राधिका कुंटे

नाणी गोळा करण्याच्या छंदास पूरक ठरणारी ब्राह्मी लिपी शिकताना त्याने काही हटके उपाय वापरले. नाणी आणि शिलालेखाच्या माध्यमातून ब्राह्मीचे विविध प्रकार शिकणाऱ्या श्रीपाद ब्राह्मणकरच्या ‘ब्राह्मी’मयी धडपडीविषयी जाणून घेऊ या.

असं म्हणतात, शोधलं की सापडतंच. मग त्या शोधाचा, संशोधनाचा विषय हा भाषा, विज्ञान, कला, पर्यावरण, इतिहास आणि अन्य कोणत्याही क्षेत्रातला असू शकतो. तरुण पिढीतील अनेक जण सध्या संशोधन क्षेत्रात रमले आहेत. काही अभ्यास म्हणून तर काही पूर्णपणे संशोधक म्हणूनच कार्यरत आहेत. हे तरुण संशोधक त्यांच्या अभ्यासाचा विषय आणि त्या संशोधनातील टप्पे या सदरातून उलगडतील..

नववीत असतानाची गोष्ट. नाण्यांच्या संदर्भातला धडा वाचून त्याच्या मित्राला नाणी गोळा  करावी असं वाटू लागलं आणि ती नाणी तो त्याला दाखवू लागला. दिवाळीत लक्ष्मीपूजनाला जुनी नाणी पूजेसाठी म्हणून ठेवल्यावर इंदिरा गांधी यांचं रेखाचित्र असलेलं नाणं त्याला दिसलं. त्यानं ते मित्राला दाखवलं. मित्राचा चेहरा थोडा पडलेला बघून त्याला मजा वाटली. मग त्याने बाबांना तो जुनी नाणी गोळा करणार असल्याचं सांगितलं. त्यांनीही त्याला मदत केली. हा नाणी संग्राहक आहे श्रीपाद ब्राह्मणकर. तो दहावीत असताना ‘रेअर फेअर’ या प्रदर्शनाचं पत्रक त्याला मिळालं. त्या पत्रकावरून त्याने ‘कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्यूमिसमॅटिक अ‍ॅण्ड रेअर आयटेम्स’ या नाशिकमधील संस्थेचे तत्कालीन सचिव अच्युत गुजराथी यांच्याशी संपर्क साधला. ‘माझ्याकडे काही नाणी आणि पोस्टाची तिकिटं आहेत, मला या प्रदर्शनात सहभागी होता येईल का?’, असं त्यांना विचारलं. त्यांनी होकार देत नवोदित संग्राहकाने काय करायला हवं आणि काय टाळायला हवं, ते सांगितलं. त्याच दिवशी श्रीपादने त्या संस्थेत नाव नोंदवलं. त्याबद्दल त्याने आजोबांना सांगितल्यावर त्यांनी ब्रिटिश काळातली नाणी असलेला डब्बाच त्याला दिला. श्रीपाद सांगतो, ‘त्या क्षणापासून माझ्या नाणीसंग्रहाची सुरुवात झाली. नाणी-तिकिटांचा तो संग्रह गुजराथीसरांना दाखवला. त्या संदर्भातल्या अनेक थीम त्यांनी समजावून सांगितल्या. तेव्हा हे प्रकरण भारी असल्याचं जाणवून आता शून्यापासून सुरुवात आहे हे कळलं. २०१४ मध्ये दहावी झाल्यावर लगेच प्रदर्शनात सहभागी झालो. त्यात मांडलेल्या आर्किटेक्चरशी निगडित स्टॅम्पचं अनेक लोकांनी कौतुक केलं. त्यामुळे प्रोत्साहन मिळालं. या प्रदर्शनामुळे आपल्यापेक्षाही दुर्मीळ आणि चांगला संग्रह असणारे आहेत हे भान आलं. आतापर्यंत केवळ इतिहासात वाचलेल्या-ऐकलेल्या राजवटींमधील नाणी पुढय़ात दिसत होती. त्यातही त्यातल्या काही नाण्यांवर असं काही लिहिलेलं आहे, जे आपल्याला वाचता येत नाही हे कळलं. ते समजून घ्यायचं असेल तर ब्राह्मी लिपी शिकायला हवी, असा सल्ला गुजराथीसरांनी दिला’.

त्याच सुमारास नाशिकमधल्या अतुल भोसेकर यांच्या ‘ट्रिबिल्स’ संस्थेने वर्षभरात जवळपास अडीच हजार शालेय विद्यार्थ्यांना ब्राह्मी शिकवली आणि या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली. ते वाचून श्रीपाद त्यांना भेटला आणि ब्राह्मी लिपी शिकला. भारतातल्या सर्वात पहिल्या लिपींपैकी एक ब्राह्मी मानली जाते. सम्राट अशोकाच्या काळापासून ही लिपी भारतभरात वापरात होती. तज्ज्ञांच्या मते, आताच्या वापरात असलेल्या लिपींची उत्पत्ती ब्राह्मी लिपीत आहे. काळानुसार या लिपीत अनेक बदल होत गेले. जुनी नाणी संग्रह करण्यासाठी आणि शिलालेखावरील उल्लेख वाचण्यासाठी म्हणून त्याने ब्राह्मी शिकायचं ठरवलं. प्राथमिक पातळीवरची ब्राह्मी लिपी शिकल्यावर त्याला वाटलं, ‘चला काम झालं’. पण त्या पलीकडेही गोष्टी आहेत हे तेव्हा माहिती नव्हतं. तो सांगतो, ‘पश्चिमी क्षत्रप राजांचं त्या काळात पुणे, गुजरात इत्यादी भागांवर राज्य होतं. नाशिकमधल्या पांडवलेण्यांमध्ये या राजांचा उल्लेख आहे. त्यापैकी एक राजा यशोदानची मुद्रा असलेलं नाणं थोडे पैसे जमा करून मी विकत घेतलं. मात्र त्यावरची ब्राह्मी वाचताच येईना. पार मूडच गेला राव! वाटलं मी खरंच ब्राह्मी शिकलो का? घरी येऊन सर्च केला. कॉईन इंडियाच्या साइटवर अनेक राजांची नाणी होती आणि मुख्य म्हणजे ब्राह्मी हातानं लिहिलेली होती. मग ते गिरवायला सुरुवात केली. एरवी आपण पूर्ण अक्षरं गिरवतो तर नाण्यावर कोरून काढलेली अक्षरं असतात. माझ्याकडे तेव्हा एकच नाणं होतं. ते गिरवायला सुरुवात केली तरी ते वाचता येईना. पुन्हा लिपीच्या अभ्यासाला सुरुवात केली’.

तरीही नाण्यांच्या अभ्यासाला आणखी गती येणं आवश्यक होतं. मग त्याने पुन्हा गुजराथीसरांकडे धाव घेतली. त्यांच्याकडे तशा प्रकारची पन्नास नाणी होती, ती त्यांनी त्याला देऊन त्यांचा अभ्यास करायला सांगितलं. शिवाय असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जुन्नरे यांनी नाण्यांचे कॅटलॉग अभ्यासासाठी म्हणून मोफत दिले. या साहित्यानिशी अभ्यास करता करता हळूहळू ब्राह्मी वाचता येऊ लागली. त्यातले स्वर, व्यंजनं लिहून काढली. तो शिकला ते वेगळं होतं आणि हे नाण्यावर कोरलेलं वेगळं होतं. गुजराथीसरांनी त्यातले अनेक बारकावे दाखवत बदल अभ्यासायला सांगितले. गूगलवर शोधल्यावर दुवा मिळाला— ‘एपिग्राफिया इंडिका’चे ३२ खंड आहेत. त्यातला पहिला लेख ताम्रपटावर होता, तो आणखी कठीण धाटणीच्या ब्राह्मीमधला होता. तेव्हा या विषयाचा आवाका खूपच मोठा असल्याचा त्याला अंदाज आला. ताम्रपटावर दिसतं आहे, तसंच चित्रकलेच्या वहीवर तो गिरवायचा. त्याखाली स्वत: लिप्यंतर करायचा प्रयत्न करायचा, मग त्या पुस्तकातलं लिप्यंतर करायचा प्रयत्न करायचा. असं करता करता तो ताम्रपट पूर्ण झाला. त्यानंतर त्यातले स्वर आणि व्यंजन वेगळे लिहून काढले. तो सांगतो की, ‘एक दिवस पांडवलेण्यांमध्ये गेलो. तिथे ब्राह्मीमध्ये कोरलेल्या शिलालेखांचा खजिनाच सापडला. मग दर रविवारी तिकडे जायला लागलो. अकरावी कॉमर्सला प्रवेश घेताना वाटलंच नव्हतं की, या नाण्यांच्या नि ब्राह्मीच्या दुनियेत मी इतका हरवून जाईन.. सीए व्हायचा पर्याय निवडला होता. सीपीटी द्यायची होती. एका बाजूला जुन्या नाण्यांमध्ये फारच रस वाटू लागला होता. अभ्यास व्हायचा दोन तास, नाण्यांमध्ये जायचे १२ तास. पहिला प्रयत्न निष्फळ ठरला. दुसरा आणि तिसराही नाहीच. मग वेळापत्रक उलटं केलं.. दरम्यानच्या काळात लेण्यांमधले शिलालेख वाचायचो. बऱ्याच उंचीवरचे शिलालेख मान वर करून वाचायला लागायचे. एकेका ओळीत जवळपास पन्नास शब्द.. अशा सहा-सात ओळी. त्यांचे फोटो काढून वाचून बघू लागलो तर कोरलेलं नीट दिसत नव्हतं. तेव्हा माझी ओळख पंकज समेळ यांच्याशी झाली. त्यांनी सांगितलं की, जुन्या पद्धतीनुसार टिश्यू पेपरसारखा कागद पाण्यात भिजवून शिलालेखावर लावायचा. त्यावर कोरडी शाई पसरून त्याचा ठसा घ्यायचा. ही भन्नाट कल्पना बाबांना सांगितली. त्यांनी पुरातत्त्वखात्याच्या अख्यत्यारीतल्या गोष्टीत असं काही करता येणार नाही, असं सांगून सपशेल नकार दिला. मान वर करून वाचावं तर तीही खूप दुखायला लागली होती. दुर्मीळ खंडांची किंमत हजारो रुपयांच्या घरात आणि त्यांचं पुनर्मुद्रणही बंद झालेलं. मग करणार काय? शोधलं की सापडतंच उत्तर.. कागदाचा लगदा, लांबी आणि फेव्हिकॉल एकत्र केला. प्लास्टिकच्या पारदर्शक डब्यावर थापलं. ऑनलाइन सर्च केल्यावर लेण्यांचे चांगले फोटो मिळाले. मग फोटो बघायचो आणि लगद्यावर अक्षरं काढत जायचो. असे २४ शिलालेख उतरवायला जवळपास वर्ष लागलं’. त्याचं शिलालेखाचं काम पाहिल्यावर गुजराथीसरांनी त्याला फक्त सातवाहन आणि क्षत्रपांच्याच नाण्यांवर काम करण्याविषयी सुचवलं. अमित उदेशी या नावाजलेल्या संग्राहकांना हा संग्रह दाखवल्यावर त्यांनी फेसबुकवर त्या संदर्भात पोस्ट केली. त्याला अनेक अभ्यासकांसह आमितेश्वर झा यांसारख्या तज्ज्ञांनी रिप्लाय केला. त्यातलं एक नाव होतं दिलीप राजगोर. त्यांनी श्रीपादच्या कामाचं कौतुक करणं ही त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट होती.

याच सुमारास तो खरोष्टी, मोडी, शारदा, ग्रंथा या लिपी शिकला. त्यावर काम करायला सुरुवात केली, पण ते मागं पडलं आणि त्याने पुन्हा ब्राह्मीवर लक्ष केंद्रित केलं. एकीकडे संग्रह वाढत होता आणि लिपीवरचं काम सुरू होतं. या कामाची दखल ‘इंदोर कॉइन सोसायटी’चे अध्यक्ष गिरीश शर्मा यांनी घेऊन श्रीपादचा सत्कार केला. त्यामुळे त्याला अधिकच हुरूप आला. त्याच वेळी चौथ्या प्रयत्नात सीपीटी पास झाला. मग आयपीसीसीचा नऊ महिने अभ्यास केला. नाणी आणि लिपीकडे ढुंकूनही बघितलं नाही. परीक्षेनंतर अधाशासारखं सगळं साहित्य बाहेर काढलं. बघितलं तर त्याला लिपीची ओळखच लागेना. तो दोन दिवस ढसाढसा रडत होता. ब्राह्मीची अक्षरं अनोळखीपणे वागत होती. पुन्हा शून्यापासून सुरुवात केली. तीन महिन्यांत गाडी रुळांवर आली. दोन महिन्यांनी निकाल लागून त्याला केवळ दोन गुणांनी अपयश पदरी आलं. मग त्याने परीक्षेचा अभ्यास आणि नाणी-लिपीचाही अभ्यास करेन, असं ठरवलं. एकीकडे इतिहास दुसरीकडे अर्थशास्त्र आणि आकडेमोड या दोन टोकांचा ताळमेळ बसवायचा कसा, हा मोठाच प्रश्न होता. हा ताळमेळ साधत श्रीपाद ‘भिकूसा यमसा क्षत्रिय महाविद्यालया’तून बी.कॉम. झाला. सीए झाल्यानंतर स्वत:ची प्रॅक्टिस करायचा त्याचा विचार आहे.

गेली दोन वर्ष तो ब्राह्मी संदर्भातली माहिती गोळा करतो आहे. शिकता येईल तितकं शिकतो आहे. शिलालेख, राजाचा उल्लेख, वेगळं अक्षर अशा नोंदी करून ब्राह्मीच्या संदर्भातली काही डॉक्युमेंट्स त्याने तयार केली. जानेवारी २०२०मधल्या ‘रेअर फेअर’च्या प्रदर्शनात क्षत्रप नाण्यावरची ब्राह्मी कागदावर लिहून त्याच्याबाहेर देवनागरी लिपी असं मांडलं, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ‘प्रदर्शनानंतर नाणं फोल्डरमध्ये ठेवणं गरजेचं असल्याने त्यावर बटरपेपर ठेवला. पेन्सिलने घासून ठसा घेतला. त्याच्याबाहेर मी हातानं लिहिलेली ब्राह्मी आणि त्याबाहेर देवनागरी असं भारी कॉम्बिनेशन जमून आलं. संगणकावर तयार केलेल्या प्रतिमेच्या कामात हस्तलिखिताची मजा नाही. त्यामुळे प्रत्येक नाण्यासाठी वेगळा प्रयोग करून बघतो. कमीत कमी एक तास जातो. कधी एखादं अक्षर राहतं, कधी एखादं वळण चुकतं असं एक नाणं जवळपास १०८ वेळा चुकतमाकत केलं होतं. सध्या क्षत्रपकालीन नाणी आणि शिलालेख यांवरची ब्राह्मी समान आहे का ते शोधायचा प्रयत्न सुरू आहे. प्राथमिक निरीक्षणानुसार ती जवळपास ९९ टक्के समान आहे. त्याचा पुरावा यौधेय गणाचं नाणं अभ्यासल्यावर मिळाला. त्याच्या नाणी आणि शिलालेखावर ब्राह्मी लिहिलेलं होतं — ‘यौधेय गणक जय’. तोपर्यंत ब्राह्मी भारताच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या प्रकारे वापरली जात होती. मग अलाहाबादचा समुद्रगुप्तचा शिलालेख पाहिला. त्यात ययोधन याचा उल्लेख असून त्याने अश्वमेध यज्ञानंतर एक नजराणा भेट दिला होता. त्या दोन्ही शैलींचा अभ्यास करत असून त्यावर पेपर लिहायचा आहे. ययोधनाचा उल्लेख महाभारताखेरीज कुठे आहे, ते शोधल्यावर पाणिनीसूत्रात तो सापडला. नाशिकच्या ‘एचपीटी आर्टस् अ‍ॅण्ड आर.वाय.के. कॉमर्स महाविद्यालया’तील संस्कृत विभागप्रमुख लीना हुन्नरगीकर यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी मदतीचा हात देत आणखी चार संदर्भ पुस्तकं सुचवली. त्यांनी माझ्या कामाचं डॉक्युमेंटेशन करायला सुचवलं आणि मी लगोलग त्यांची सूचना अमलात आणली’, असे तो सांगतो.

त्याला इतरांना ब्राह्मी शिकवायची आहे. त्याच्या मते, इतिहास, लिपी शिकताना पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन नव्हे तर अंगी खूप चिकाटी असणं गरजेचं आहे. या क्षेत्रात यायचं तर योग्य मार्गदर्शक मिळणं गरजेचं आहे. संधी कमी आहेत, पण त्या मिळाल्या तर चांगलं उत्पन्न मिळू शकतं. केवळ नाणी न मांडता त्या राजाचा इतिहास मांडायचा प्रयत्न तो करणार आहे. श्रीपाद नाशिकच्या ‘अबीर क्रिएशन्स’मध्ये सुलेखन शिकत असताना सुलेखनकार अच्युत पालव यांनी तिथे भेट दिली. त्याने पालव यांना एक शिलालेख भेट म्हणून दिला. त्यांना तो आवडला. त्यांनी त्यातला सुलेखनाचा दृष्टिकोन दाखवून दिला. लिपी लिहिताना तत्कालीन उपलब्ध लेखन साहित्यातील विविध बदलांचं कारण निदर्शनास आणून दिलं. मग श्रीपादचा संग्रहही त्यांनी आवडीने पाहिला. जानेवारी २०२० मध्ये मुंबईच्या जहांगीर कलादालनातील ‘ल्रिटोस्पेक्टिव्ह’ या पालव यांच्या कलाप्रदर्शनात श्रीपादच्या संग्रहातली तीस नाणी प्राचीन काळातील लेखनकलेचा नमुना म्हणून मांडण्यात आली होती. त्याच्या आयुष्यातला तो एक भारी दिवस होता. त्याच्या धडपडीचं चीज झालं. श्रीपादच्या मते, हीच तर खरी सुरुवात आहे..

viva@expressindia.com

Story img Loader