रिचा हिंगल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘व्हेगन रिचा’ हीच सध्या माझी ओळख बनलीये. आणि जगण्याची जिद्दसुद्धा. आज टॉप फूड ब्लॉगरमध्ये माझी गणना होत असली तरी ही ओळख घडवणं सोपं नव्हतं. ही ओळख माझ्यावर ओढवलेल्या जीवघेण्या प्रसंगामुळे घडली. नवे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी, नव्या रेसिपी शोधून काढण्याच्या मी केलेल्या प्रयत्नाला पुरस्कार मिळाले. माझी शाकाहारी खाद्यसंस्कृतीवरील दोन्ही पुस्तकं बेस्टसेलर ठरली. खरंतर एका वेगळ्याच जिद्दीतून या खाद्य सफरीवर आले..

रेसिपी डेव्हलपर, छायाचित्रकार, ब्लॉगर आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर अशा वेगवेगळ्या विशेषणांनी मला ओळख मिळवून दिली आहे, पण माझी ब्लॉगर म्हणून असलेली ओळख मला सगळ्यात जास्त जवळची वाटते. ब्लॉगर त्यातही महत्त्वाचं म्हणजे शाकाहारी खाद्यसंस्कृतीविषयी तळमळीने लिहिणारी असा माझा उल्लेख केला जातो. मला ब्लॉग वाचकांसाठी सोप्या भाषेत लिहायला आवडतं. तेसुद्धा त्याला स्टेप बाय स्टेप योग्य छायाचित्रांची जोड देऊन एखादा रुचकर अनुभव मांडायला आवडतो. मला माझ्या प्रयत्नातून लोकांना हे सांगायचं आहे की शाकाहारी भारतीय पदार्थ आणि इतर खाद्यसंस्कृतीमध्येसुद्धा साध्यासोप्या शाकाहारी पाककृती आहेत. त्याचबरोबर त्यांची नवनिर्मितीही शक्य आहे.

मी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत होते. या क्षेत्रात मी खूश होते. पण मेंदू विकारामुळे एका गंभीर शस्त्रक्रियेतून मला जावं लागलं. त्यामुळे माझं काम करणं मंदावलं. माझ्या एका डोळ्याला त्यात इजाही झाली. ऑफिसमध्ये जाऊन काम करणं, तितक्याच प्रभावीपणे शक्य नव्हतं. घरी बसून राहणं हीसुद्धा एक प्रकारे शिक्षाच होती. अचानक आपल्या व्यवसायातून पूर्ण माघार घेतल्यावर शरीर साथ देईल, असं काहीतरी निवडणं गरजेचं होतं. एकीकडे मी स्वयंपाकही शिकत होते.

मला तशी स्वयंपाक करायची आवड वगैरे नव्हती. पण मी २००७ पासून स्वयंपाक शिकायला सुरुवात केली. पाककृतींचे वेगवेगळे प्रयोग करायला लागले. बहुतेक वेळा मी बनवलेल्या रेसिपी चवीला अजिबात चांगल्या नसत. त्यामुळे खाद्यपदार्थ बनवायला शिकण्याच्या माझ्या प्रयत्नांना एक योग्य दिशा देण्याची गरज होती. म्हणून मग मी बेकिंगकडे वळले. बेकिंगचे पदार्थ पहिल्यांदा नीट शिकून मग इतर गोष्टींकडे वळू असा निर्धार मी केला. बेकिंग शिकल्यामुळे न्याहारीचे पदार्थ, चहाबरोबर तोंडी लावण्याचे पदार्थ यातील बरेच प्रकार मला नीट जमू लागले. आणि आत्मविश्वासही मिळाला. त्यानंतर २००९ पासून मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. ‘व्हेगन रिचा’ असं ब्लॉगचं नाव ठेवलं. मला लोकांना पौष्टिक पण काहीतरी वेगळं  द्यायचं होतं. त्यात बेकिंगचे पदार्थही होतेच, पण एक योग्य संकल्पनाही ब्लॉगमधून मांडली जाणं आवश्यक वाटलं म्हणून मी शाकाहारी पदार्थाकडे वळले. माझ्या ब्लॉगवरील सर्व रेसिपी व्हेगन आहेत. काही सुरुवातीच्या पाककृती व्हेगन नाहीत. पण आता मात्र मी पूर्णपणे माझ्या आयुष्यात सामाजिक कार्याचा जसा स्वीकार केला तसंच शाकाहारी असणं हेही मी स्वीकारलं आहे.

मँगो करी टोफू, होल रोस्टेड कॉलीफ्लॉवर इन मखनी ग्रेवी, बेक्ड लेंटील कचोरी पेस्ट्रीज, क्विक टॅमरिंड डेट चटणी, वन पॉट पीनट बटर नूडन्स, ग्रीन करी फ्राइड राइस या माझ्या पाककृती खूप गाजल्या. ब्लॉगपोस्टही दिवसेंदिवस वाचक पसंती मिळवू लागल्या. त्यानंतर मला खाद्यसंस्कृतीवर पुस्तक लेखनासाठी प्रकाशकांकडून विचारणा होऊ  लागली. त्यातूनच ‘व्हेगन रिचाज इंडियन किचन : ट्रॅडिशनल क्रिएटिव्ह रेसिपीज फॉर द होम कुक’ आणि ‘व्हेगन रिचाज एव्हरीडे किचन : एपिक एनीटाइम रेसिपीज विथ अ वर्ल्ड ऑफ फ्लेवर’ या दोन पुस्तकांचं लेखन मी केलं.

माझे फॉलोवर भारत आणि अमेरिका इथे जास्त आहेत. त्यामुळे फक्त भारतीय शाकाहारी पदार्थावरच न थांबता त्यांचं फ्यूजन करून काही परदेशी चवींचे पदार्थही बनवायला मी सुरुवात केली. भारतात शाकाहारी पदार्थामध्ये गव्हाचे पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थाचा वापर होतो. पण मी माझ्या ब्लॉगमधून विविध भाज्या, डाळी यांचा खुबीने वापर केलेल्या रेसिपी पोस्ट केल्या. मी ऑर्गॅनिक आणि लेस प्रोसेस्ड इंग्रेडियंट्स वापरण्यावर भर देते.

कॅश्यू मिल्क, आल्मंड मिल्क, नट मिल्क, रिफाइंड कोकोनट ऑइल, बटर आणि तूप असे काही पदार्थ मी माझ्या पद्धतीने बनवले. त्यामुळे मी व्हेगन पनीर, व्हेगन रसमलाई आणि गुलाबजाम असे पदार्थ ब्लॉगवर नव्या रूपात दाखवू शकले.

प्राण्यांच्या बाबतीतही मी तेवढीच इमोशनल आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची इजा पोहोचू नये, या विचारांची आहे. पण म्हणून शाकाहारी जीवनशैली स्वीकारायची का.. तर त्यासाठी एक तात्त्विक बैठक आवश्यक होती. मी भारत आणि अमेरिकेतील प्राणी वाचवण्यासाठी काम करणाऱ्या काही संघटनांशी जोडले गेले, पण शाकाहारी जीवनशैली स्वीकारणं म्हणजे काहीतरी त्याग करणं असं मी मानत नाही. तुम्ही एखादी खाद्यसंस्कृती अंगीकारलीत म्हणजे इतर पद्धतींचा त्याग के ला, असं होत नाही. तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत एक नवा मार्ग शोधला आहे, असा त्याचा अर्थ घेतला पाहिजे, हेच माझ्या पाककृतींमधून माझं वाचकांना सांगणं असतं.

त्यामुळेच मस्त मसालेदार चमचमीत आणि स्वादिष्ट अशा शाकाहारी पाककृतींचा शोध मी कायम घेत राहते. त्यातील काही पाककृतींचं म्हणूनच फ्यूजन करायला सुरुवात केली. तरीही ज्यांना शाकाहारी भारतीय खाद्यसंस्कृती फॉलो करायची आहे त्यांनाही माझ्या पोस्टमधून वेगळं देण्यावर माझा भर असतो. मला आता फक्त व्हेगन ब्लॉगर न राहता या विचाराकडे घेऊन जाणारी पुस्तकं लिहायची आहेत. प्राण्यांच्या संदर्भात प्रत्यक्ष सहभाग घेऊन समाजकार्यही करायचं आहे. छोटय़ा शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्येही माझं काम पोहोचवायचं आहे.

प्रादेशिक खाद्यसंस्कृती, भारतीय संस्कृती, आपल्या आसपासच्या परिसरात उपलब्ध असणारे जिन्नस अशा सगळ्याचा सुरेख मेळ साधून खाद्यसंस्कृतीतील पुढील वाटा मी शोधणार आहे. मला वाटतं तुम्हाला जर भारतीय पद्धतीचं जेवण जेवायचं असेल तर त्यात नेहमी योग्य प्रमाणात मसाल्यांचा वापर आणि प्रोटिन मिळू शकेल अशा पाककृती बनवल्या पाहिजेत. भारतीय खाद्यसंस्कृतीवर बेतलेल्या, घरातल्या घरातच सहज बनवता येणाऱ्या पाककृतींवर भर द्या, त्यांचा शोध घ्या. मी माझ्या ब्लॉगवरून रेस्टॉरेंटसारख्या दर्जाच्या शाकाहारी पाककृती तुमच्या कुटुंबासाठी, घरी आलेल्या पाहुण्यांना खूश करण्यासाठी पोस्ट करत राहीनच!

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about vegetarian lifestyle