वैष्णवी वैद्य
आज स्पर्धेच्या जगात वावरताना, जुन्याची पाळंमुळं घट्ट हवीतच, परंतु नव्याचे प्रायोगिक रूपसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते. आताची पिढी रंगभूमीवर एकांकिकांच्या माध्यमातून अधिक प्रयोगशील पद्धतीने वावरताना दिसते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातला शुभ मुहूर्त साधून आधुनिक दशकातील नवविचारांच्या एकांकिकांचा घेतलेला हा आढावा.
असं म्हणतात ‘होळी पौर्णिमा’ झाली की ऋतू बदलतात. निसर्गाचं या वर्षीचं चक्र संपतं आणि तो जणू नवीन वर्षांची वाट पाहत असतो. निसर्ग नेहमीच आपल्याला त्याच्या पद्धतीने ऋतुबदलाचे, वातावरणबदलाचे संकेत देत असतो, कारण बदल हा अनिवार्य आहे. दर दहा वर्षांनी पिढीसुद्धा बदलते. मग त्या नव्या पिढीचे नवे आचारविचार जगात रुजायला सुरुवात होते. आपल्या पूर्वजांनी आपल्याला ‘जुनं ते सोनं’ अशीच शिकवण दिली आहे; परंतु आजची तरुण पिढी या तत्त्वासोबतच नव्याची काससुद्धा धरू पाहते. जुन्यात परंपरा आहे, पण नव्यातसुद्धा परिपक्वता आहे. जुन्यात स्निग्धता आहे, पण नव्यातसुद्धा प्रांजळपणा आहे. आज स्पर्धेच्या जगात वावरताना, जुन्याची पाळंमुळं घट्ट हवीतच, परंतु नव्याचे प्रायोगिक रूपसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते. नव्या-जुन्याचा संगम साधणारी ही तरुण पिढी कलाविश्वात तरी बदल आणि प्रयोगाशिवाय कशी राहील. आताची पिढी रंगभूमीवर एकांकिकांच्या माध्यमातून अधिक प्रयोगशील पद्धतीने वावरताना दिसते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातला शुभ मुहूर्त साधून आधुनिक दशकातील नवविचारांच्या एकांकिकांचा घेतलेला हा आढावा.
कलाविश्वाच्या या मखमली राजवाडय़ात ‘एकांकिका’ या दालनाचे दरवाजे प्रयोगासाठी कायमच उघडे असतात. नाटक हे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले पाऊल असते, पण त्याचा उगम एका सुबक आणि कलासक्त अशा एकांकिकेतूनच होतो. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आलेली ही एकांकिका त्यांच्या सामाजिक, वैयक्तिक अशा अनेक घडामोडींचे प्रतिबिंब असते. मनोरंजनासोबतच काळाने त्याला एक महत्त्वपूर्ण अभिव्यक्ती साधनसुद्धा बनवले आहे, समाजमनाचा आरसा बनवले आहे. अमुक एक विषय लोकांसमोर यायलाच हवा अशा तरुणाईच्या आग्रहामुळे एकांकिकेच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग घडू लागले. एकांकिका किंवा नाटक ही स्वयंभू कला आहे. काळाप्रमाणे ती बदलत असली तरी संहिता बदलत नाही. विषय आणि विचार बदलले तरी लेखन, दिग्दर्शन, पात्र हे पैलू कमीजास्त होत असतात; पण या कलेतून ते वेगळे होऊ शकत नाहीत. पूर्वी ‘नाटक’ हा ध्यास होता. तेव्हा अजिबातच प्रयोग नव्हते असं नाही. कानेटकरांचं ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, तेंडुलकरांचं ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘घाशिराम कोतवाल’, एलकुंचवारांचं ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, गडकरींचं ‘एकच प्याला’ अशा अनेक कलाकृतींना यशस्वी प्रयोगच म्हणावं लागेल. आणखी काही नावे नमूद करायची झाली तर पु. ल. देशपांडे, रत्नाकर मतकरी, सतीश आळेकर या सगळ्या दिग्गजांनी प्रयोगच केले आणि ते जाणीवपूर्वक केले. तेव्हा परिवर्तन आणि सर्जनतेला महत्त्व होतं.
आजच्या काळात प्रयोगांना जास्त महत्त्व आहे, कारण त्याला तंत्रज्ञानाची जोड आहे. त्याचबरोबर ‘सवाई’, ‘लोकांकिका’, ‘पुरुषोत्तम करंडक’ यासह वेगवेगळ्या राज्यस्तरीय स्पर्धाची सुरुवात झाली आणि पर्यायाने ‘आपण सर्वोत्तम’ कसं व्हावं याचीसुद्धा सुरुवात झाली.
डिजिटल काळात नाटक टिकून राहील का? हा बरेचदा वेगवेगळ्या माध्यमांतून डोकावणारा प्रश्न असतो; पण तरुणाई मात्र त्या मुद्दय़ात न अडकता, त्याच डिजिटल माध्यमातून आपल्या एकांकिकांचा अभ्यास कसा करता येईल यावर भर देत आहे. पूर्वी विषय लोकांपर्यंत पोहोचावा, हा आग्रह होता; पण आता कशा पद्धतीने पोहोचावा याचासुद्धा विचार केला जातो. लेखन आणि दिग्दर्शन हे दोन अंग या प्रयोगांसाठी खूप महत्त्वाचे ठरतात. सवाई स्पर्धक असलेली ‘द कट’ या एकांकिकाची लेखिका आणि दिग्दर्शिका शर्वरी लहाडे सांगते, ‘‘आफ्रिका, सोमालिया या देशांमध्ये चालणारी अतिशय बीभत्स आणि भीतीदायक परंपरा ‘एफजीएम’ हा आमच्या एकांकिकेचा विषय होता; पण हा विषय लोकांपुढे यावा, असा आमचा आग्रह नाही तर हट्टच होता. वेगवेगळ्या आत्मकथांचे पुस्तक वाचताना याचा उल्लेख एका लेखात आढळला आणि हा किडा डोक्यात घुसला. दोन-अडीच वर्ष यावर आमचा रीसर्च चालू होता. या विषयावर मिळेल ते साहित्य, मिळेल त्या माध्यमातून वाचन चालू होतं. एकांकिकेतल्या प्रत्येक मुलीला या विषयावरचा अभ्यास स्वत:चा स्वत: करायला लावून त्यांच्या शब्दांत मांडायला सांगितला. आमच्या प्रत्येक पात्राचा अभ्यासच ३० ते ३५ पानांचा होता. या एकांकिकेत अनेक बोल्ड सीन्स आहेत, पण ते कुठल्याही पुरुषाबरोबरचे नाहीत, प्रत्येक मुलीचे वैयक्तिक सीन आहेत. आमच्या ग्रुपमधल्या कुठल्याही मुलीने यासाठी नकार दिला नाही. एकांकिकेत एक सात वर्षांची मुलगी आहे, तिला आणि तिच्या आईवडिलांनाही या विषयाची पूर्ण कल्पना आहे. एकांकिकेची प्रकाशयोजना करतानासुद्धा आम्ही कुठलाही साचा ठेवला नाही. ज्या सीनसाठी जो लाइट योग्य वाटेल तसं डिझाईन केलं.’’
अभिनेता सुमीत राघवन यांनी याच एकांकिकेतल्या वेशभूषा आणि रंगभूषा या पैलूंचे कौतुक केले. हेच आजच्या एकांकिकेतलं नावीन्य किंवा प्रायोगिक तत्त्व! आजची पिढी विषयमांडणीसोबत तंत्रज्ञानाला आणि सादरीकरणालाही तेवढंच महत्त्व देतेय. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अद्वैत दादरकर म्हणतो, ‘‘एकांकिका काळाप्रमाणे बदलत असतात. आमच्या वेळी आम्ही जे आजूबाजूला पाहात होतो तेच आम्ही रंगमंचावर आणण्याचा प्रयत्न केला. भोवतालचं समजून ते प्रकाशझोतात आणणं यातच एकांकिकेची गंमत आणि खरेपणा असतो. हे भान आजच्या तरुण पिढीला आहे आणि ते या तरुण लेखकांच्या लेखणीतून उतरतंय याचं समाधान आहे. एकांकिकेचा अभ्यास करताना विचारांची पारदर्शकता महत्त्वाची असते. आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे हे फक्त लेखक-दिग्दर्शक नाही तर एकांकिकेतल्या प्रत्येक पात्राला समजलं पाहिजे तरच तुम्ही लोकांना समजवू शकाल.’’
महाविद्यालयीन एकांकिकांची लेखनसंहिता ही भरपूर पात्रांची असते. एकाच वेळी आपल्या एकांकिकेत खूप पात्रं असली की ती चांगली असते असा समज तरुणांचा होतोय का? यावर ‘‘नाटक हे टीमवर्क असतं. त्याची मोट जितकी घट्ट बांधली जाईल ते तितकं चांगलं होतं. महाविद्यालयीन काळात चांगलं टीमवर्क टिकवून ठेवणं तसं कठीण असतं, पण ते गरजेचंही असतं. पुढे जाऊन व्यावसायिक रंगभूमीवर कमीत कमी पात्रांचीच नाटकं असणार आहेत, तर आज जेव्हा संधी आहे तेव्हा ग्रुपची नाटकं का करू नयेत, असं मुलांना वाटू शकतं,’’ असं अद्वैत म्हणतो.
मुलांची एकांकिका जर इतकी प्रयोगशील आणि सर्जनशील आहे तर ती कु ठेच कमी पडत नसेल का? असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडू शकतो; पण जिथे कमी आहे तिथेच प्रगतीलादेखील वाव आहे हे तत्त्वसुद्धा आजच्या पिढीने लक्षात घ्यावं. यावर अद्वैत सांगतो, ‘‘एकांकिकेचा विषय कितीही चांगला असला तरी त्यातली पात्रंसुद्धा तेवढीच महत्त्वाची असतात. त्या पात्रांचा अभ्यास कुठे तरी कमी पडतोय असं वाटतं. चांगल्या लेखनसंहितेपेक्षा ‘टाळी वाक्यांवर’ जास्त भर दिला जातो असं वाटतं. त्याचबरोबर भाषा शुद्धच किंवा अमुक अशीच असायला हवी असं अजिबात असू नये. १० जणांच्या समूहात प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते. फक्त आपल्या पात्राला साजेशी भाषा हवी. उदा. तुमचं अमुक एक पात्र ‘गोगटे गुरुजी’ असेल तर त्याची भाषा शुद्धच हवी.’’
अभिनेता, दिग्दर्शक आलोक राजवाडे म्हणतो, ‘‘एकांकिकेच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत ती अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ते होण्यात काहीच चुकीचं नाही ते अधिकाधिक होत राहावेत.’’ तर अभिनेत्री भक्ती देसाई सांगते, ‘‘अभिनेत्याचा अभ्यास हा स्क्रिप्ट मिळाल्यापासून सुरू होतो. पात्राचा अभ्यास करताना लेखकाला काय म्हणायचे आहे आणि दिग्दर्शकाला ते कसे मांडायचे आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचा समतोल साधत तुमच्या अभिनयाला तुम्ही न्याय द्यायला हवा हे तुमचे खरे स्किल आहे.’’
आता एकांकिका हे पूर्ण लांबीचे नाटक न राहता एक स्वतंत्र नाटय़ प्रकार बनला आहे. अनेक भागांतून लक्षणीय संख्येने एकांकिकाकार लिहिते झाले आहेत. थोडक्यात काय, तर आजची एकांकिका ही प्रयोगशील आहे. सगळ्या माध्यमांपेक्षा ती उजवी असावी असा आग्रह अजिबात नाही; पण सर्वागाने प्रौढ असावीच. आजच्या काळातले प्रश्न मांडावेत; पण आपल्या नाटक परंपरेचा वारसा अधिकाधिक समृद्ध व्हावा हे तत्त्व मात्र सोडू नये. मराठी एकांकिकांची ही प्रयोगशील गुढी वर्षांगणिक उंच आणि नवविचारांच्या दागिन्यांनी नटलेली राहो.