देवव्रत जातेगांवकर

थंडीतली खाद्यसंस्कृती अनुभवताना आपण गेल्या आठवडय़ात थंडीतले स्पेशल स्ट्रीट फूड माहिती करून घेतले. आज आपण थंडीतील स्पेशल पेयांची सफर करणार आहोत.

पावसाळ्यात गारेगार हवेत, मातीचा सुगंध घेत मन ताजेतवाने करायला जसा चहा हा सोबती असतो तसंच थंडीतही कुडकुडवणाऱ्या हवेत शरीरात भरणारी हुडहुडी कमी करायला गरमागरम सूपची संगत असते. हिवाळ्यात वातावरण बदलत असतं त्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी डॉक्टर, न्यूट्रिशियन वेगवेगळ्या चवीचं सूप प्यायला सांगतात. पण थोडं मागे वळून पाहिलं तर घरोघरी, आपापल्या प्रांतानुसार थंडीत वेगवेगळ्या प्रकारचे सूप, सार, रस्सम केलेले आढळतात.

महाराष्ट्रामध्ये थंडीत घरोघरी एक कॉमन सूप केले जाते जे ‘टोमॅटोचे सार’ या नावाने सर्वश्रुत आहे. टोमॅटोचे सार जेवणाच्या सुरुवातीला सूप म्हणून आणि नंतर भातासोबत फस्त केले जाते. मांसाहाराबरोबर कोकणी सोलकढी असेल तर जेवायला आणखी मजा येते. नारळाच्या दुधापासून तयार होणारी ही सोलकढी सामान्यत: गरम नसते. परंतु थंडीमध्ये कोकण प्रांतात ही सोलकढी हिरवी मिरची, लसूण, कढीपत्त्याची फोडणी देऊन उकळवली जाते आणि गरमागरम सव्‍‌र्ह केली जाते.

दक्षिण भारतात थंडीत काही वेगवेगळ्या प्रकारचे रस्सम केले जातात, जे थोडेफार आपल्या साराशी मिळतेजुळते आहेत. पेपर रस्सम, मिश्र डाळींपासून दाल रस्सम, टोमॅटोपासून तयार होणार टोमॅटो रस्सम वगैरे वगैरे. वरणाची, सांबाराची शोभा आणि चव वाढवणारी शेकटाची शेंग! तिथे या शेंगेच्या पाल्याचंही सूप बनवलं जातं. ते तिथे प्रचंड प्रसिद्ध आहे. त्याला ‘ड्रमस्टिक लीफ सूप’ असं म्हणतात. या पाल्यात भरभरून कॅल्शियम असत. पोटभरीचं असणारं हे सूप दक्षिण भारतात बऱ्याच ठिकाणी सकाळी न्याहारीच्या वेळी प्यायलं जातं. हैदराबादमध्ये पहाटे ४ वाजता रस्त्याच्या कडेला मटण पाया सूपच्या गाडय़ा आढळतात. आपल्याकडे सकाळी सकाळी फक्कड चहा लागतो. तिथे मात्र थंडीपासून बचाव करण्यासाठी गरमागरम पाया सूप प्यायलं जातं. पहाटे ४ ते रात्री ११ पर्यंत हे हेल्दी सूप हैदराबादमध्ये चाखायला मिळतं.

मद्रासमध्ये ब्रिटिश काळापासून बनवलं जाणारं एक सूप आहे. ज्याला मुलीगटांनी किंवा मिलागू तानी सूप असं म्हणतात. मिश्र डाळी, सफरचंद व स्पेशल मद्रास करी मसाला वापरून बनवलं जाणार हे सूप जिभेची लज्जत वाढवत थंडीत शारीरिक फायदेही मिळवून देतं. काश्मीरमध्ये सूपला शोर्बा हे नाव आहे. ‘याकनी शोर्बा’ हा येथील लोकप्रिय शोर्बा आहे. काश्मिरी पद्धतीने बनवला जाणारा हा शोर्बा चवीला थोडासा मधुर असतो. कारण यात काश्मिरी केसर व ड्रायफ्रूट एकजीव केलेले असतात. काश्मिरी थंडीपासून बचाव करण्यासाठी इथे दिवसांतून ३-४ वेळा चहा प्यायला जातो. विशेषकरून ‘बटर टी’ प्यायला जातो. मंद आचेवर उकळणाऱ्या या चहात याकच्या दुधापासून तयार केलेलं बटर वापरलं जातं. त्यासोबतच ‘काश्मिरी काहवा’देखील शरीर उष्ण ठेवायला मदत करतो. जम्मू मध्ये ‘नोन टी’ प्रसिद्ध आहे. हा प्रसिद्ध असण्यामागचं कारण त्याची चव नसून त्याचा गुलाबी रंग आहे. चहा आणि तोही गुलाबी? ऐकायला नवल वाटेल पण हो! बदाम, वेलची आणि चक्क बेकिंग सोडय़ापासून हा चहा बनवला जातो. जो चवीला किंचित खारट असतो.

आपल्याकडे जे चायनीज खाल्लं जातं ते इंडो-चायनीज आहे. कलकत्त्यामध्ये चायनीज सूपचं प्रस्थ फार आहे. सिक्किममध्ये थंडीमध्ये ‘चांद’ नावाचं एक पेय फार लोकप्रिय आहे. बांबूच्या कपमध्ये चांद सव्‍‌र्ह केलं जातं. थंडी पळवणाऱ्या या गरमागरम पदार्थापैकी काहवा आणि ड्रमस्टिक लीफ सूपच्या रेसिपी सोबत देतो आहे..

ड्रमस्टिक लीफ सूप

साहित्य: एक कप शेवग्याच्या शेंगांचा रस, एक चमचा आलं लसूण पेस्ट, एक बारीक चिरलेला कांदा, दोन चमचे तेल, दोन कप दूध, एक चमचा मैदा, मीठ, लवंग पावडर.

कृती : कढईमध्ये तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि एक चमचा मैदा तांबूस लाल होइपर्यंत परता. नंतर त्यात एक चमचा आलं-लसूण पेस्ट, एक कप शेवग्याच्या शेंगांचा रस घालून मिश्रण सतत ढवळत राहा. मिश्रण उकळू लागल्यावर दोन कप दूध घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. मीठ आणि लवंग पावडर घालून सव्‍‌र्ह करा गरमागरम ड्रमस्टिक लीफ सूप.

काश्मिरी काहवा

साहित्य : चार कप पाणी, चार चमचे साखर, चार चमचे चहा पावडर, दहा-बारा बदामांचे काप, पाव चमचा केशर.

कृती : पाण्यात साखर घालून ते उकळावे. त्यात चहा पावडर टाकावी. तीन मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर चहा गाळून त्यात बदामाचे काप आणि केशर टाकावे.

संयोजन साहाय्य : मितेश जोशी