशी संवाद साधण्याची तयारी कुणीच दाखवत नाही. उलट टीव्हीवर लावलेल्या चित्रपटादरम्यान एखादा प्रणय प्रसंग सुरू झाल्यास झटकन रिमोटने चॅनेल बदललं जातं. अशा वातावरणात या गोष्टींबद्दल वाटणारं कुतूहल मुलांना पोर्न संकेतस्थळांकडे नेतं, हे वारंवार सिद्ध झालं आहे.

लैंगिक शिक्षण दिल्याने पोर्नबद्दलचं आकर्षण कमी होईल का, हा चर्चेचा मुद्दा असू शकतो. पण त्या चर्चेची जागा ही नाही. त्याहूनही गंभीर मुद्दा ‘क्वार्ट्झ’च्या अहवालातून समोर आला आहे आणि तो समस्त मोबाइल वापरकर्त्यांसाठी धोक्याचा इशारा आहे. ‘क्वार्ट्झ’नं गेल्या महिन्यात जारी केलेल्या या अहवालानुसार, पोर्न संकेतस्थळं ‘मनोरंजना’च्या आडून वापरकर्त्यांचा डेटा गोळा करत आहेत. अलीकडे, इंटरनेट किंवा मोबाइलवरून साधं रेल्वे वेळापत्रकाचं अ‍ॅप जरी हाताळलं तरी हाताळणाऱ्याची माहिती संबंधित अ‍ॅपकडे आपोआप जमा होते. त्यामुळे पोर्न संकेतस्थळं पाहणाऱ्यांचा डेटा त्या कंपन्यांकडे जमा होत नसेल, असं मानणं वेडेपणाचं ठरेल. पण या डेटाचं प्रमाण किती? तर नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन अशा व्हीडिओ स्ट्रिमिंग साइट्सपेक्षाही जास्त यूजर डेटा पोर्न संकेतस्थळं गोळा करत आहेत. हा यूजर डेटा म्हणजे, वापरकर्त्यांचं नाव, ईमेल आयडी किंवा त्याच्या ‘आवडी’चे विषय इथपर्यंतच मर्यादित नाही. वापरकर्त्यांचा आयपी अ‍ॅड्रेस, त्यांचे लोकेशन, ते कोणत्या प्रकारचं पोर्न पाहतात, एखादा व्हीडिओ ‘प्ले-पॉझ’ करण्याच्या सवयी, त्यांचे इतर शोध अशी सगळी माहिती ही पोर्न संकेतस्थळं गोळा करत आहेत. कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या मदतीने या सगळय़ा माहितीचं पृथ्थकरण करून संबंधित वापरकर्त्यांचं एक व्यक्तिमत्त्वच या संकेतस्थळांकडून तयार केलं जातं. या तयार माहितीचा उपयोग कोणत्याही प्रकारे केला जाऊ शकतो, हे सांगायला नको!

एकंदरीत ‘पोर्न’ हे आता अधिकाधिक वापरकर्त्यांना इंटरनेटच्या जाळ्यात ओढून त्यांचा आपल्या पद्धतीने वापर करण्याचं साधन बनू लागलं आहे. आपल्यातील अनेकजण चोरून, चुकून, अपवादाने कधीतरी अशा साइटच्या वाटेला जातही असतील. कुणाला कळणारही नाही. पण हा सवयीचा भाग बनला तर, लक्षात ठेवा तुमच्या इंटरनेटवरील प्रोफाइलचा ‘पोर्न’ही घटक बनेल, असं प्रोफाइल कुणाला हवंय?