सचिन जोशी
जेवण झालं की तोंडात टाकायला काहीतरी गोड हे हवंच. डेझर्टशिवाय जेवण पूर्ण होतच नाही. घरात काही गोड नसेल तर साखर आणि गूळ हे डेझर्टची जागा चालवतात. पण क्रीमयुक्त डेझर्ट जर समोर आलं तर? म्हणजे ते आईस्क्रीम असो किंवा क्वचित केलं जाणार पुडिंग असो! जिव्हातृप्ती ही सारखीच. आज आपण शिरणार आहोत क्रीमी, स्वीट, टेस्टी अशा ‘पुडिंग’च्या विश्वात..
घरातील सर्व सदस्य एकत्र येतात तेव्हा रात्रीचं जेवण संपल्यावर गोड पदार्थाने त्या रात्रीची मजा वाढवायला पुडिंगसारखा साथी नाही! पुडिंग म्हणजे काय तर चमच्याने खाता येणारे एक गोड, क्रीमयुक्त मिष्टान्न होय. सामान्यत: पुडिंग दूध, साखर आणि कॉर्नस्टार्चपासून बनवलं जातं. तरुणाईमध्ये पुडिंगचे तीन प्रकार प्रसिद्ध आहेत. ते म्हणजे डार्क चॉकलेट, बटरस्कॉच व तांदळाचं पुडिंग. जे मधुर, मऊ आणि सामान्यत: थंड असतं. ब्रिटनमध्ये पुडिंगचा अर्थ ‘मिष्टान्न’ असा होतो. उत्तर अमेरिकेत पुडिंग हा विशिष्ट प्रकारचा डिनरनंतर खाण्याचा स्पेशल पदार्थ आहे, तर जुन्या काळी म्हणजे साधारणपणे १३०० च्या दशकात पुडिंगचा अर्थ होता एक प्रकारचा सॉसेज. काही ठिकाणी पुडिंग गोड नसून चविष्ट नमकीन असतात.
ब्रिटनचं लाडकं स्टिकी टॉफी पुडिंग
आंतरराष्ट्रीय शहरातील पारंपरिक पुडिंगच्या सफरीला निघताना सुरुवात ब्रिटनपासून करूयात. ब्रिटनमध्ये तयार होणारं पुडिंग हे जगप्रसिद्ध पुडिंग आहे. जे स्टिकी टॉफी पुडिंग नावाने ओळखलं जातं. सुंदर तपकिरी रंग, केकच्या आतील घनदाट ओलावा, गोड- खारट चव आणि त्या सर्व चवींवर असलेलं खजुराचं वर्चस्व. त्यामुळे या पुडिंगने ‘स्टार ऑफ द शो’चा मानाचा मुजरा मिळवलाय!
ख्रिसमस प्लम पुडिंग किंवा ख्रिसमस पुडिंग
ख्रिसमच्या काळात आपल्या जिवलगांना सव्र्ह केल्या जाणाऱ्या पुडिंगला ख्रिसमस प्लम पुडिंग किंवा ख्रिसमस पुडिंग असं म्हणतात. हे पुडिंग ख्रिसमसच्या डिनरचं सर्वात शेवटचं खास डेझर्ट असतं. या पुडिंगशिवाय ख्रिसमसचा सण साजरा होतच नाही. हे पुडिंग कस्टर्ड किंवा ब्रँडी सॉससह दिलं जातं.
नाताळचा सण सुरु होण्याआधीच्या रविवारी परंपरेनुसार घरातील सर्व सदस्य स्वयंपाकघरात एकत्र येऊन ख्रिसमस पुडिंग मिक्स आणि स्टीम करतात. ही परंपरा २५ डिसेंबरच्या ५ आठवडे आधी जोपासली जाते.
या पुडिंगसाठी लागणारं मिश्रण बरंच आधी बनवलं जातं. पुडिंगचं मिश्रण एका विशिष्ट पद्धतीने लाकडी चमच्याच्या साहाय्याने क्लॉकवाइज डायरेक्शनने ढवळलं जातं. या वेळी घरातील सर्व सदस्य डोळे बंद करून मनात काही इच्छा धरतात. ती पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे. पुडिंग मिक्स हलवायची ही पद्धत म्हणजे जणू काही जीझस बाळाला पाळण्यात ठेवून आंदुळलं जातं, या कृतीचं प्रतीक मानण्यात आलेली आहे. ही परंपरा खूप शुभकारक मानली जाते. तर असा हा रेसिपी बनवण्याचा रविवार ‘स्टर अप संडे’ म्हणून ओळखला जातो. हे सगळ्यांनी हलवलेलं मिश्रण आधी आठ तास डबल बॉयलर पद्धतीने उकडणं आवश्यक असतं. असं तयार पुडिंग थंड ठिकाणीवरून कापड अंथरून ठेवलं जातं. ख्रिसमस डिनरच्या वेळी पुडिंगवरचं कापड काढलं जातं आणि सव्र्ह करण्याआधी पुडिंगवर ब्रॅण्डी ओतून पेटवलं जातं. रात्रीच्या अंधारात या जळत्या पुडिंगचा सोहळा सुरेख दिसतो आणि चवही छान खरपूस लागते. काही घरांमध्ये चांदीचे नाणे पुडिंग मिश्रणात घालतात. असं मानलं जातं की नाणं ज्याला मिळेल त्याचं नशीब उजळणार आहे! ख्रिसमस पुडिंग कस्टर्ड किंवा ब्रँडी सॉससह दिलं जातं. या ब्रँडी सॉसला आग लावून हा सोहळा साजरा केला जातो. या पुडिंगवरच्या ज्वाळा स्पष्ट दिसाव्यात म्हणून दिवे बंद करून हे पुडिंग सव्र्ह करतात!
तिरामिसू आणि पॅनाकोट्टा – इटली
ज्याप्रमाणे ब्रिटनमध्ये स्टिकी टॉफी पुडिंग प्रसिद्ध आहे. तसंच इटलीमध्ये तिरामिसू आणि पॅनाकोट्टा या नावाने पुडिंग प्रसिद्ध आहेत. तिरामिसू आणि पॅनाकोट्टा हे नाव वाचल्यावर चटकन आपल्या डोळ्यासमोर साऊथ इंडिया आलं असेल. या नावाला तसं म्हणाल तर नक्कीच साऊथ इंडियन टच आहे.
उत्तर इटलीतील ट्रेविसो या शहरात पहिल्यांदा तिरामिसू हे पुडिंग तयार केलं गेलं असं मानलं जातं. तिरामिसूने लगोलग आंतरराष्ट्रीय चवींवर ठसा उमटवला आणि आज जगमान्य असलेल्या अगदी हमखास आवडीच्या इटालियन पदार्थाच्या यादीत अग्रगण्य जागा पटकावली आहे. या मोहक मिष्टान्नांच्या नावाचा इटालियन भाषेमध्ये अर्थ ‘पिक मी अप’ असा गमतीशीर होतो. कॉफी, अल्कोहोल, हलक्या फुलक्या मास्कार्पोन चीज, झ्ॉबॅग्लिओन क्रीम आणि चॉकलेट यांचं स्वादिष्ट संगम हे या डेझर्टचं खरं नावीन्य आहे! पॅनाकोट्टा म्हणजे शिजवलेली मलई असा या पुडिंगचा इटालियन भाषेतला अर्थ आहे. मलईला साखरेने अधिक गोड करून त्यात जिलेटिन घालून घट्ट करून साच्यातून सुंदर आकार या पुडिंगला दिला जातो. कॉफी, व्हॅनिला किंवा इतर सुगंधांसह हे क्रीम तयार केलं जातं.
पोर्तुगाल आणि मकाऊचं बेबिंका
बेबिंका हे पुडिंग पारंपरिक इंडो-पोर्तुगीज गोडाचा प्रकार आहे. पारंपरिक बेबिंकामध्ये एक नव्हे दोन नव्हे तर चक्क सात थर असतात. साहित्यामध्ये गव्हाचे पीठ, साखर, तूप, अंडय़ाचा बलक आणि नारळाचं दूध यांचा समावेश असतो. भारतात गोवा राज्याचा हा एक पारंपारिक गोड पदार्थ आहे. फ्रीजमध्ये ठेवून बराच काळ चवीचवीने हे पुडिंग खाल्लं जातं. मकाऊ , पोर्तुगाल आणि मोझांबिकमध्येदेखील बेबिंका तयार केलं जातं. कमीत कमी चार तास बनवण्यासाठी लागणाऱ्या बेबिंकाला ‘गोव्यातील मिठाईची राणी’ असं संबोधलं जातं. बेबिंका आइस्क्रीमबरोबर गरम सव्र्ह करावं.
यॉर्कशायर पुडिंग – इंग्लिश साइड डिश
यॉर्कशायर पुडिंग एक सामान्य स्वादिष्ट नमकीन इंग्लिश साइड डिश आहे. यामध्ये अंडी, पीठ आणि दूध वापरून ओव्हनमध्ये बेक करून हे पुडिंग बनतं. हे यॉर्कशायर पुडिंग कोणत्या क्रीम किंवा सॉसबरोबर सव्र्ह न करता चक्क भाजलेल्या मटणाबरोबर सव्र्ह करतात.
पुडिंग हा पदार्थ आज भारतात सर्रास मिळू लागलाय. घरोघरी बनवला जातोय. परंतु आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये पारंपरिक पुडिंग बनवण्याची पद्धत, जिन्नस यात विविधता आढळते. ही खाद्यसफर पारंपरिक पुडिंगची आहे. जी प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वाभाविक निव्वळ गोडवाच देते.
स्टिकी टॉफी पुडिंग
साहित्य : १ कप म्हणजे २०० ग्रॅम असे प्रमाण घ्यावे. १/४ कप लोणी, दीड कप मैदा, दीड कप बिया काढून चिरलेला खजूर, १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा बेकिंग पावडर, मीठ स्वादानुसार, १ कप साखर, १ चमचा व्हॅनिला इसेन्स, २ अंडी.
सॉससाठी साहित्य : दीड कप ब्राऊन शुगर, अर्धा कप क्रीम, दीड कप लोणी, १ चमचा ब्रँडी (इच्छेनुसार), अर्धा चमचा व्हॅनिला आइस्क्रीम
आवश्यक उपकरण : ६ कप केक मोल्ड्स (साचे)
कृती : पुडिंगसाठी : ओव्हन ३५० डिग्री तापवून घ्या. लोणी आणि मैदा केकच्या साच्याला लावून घ्या. १ ते ४ कप पाणी उकळवा. उकळवलेल्या पाण्यात बेकिंग सोडा आणि खजुराचे तुकडे घाला. या मिश्रणाला फेस यईल. मिश्रण बाजूला ठेवा व थंड होऊ द्या. एका लहान वाडग्यात दीड कप मैदा, बेकिंग पावडर आणि स्वादानुसार मीठ घालून एकजीव करा. एक मोठं वाडगं घ्या. त्यात १/४ कप लोणी, साखर आणि व्हॅनिला आईस्क्रीम एकजीव करा. या मिश्रणात शेवटी १ अंडं घालून फेटा. लहान वाडग्यातील मैद्याचं मिश्रण आणि सुरुवातीला थंड होण्यासाठी ठेवलेलं खजुराचं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या. मोठय़ा वाडग्यातील लोण्याचं मिश्रण व आपल्याजवळ उरलेलं १ अंडं या मिक्सरमधील मिश्रणात टाकून मिश्रण पुन्हा एकजीव करा. हे सर्व मिक्सरमध्ये फिरवलेलं मिश्रण केकच्या साच्यात घाला आणि ४५ मिनिटे ओव्हनमध्ये बेक करा. बेक झाल्यावर केकच्या साच्यासकट बाहेर काढून ३० मिनिटं थंड होऊ द्या.थंड झाल्यावर केक साच्यातून बाहेर काढा.
सॉससाठी कृती: दीड कप कप ब्राऊन शुगर, अर्धा कप क्रीम आणि दीड कप लोणी मंद आचेवर उकळवा. तीन मिनिटं सतत ढवळून उकळवल्यावर गॅस बंद करून ब्रँडी (इच्छेनुसार) आणि व्हॅनिला घालून मिश्रण एकजीव करा. हा केक चार तास आधी बनवून ठेवा. सव्र्ह करण्यापूर्वी हळुवारपणे केकचे मोठे स्लाइस करा. त्यावर सॉस आणि व्हिप्ड क्रीम घालून सव्र्ह करा.
बेबिंका
साहित्य: २ ओल्या नारळाचं किसलेलं खोबरं, ४०० ग्रॅम साखर, १५० ग्रॅम मैदा, ८ अंडय़ांचा बलक,
१ लहान जायफळ, चिमूटभर मीठ, १ते २ टीस्पून तूप.
कृती : नारळाचं दूध काढा. हवाबंद पाकिटातील नारळाचं दूध वापरण्याचा सुलभ मार्ग निवडू नये. १५० ग्रॅम मैदा हळूहळू नारळाच्या दुधात मिसळा त्यात चिमूटभर मीठ घाला. व मिश्रण बाजूला ठेवा. एका वाडग्यात किसलेलं जायफळ, अंडय़ाचा पिवळा बलक आणि ४०० ग्रॅम साखर घाला.अंडी-साखर-जायफळ मिश्रण आणि मैदा – नारळ दूध एकत्र करून सर्व मिश्रण गुठळ्या होऊ न देता एकजीव करा. मिश्रण खूप घट्ट असेल तर उर्वरित नारळाचे दूध घाला व सैलसर करून घ्या. मंद आचेवर तूप गरम करा. या पातेल्यात आता २ पळ्या मिश्रण घाला. हा प्रथम तळ थर तयार होईल. तो पातेल्यातून काढून ओव्हनमध्ये ठेवा. (ओव्हनचा फक्त वरच्या उष्णतेचा स्रोत सुरू ठेवा) अशा पद्धतीने थरांमध्ये तूप घालून एक थर दुसऱ्या थरावर ठेवा. प्रत्येक थराला २० मिनिटे बेक करा. एकावर एक ७ थर झाल्यावरच स्वादिष्ट बेबिंका तयार होईल!
viva@expressindia.com
शब्दांकन : मितेश जोशी