|| आसिफ बागवान
तुम्हाला सागर गोस्वामी माहितेय? किंवा अक्षय कक्कड? किंवा मंजुल खट्टर, मृणाल पांचाल, हिर नाईक यांच्यापैकी कुणाला तुम्ही ओळखता का? जर यापैकी कुणाला तुम्ही ओळखत असाल तर तुम्हाला ‘टिकटॉक’या अॅपबद्दल नक्कीच माहिती असेल. अवघ्या दोन वर्षांत भारतात वीस कोटी वापरकर्ते, अडीच लाख दैनंदिन वापरकर्ते आणि ७० अब्ज मासिक व्हिडीओ व्ह्यूज कमावणाऱ्या ‘टिकटॉक’वरील सेलिब्रिटींची ही नावे आहेत. ही नावे केवळ टिकटॉकमुळे प्रसिद्ध झाली आणि अजूनही टिकटॉकवरच लोकप्रिय आहेत. किती? तर यातल्या प्रत्येकाच्या फॅन्सची म्हणजेच चाहत्यांची अधिकृत संख्या काही लाखांच्या घरात आहे. तुम्ही आहात तिथेच बसून तुमच्यातील कलागुणांचं दर्शन घडवणारे व्हिडीओ बनवून ते प्रसारित करण्याची संधी देणाऱ्या टिकटॉकने आज देशातील युवापिढीला भारून टाकलं आहे. केवळ तरुणवर्गच कशाला, गोवंडीसारख्या गरीब, निम्नमध्यमवर्गीयांच्या वस्तीतील एखाद्या गृहिणीपासून उत्तर प्रदेशातील एखाद्या खेडय़ातल्या आजोबांपर्यंत साऱ्यांनी ‘टिकटॉक’ला आपलंसं केलं आहे.
‘टिकटॉक’बद्दल तुम्ही जाणत असाल तर प्रश्नच नाही. पण ज्यांना हे अॅप काय, हे माहिती नाही, त्यांच्यासाठी. ‘टिकटॉक’ हे १५ सेकंद ते एक मिनिटाचे ‘लिपसिंकिंग’ व्हिडीओ रेकॉर्ड करून ते शेअर करण्यासाठी तयार करण्यात आलेलं अॅप आहे. चीनमधील ‘बाइटडान्स’ नावाच्या कंपनीच्या मालकीचं हे अॅप. तसं तर या अॅपचा अधिकृत जन्म सप्टेंबर २०१६चा. पण २०१४मध्ये जगभरात प्रसिद्ध झालेल्या शांघायस्थित ‘म्युझिक.ली’ या अशाच ‘लिपसिंकिंग’ अॅपच्या स्टार्टअपची खरेदी करून ‘टिकटॉक’ने आपला विस्तार केला. तब्बल ७५ अब्ज डॉलर मोजून २०१७मध्ये ‘बाइटडान्स’नं ‘म्युझिक.ली’ खरेदी केलं. ‘बाइटडान्स’चं ‘टिकटॉक’ तोपर्यंत चीनमध्ये ‘डौइन’ या नावानं ओळखलं जात होतं. अवघ्या दोनशे दिवसांत विकसित करण्यात आलेल्या ‘डौइन’नं वर्षभरात दहा कोटी वापरकर्ते कमावले. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘टिकटॉक’ हे नामाभिधान करून प्रवेश केल्यानंतर आणि ‘म्युझिक.ली’ला सामावून घेतल्यानंतर ‘टिकटॉक’चा घोडा तर अक्षरश: उधळला. आजघडीला या अॅपचे जगभरात ५० कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत.
हे झालं ‘टिकटॉक’च्या जन्माविषयी. भारतात ‘टिकटॉक’ नाव धारण करण्याआधी ‘म्युझिक.ली’च्या माध्यमातून ते बऱ्यापैकी रुळलं होतं. वेगवेगळे फिल्मी संवाद, गाणी, संगीत यावर ‘लिपसिंकिंग’ करून किंवा नृत्य, हावभाव करून आपले व्हिडीओ तयार करण्याची संधी देणाऱ्या या अॅपला म्हणता म्हणता प्रसिद्धी मिळाली. वलयांकित होणं, कुणाला नको असतं? आयुष्यात एकदा का होईना आपणही सिनेमाच्या पडद्यावर किंवा टीव्ही स्क्रीनवर झळकावं, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करण्याची संधी ‘टिकटॉक’ने वापरकर्त्यांना दिली. स्मार्टफोनच्या स्क्रीनच्या माध्यमातून का होईना, आपले कलागुण जगभरात पोहोचताहेत, हे पाहून ‘टिकटॉक’वर व्हिडीओ बनवणाऱ्यांची लाटच देशात आली. अशा व्हिडीओंच्या माध्यमातून मोठय़ा पडद्यावर चमकण्याची संधी मिळण्याची आशा असलेले, कलागुण असूनही परिस्थितीमुळे ती संधी हुकल्याची सल मनात असणारे आणि मोठय़ा पडद्यावर झळकत असतानाही ‘टिकटॉक’च्या प्रेमात पडलेले अशा साऱ्यांनीच आपले व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली. टायगर श्रॉफ, जॅकलिन फर्नाडिस, अवनित कौर, नेहा कक्कड अशा प्रसिद्ध कलाकारांचे ‘टिकटॉक’ व्हिडीओ लोकप्रिय आहेतच. पण सागर गोस्वामी, अक्षय कक्कड, मंजूल खट्टर अशा सहसा कुणाला माहिती नसलेल्यांच्या व्हिडीओंना त्याहूनही अधिक लोकप्रियता आहे.
ताजं उदाहरण द्यायचं झालं तर, सागर गोस्वामी या मुलांचं देता येईल. साधारण १४-१५ वर्षांच्या या मुलाने काही दिवसांपूर्वी ‘तेरी प्यारी प्यारी दो अखियाँ’ या गाण्यावर रडके हावभाव करत ‘लिप सिंकिंग’ करणारा व्हिडीओ ‘टिकटॉक’वरून प्रसारीत केला. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. सागरचा रडवेला चेहरा लोकांना इतका पसंत पडला की, तीन-चार दिवसांत त्या व्हिडीओला ‘टिकटॉक’वर २५ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले, हा व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या दहा लाखांहून अधिक पोहोचली. केवळ एका व्हिडीओद्वारे सागर गोस्वामी सोशल मीडियावरील सेलिब्रिटी बनला. ‘टिकटॉक’वर त्याच्या आधी लोकप्रिय असलेल्या सेलिब्रिटींपासून हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांपर्यंत अनेकांनी सागरच्या व्हिडीओसोबत ‘डय़ुएट’ व्हिडीओ केले. ही लोकप्रियता इतक्या थराला पोहोचली की, सागरचा ‘टिकटॉक’ आयडीच कुणीतरी ‘हॅक’ केला! हा आयडी सागरनेच कुणाला तरी लाख रुपयांत विकला, अशीही चर्चा आहे. काहीही असो, ‘टिकटॉक’मुळे मिळणारं ग्लॅमर किती मोठं आहे, हे यातून स्पष्ट आहे.
आजघडीला जगभरातील ‘टिकटॉक’च्या एकूण वापरकर्त्यांपैकी ३९ टक्के वापरकर्ते भारतात आहेत. म्हणजेच, जवळपास २० कोटी भारतीय वापरकर्त्यांची ‘टिकटॉक’वर नोंद आहे. दर महिन्याला सरासरी ५ कोटी सक्रिय वापरकर्ते असलेल्या ‘टिकटॉक’वर दररोज सरासरी २९ मिनिटे घालवली जात आहेत. टिकटॉकच्या एकूण वापरकर्त्यांपैकी ७८ टक्के जण २५ वर्षांच्या आतील आहेत. ही मंडळी दिवसातून किमान पाच वेळा टिकटॉकचं अॅप हाताळतात, अशी आकडेवारी आहे.
भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांचा दहा टक्के हिस्सा आज टिकटॉकच्या ताब्यात आहे. फेसबुक (२९ कोटी मासिक वापरकर्ते) आणि इन्स्टाग्राम (सात कोटी मासिक वापरकर्ते) यांच्या तुलनेत ‘टिकटॉक’ची कामगिरी कदाचित फिकी वाटू शकेल. पण त्याची व्याप्ती अन्य सोशल मीडिया अॅपपेक्षाही अधिक आहे. अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे व्हिडीओही ‘टिकटॉक’वर झळकले आहेत. तर ‘ओ समिता..’ या गुजराती गाण्याच्या ठेक्यावर नाचणारे ९० वर्षांचे आजोबाही तेथे पाहायला मिळतात. यातल्या अनेकांचे ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर खातेही नाही. पण ते ‘टिकटॉक’च्या प्रेमात आहेत.
यातूनच आता एक गंभीर मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. तो आहे ‘टिकटॉक’वरील सुरक्षा आणि प्रायव्हसीचा. टिकटॉकवर आपला व्हिडीओ कोणी पहावा, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य देणारी सुविधा अॅपमध्ये आहे. मात्र, एखादा व्हिडीओ अन्य माध्यमातून शेअर झाला तर त्यावर नियंत्रण कुणाचे, हा प्रश्न कायम आहे. अशातूनच किशोरवयीन मुली, तरुणी, गृहिणी यांचे व्हिडीओ परस्पर अन्य व्यक्तींपर्यंत पोहोचत असून त्याचा गैरवापर केला जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. ‘टिकटॉक’च्या माध्यमातून नग्नता, अश्लील भाषा, हिंसाचार, द्वेषमूलक वक्तव्य यांचा प्रसार होत असल्याची ओरडही आता होऊ लागली आहे. लहान मुले कौतुकाने हे अॅप पाहतात. मात्र, वरवर सरकत जाणाऱ्या स्क्रीनवर मध्येच एखादा आक्षेपार्ह व्हिडीओ त्यांच्या पाहण्यात येऊ शकतो, याचा गंभीर परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो, अशी चिंताही व्यक्त होत आहे. या सगळ्या पाश्र्वभूमीवर गेल्याच आठवडय़ात तमिळनाडू सरकारमधील माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांनी ‘टिकटॉक’वर बंदी आणण्याचे संकेत दिले आहेत. हा मुद्दा अजून तरी केंद्र सरकारच्या कोर्टात गेलेला नाही. परंतु, दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना असलेल्या स्वदेशी जागरण मंचने ‘टिकटॉक’वर बंदी आणण्याचा आग्रह धरला आहे. ‘टिकटॉक’वरील व्हिडीओंना त्यांचा आक्षेप आहेच पण ‘टिकटॉक’ चिनी कंपनीचे असल्याने या अॅपवर बंदी आणून पाकिस्तानला वारंवार पाठीशी घालणाऱ्या चीनलाही अद्दल घडवावी, असे त्यांचे म्हणणे आहे. राजकीय स्तरावर याबाबत जो निर्णय होईल तो होईल, पण ‘टिकटॉक’चं गारूड भारतीयांच्या मनावरून उतरेल, असं सध्या तरी सांगणं कठीण आहे.
viva@expressindia.com