डॉ. अपूर्वा जोशी
गुंतवणूकदार अशाच कंपनीमध्ये पैसे लावतात जिथे त्यांना बऱ्यापैकी खात्री असते की या कंपनीचे मूल्य किमान दहा पटीने तरी वाढेल. १० कंपन्यांत पैसे गुंतवले की ५ गुंतवणूक बुडतात, ५ तरून जातात पण १ गुंतवणूक इतके पैसे देऊन जाते की त्यातून त्यांच्या उरलेल्या तोटय़ाची भरपाई होते. गुंतवणूकदाराच्या मानसिकतेचा अभ्यास ही यशस्वी स्टार्टअपची महत्त्वाची पायरी असते.
‘‘अरे तो २५-२६ वर्षांचा गुंतवणूकदार होता आणि तो सरांना सांगत होता की मेडिकल डिव्हाइस कसे विकायला हवेत आणि कंपनी कशी चालवायला हवी. सरांनी २५ वर्षे मेडिकल डिव्हाइस बनवण्यापासून ते शेठजींचा बिझिनेस एस्टॅब्लिश करून देण्यात घालवली आहेत, त्यांना कसा काय हा असा बोलू शकतो?’’ कोणतीही कंपनी जी भांडवल उभी करायला गुंतवणूकदारांकडे जाते आहे तिथे हे हमखास कानावर पडणारं वाक्य. गुंतवणूकदाराचा तोरा काही वेगळाच असतो, त्यांच्याकडे के वळ पैसाच नसतो तर त्यांना एक आत्मविश्वास असतो ते म्हणजे समोरच्या माणसाची कंपनी किंवा त्याचे प्रॉडक्ट विकून देण्याचा. त्याच्या नेटवर्कमध्ये अथवा त्याच्या गुंतवणूक केलेल्या कंपनीमध्ये त्याला काहीतरी सामान धागा दिसत असतो. स्टार्टअपमधल्या गुंतवणूकदारांचं विश्वच वेगळं असतं. गेल्या काही आठवडय़ांत शेअर बाजारात रक्तपात झाला आहे, भांडवल बाजार प्रचंड दोलायमान झाला, अस्वस्थ झाला आणि अनेक गुंतवणूकदारांचे पैसे, नफ्याचे आकडे जणू हवेत विरून गेले. स्टार्टअपच्या गुंतवणुकीत जोखीम असते म्हणणाऱ्यांना आता कदाचित स्टार्टअपमधील गुंतवणूक अधिक आकर्षक वाटू लागेल.
भांडवल बाजारात पुण्या-मुंबईमधील ५० टक्के तरी लोक गुंतवणूक करत असतील, पण स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची एक वेगळीच प्रजाती असते. हे गुंतवणूकदार ‘यत्र तत्र सर्वत्र’ सापडत नाहीत. त्यांची विचारपद्धती समजावून घेणे, हे स्टार्टअपच्या भांडवल उभारणीसाठी खूप महत्त्वाचे असते. गुंतवणूकदार अशाच कंपनीमध्ये पैसे लावतात जिथे त्यांना बऱ्यापैकी खात्री असते की या कंपनीचे मूल्य किमान दहा पटीने तरी वाढेल. १० कंपन्यांत पैसे गुंतवले की ५ गुंतवणूक बुडतात, ५ तरून जातात पण १ गुंतवणूक इतके पैसे देऊन जाते की त्यातून त्यांच्या उरलेल्या तोटय़ाची भरपाई होते. गुंतवणूकदाराच्या मानसिकतेचा अभ्यास ही यशस्वी स्टार्टअपची महत्त्वाची पायरी असते. हे गुंतवणूकदार विखुरलेले असतात, यांच्यापर्यंत पोहोचणे बऱ्यापैकी अवघड असते आणि त्यातही मराठी गुंतवणूकदार सापडणे थोड दुर्मीळच. बरेचदा ‘लिंक्डइन’ अथवा ‘ट्विटर’द्वारे या लोकांशी जोडले जाणे आणि आपले विचार अथवा आपल्या कंपनीशी संबंधित गोष्टी या गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवत राहणे हे कधी कधी कामी येते.
मी एकदा खरंच मराठी एन्जेल्स किंवा व्हेंचर कॅपिटॅलिस्ट लोकांच्या याद्या तपासायला गूगल करत होते. मला त्यात उल्हास नाईक हे नाव दिसलं. मला आश्चर्य वाटलं. आजवर ४८ गुंतवणूक या माणसाने केल्या आहेत, असं त्यात लिहिलेलं होतं, पण मी जेव्हा त्याचे लिंक्डइनवरचे प्रोफाइल तपासले तेव्हा जाणवले की हा अमेरिकन आहे, याचं आडनाव फक्त मराठी आहे. त्या वेळी माझा खूप हिरमोड झाला.
एका कंपनीने मध्यंतरी ‘इंडिया सेफ नोट’ नावाचा गुंतवणुकीचा वेगळाच प्रकार स्टार्टअपच्या गुंतवणुकीसाठी चालू केला आहे, यामध्ये गुंतवणूकदार भांडवल पुरवत असताना ना स्टार्टअपचे शेअर्स घेतो ना हे कर्ज असते, पैसे घेतले म्हणून स्टार्टअप गुंतवणूकदाराला आयसेफनोट देत असते. ज्या कंपनीकडे स्वत:चं प्रॉडक्ट नाही, ज्याची काही विक्री नाही त्या कंपनीचे मूल्यांकन मुळात होणार तरी कसे? म्हणून या आयसेफनोटचा शोध लागला आणि मी जेव्हा अजून माहिती गोळा केली तेव्हा मला असे कळले की या संकल्पनेचा जनक एक मराठी माणूस आहे. निनाद करपे हे नाव मला एक गुंतवणूकदार म्हणून दिसले. ‘१०० एक्स’ नावाचा त्यांचा व्हेंचर फं ड मुंबईमध्ये नोंदणीकृत आहे. निनाद हे व्यवसायाने सीए, पण त्यांची कारकीर्द गाजली ती प्रामुख्याने ‘अॅपटेक’ कंपनीचे प्रमुख म्हणून. आयटीमधील काम आणि अनुभवानंतर ते अनेक कंपन्यांच्या मंडळात स्वायत्त संचालक म्हणून सामील झाले, पण मराठी माणसासाठी काहीतरी करायचं म्हणून मग एक मराठी नाटक बनवणारी कंपनी चालू केली आणि मराठी व्यवसायांना भांडवल पुरवण्यासाठी, त्यांच्या चांगल्या कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी या गुंतवणूक फंडाची स्थापना केली.
थोडक्यात काय तर गुंतवणूकदाराची माहिती असल्यास त्याच्यापर्यंत पोहोचणे सोपे जाते, त्याची गुंतवणुकीची पद्धती माहिती करून घेतली तर गुंतवणूकदारांचा फायदा कसा होईल हे पाहता येते. जास्तीतजास्त लोकांशी बोलल्याने आणि त्यांच्याशी विविध फॉर्मवर जोडले गेल्याने आपल्या कल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे अधिक सोपे होते.
एका कंपनीने मध्यंतरी ‘इंडिया सेफ नोट’ नावाचा गुंतवणुकीचा वेगळाच प्रकार स्टार्टअपच्या गुंतवणुकीसाठी चालू केला आहे, यामध्ये गुंतवणूकदार भांडवल पुरवत असताना ना स्टार्टअपचे शेअर्स घेतो ना हे कर्ज असते, पैसे घेतले म्हणून स्टार्टअप गुंतवणूकदाराला आयसेफनोट देत असते. ज्या कंपनीकडे स्वत:चं प्रॉडक्ट नाही, ज्याची काही विक्री नाही त्या कंपनीचे मूल्यांकन मुळात होणार तरी कसे? म्हणून या आयसेफनोटचा शोध लागला.
viva@expressindia.com