वेदवती चिपळूणकर
‘मेक इंडिया रीड’ हे त्याने स्वत:चं मिशन ठरवलं आणि त्याच्यासाठी त्याने झपाटून काम सुरू केलं. सुरुवातीला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या या वाचनसेवेला त्याने स्वतंत्र अॅपचं रूप दिलं आणि त्याचे फॅन फॉलोअर्स वाढत गेले. सध्या त्याच्या या अॅपशी तब्बल दहा लाख वाचक-श्रोते जोडलेले आहेत. दर आठवडय़ाला अमृत त्याच्या अॅपवर एका पुस्तकाचा सारांश किंवा समरी अपलोड करतो. ऑडिओ फॉर्ममध्ये ही समरी अपलोड होते. पुस्तकं न वाचण्यासाठी जे वेळेचं कारण पुढे करतात त्यांना पुस्तकांच्या जवळ आणण्यासाठी लढवलेली ही शक्कल लोकांना खरोखरच आवडू लागली आहे. तीन वर्षांत अमृतच्या अॅपने बराच मोठा पल्ला गाठला आहे.
सीए सोडून वाचनाच्या या आवडीला प्रोफेशनमध्ये कन्व्हर्ट करताना त्याला स्वत:बद्दल चुकूनही शंका आली नाही. उलट या प्रोफेशनमध्ये त्याच्या मनाला जास्त शांतता मिळते हे त्याच्या हळूहळू लक्षात यायला लागलं. अमृत म्हणतो, ‘घरातले सगळे कॉमर्सचे म्हणून मीही सीए झालो. आधी वाटायचं की हेच आपलं करिअर आहे आणि आपलं आयुष्य यासाठीच आहे. पण जेव्हा आता सोमवार आला म्हणजे काम करावं लागणार हे जाणवायला लागलं आणि वीकएंडची ओढ लागायला लागली तेव्हा साधारण अंदाज आला की ज्यात आपलं मन लागत नाही ते आपलं आयुष्यभराचं प्रोफेशन असू शकत नाही. एक दिवस मित्रासोबत ‘बाहुबली’ बघायला गेलो होतो. थिएटरवर वेळेच्या आधी पोहोचलो. वेळ घालवण्यासाठी मी नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाची, ‘सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ची समरी सांगितली. त्याला ते प्रचंड आवडलं आणि तो सहज म्हणाला की हे इंटरेस्टिंग आहे, असं तू सांगत गेलास तर लोक ऐकतील. तेव्हा मला ती कल्पना भारीच आवडली आणि हळूहळू त्यावर काम सुरू केलं.’ चित्रकला, तबला, टेबल टेनिस अशा सगळ्या गोष्टी वेळोवेळी करत राहिल्यामुळे नवीन गोष्ट करून बघण्याची भीती अमृतला वाटली नाही. हळूहळू त्याने ही कल्पना कशी प्रत्यक्षात आणता येईल त्यावर विचार सुरू केला. सुरुवातीला व्हॉट्सअॅपवर तो परिचित लोकांना लिखित स्वरुपात असा सारांश पाठवत असे. मग तेवढा सारांशसुद्धा वाचायला वेळ नाही असं त्याच्या कानावर यायला लागलं तसं त्याने ऑडिओ करायला सुरुवात केली. ते सगळ्यांच्या पसंतीस उतरलं, याचा पसारा वाढत गेला आणि ‘बुकलेट’ जन्माला आलं.
‘माझे मोठे भाऊ बहीण माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. त्यामुळे त्यांनीच माझ्या आईबाबांचा रोल बहुतांशी वेळा केला आहे,’ असं अमृत सांगतो. ‘माझा हा निर्णय माझ्या मित्रमैत्रिणींना फारच आवडला. दादानेही मला पाठिंबाच दिला. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांना काहीतरी वेगळं करायचं तर असतं, पण काही ना काही कारणांनी ते जमत नसतं. त्या वेळी त्यांच्यातलंच कोणी काहीतरी वेगळं करू पाहतंय म्हटल्यावर त्याला जास्तीतजास्त पाठिंबा दिला जातो, तसा तो मलाही मिळाला. तिथून हळूहळू मला जाणवायला लागलं की आपण भविष्याची फारच चिंता करत बसतो आणि भूतकाळाचं ओझं घेऊन वावरत राहतो. एखाद्या सिनेमाला आपण जातो, मध्यंतरात आपल्या लक्षात येतं की सिनेमा अगदी बकवास आहे. त्या वेळी आपण आता तिकिटावर खर्च केलेले पैसे वाया कुठे घालवायचे म्हणून उरलेला वेळही तो बकवास सिनेमा बघण्यात वाया घालवतो. या तत्त्वाने चालायचं तर मी सीएच्या क्लाससाठी भरलेले पैसे, केलेला अभ्यास या सगळ्याचं ओझं घेऊ न तेच करत राहायला हवं होतं आणि खरंतर अनेकदा अनेकजण तसंच करतात. त्यापेक्षा सिनेमा वाईट आहे आणि आवडत नाहीये हे लक्षात आलंय तर तिथून निघून जाऊन आपला उरलेला वेळ सत्कारणी लावण्यातच शहाणपण आहे, असं मला वाटतं. गेलेल्या पैशांचं गिल्ट घेऊन नावडतं काम करत राहिलो तर आयुष्य जगणंच राहून जाईल’, हा विचार मनात फे र धरत होता, असं अमृतने सांगितलं.
अमृत त्याच्या विचारांशी खूप ठाम आहे. निर्णय घेण्यापेक्षा तो अमलात आणणं त्याला अधिक महत्त्वाचं वाटतं. ‘कोणताच निर्णय योग्य किंवा अयोग्य नसतो. त्या निर्णयाचे होणारे परिणाम आपल्या हातात राहिले नाहीत की मग तो अयोग्य ठरतो आणि ते परिणाम आपल्या नियंत्रणात राहिले तर तो योग्य ठरतो. आपण निर्णय घेतो आणि मग त्याला योग्य ठरवण्यासाठी प्रयत्न करतो. हे इंग्लिशमधल्या मॅरेज आणि वेडिंग या शब्दांसारखं आहे. वेडिंग हे त्या एक दिवसापुरतं असतं. जसा आपला निर्णय आणि मॅरेज हे कोणत्याही परिस्थितीत कायम टिकवायचं असतं तसंच आपल्या निर्णयाचं एक्झिक्युशन! त्यामुळे निर्णय या क्षणाला मी कमी महत्त्व देतो, मात्र एखादा निर्णय निभावणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे,’ अशा शब्दांत अमृत त्याचं मत व्यक्त करतो.
यश हे आनंदापेक्षा मोठं आहे असं कधीकाळी मानणाऱ्या अमृतला त्याची वाट हळूहळू सापडली. एखादा समाज बदलायचा असेल तर त्यासाठी त्या संपूर्ण समाजाची मानसिकता बदलावी लागते यावर त्याचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे आपला समाज तेव्हाच बदलेल जेव्हा आपल्याला वाचनाची गोडी लागेल. चांगलं-वाईट, आवडतं-नावडतं अशा गोष्टी स्वत:हून ठरवण्याची क्षमता तेव्हाच येईल जेव्हा प्रत्येक माणूस स्वतंत्र विचार करायला सक्षम असेल. तरुण पिढी कट्टय़ावर नवीन सिनेमांसोबतच नवीन पुस्तकांचीदेखील चर्चा करायला लागेल आणि हे चित्र सर्वत्र दिसेल तेव्हा ‘इंडिया २०२०’चं स्वप्न साकार होऊ शकेल. त्यामुळे ‘मेक इंडिया रीड’ हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणाऱ्या अमृतच्या वेगळ्या विचारांकडून सर्वानीच प्रेरणा घ्यायला हवी असं म्हणायला हरकत नाही! शिक्षणाने सीए असलेला आणि गेल्या तीन वर्षांत ‘बुकलेट गाय’ म्हणून ओळखला जाणारा अमृत देशमुख. वाचनाची आवड लहानपणीच त्याच्यात रुजवली गेली आणि त्याच आवडीचं त्याने हळूहळू प्रोफेशनमध्ये रूपांतर केलं.
कोणताच निर्णय योग्य किंवा अयोग्य नसतो. त्या निर्णयाचे होणारे परिणाम आपल्या हातात राहिले नाहीत की मग तो अयोग्य ठरतो आणि ते परिणाम आपल्या नियंत्रणात राहिले तर तो योग्य ठरतो.
– अमृत देशमुख