तेजश्री गायकवाड
खरं तर आपल्या देशावर आपलं किती प्रेम आहे हे दाखवायला कोणत्या एका दिवसाची गरज नसते. तरीही दरवर्षी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अगदी आबालवृद्ध आपलं देशप्रेम छातीवर तिरंगा लावून तर कधी स्वत: तिरंग्याच्या रंगाचे कपडे घालून दाखवत असतात. प्रजासत्ताक दिन अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. एव्हाना तुम्ही यंदा कशा पद्धतीने या दिवशी प्रेझेंट व्हायचं हे ठरवायला सुरुवात केली असेलच. तुमच्या त्या तयारीमध्ये थोडीशी मदत म्हणून काही खास आणि हटके फॅशन टिप्स..
तिरंगी फॅशन: प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनी हमखास हिरवा, पांढरा आणि केशरी रंगाची फॅ शन केली जाते. या तीन रंगांसोबत निळा रंगसुद्धा सर्रास वापरला जातो. अनेकदा अशा रंगांमध्ये फक्त मुलीच फॅ शन करू शकतात असं म्हटलं जातं, पण मुलांनाही हे रंग वापरून प्रजासत्ताक दिनी फॅशनेबल दिसता येतं. ज्याला फॅ शनमध्ये जास्त प्रयोग करायला आवडत नाही अशा मुलांनी सरळ पांढरा शर्ट किंवा टी – शर्ट आणि त्याखाली निळ्या रंगाची जीन्स घालावी. हे कॉम्बिनेशन कधीही चुकत नाही आणि प्रत्येकाला ते सहज कॅरीसुद्धा करता येतं. या पांढऱ्या-निळ्या कॉम्बिनेशनवर एक हटके टच म्हणून तुम्ही के शरी रंगाचा स्टोल नक्कीच घेऊ शकता. स्टोलमुळे थंडीपासून संरक्षणही होईल आणि फॅशनही साजरी होईल. याखेरीज मुलं निळ्या, हिरव्या किंवा केशरी रंगाच्या कुर्त्यांवर पांढऱ्या रंगाचा सलवार घालूनही लूक निर्माण करू शकतात. मुलींसाठी तर हजारो ऑप्शन्स नेहमीच असतात. सकाळी ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला जायचं असेल तर मुलींसाठी कुर्ती हा ऑप्शन नेहमीच बेस्ट असतो. त्याबरोबर लेगिंग्ज, धोती, सलवार, जेगिंग्ज याचं कॉम्बो करून एक हटके लूक मिळवू शकता. व्हाइट कलरमध्ये शॉर्ट कुर्ती आणि त्याबरोबर ग्रीन किंवा ऑरेंज पतियाला किंवा धोती आणि त्यावर कॉटन किंवा शिफॉनमधील बॉटमला शोभून दिसणारी ओढणी. त्यावर झुमके किंवा फक्त मोत्याचे छोटे कानातले. झाला तुमचा क्लासी लूक तयार!
शुभ्र काही देखणे प्रजासत्ताकदिनी पांढरा रंग म्हणजे जणू काही ड्रेसकोडच असतो. पांढरा रंग प्रत्येक स्किन टोनला शोभून दिसतो. हा रंग व्यक्तिमत्त्व खुलवत असल्याने या रंगाच्या कपडय़ांचं कलेक्शन प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये असतंच. हा रंग स्टाइल स्टेटमेंट म्हणूनही वापरला जातोच. त्यामुळे पांढऱ्या रंगावर पांढरंच कॉम्बो घालून तुम्ही स्टाईल करू शकता. नेहमीच्या कुर्ती लेगिंगसोबत तुम्ही पांढरी जीन्स आणि टी-शर्ट किंवा टॉप असं कॉम्बिनेशन करू शकता. या कॉम्बिनेशनसोबत तुम्ही फूटवेअरमध्येही पांढराच रंग वापरलात तर लूक नक्कीच पूर्ण होईल. तुम्हाला मीटिंगसाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी फॉर्मल घालून जायचं असल्यास तुम्ही पांढरी स्ट्रेट पॅन्ट आणि त्यावर सेमी ट्रान्सपरंट शर्ट नक्कीच परिधान करू शकता. याखाली पांढऱ्या रंगाची अंकल स्टॅप हिल्स घालायला विसरू नका. याशिवाय, पांढऱ्या रंगाचा वनपीस, गाऊन, अनारकली ड्रेस, स्कर्ट टॉप हे सुद्धा पर्याय आहेत.
हातमाग आणि हॅंडिक्राफ्ट : नेहमीच फक्त पांढरा रंग घालून फॅ शन करण्यापेक्षा तुम्ही हातमागावरचे कपडेसुद्धा नक्कीच परिधान करू शकता. हातमाग आणि हॅंडिक्राफ्ट हे आपल्या भारतीय संस्कृतीमधला महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी हातमागाचे कपडे घालून मिरवायला काहीच हरकत नाही. तुम्ही कॉटन व्हाइट कुर्तीऐवजी खादीची कुर्ती ट्राय करू शकता. हल्ली खादी मटेरियलमध्ये अनेक प्रकारच्या कुर्तीज उपलब्ध आहेत त्या तुम्ही वापरू शकता. हे कुर्ते/ कुर्ती मुलं आणि मुली सहज वापरू शकतात. खादीनंतर तुम्ही कॉटन, टसर, जूट, सिल्क असे भारतीय हातमागावर तयार होणारे कापड आणि त्याचे कपडे नक्कीच घालू शकतात. या खेरीज तुम्ही ब्लॉक प्रिंट, बांधणी, रोगन आर्ट असलेले कपडेही घालू शकता. हॅंडिक्राफ्टमध्ये तुम्ही हाताने बनवलेल्या बॅग, ज्वेलरी, कोल्हापुरी चप्पल, टोपी अशा अनेक गोष्टी वापरू शकता.
चढवा पारंपरिक साज- प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम आणि आपला पारंपरिक पोशाख हे सगळ्यात सुंदर कॉम्बिनेशन. आपल्या देशावरील प्रेमाची भावना तुम्ही पारंपरिक पोशाख घालूनही नक्कीच व्यक्त करू शकता. भारतीय पारंपरिक कपडय़ांचा साज म्हटलं की डोळ्यासमोर येते ती साडी. साडी हातमागावरची किंवा भारतीय कापडाची असेल तर आणखीच उत्तम. आपल्या देशात प्रत्येक राज्याची एक वेगळी साडी आहे. म्हणूनच तुम्ही प्रजासत्ताकदिनी साडी नक्कीच नेसू शकता. तुम्हाला साडीमध्येही किती तरी ऑप्शन्स उपलब्ध आहेत. प्रत्येक राज्याचा ड्रेस परिधान करायचं ठरवलं तरी अनेक पर्याय मुला-मुलींपुढे सहज उपलब्ध होतात. तुम्ही सिम्पल घागरा / स्कर्ट आणि चोळी / टॉप, पंजाबी ड्रेस, धोतर आणि कुर्ता, पायजमा आणि कुर्ता असे कपडे परिधान करू शकता. संपूर्ण पारंपरिक पोशाख वापरणं शक्य नसल्यास तुम्ही एखाद्या राज्याचं एकच एलिमेंट घेऊनही ड्रेसिंग करू शकता. उदहरणार्थ- साध्या ड्रेसवर तुम्ही बांधणी किंवा फुलकारी वर्क केलेली ओढणी घेऊ शकता, मुलांमध्ये शर्ट-पॅन्टवर स्कार्फ किंवा स्टोल घेऊ शकता.
रंग मेकअपचा- मुलींसाठी कपडय़ांसोबत मेकअप आणि अॅक्सेसरीजमधूनही फॅ शन करण्याचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. आय मेकअप करताना तुम्ही नारंगी, निळा आणि हिरवा हा रंग वापरून लूक तयार करू शकता. काजळ घालताना तुम्ही पांढऱ्या रंगाचं काजळ लावू शकता. तुम्ही नेलपॉलिशमध्येही प्रयोग करू शकता. तिरंग्याचे रंग वापरून नेल आर्ट करायला विसरू नका. तुम्ही नखांवर मधलं निळं चक्रसुद्धा काढू शकता. तुम्ही टिकली वापरत असाल तर टिकलीमध्येही ध्वजाचे रंग वापरायला विसरू नका. बांगडय़ांमध्येही तुम्ही हे रंग वापरून छान छान कॉम्बिनेशन करत लूक निर्माण करू शकता. टॅसलच्या कानातल्यामध्येही तुम्ही या रंगाचं कॉम्बिनेशन वापरू शकता. हेअर बेल्ट, नेकपीस आणि ब्रेसलेट्समध्येही हे रंग असलेल्याच प्रॉडक्टची निवड तुम्ही करू शकता.
एकंदरीत प्रत्येक वेळी निव्वळ पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्यापेक्षा तुम्ही जरा विचार केला तर प्रजासत्ताकदिनी तुम्ही हटके लूक नक्कीच मिळवू शकता. ऑनलाइन आणि ऑफलाइन बाजारात यासाठी अनेक पर्याय आलेले आहेत.