सारंग साठय़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘व्हायरल’ हा आजचा शब्द नाही. तो याआधीही सर्वत्र भरून राहिलेला होता. साधारण ‘व्हायरल’ या शब्दाला कितपत अर्थ होता? तर काय साधा ताप आला की डॉक्टर त्याला ‘व्हायरल फीवर’ म्हणायचे किंवा आताही तसंच म्हणतात. पण ‘व्हायरल’ ही तशी साधीसुधी गोष्ट नाही. तिच्यात एक ताकद आहे. कसली? तर अनुकरणाची. दांडी सत्याग्रहात महात्मा गांधींनी गुजरातच्या किनाऱ्यावर वसलेल्या दांडी गावाजवळचे मूठभर मीठ उचलले आणि ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. ती घटना वा कृती खऱ्या अर्थाने ‘व्हायरल’ झाली. का तर ती भावनाच साऱ्यांच्या मनात कुठेतरी लपलेली होती. गांधीजींनी ती दाखवली. साऱ्यांनी मिठाची काय ताकद आहे, हे दाखवून दिले.

तसंच आजच्या इंटरनेटच्या जगात ‘व्हायरल’ होणं आहे. कुणाची कृती काहीही असली तिला प्रतिसाद देणं, हे आज डिजिटल युगात होत आहे. थोडक्यात ‘क्रिंज पॉप कल्चर’चे (Crinj Popular culture) हे लोक पाइक आहेत. म्हणजे ‘ढिंच्याक पूजा’ याबाबतच सांगता येईल. पूजा नावाच्या मुलीने ‘सेल्फी मैंने ले ली’ हे गाणं गायलं. कानाला अत्यंत वाईट वाटेल असं हे गाणं होतं. तिचा तो बेसूर आवाज, ऐकू नये असे वाटत असतानाही साऱ्यांनी परत परत ऐकला. म्हणजे एका रात्रीतला स्टार होण्याचा जो पराक्रम असतो, तो पूजाने करून दाखवला. ती ‘ओव्हरनाइट स्टार’ बनली. म्हणजे पूजा कोणी मोठी ‘कन्व्हेशनल आर्टिस्ट’ नव्हती. खरे तर ती बरेच दिवस या विश्वापासून दूर होती. तिच्या कोशात तिने स्वत:ला गुरफटवून घेतलं होतं. पण मीही कोणीतरी आहे, हे सांगण्यासाठी तिला तिचा बेसूर आवाज लावावा लागला. हे एक.

दुसरं, मिथिला पालकर हिच्याबद्दलही सांगावं लागेल. साध्या मोबाइल कॅमेऱ्यावर खुलून आली होती ती. घरात एकटीच असताना तिच्यातला कलाकार जागा झाला. तिने तीन कप घेतले. ते वाजवत ‘तुझी चाल तुरुतुरु’ हे गाणं तिच्या गळ्यातून आलं. नुसतं आलंच नाही तर ते वाऱ्यासारखं पसरलं. कानाकानांत घुमत गेलं ते अगदी इम्तियाज अलीपर्यंत. अनेक ‘लाइक्स’ त्याच्यासाठी तिला मिळाले. म्हणजे मिथिला चांगल्या गाण्यासाठी अनेकांच्या स्मरणात राहिली. आज ती ‘नॅशनल सेन्सेशन’ आहे.

जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा ‘एक्स्ट्रोव्हर्ट’ असतोच असं नाही. किंबहुना माझ्या मते बहुतेक जण अंतर्मुख असतात. म्हणजे ते आतून कुठेतरी गंभीर जाणीव घेऊन जगत असतात. सार्वजनिक पातळीवर ते लगेचच खुलत नाहीत. त्यांना त्यासाठी ‘ऑक्वर्ड फिल’ होत असावं. ही माणसं एकांतात खुलून येतात. पूर्वी कलाकार म्हणजे गोरागोमटाच असावा. म्हणजे असं असण्याचा एक राजमार्गच होता. या राजमार्गावर साऱ्यांना जाणं जमतं असं नाही. काही जण आपले पायरस्ते तयार करीतच असतात. म्हणजे गोरं, गुबगुबीत ‘चॉकलेटी’ व्यक्तिमत्त्व असणं म्हणजे कलाकार असणं असं काही यांच्यात नसतं. विकी कौशल, राजकुमार राव आणि आयुष्मान खुराना हे तिघेही सामान्य दिसणारे. पण कला म्हणून गंभीर जाणीव घेऊन जगणारे ‘आर्टिस्ट’ अशी त्यांची आज ओळख आहे.

कदाचित असंच असतं ‘क्रिंज पॉप कल्चर’मध्ये. इथे कोणी ‘ब्लॅक’ आणि ‘व्हाइट’ असं नसतं. प्रत्येज जण हा विविध रंग, विचार आणि आचारांनी सजलेला असतो. त्यांच्यात शाहरुखमध्ये जे काही आहे, ते नसतं. पण ते आज यू-टय़ूबवर शाहरुखपेक्षाही ‘इन्फ्ल्युअन्स’ असलेले हे कलाकार आहेत. म्हणूनच असा कुठे कधी साचा नसतो, की त्यातून प्रत्येक जण समानच तयार होऊन बाहेर पडेल. कुणी संकोचणारा, कुणी कमी बोलणारा, कुणी स्वत:च्याच विश्वात जास्त रमणारा पण ‘युनिक’ असतो. ते त्याचं युनिक अस्तित्व महत्त्वाचं असतं. त्यांच्या गोंधळलेपणातही एक सुसंगती असते. विश्वातल्या काही घटनांशी काहीतरी विसंगती असली तरी ते ‘व्हायरल’ होतं. तेव्हा प्रत्येकाच्या आतल्या कुणाला ते निर्मितीसाठी साद घालीत असतं!!

शब्दांकन : गोविंद डेगवेकर

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about simplicity of viral