सारंग साठय़े

नमस्कार, खरं तर मंचावर निरंतर बोलणारा मी लिहिता झाल्यानं स्तंभित तर झालोयच, पण अरे हा ‘स्टॅण्डअप’वाला पण लिहायला लागलाय म्हणून चाहतेही स्तंभित होतील. येथून पुढे वर्षभर या स्तंभातून मी तुम्हाला भेटत राहीन. आजूबाजूच्या घटनांमधून येणारी अनुभूती मी तुमच्यासमोर शब्दरूपाने सादर करणार आहे..

भाडिपा.. भारतीय डिजिटल पार्टीच्या आधी मी कोण होतो? एखाद्या महाविद्यालयाच्या ‘कॉमर्स’ शाखेत शिकणारा विद्यार्थी. वर्गात खूप हुशार म्हणून ना सर्वात पुढे बसणारा ना ‘ढ’ म्हणून मागे बसणारा! म्हणजे केवळ विद्यार्थी म्हणून मधल्या बेंचवरचा पोर, अशीच ओळख समजा हवं तर!! तशीच ओळख शाळेतही होती माझी. काटेकोर अभ्यास. मांडी ठोकून वाचणं. पाठांतर. मग परीक्षेत डेस्कवर मानेवर पट्टी ठेवून पेपर लिहून काढणं, असं काहीच जमलं नाही. रोजच्या लिखापढीत मन नव्हतं. मी अभ्यासात कच्चा होतो. तरीही कॉलेजात गेलोच. म्हणतात ना, कुणी तरी कुणाचं तरी पाहून तो तसा झाला.. तसंच अगदी सहजगत्या कॉलेजच्या पायऱ्या चढलो असेन. ‘अकाऊंन्ट, बिझनेस’चा व्यापार करून पाहिला. पण तो व्यापार फसला. कॉलेजच्या हयातीत पुस्तकं वाचून काही शिकता आलं नाही. कुठे तरी मनात एक बंडाचा कोपरा होता. तो सुप्तही असेल कदाचित. म्हणजे मला हवं ते पुस्तकांना शिकवता आलं नाही आणि इतरांना हवं ते मला शिकता आलं नाही. की नाही.. हे जे ‘रिटन’चं ‘रीडिंग’ मला काही जमू शकणार नाही!! माझ्याच अनुभवावरून सांगतो. अनेक जण या ‘रिटन-रीडिंग’च्या परंपरेत अडकून पडतात. बरेच दिवस. पुढे महिना महिना आणि वर्षसुद्धा. दुसरा जे सांगेल ते मानायचं हे आपल्या शिक्षणपद्धतीचं तीव्र लक्षण आहे. या ‘लक्षणा’ची बाधा साऱ्यांना होतेच. आता यामुळे साऱ्यांचं काही बिघडतं असं काही नाही. सारे जण त्यात स्वत:ला जुळवून घेतात. मी मात्र ‘अवलक्षणी’ झालो. लिहिण्या-वाचण्यात अडकण्यापेक्षा व्यक्त होणं मी पसंत केलं.

आता समोर प्रश्न बरेच होते आणि त्याची उत्तरंही बरीच होती. नेमका प्रश्न हा होता, की कोणतं उत्तर सोबत घेऊन जायचं. तेव्हा समोर पिक्चर, चॅनेलचा भडिमार होत होता. तो सारा प्रवाह माझ्यावर येऊन आदळत होता. कान, डोळे आणि मेंदू आळीपाळीनं हा सारा कल्लोळ झेलत होते. तसा माझ्यासाठी हा सारा कल्लोळ सुसहय़च होता. मग ठरवलं की, ‘ऑडिओ-व्हिज्युअल’च्या जगात शिरून आतील सारं काही ओतायचं. सुरुवातीला म्हणजे २०१२ला हिंदी-इंग्रजीतली (नाइट) छोटी मालिका आणि नंतर २०१५ला हिंदीत एक सिनेमा (द ब्राइट डे) नंतर मराठीत ‘उबुंटू’त भूमिका. म्हणजे कॉलेज सुटल्यानंतरच्या १४ वर्षांची ही प्रेरक घुसळण येऊन थांबते ती ‘इंटरनेट’पाशी. इंटरनेटने माझ्यातल्या ‘तारे जमीं पर’ टाइप मुलाला जो वाव दिला तो आज मी तुमच्यासमोर बोलतो आहे, ते त्या प्रक्रियेचे सार आहे. फार काही न वाचलेला लिहिलेला मी १४ वर्षांच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून खुललो आणि बहरलोसुद्धा.

‘यू-टय़ूब’ हे माझं पहिलं व्यासपीठ. म्हणजे या माध्यमावर सलग कार्यक्रम सादर करण्याचं काम आम्ही करतो. पूर्वी जसे स्टार कलाकार होते, तसे ‘यू-टय़ूब’वर ‘इन्फ्ल्युअर्स’ आहेत. आज इंदुरीकर महाराजांचं कीर्तन सर्वाधिक ‘ट्रेण्डिंग’ होत असतं. इतकी ऐकण्याची आणि पाहण्याची जादू चाहत्यांवर कायम आहे. म्हणजे श्रवणभक्ती ही कधीही परिणामकारकच असते. पूर्वी लोक, म्हणजे आपण असं मानतो की निरक्षर होते. त्यांना अक्षराची ओळख नव्हती. तेव्हा श्रवणाने साऱ्या गोष्टी समजावून घेत आणि स्वत:च्या ज्ञानात भर घालीत. तसं आजच्या बाबतीत म्हणता येईल, की कीर्तन नव्या व्यासपीठावर आलं आहे.

शेवटी एक सांगतो की, मी आज जे लिहिलंय ती प्रक्रियाच चाचपडण्याची होती. माझ्यासाठी असं लिहिणं नवंच आहे. तरीही या नव्या वळणावर आजवर मला जे सार सापडलं ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तुमच्या-माझ्यातला हा थेट संवादही माझ्यासाठी नित्यच प्रेरणादायी असेल.

शब्दांकन : गोविंद डेगवेकर

viva@expressindia.com

Story img Loader