वेदवती चिपळूणकर

बातमी राजकारणाची असो किंवा अतिसंवेदनशील गुन्ह्य़ाची असो, दुष्काळाची असो वा भारताने जिंकलेल्या क्रिकेटच्या सामन्याची असो, स्क्रीनवर ती बातमी सांगताना कोणत्याच भावनांचा उद्रेक होऊन चालत नाही. सामना जिंकला म्हणून आनंदही दाखवता येत नाही आणि एखाद्या बातमीच्या प्रभावाखाली स्क्रीनवर रडताही येत नाही. चेहऱ्यावरचे भाव, कपडे, बॉडी लँग्वेज, बोलणं अशा अनेक गोष्टींचं भान बाळगत शांतपणे आणि गांभीर्याने बातम्या देणं हे वाहिनीच्या नावाच्या प्रतिष्ठेसाठीही महत्त्वाचं असतं. ही तारेवरची कसरत समर्थपणे करून प्रेक्षकांच्या ओळखीचं बनलेलं नाव म्हणजे ज्ञानदा कदम.

माध्यमाची विद्यार्थिनी असलेल्या ज्ञानदाने सुरुवातीचा काही काळ आकाशवाणीमध्ये काम केलं. आकाशवाणीवर तिचा आवाज कधी ऐकायला मिळाला नाही तरी तिला त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. ‘आकाशवाणीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी पाहुणे येत असायचे. त्यांच्याशी कसं बोलायचं, तांत्रिक बाजू कशा सांभाळायच्या, बॅक ऑफिसला काय काय कामं असतात हे मला आकाशवाणीच्या आठ महिन्यांनी शिकवलं,’ असं ज्ञानदा सांगते. ‘एबीपी माझा हे स्टार माझा होतं तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे. या १ मार्चला मला इथे तेरा वर्ष पूर्ण होतील. मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि काय ते माहिती नव्हतं. पत्रकारितेचा कोर्स करून मी नुकतीच २००७ मध्ये ‘स्टार माझा’ला जोडले गेले होते. ती आमची मराठीतली साधारण पहिलीच बॅच असेल जी टीव्ही मीडियामध्ये एवढय़ा तयारीने उतरली होती. सगळेच तेव्हा या माध्यमाला नवीन होतो आणि त्यामुळे सगळेच धडपडत होतो,’ अशी आठवण ती सांगते. ज्ञानदाला पत्रकारिता जमली नसती तर तिच्याकडे घरच्यांनी पर्यायही दिलेले होते. तिचे आजोबा शाळेचे मुख्याध्यापक होते, आजी शिक्षिका होती, त्यामुळे ‘काही वेगळं करायला जमलं नाही तर शिक्षणाच्या क्षेत्रात येऊ शकतेस,’ हा सल्ला तिच्यासाठी कायमच होता. मात्र ज्ञानदाने निश्चयाने तिला हवं तसं इतरांपेक्षा ‘वेगळं’ करिअर घडवण्यासाठी लागेल ती सगळी मेहनत घेतली.

एक मुलगी म्हणून, एक महिला पत्रकार म्हणून वेगळ्या पद्धतीची वर्तणूक अनेकदा या क्षेत्रात अनुभवायला मिळते. काही वेळा तो जाणूनबुजून केलेला फरक असतो तर काही वेळा त्यात खरोखरीची काळजी असते. ‘महिला पत्रकारांच्या बाबतीतल्या या काळजीच्या मागे तशीच कारणं असतात,’ असं ज्ञानदाचं मत आहे. या बाबतीतले तिचे अनुभव ती सांगते, ‘मुलींना नाइट शिफ्ट का देत नाहीत, असा प्रश्न मलाही पडला होता. अनुभव घ्यावा म्हणून मी जेव्हा नाइट शिफ्ट केली तेव्हा लक्षात आलं की, सामान्यत: नाईट शिफ्टला खून, दरोडे, मारामारी अशा पद्धतीच्या क्राइमच्या बातम्या अधिक असतात. या सगळ्या बातम्यांचा, त्या वातावरणाचा, त्या फोटोजचा नकळत तुमच्यावर परिणाम होतो. सगळं निगेटिव्ह वास्तवच तुमच्यासमोर येत राहातं. फार थोडय़ा मुलींना या वातावरणाने त्रास होत नाही. त्यामुळे मी नाईट शिफ्ट हौसेने मागून घेणं बंद केलं. तसंच जेव्हा फील्डवर जायचं असतं, त्या वेळीही भेद केला जातो असं सगळ्यांना वाटतं. ज्या वेळी भारताची क्रिकेट टीम टी-ट्वेण्टी वर्ल्ड कप जिंकली होती आणि मुंबईत अंधेरी ते वानखेडे स्टेडियम अशी त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती, तेव्हा मी तिथे रिपोर्टिगला गेले होते. माझ्याबरोबर अजून एक कलीग आणि कॅमेरामन होते. त्या मिरवणुकीला प्रचंड गर्दी आणि चेंगराचेंगरीचा अनुभव आम्ही घेतला. त्या वेळी त्या गोंधळात मला तर काही काम करता आलंच नाही, उलट माझ्यासोबतच्या मेल कलीगने संपूर्ण वेळ एका हाताने मला धरून ठेवून कॅमेऱ्याला बाइट्स दिले. याचा सगळ्यात जास्त परिणाम आमच्या कामावर झाला. मला सांभाळण्यात त्याचं काम शंभर टक्केतो करू शकला नाही आणि मी तर कामच करू शकले नाही.’ अशा अनुभवांनंतर ‘अगदीच गरज असेल तरच अशा ठिकाणी जावं’ हे ज्ञानदाने स्वत: ठरवलं आणि तेच तिचं इतरांनाही सांगणं आहे.

माध्यमात काम करताना स्वत:ची मतं, भावना, अडचणी बाजूला ठेवून काम करावं लागतं हे तर सर्वश्रुत आहे. एखाद्या संवेदनशील घटनेबद्दल बोलताना मनाचा दगड न करता मात्र तरीही भावनांवर संयम ठेवून बोलावं लागतं. सांगली आणि कोल्हापूरच्या पुरानंतरच्या ‘विघ्नहर्ता’ पुरस्कारांबद्दल बोलताना ज्ञानदा सांगते, ‘एका अशा काकांना पुरस्कार दिला गेला ज्यांची स्वत:ची पत्नी गरोदर होती, तिची डिलिव्हरी कोणत्याही वेळी होईल अशी परिस्थिती होती आणि तरीही त्या काकांनी लोकांना वाचवलं. त्या काकांना मुलगी झाली. तेव्हा मी निवेदनात असं म्हटलं की तुम्ही इतरांना वाचवत होतात आणि तुमच्या घरी लक्ष्मीचा जन्म झाला. त्या वाक्यावर अनपेक्षितपणे त्या काकांनाही भावना आवरल्या नाहीत, स्टेजवर असलेल्या सई ताम्हणकरलाही अश्रू आवरले नाहीत आणि मग मीही माझ्या भावना रोखल्या नाहीत.’ प्रत्यक्ष एखाद्या घटनेच्या ठिकाणी जाऊन तिथल्या पीडितांशी किंवा त्यांच्या नातेवाईकांशी बोलण्याचे प्रसंग ज्ञानदाने अनेकदा अनुभवले आहेत. ‘ज्या वेळी आम्ही कोपर्डी किंवा हिंगणघाट यासारख्या ठिकाणी जातो त्या वेळी कपडे आणि चेहऱ्यावरचा मेकअप बघून आमच्याशी बोलायला मुली तयार होत नाहीत. अशा वेळी टीव्हीवर बोलणारी ज्ञानदा सोडून मला त्यांच्यातली एक होऊन त्यांना विश्वासात घ्यावं लागतं. त्यांच्या भावना समजून घेताना केवळ माझा कार्यक्रम चांगला व्हावा म्हणून मला दगड बनून चालत नाही.’ एकाच वेळी भावनांवर संयम ठेवणं आणि तरीही संवेदनशीलता न गमावणं या दोन गोष्टींचा तोल ज्ञानदाने कुशलतेने सांभाळला आहे.

स्त्री कोणत्याही क्षेत्रात काम करत असली तरीही मल्टिटास्किंग हे एक आवश्यक कौशल्य असतं, असं ज्ञानदा म्हणते. आपण करत असलेल्या कामावर आपलं प्रचंड प्रेम असेल तरच हे शक्य होतं असं तिचं मत आहे. ‘कॅमेऱ्यासमोर बसल्यावर कानात थ्री, टू, वन, क्यू हे ऐकलं की मी आपोआपच बाकी सगळं विसरून त्या झोनमध्ये निघून जाते,’ हे सांगताना ज्ञानदा नव्हे तर तिच्या कामावरचं तिचं प्रेमच हे बोलत होतं.

कॅमेऱ्यावर दिसतो म्हणजे इथे केवळ ग्लॅमर आहे असं नाहीये. त्यामागे प्रचंड मानसिक, शारीरिक, भावनिक काम आहे. आजच्या पिढीकडे पेशन्स कमी आहेत. पटकन अशी कोणतीच गोष्ट मिळत नाही. सहज प्रगती करू  शकू असं वाटत असेल तर ते शक्य नाही. इथे आलेली व्यक्ती फार काळपर्यंत अनेकदा टिकूनही राहात नाही. सगळी प्रेशर हॅण्डल करून स्वत:ला कम्पोज्ड ठेवणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे या कामावर प्रचंड प्रेम असेल तरच या क्षेत्रात या आणि हे क्षेत्र निवडलंत तर कायम त्यात टिकून राहायच्या तयारीने या.

– ज्ञानदा कदम

viva@expressindia.com