पार्थ फणसेकर
लहानपणापासून आपण सगळेजण आपापल्या भविष्याविषयीची काहीएक स्वप्नं बघत असतो. त्या स्वप्नांपैकी माझं एक स्वप्न होतं, परदेशात शिकायला जायचं. खरं तर मनाशी होतं अमेरिकेत शिकायला जायचं, पण ते नाही जमलं. त्यामुळे दुसऱ्या चांगल्या पर्यायाचा विचार केला आणि तो देश होता ऑस्ट्रेलिया. माझी काही मित्रमंडळी आणि बाबांच्या मित्रांची मुलगी यांनी ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतलं होतं. त्यांनी माझा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला. हा निर्णय घेताना आई-बाबांनी मला पूर्ण पाठिंबा दिला.
के. जे. सोमय्या कॉलेजमधून मी बीएमएस अर्थात ‘बॅचलर्स मॅनेजमेंट स्टडीज’ची पदवी घेतली होती. ‘आयडीपी’ या संस्थेत मला हव्या असणाऱ्या अभ्यासक्रमाची सविस्तर चौकशी केली. ऑस्ट्रेलियात शिकायला जाण्यापूर्वी कएछळर आणि ढळए या परीक्षा द्याव्याच लागतात. त्या दोन्ही दिल्या. त्यानंतर मोनॅश युनिव्हर्सिटीमध्ये ‘मास्टर्स ऑफ बिझनेस’ या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला. संस्थेच्या काऊ न्सिलरची ए टू झेड सगळ्याच गोष्टींत खूपच मदत झाली. संस्थेतर्फे एक मार्गदर्शनपर कार्यक्रम घेतला जातो. त्यात त्या त्या देशाविषयी, हवामान, चालीरीती वगैरेंविषयी सांगितलं जातं. एक पुस्तिका दिली जाते. मी तीन युनिव्हर्सिटीजमध्ये अर्ज पाठवला होता. ‘मास्टर्स ऑफ बिझनेस’ या अभ्यासक्रमासाठी ‘मोनॅश युनिव्हर्सिटी’ हा सगळ्यात चांगला पर्याय होता आणि मला तिथे प्रवेश मिळाला. जगभरात या विद्यपीठाचं रँकिंग ८४ आहे. ऑस्ट्रेलियात माझ्या अभ्यासक्रमासाठी दुसरं रँकिंग असून, हे विद्यापीठ ऑस्ट्रेलियातील टॉप टेन विद्यापीठांपैकी एक आहे. या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमातलं माझं पहिलं वर्ष पूर्ण झालं आहे. इथे लेखी परीक्षा आणि असाइनमेंटचे गुण असे दोन्ही विचारात घेतले जातात. अभ्यासक्रम काठिण्य पातळीवरचा असतो. खूपच मेहनत घ्यावी लागते. असाइनमेंट्सही खूप असतात.
इथे माझं विमान लॅण्ड झाल्यावर भोवतालचं वातावरण पाहून आणि फारच मोजकी माणसं नजरेस पडल्याने काही क्षणांसाठी वाटलं होतं की, अरे कुठे आलो आहोत आपण? पण नंतर गोष्टी बदलल्या. इथलं राहणीमान, अभ्यासक्रम आणि परीक्षापद्धती समजून घेताना पहिले २-३ महिने असेच गेले. राहण्याच्या सोयीसाठी भारतात असतानाच फेसबुक ग्रुपवर विचारणा केली. तीनजण तयार झाले. मग भारतातून आम्ही जवळपास महिनाभर घरासाठी शोधाशोध करत होतो. शेवटी एकदाचं घर मिळालं. इथे आल्यावर कोणत्याही कामाचं कुणा एकावर ओझं नको, म्हणून आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या. स्वयंपाक शिकून घेतल्याने तुलनेने सोपं गेलं. भारतीय चीजवस्तूंच्या दुकानांमुळे एक प्रकारे आधार मिळाला. अनेदा रुममेटशी अभ्यासाची चर्चा व्हायची. आता या घराचा करार संपल्यामुळे नवीन घर शोधायचं आहे.
आपण कितीही इंग्रजी शिकलो असलो तरी ऑस्ट्रेलियन लोकांची अॅक्सेंट वेगळी आहे. सुरुवातीचे दोन महिने ती समजून घेण्यात गेले. प्राध्यापक सगळ्या विद्यार्थ्यांना समजेल असं बोलतात. मला ती अॅक्सेंट आलीच पाहिजे, असं अँथनी मजटलिस या माझ्या मित्राला मनापासून वाटल्याने त्याने मला कुठले शब्द कुठे, कसे वापरतात, त्यांचा उच्चार वगैरे गोष्टी शिकवल्या. लेक्चर सुरू असताना विद्यार्थ्यांना वर्गात शंका विचारता येते, मात्र लेक्चरनंतर काही शंका विचारायच्या असतील तर मात्र प्राध्यापकांची रीतसर वेळ घेऊनच त्या शंका त्यांना विचारल्या जातात. एका केसस्टडीचं आमच्या ग्रुपने प्रेझेंटेशन केलं होतं, ते आवडल्याने सगळ्यांनी टाळ्या वाजवून आमचं कौतुक केलं होतं. इथे आपल्यासारखा रट्टा मारून अभ्यास करण्याची पद्धत नाहीच. काही वेळा वर्गात शिकवताना चटकन एक ग्रुप तयार केला जातो. त्या ग्रुपला अभ्यासातील एखाद्या मुद्दय़ाच्या अनुषंगाने विचार करायला सांगितला जातो. त्या ऑन द स्पॉट प्रॅक्टिकलचे गुण दिले जातात. शिकताना बोअर होत नाही, थोडीशी मजाही वाटते. कुठल्याही क्षणी काहीही विचारलं जात असल्यानं सतत सजग राहावं लागतं आणि अभ्यासही करावा लागतो. लेक्चर्सचा कालावधीही आटोपशीर असतो. इथल्या ‘मूडल’ या सिस्टिमवर नोट्स वगैरे अपलोड केलेल्या असतात. कधी लेक्चरला जायला जमलं नाही तर लेक्चरचं लाइव्ह रेकॉìडगही बघता येतं. प्रेझेंटेशन, प्रोजेक्टचं सबमिशनही ऑनलाइन असतं. काही वेळा ते प्रॅक्टिकल असतं. इथलं तंत्रज्ञान खूपच अत्याधुनिक आहे. बॅचलर्समध्ये माझा त्याविषयीचा पाया पक्का झालेला असल्यामुळे या तंत्रज्ञानाचा बाऊ वाटला नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांच्यासाठी बऱ्याच सोयी करण्यात आल्या आहेत. सगळ्याच विद्यार्थ्यांना टय़ूटरची मदत आणि मार्गदर्शन मिळू शकतं.
मोनॅश विद्यापीठाचे मेलबर्नमध्ये तीन कॅम्पस असून त्यापैकी काऊ लफिल्ड या कॅम्पसमध्ये मी जातो. या कॅ म्पसमध्ये एक छोटेखानी हॉस्पिटल असून विद्यार्थ्यांना तिथे विनाशुल्क उपचार मिळतात. हॉस्टेलच्या इमारती आणि कॅन्टीन आहे. ग्रंथालय अत्यंत अद्ययावत आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यात हजारो प्रकारची पुस्तकं छापील आणि ऑनलाइन उपलब्ध असतात. तिथे बसून वाचताना छापील पुस्तकांना आणि घरी ऑनलाइन पुस्तकांना वाचण्याला मी प्राधान्य देतो. कर्मचारी पुस्तकांविषयी अचूक माहिती पुरवतात. कॅम्पसमध्ये काही ना काही इव्हेंट्स होत असतात. त्यात गेम्स, फ्री सेशन्स, काही वेळा फ्री फूड वगैरे उपलब्ध असतं. त्याखेरीज एमपीए अर्थातच ‘मोनॅश स्पोर्ट्स ग्रॅज्युएट असोसिएशन’ आहे. असोसिएशनच्या मोठय़ा इमारतीत विद्यार्थ्यांना आराम करता येतो. गप्पाटप्पा मारता येतात. रिलॅक्स होता येतं. कॅम्पसमधल्या एका इमारतीत नोकरीपासून ते मानसिक ताणतणावांपर्यंत अनेक गोष्टींसाठी तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन आणि समुपदेशनही मिळतं. इथे शिकण्यासाठी भारतीय, चिनी, स्थानिक विद्यार्थी, यूएसए, युरोप, कॅनडा, न्यूझीलंड आदी जगभरातून विद्यार्थी येतात. मेलबर्न हे इंटरनॅशनल स्टुडण्ट्ससाठी एक हब मानलं जातं. शैक्षणिक गुणवत्ता आणि सुरक्षित शहर ही इथली दोन महत्त्वाची वैशिष्टय़े आहेत.
मला टेबल टेनिसची आवड आहे. भारतात मी राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळलेलो आहे. त्यामुळे इथल्या स्पोर्ट्स क्लबचा सभासद होणं हे ओघानं आलंच. भारताएवढा नसला तरीही खेळाचा सराव मी सुरू ठेवला आहे. त्यातले सातत्य आणि नैपुण्य या गुणांमुळे माझी विद्यापीठाच्या टीममध्ये निवड झाली. विद्यापीठाचं प्रतिनिधित्व मी केलं आणि बरीच मेडल्स मिळवली. पहिल्यांदा खेळताना खूप एक्साईट झालो होतो. इथले सगळे खेळाडू निपुण असल्यामुळे अटीतटीचा सामना होतो. अशी स्पर्धा जिंकण्यात आणखी मजा येते आणि आपण जिंकल्याचा आनंद दुणावतो. मॅचसाठी कॉलेजचा खूप सपोर्ट मिळतो. मॅचसाठी काही वेळा ट्रेनने प्रवास करून थोडं लांब जायला लागायचं. जानेवारी ते ऑगस्ट या काळात होणाऱ्या या टुर्नामेंटपैकी जिल्हा, राज्यस्तरावरचे सामने खेळायची संधी मला मिळाली. आपले सणवार वगैरे गोष्टी थोडय़ाशा मिस करतो, हे खरं आहे. पण सतत असाईनमेंट आणि अभ्यासामुळे बाकी गोष्टींचा विचार करायला उसंतच मिळत नाही. कसं आहे की, आपलं ठरलेलं ध्येय गाठायचं झालं तर काही गोष्टींचा त्याग करावाच लागतो. शिक्षण संपल्यावर तिथेच नोकरी शोधायचा विचार आहे. आत्तापर्यंतच्या अनुभवाच्या आधारे सांगायचं तर, उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया हा देश खूप चांगला आहे. इथे बऱ्याच संधीही उपलब्ध आहेत. बघा, विचार करा. ऑल द बेस्ट.
कानमंत्र
* इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवा. त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होतील.
* वेळेचं व्यवस्थापन करायला शिका. कारण इथे वेळ कटाक्षाने पाळली जाते.
शब्दांकन : राधिका कुंटे
viva@expressindia.com