|| तेजश्री गायकवाड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तुमचा हुकूम आपला इक्का’, किंवा ‘तुमच्यासाठी काय पण’ हे संवाद आठवताहेत? या मालिका आता बंद झाल्या असल्या तरी त्यातले डायलॉग आजही तितकेच लोकप्रिय आहेत. कधी कधी चित्रपट किंवा मालिका फ्लॉप ठरतात मात्र त्यातले डायलॉग कधीही विसरले जात नाहीत. उलट ते आणखी व्हायरल होतात, हल्ली तर फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप सगळीकडे दिसणारे हे डायलॉग आता फॅशनविश्वातही व्हायरल झाले आहेत. सध्या टी-शर्टवर उमटणारी ही डायलॉगबाजी तरुणाईला वेड लावते आहे..

नुकताच लॅक्मे फॅशन वीक पार पडला. त्यात दर वर्षीप्रमाणे वेगवेगळ्या फॅशन डिझायनर्सनी उत्तम कलेक्शन सादर केले. या वेळी आणखी एक हटके शो पाहायला मिळाला. भवना पांडे, डॉली साधवानी आणि नंदिता महतानी या फॅशन डिझायनरच्या ट्रायोने ‘गल्ली जेन’ नावाचं कलेक्शन सादर केलं. रणवीर सिंग आणि अलिया भट्ट यांची भूमिका असलेला ‘गली बॉय’ या सिनेमाच्या गाजलेल्या डायलॉगसह हे कलेक्शन सादर झालं. या कलेक्शनमध्ये जॅकेट्स, हुडीज आणि टी-शर्ट्सवर ‘मी गली मीन’, ‘स्ट्रेट आऊट्टा गली’, ‘अपना टाइम आएगा’, ‘जी-बॉय’, ‘बहोत हार्ड’ असे डायलॉग लिहले होते. याबद्दल डिझायनर सांगतात, ‘आम्ही यासाठी संपूर्ण चित्रपटाचा अभ्यास केला. दिग्दर्शक, कलाकार आणि अन्य टीमकडून माहिती घेत आम्ही हे कलेक्शन डिझाइन केलं. आजच्या तरुणाईसाठी चित्रपट आणि फॅशन हे एकत्र हातात हात घेऊन येतात, हे लक्षात घेऊनच आम्ही असे डायलॉग असणारे कपडे डिझाइन केलेत.’

चित्रपटातील व्यक्तिरेखांसाठी ज्या पद्धतीने विचार करून कपडे डिझाइन केले जातात. त्याच पद्धतीने या चित्रपटाचे र्मचडायझिंग यावेत, असं दिग्दर्शक झोया अख्तरला पहिल्यापासून वाटत होतं. त्या दृष्टीने काम करत आपल्या ‘लवजेन’ या लेबलअंतर्गत ‘गल्ली जेन’ हे कलेक्शन सादर केल्याची माहिती या फॅशन डिझायनर्सनी दिली. अर्थात, चित्रपटांमधील डायलॉग किंवा त्यामध्ये वापरले जाणारे कपडे, वस्तू बाजारात आणण्याचा हा प्रकार नवीन नाही मात्र लोकप्रिय डायलॉगबाजी कपडय़ांवर प्रिंट करण्याचा ट्रेण्ड दिवसेंदिवस वाढतोय हेही तितकेच खरे आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटातील ‘हाऊ इज द जोश?’ हा डायलॉग सध्या लहानांपासून मोठय़ापर्यंत सगळ्यांच्याच तोंडी आहे. आता हाच डायलॉग टी-शर्ट, हुडीज, जॅकेटवरही प्रिंट झालेला बघायला मिळतोय. हा ट्रेण्ड फक्त चित्रपटापुरता मर्यादित राहिलेला नाही. सध्याच्या काळात तपरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या वेबसीरिज, प्रसिद्ध गेम्स, यूटय़ूब आणि त्यावरील यूटय़ूबरही या स्पर्धेत आहेत. ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘लिटिल थिंग्ज’, ‘देसी बॉइज’ अशा एक ना अनेक वेबसीरिजमधील डायलॉग, त्यातले लोगो किंवा चित्रांसमवेत बाजारात दिसताहेत. ‘पब्जी’ नामक गेमने सध्या धुमाकूळ घातला आहे, याच पब्जीचे ‘जिथे पब्जी तिथे मी’, ‘विनर विनर चिकन डिनर’, ‘चल पब्जी खेलते है’, ‘जय पब्जी’ असे डायलॉग लिहिलेले टी-शर्ट, हुडीज बाजारात आले आहेत. हिंदी चित्रपटांपेक्षा मराठी चित्रपटातील डायलॉग किंवा नावाच्या टी-शर्ट्सचा जास्त ट्रेण्ड आहे. ‘आधार कार्ड? मला कोणाच्या आधाराची गरज नाही’, ‘वय विचारू नका’, ‘वक्खा विक्खी वुक्खू’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘चड्डीत राहायचं’ अशा डायलॉगचे टी-शर्ट सध्या हमखास सगळीकडे बघायला मिळतात.

यूटय़ूब आणि यूटय़ूबर हे इंटरनेटवरील स्टार आहेत. आजची तरुणाई त्यांची प्रत्येक गोष्ट फॉलो करते. म्हणूनच जवळजवळ प्रत्येक प्रसिद्ध यूटय़ूबरची स्वत:ची र्मचडायझिंग लाइन आहे. यूटय़ूब चॅनेलवरून कमवता कमवता र्मचडाइझिंग विकणं हाही एक त्यांचा उत्तम साइड बिझनेस झाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यूटय़ूबर्स अनेकदा त्यांच्या व्हिडीओमध्ये बोलताना काही तरी हटके लाइन्स, शब्द किंवा डायलॉग म्हणतात आणि त्यांना फॉलो करणारे त्यावर फिदा होतात. मग याच लाइन्स किंवा डायलॉग कपडय़ांवर प्रिंट करून ते विकले जातात. काही यूटय़ूबर्स स्वत:च्या चॅनेलच्या नावाचा डायलॉग बनवून, त्यातल्या कॅरेक्टरच्या नावाचा किंवा त्याच्या तोंडी सतत असलेल्या डायलॉगचेही टी-शर्ट बनवतात.

ही अशी कापडी डायलॉगबाजी सध्या अगदी लोकल ते ग्लोबल अशा सगळ्याच मार्केटमध्ये पाहायला मिळेल. काही चित्रपटकर्मी, यूटय़ूबर्स, वेबसीरिजवाले त्यांची अधिकृत र्मचडायझिंग लाँच करतात. तर काही लोकल प्रिंटर स्वत:हून प्रसिद्ध डायलॉगचे टी-शर्ट प्रिंट करून विकतात. हे असे टी-शर्ट तुम्हाला कस्टमाइझ करूनसुद्धा मिळू लागले आहेत. अगदी २५० पासून ते ५०० रुपयांपर्यंत याच्या किमती आहेत. ‘चाय, चाय’, ‘आता फक्त राडा’, ‘दिला तर दणकाच’, ‘एकच फाइट वातावरण टाइट’, ‘एकदम कडक’, ‘मौसम मस्ताना आयटम नसताना’, ‘निर्लज्जम सदा सुखी’, ‘राहण्याची उत्तम सोय औकात’, ‘लसावी मसावी माफी असावी’, ‘सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग’ असे अनेक डायलॉग असलेले टी-शर्ट सध्या बाजारात प्रसिद्ध आहेत. आता या कापडी डायलॉगबाजीतला तुमचा आवडता कोणता? तुमचा तुम्हीही डायलॉग तयार करून तोही प्रिंट करून घेऊ शकता. न जाणो तुमचाही डायलॉग व्हायरल होईल..!

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on social media dialog on cloths