गायत्री हसबनीस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मौसम बदलला की त्याच्यानुसार भटकंतीचा विचार आला नाही तरच नवल! तरुण मनाला भुरळ असते ती बदलत्या मौसमाची, सुट्टीची आणि नवी प्रवासवर्णनं तयार करण्याची. त्यामुळे भारत भ्रमणापलीकडे धावणाऱ्या त्यांच्या मनाला या थंडीच्या दिवसांत परदेशवारीचा विरह सहन होत नाही. आपलं दैनंदिन कामकाज सुरू ठेवतानाच तरुणाईला आस असते ती सुट्टीतील प्रवासाची. सोशल मीडिया, ट्रॅव्हल ब्लॉगर्स, ट्रॅव्हल व्हिडीओग्राफर्स, सोलो ट्रॅव्हलर्स यांच्या भ्रमंतीचे किस्से ऐकून, छायाचित्रं-व्हिडीओ पाहून हरखून गेलेली तरुणाई सुट्टीच्या आणि खास करून थंडीच्या या सीझनमध्ये परदेशवारी करण्यावर भर देऊ लागली आहे. मात्र अशा वेळी कमीत कमी बजेटमध्ये उत्तम व्यवस्थापन करत परदेशवारीचे स्वप्न ही तरुणाई कशी पूर्ण करते त्याविषयी खुद्द अशा फिरस्त्यांशी बोलून घेतलेला वेध..

सर्वसाधारणपणे आपल्याकडे तरुण पिढीचे प्रयत्न हे एखादा वेगळा देश पाहण्यासाठी असतात, त्यातही अनेकांना एखादी तरी युरोप टूर करण्याची इच्छा असते. मात्र, परदेशवारीचे बजेट-सुट्टय़ांचे गणित, तिथे गेल्यावर कमीत कमी पैशांत जास्तीत जास्त भ्रमंती कशी करता येईल, राहण्याचा खर्च कसा कमी करता येईल, अशी एक ना अनेक प्रश्नांची जंत्री असते. अशा वेळी सोलो ट्रॅव्हलिंग करणाऱ्यांच्या ग्रुपबरोबर ओळख करून घेत, त्यांच्याकडून माहिती जमवून कधी त्यांच्याबरोबर, तर कधी एकटय़ाने सीमोल्लंघन करणारे असे अनेक तरुण फिरस्ते आहेत. सोलो ट्रॅव्हलिंग करणारा रोहन फणसे सांगतो, ‘‘सोलो ट्रॅव्हलिंग हे दोन प्रकारचे असते. काहींना मनापासून एकटय़ाने जायचं असतं, तर काहींना पर्याय नाही म्हणून नाइलाजाने एकटं जावं लागतं. माझ्याबाबतीत हा दुसरा प्रकार घडला. अगदी ऐन वेळी माझ्या एका मित्राचे तिकीट रद्द झाल्याने मला एकटं जावं लागलं, पण हा एकटय़ाने केलेला प्रवास खूप शिकवून गेला. एअरपोर्टवर उतरेपर्यंत तुम्ही एकटे आहात, ही भावना तुम्हाला सतावत असते, पण त्या देशात पोहोचल्यानंतर तिथल्या लोकांशी बोलणं, त्यांच्यात राहणं, मिक्सअप होणं, काही अडलं तर त्यांना विचारणं याची सवय होते, कारण सोलो ट्रॅव्हलिंगचे वैशिष्टय़ मुळात त्या देशाचा होऊन जाणं असंच आहे.’’ त्यातून तुमची भीती कमी होते, संबंध वाढतात आणि मुळात तिथल्या लोकांमध्ये तुम्हाला आदर मिळतो, असं रोहन म्हणतो. या थंडीत अमेरिका, युरोप आणि रशिया यांसारख्या देशांत भटकंती करण्यापेक्षा दुबई, सिंगापूर, श्रीलंका, मलेशिया, चीन, जपान, साऊ थ ईस्ट देशांसारखे पर्याय ट्रेण्डी ठरतील, असं त्याने सांगितलं. ‘‘सोलो ट्रॅव्हलिंग करतोय म्हणून इतर जण आपली काळजी जास्त घेतात हे खरंय. सोलो ट्रॅव्हलर असाल तर कुठल्याही देशात गेल्यावर हॉस्टेलमध्ये राहण्याला प्राधान्य द्यावं, तिथे हॉस्टेलमेट्स जोडले जातात. सोशल मीडियावर कनेक्ट होता येते आणि ही मैत्री परत आल्यावरही टिकून राहते.’’

सोलो ट्रॅव्हलिंग करताना विशेषत: परदेशात फिरताना अनेक बाबतीत मार्गदर्शन आणि पूर्वतयारी महत्त्वाची ठरते. अनेकदा विंटर सीझनमध्ये मुलंमुली बर्फाळ देशांत फिरायला निघतात. मात्र तिथे थंडी आणि बर्फ असल्याने भटकंती बंद होते. अशा वेळी निराश होऊन परतावे लागते. त्यामुळे कोणत्या सीझनमध्ये कोणत्या देशात जाता येईल यासंबंधीची माहिती घेणे आवश्यक ठरते. हल्ली अशी माहिती कुठल्याही ट्रॅव्हल एजन्सीपेक्षा प्रोफेशनल ट्रॅव्हलर, ट्रॅव्हल ब्लॉगर्स, ट्रॅव्हल व्हिडीओग्राफर्स यांच्याकडून घेण्याकडे तरुणाईचा कल आहे. स्वत: फिरून मग ब्लॉगवर प्रवासवर्णनं लिहिणारी गायत्री काशेळकरही सांगते की, परदेशवारी करायची असेल तर ट्रॅव्हल ब्लॉगर्सकडूनच तरुणाई जास्त प्रमाणात मार्गदर्शन घेते. त्यामुळे मी स्वत: अशा पद्धतीने ब्लॉग लिहिते, की लोकांना माझ्याबरोबर त्या प्रदेशाची भटकंती करून आल्यासारखे वाटले पाहिजे. असा प्रतिसाद मला मी अमेरिका फिरून आल्यानंतर केलेल्या ब्लॉगला मिळाला. तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन जगाशी कनेक्टेड असलेली आजची पिढी ट्रॅव्हल ब्लॉगर, व्हिडीओग्राफर, त्यांचे चॅनेल्स फॉलो करते, त्यांच्याकडून माहिती मिळवते. अनेकदा कोणी ओळखीचा मित्र किंवा मैत्रीण आपण फिरायला जाणाऱ्या ठिकाणी राहत असेल तर त्याच्या जास्तीत जास्त संपर्कात राहून आपली ट्रिप मुलंमुली मॅनेज करतात आणि आपली परदेशवारी यशस्वी झाल्यानंतर हौसेने स्वत:सुद्धा ब्लॉग किं वा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले प्रवासवर्णन, अनुभव लिहून इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मेहनत घेताना दिसतात. मी स्वत: माझे ब्लॉगवर व्हिडीओ क्लिप्स, तिथला अनुभव सांगणारा ऑडिओ जोडत त्यात एखाद्या देशात गेल्यावर तिथलं जीवन, राहणीमान, खाणंपिणं काय असतं? तिथली दुकाने किंवा बाजार कधी बंद होतो असे बारकावे देते, असं गायत्री सांगते. उदाहरणार्थ विंटर सीझनमध्ये अमेरिकेत ग्रॅन्ड कॅनियनला अंधार झाल्यावर ते पाहता येत नाही, कारण रात्री तिथे बंदी असते. अशा वेळी तुम्ही अ‍ॅन्टिलोकला ख्रिसमसमध्ये पाहायला जाऊ शकता, अशा अनेक गोष्टी या ब्लॉगच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवता येतात आणि अनेक जण हे ब्लॉग पाहून इतर गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधतात. आपल्या आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करून परदेशवारी करायला तरुणाईला खूप आवडतं, असं निरीक्षणही तिने नोंदवलं.

अर्थात, कितीही तयारी केली तरी आर्थिक नियोजन हा यातला महत्त्वाचा भाग ठरतो. त्यासाठी स्वत: दहा-बारा देशांमध्ये फिरून आलेला अमित दाणी सांगतो, अगदी प्राथमिक पातळीवर पाहिलं तर या दिवसांत भारतातून परदेशात फिरायला जाण्याचा खर्च हा बऱ्यापैकी मोठा असतो. आपल्या चलनातून तिकडचे चलन मिळते आणि तिकडे सामान्य गोष्टीही महाग असतात. त्यामुळे आपल्या दृष्टीने ३ युरोला मिळणारी पाण्याची बाटली ही २०० रुपये एवढय़ा किमतीत असते म्हणून या छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा विचार या सीझनदरम्यान परदेशात जाताना केला जातो. तुमच्या खर्चानुसार देशाची निवड, तुमच्या बॅगेचे वजन आणि राहण्याची सोय महत्त्वाची असते. परदेशात हॉस्टेल संस्कृती स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित आहे. शिवाय मेल्स हॉस्टेल, फिमेल्स हॉस्टेल किंवा दोन्ही एकत्र असे पर्यायही असतात. एकटं राहण्यापेक्षा हॉस्टेलमध्ये तुमच्या ओळखी वाढतात आणि ते गरजेचे म्हणूनच महत्त्वाचे ठरते, असे त्याने सांगितले. परदेशात गेल्यावर भाषेचा प्रश्न असतो, राहण्याच्या ठिकाणाचं आधी बुकिंग कसं करावं? काय खावं-प्यावं? असे बरेच प्रश्न किंवा हॉस्टेलमध्ये गेल्यावर चेक-इन, चेक-आऊ ट कधी असते? आता ग्रुपने जात असलो तर काही दिवसांचे ग्रुप तिकीट मिळते. एकटे फिरणारे असाल तर ‘डे तिकीट’ मिळते ज्यात २४ तासांत एखादे शहर फिरून होते. याशिवाय युरोपमध्ये युरो रेलचा पास असतो त्याने देश फिरता येतो. फ्लिक्स बस असते. रायनेअर प्लॅनने २० डॉलरमध्ये तुम्हाला प्रवास करता येतो. इंटरनेट, वायफायसाठी तुम्ही इथून रोमिंग चार्ज भरण्यापेक्षा एअरपोर्टवर सिम कार्ड घेऊन गुगल मॅप वगैरे वापरणे सोईचे होते. काही फ्री वॉकिंग टूरही असतात. अशा अनेक गोष्टींची माहिती सातत्याने प्रवास केलेल्यांना विचारून घेणे सोईचे ठरते, असेही या सोलो टॅव्हलर्सनी आवर्जून सांगितले.

तरुणाई परेदशवारीचा खर्च कसा करते?

ड्ट ख्रिसमसमध्ये अमुक एका देशात जायचं तर वर्षभर आधीच त्याची तयारी करून तिकिटे बुक करावीत, जेणेकरून ख्रिसमसमधील वाढीव दरांचा फटका बसत नाही. युरोप टूर सर्रास महाग असते. विमानप्रवासाचे रेट्सही चढे असतात. त्यामुळे ‘इन अ‍ॅडव्हान्स बुकिंग’ हे महत्त्वाचे असल्याने विमान तिकीट बुकिंग करण्याआधी रेट्स काय आहेत, काय रेट्स याआधी होते, काही विशेष सवलती आहेत को, ख्रिसमस टूर पॅकेज कोणकोणती आहेत? या सर्वाचा अंदाज घेतला जातो. ‘बुकिंग.कॉम’, ‘हॉटेल.कॉम’, ‘हॉस्टेल.कॉम’ या बुकिंग साइट्स सर्रास वापरल्या जातात. भारतातून परदेशात प्रवास हा लाखांच्या वर असतो त्यामुळे इथे तुमचे सेव्हिंग आणि त्यासाठीचे नियोजन महत्त्वाचे ठरते. बजेट कमी असेल तर स्वित्र्झलड, इटली, फ्रान्स, पॅरिसऐवजी बुडापेस्ट, प्राग, स्लोव्हाकिया (ईस्ट युरोप) अशा तुलनेने स्वस्त देशांना भेट देता येते. सोलो ट्रॅव्हलर हे खरं तर आधीच्या भ्रमंतीतून उरलेल्या पैशातून पुढची तयारी करतात. आज जर एखादा सोलो ट्रॅव्हलर समरमध्ये एकटय़ा प्रवासाला जाऊ न आला असेल तर एक गॅप सोडून तो नेक्स्ट विंटरला दुसऱ्या देशात भ्रमंतीला निघतो. एकटय़ाचा प्रवास (जायचा आणि परतीचा) हा महाग असतो. त्यामुळे सोलो ट्रॅव्हलर्सना चोख व्यवस्थापन करावं लागतं.

कुठे कुठे जाऊ शकता?

* स्वित्र्झलडमधील बर्न हे शहर फिरण्याजोगे आहे. जीनेव्हा, लुत्सेन, इंटरलाकेन अशीही शहरं फिरण्याजोगी आहेत. विविध सांस्कृतिक शहरं पाहायची असतील तर काही जण अख्खा युरोप फिरायला जातात, तर काहींना थोडीच शहरं पाहायची असतात तेव्हा फक्त साऊ थ युरोप असा एखादा भागच पाहिला जातो. एका बजेटमध्ये खूप ठिकाणं पाहता येतात; पण एकाच शहरात राहून तिकडचं लोकल कल्चर अनुभवणारेही असतात. परदेशात शहरं लहान असतात, त्यामुळे भरपूर शहरं फिरता येतात, तर एकाच शहरात फिरायचे असल्यास तिकडच्या सिटी सेंटरमध्ये फिरता येते. इतिहास, हेरिटेज अनुभवायचे असेल तर युरोप हा उत्तम पर्याय आहे. निसर्ग किंवा भव्य ठिकाणं पाहायची असतील तर वेस्ट कोस्ट ऑफ अमेरिका आहे किंवा अगदी वेगळं काही तरी हवं असेल तर टोकियो, शांघाय हेही पर्याय आहेत. बेटांवर जायचं असेल तर फिलिपाइन्स, सॅन्टेरॉनी असे काही पर्याय आहेत.

* या सीझनमध्ये दिवस लहान असतो. त्यामुळे दिवसा भटकंतीचे पर्याय कमी असतात. म्हणून रात्री उशिरापर्यंत विविध शहरांत आर्टिफिशियल लाइट्स, डेकोरेटेड पूल्स, तलाव, ब्रिज, सीटी पार्क, मार्केट्स, लेन्स, शॉप्स, पब्स, कॅफेज, हॉटेल्स अशा असंख्य ठिकाणी शहरात फिरता येतं. नाइट लाइफ एन्जॉय करण्यासारखी असते.

* परदेशात ख्रिसमस, थॅक्स गिव्हिंग आणि न्यू ईअर असे सण नाही म्हटले तरी महाग ठरतात. त्याऐवजी या सीझनमध्ये फक्त वीक डेजला फिरण्याचा पर्याय चांगला ठरतो. तुम्हला अमेरिकेत जायचं असेल तर सिएटल, फ्लोरिडा, लास व्हेगास हा चांगलाच पर्याय ठरू शकतो. ख्रिसमसमध्ये पाहण्यासाठी येथे काही कन्सेप्ट्स तयार केल्या जातात. वेगळी संस्कृती पाहायची असेल तर व्हेनिशयन, सिझर पॅलेस, इजिप्तमधील लक्सर अशा महत्त्वपूर्ण ठिकाणी जाता येते. आयफेल टॉवर, पॅरिस येथेही या सीझनमध्ये खूप तरुण फिरतात.

* अमेरिकेत गेल्यावर नायगरा फॉल्स न्यूयॉर्कमधून आणि कॅनडातूनही पाहायला मिळतो. गंमत म्हणजे खास थंडीत तो गोठतो. त्यामुळे ते पाहायला आणि त्यावर नुसतं चालायला म्हणूनही लोक जातात. बफेल्लो परिसरात रात्री लाइट्स आणि त्यांचा शो ही एक वेगळी पर्वणी असते. तिथे ‘केव्ह ऑफ विन्ड्स’ आहे जे फक्त याच सीझनला ओपन होते. परदेशात उबर, ओराका, शटल बस, फ्री बस अशा ट्रान्सपोर्टच्या सोयीही असतात.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about walking abroad