कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी वापरावी? चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटीकेट

टेबल वेअरविषयी आपण बोलतो आहोत. मागच्या आठवडय़ात आपण कप-बश्या अर्थात क्रॉकरीविषयी जाणून घेतलं. आता कटलरीविषयी समजून घेऊ या. कटलरीमध्ये काटे, चमचे, सुऱ्या इत्यादींचा समावेश असतो. ‘फाइन डाइन’ला लागणारी कटलरी उत्तम प्रतीच्या स्टेनलेस स्टील अथवा प्लेटेड चांदीची असते. पूर्वी श्रीमंत घरांमध्ये तर ती खऱ्या चांदीची असायची. सोन्याची किनार असलेल्या क्रॉकरीसोबत सोन्याचं प्लेटिंग केलेली कटलरी पण वापरली जाते.

प्रत्येक कोर्स खायला, त्यातल्या पदार्थाचा आस्वाद घ्यायला  वेगळी कटलरी लागते आणि त्यातल्या प्रत्येक प्रकाराला वेगळं नाव असतं – जसं सूप प्यायच्या चमच्याला सूप स्पून, चहा ढवळायला लागणाऱ्या चमच्याला टी स्पून. फिश खायला फिश फोर्क आणि फिश नाईफ असते. हे काटा-सुरी थोडे वेगळे असतात. काटय़ाच्या वरच्या भागाला दोन्ही बाजूनी खाचा असतात आणि सुरीच्या टोकालाही एक खाच असते. मेन कोर्स (मांसाहारी) खायला जेवणाच्या काटा-सुरीला लार्ज फोर्क, लार्ज नाईफ म्हणतात. ही कटलरीची जोडी फिश कटलरीपेक्षा थोडी मोठी असते.

गोड पदार्थ खाण्याचे थाट तर सर्वात जास्त! निरनिराळ्या प्रकारचे गोड पदार्थ खायला निरनिराळी कटलरी. प्लेटमध्ये सव्‍‌र्ह केलेलं डीझर्ट डीझर्ट स्पून आणि डीझर्ट फोर्कनी खाल्लं जातं. आणि आईस्क्रीम खायला एक वेगळा आईस्क्रीम स्पूनही असतो. या चमच्याची वरची बाजू गोलाकार नसून सरळ असते. केक अथवा पेस्ट्री खावयास पेस्ट्री फोर्क वापरतात. पेस्ट्री फोर्कचा डावीकडचा अणकुचीदार दांडा जरा जास्त जाड असतो. याने थोडे कडक पेस्ट्रीचे पदार्थ कापायला सोपं जातं.

फाइन डाइनचे पदार्थ सहसा बोनलेस असतात. पण समजा कधी असा पदार्थ खायचा झाला ज्याच्यात बोन्स (हाडूक) असतील, तर त्यातील आतलं खायला एक वेगळा चमचा असतो ज्याला मॅरो स्पून/स्कूप म्हणतात. हा चमचा एखादी धातूची अगदी बारीक नळी आडवी ठेवून अर्धवट कापली की कशी दिसेल, तसा दिसतो. आपल्याकडे हाडूक ताटात आपटून जोराने आतला भाग चोखून ओढला जातो (अगदी आवाज येईस्तोवर!) – असं फाइन डाइनमध्ये करणं म्हणजे अगदीच नो नो! नॉट अ‍ॅटऑल लेडी लाईक!

Story img Loader