मितेश जोशी

२१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून १७५ देशांमध्ये साजरा केला जातो. योग ही भारत देशाला मिळालेली मोठी देणगी आहे. या क्षेत्रालासुद्धा भरभराटीचे दिवस आले आहेत. योग या क्षेत्राकडे करिअरच्या दृष्टीने विचार करत त्यात वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन-अभ्यास करणाऱ्या तरुणाईचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते आहे.

योगस्थ: कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्ज्य

सिद्धय़सिद्धय़ो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते

त महत्त्वाचा घटक मानले जाते. मात्र के वळ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगप्रकार करणे इतपत मर्यादित न राहता त्याचा चहूअंगाने अभ्यास करण्याकडे तरुणाईचा कल वाढतो आहे. मुंबईची डॉ. निशा ठक्कर ही तरुणी अंध मुलांना योग शिक्षण देते. त्यामुळे तिने पीएच.डी.साठी सुद्धा ‘अ‍ॅप्लिके शन ऑफ योगा टु व्हिज्युअली इम्पेअर्ड स्टुडण्ट्स ऑफ कॉलेजेस इन मुंबई’ हाच  विषय निवडला. या क्षेत्राकडे अभ्यास म्हणून पाहण्यासाठी तिचा अनुभव कारणीभूत ठरला. एके दिवशी निशा व तिची मैत्रीण अंध मुलांच्या शाळेत गेले होते. त्या मुलांचं जीवन बघून निशा थक्कच झाली. आपण शिकलेल्या योग साधनेचा उपयोग या मुलांना नक्कीच होऊ शकेल या विचारांनी तिला पछाडले. पण या मुलांशी बोलायचं कसं? त्यांच्याकडून आसनं करून घ्यायची कशी? या विचारांनी ती चिंताग्रस्त झाली. एके दिवशी योगसाधना करत असताना घरातली वीज गेली. काळोखात कशीबशी तिने साधना पूर्ण केली. याच प्रसंगाने तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली व नेत्रहीन मुलांना योग शिक्षण देण्याची प्रेरणा तिला आपोआप मिळाली. सुरुवातीला तिने या मुलांचा अभ्यास केला. शाळेतल्या पी.टी. शिक्षकांची मदत घेतली. आणि बघता बघता तिचं हे स्वप्न पूर्ण झालं. आज तिचे विद्यार्थी जलदीप आसनसुद्धा बिनचूक करतात. या विद्यार्थ्यांना घेऊन तिने शंभरहून अधिक कार्यक्रम केले आहेत.अनेक स्पर्धामध्येही भाग घेतला आहे.

योगप्रचार हा केवळ जिल्हास्तरावर मर्यादित राहिलेला नाही. तो आता तालुकास्तरावर व खेडय़ापाडय़ांतही  पोहोचला आहे. गावखेडय़ात जाऊन योगप्रचार  करणारा मालेगावचा चेतन वाघ हा तरुण. लहानपणापासून जिमपेक्षा योगसाधना जवळची वाटणाऱ्या चेतनने हीच वाट करिअर म्हणून निवडली. लहान व गरीब कुटुंबात वावरणाऱ्या चेतनने जळगावला ‘सुमनांजली बहुउद्देशीय संस्था’ येथे नऊ वर्ष प्रशिक्षण घेतले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करून त्याने अनेक पारितोषिके पटकावली. यातूनच त्याला रिसर्चची प्रेरणा मिळाली. चेतन ‘शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिक संतुलनासाठी योगसाधना’ या विषयावर रिसर्च करतो आहे. याविषयी चेतन सांगतो, शाळेतली बरीच मुलं ही रागीट असतात, मनासारखं जर घडलं नाही तर लगेच चिडचिड करतात. पण जर त्यांनी लहान वयातच योगसाधनेचं बोट पकडलं तर त्यांना मानसिक संतुलन साधता येतं. बरेच आईवडील पैसे नाहीत म्हणून साधनेला पाठवत नाहीत, पण अशा मुलांसाठी मी विनामूल्य योगशिक्षणसुद्धा देतो.

जळगावची रुद्राणी देवरे ही ‘ऑटिझम आणि पॅरालाइज्ड मुलांवर होणारा योगसाधनेचा परिणाम’ यावर रिसर्च करते आहे. व्याधी दूर करण्यासाठी मेडिकल उपचारांबरोबरच योगासनांकडे वळण्याचा कलसुद्धा वाढतो आहे. रुद्राणी नेमकं हेच काम जळगावच्या ‘के. के. पाटील योग निसर्गोपचार व संशोधन संस्थे’सोबत करते आहे. रुद्राणी सांगते, वयात येणारी मुलं, रिमांड होममधील गुन्हेगारी वृत्तीची मुलं यांना काही मानसिक समस्या भेडसावत असतात. त्यांच्या मनातल्या या समस्या व न्यूनगंड कमी करण्यासाठी काही योगिक प्रक्रिया, आसने, प्राणायाम, ओंकार, ध्यान यांचे मार्गदर्शन करून त्यांच्यातला बदल मी अभ्यासते आहे आणि त्याचा त्यांना खूप फायदाही होतो आहे. रुद्राणी रिसर्चबरोबरच सर्व वयोगटांतील लोकांसाठी योगशिबीर आयोजित करणे, मुलांसाठी विविध कलात्मक बौद्धिक शिबिरे आयोजित करणे, योगाथेरपी व आहारविषयक मार्गदर्शन करण्याचंसुद्धा काम करते.

मुंबईचा अजय कुंभार हा तरुण पदवी शिक्षणानंतर ऋषिकेश येथील ‘योग वेदांत फॉरेस्ट अ‍ॅकॅडमी’मध्ये गेला. तेथील योगिक प्रक्रिया बघून अजय भारावून गेला व त्याने या क्षेत्राकडे पूर्ण वेळ वळण्याचा निश्चय केला. अजय ‘मानवी देहाच्या पंचकोषांवर’ रिसर्च करतो आहे व त्यातून मिळालेल्या माहितीमधून तरुणांना व मुंबईतल्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतो आहे. तर नाशिकची रश्मी कामत ही तरुणी हठयोग अभ्यासिका आहे. नाशिकच्या ‘कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठा’तून ‘मास्टर इन योगा’ ही पदवी प्राप्त केल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की गोरखनाथांची प्रकाशित पण दुर्लक्षित अशी काही ग्रंथसंपदा आहे. ज्यात हठयोगवर विस्तृत विवेचन केले आहे. अशा गूढरम्य ग्रंथांचा रश्मी अभ्यास करते आहे. ‘गोरखनाथांच्या हठयोगविषयक प्रकाशित संस्कृत साहित्याचे विश्लेषणात्मक अध्ययन’ हा तिचा पीएच.डी.चा विषय आहे.  याच सोबत ती योग थेरपिस्ट म्हणून नाशिकमध्ये कार्यरत आहे.

योगक्षेत्रात रिसर्च करणाऱ्या तरुण-तरुणींची ही यादी सध्या वाढतीच आहे. अनेक मुलं या क्षेत्रात सातासमुद्रापार जाऊन अटकेपार झेंडा रोवत आहेत. त्यातलीच एक जळगावची श्रद्धा पाटील. फिलिपिन्स या देशात एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेत असलेली ही मराठी योगिनी त्याच देशात शिक्षण घेत योग साधनेचा प्रचार प्रसार करते आहे. तिला हे बाळकडू घरातूनच मिळालं. तिची आई डॉ. अनिता पाटील या जळगाव जिल्ह्य़ातील नामांकित योगशिक्षिका. आईकडून गिरवलेले योगशिक्षणाचे धडे श्रद्धा फिलिपिन्समधल्या नागरिकांकडून गिरवून घेते आहे. अनेक स्पर्धामध्ये कधी भारताचे तर कधी फिलिपिन्स देशाचे प्रतिनिधित्व करून तिने पारितोषिकंसुद्धा पटकावली आहेत.

भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक असलेल्या या योगक्षेत्राची कास धरणारी, त्यावर विविध अंगाने संशोधन करू पाहणारी, त्याच क्षेत्रात पूर्ण वेळ कार्यरत असणारी ही पिढी आपल्या कामातून भविष्यात योगसाधनेविषयी अधिक ठोस काम उभारल्याशिवाय राहणार नाही.

viva@expressindia.com