आसिफ बागवान

काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांच्या मेसेज फॉरवर्डिग परवानगीवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, आता व्हॉट्सअ‍ॅपचा एक मेसेज आता पाचवेळाच फॉरवर्ड करता येऊ शकणार आहे. तुम्हाला आलेला एखादा मेसेज तुम्ही फॉरवर्ड करू इच्छित असाल तर तो तुम्ही एका वेळी पाच व्यक्ती किंवा पाच ग्रूपवरच पाठवू शकाल. त्यामुळे पाचपेक्षा जास्त लोकांना तुम्हाला मेसेज पाठवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पाचपाचच्या बॅचमध्ये हा मेसेज फॉरवर्ड करावा लागेल. सहाजिकच रोज सकाळी आपल्या सर्व ‘व्हॉट्सअ‍ॅप’ मित्रमंडळींना ‘गुड मॉर्निग’चा मेसेज पाठवायची तुमची सवय असेल तर त्यावर बंधने येणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपने हा निर्णय घेण्यामागचा हेतू काय तर या मेसेंजरच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या खोटय़ा बातम्या किंवा फसवे संदेश अर्थात ‘फेक न्यूज’ यांचा प्रसार थांबवणे. जगभरात ‘फेक न्यूज’ पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा मुक्तहस्ते वापर होत असून यात ‘व्हॉट्सअ‍ॅप’ सर्वात आघाडीवर आहे. जवळपास दीड अब्ज वापरकर्ते असलेल्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून पसरवल्या जाणाऱ्या ‘फेक न्यूज’चे काय गंभीर परिणाम होऊ शकतात, याचं भारताइतकं प्रभावी उदाहरण नाही. गेल्या वर्षी जुलै महिन्यात धुळे जिल्ह्यातील एका गावातील तीन हजारांच्या जमावाने नाथ गोसावी या भटक्या समाजाच्या पाच जणांना लाठय़ाकाठय़ा आणि दगडविटांनी ठेचून ठार केलं होतं. अंगावर शहारा आणणाऱ्या त्या घटनेला निमित्त व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रसारित होणारा एक संदेश होता. ‘आपल्या भागात मुलांचं अपहरण करणारी एक टोळी कार्यरत असून मुले पळवून त्यांना भिकेला किंवा वेश्याव्यवसायाला वापरण्याचे काम ही टोळी करते,’ असा तो संदेश होता. हा संदेश गेल्या वर्षी देशभरातील १२ जणांचे बळी घेण्यास कारणीभूत ठरला. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला संदेश खरा समजून निष्ठुरपणे निष्पापांची हत्या करणारे याप्रकरणी जितके आरोपी आहेत, तितकेच दोषी या संदेशाची अजिबात खातरजमा न करता तो फॉरवर्ड करणारेही आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यांना आवर घालण्यासाठीच व्हॉट्सअ‍ॅपने मेसेज फॉरवर्डिगवर नियंत्रण आणले आहे. ‘फेक न्यूज’चा प्रसार रोखण्यात हा निर्णय कितपत उपयुक्त ठरेल, हे येणाऱ्या काळात दिसून येईलच, पण या निमित्ताने ‘फेक न्यूज’ आणि त्याला बळी पडणारी वृत्ती यांची चर्चा करणे आवश्यक आहे.

फेक न्यूज’ हा शब्द अलीकडच्या काळात रूढ झाला असला तरी, अफवा पसरवण्याची वृत्ती मानवी समाजात अनादिकालापासूनची आहे. पूर्वी तोंडी अफवा पसरवल्या जात होत्या. साहजिकच त्याची व्याप्ती मर्यादित होती. परंतु, सोशल मीडियाने अफवा पसरवण्यातील सर्व मर्यादा मोडून काढल्या. पृथ्वीच्या एखाद्या कोपऱ्यात बसून अवघ्या जगात खळबळ उडवण्याइतकी ताकद सोशल मीडियामुळे प्राप्त झाली आहे. ‘फेक न्यूज’ हे या अफवांचेच व्यावसायिक रूप आहे. ‘फेक न्यूज’ म्हणजे कोणी तरी निव्वळ टाइमपास म्हणून करणुकीसाठी पसरवलेली खोटी बातमी नव्हे. त्यामागे प्रचंड मोठे अर्थकारण, राजकारण, समाजकारण दडलेले असू शकते. अगदी डोळ्यांदेखतचं उदाहरण २०१६मधील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतलं. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय व्हावा, या हेतूने प्रेरित असलेल्या बातम्यांचा स्रोत रशियातून होता, हे एव्हाना सिद्ध झालं आहे. यामागे रशियन सरकारचा हात होता, हेही ठामपणे सांगितलं जात आहे. भारतातही निवडणुकीदरम्यान प्रतिस्पध्र्याचा अपप्रचार करणाऱ्या किंवा आपल्या उमेदवाराचा लौकिक वाढवणाऱ्या ‘फेक न्यूज’ प्रसारित झाल्याचं २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून दिसून आलं आहे. अशा फेक न्यूज बनवण्यासाठी राजकीय पक्षांनी एक विशिष्ट यंत्रणा उभी केली होती व या यंत्रणेवर वारेमाप पैसाही खर्च करण्यात आला. या सर्व गोष्टी पाहता ‘फेक न्यूज’ हे बिझनेस मॉडेल म्हणून किती यशस्वी ठरत आहे, हे स्पष्ट होतं.

इंटरनेट आणि सोशल मीडियाने प्रत्येकाला आपल्याला हवा तो कंटेंट टाकण्याचं स्वातंत्र्य बहाल केलं आहे. या माध्यमातून एकाच वेळी करोडो लोकांपर्यंत पोहोचण्याची सुविधाही मिळाली आहे. साहजिकच या सुविधेचा फायदा वेगवेगळ्या माध्यमांतून घेण्यात येत आहे. ‘फेक न्यूज’ हा यातलाच एक प्रकार. केवळ कुणाची बदनामी करण्यासाठी किंवा कुणाचा राजकीय प्रचार करण्यासाठीच ‘फेक न्यूज’ तयार केली जाते असे नाही. ‘हिट्स’ आणि ‘पेज व्ह्यूज’ वाढवण्यासाठीही ‘फेक न्यूज’ तयार केल्या जातात. एखादी खोटी बातमी टाकून अधिक माहितीसाठी त्याखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करायला सांगितले जाते. या ‘क्लिक’च्या संख्येनुसार उत्पन्न मिळवणारेही भरपूर जण आहेत. एखाद्या संकेतस्थळाच्या जाहिराती वाढवायच्या असतील तर त्याचे वाचक किंवा दर्शक किती, हे लक्षात घेतले जाते. अतिरंजित किंवा खळबळजनक ‘फेक न्यूज’च्या माध्यमातून ते वाढवता येतात. हे काम करणाऱ्यांचं एक नवं फिल्डच आता निर्माण झालं आहे.

इंटरनेटशी नव्याने परिचित होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अलीकडेच अमेरिकेत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये फेसबुकवरून ‘फेक न्यूज’चा प्रसार करणाऱ्यांत तरुणांपेक्षा मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं होतं. ही मंडळी सोशल मीडियावर नवीन असल्याने त्यातील बारकावे त्यांच्या लक्षात येत नाही. आपल्याला आलं ते केलं फॉरवर्ड, ही प्रवृत्ती या साऱ्याच्या मुळाशी असल्याचंही या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं.

पण फेक न्यूजच्या प्रसाराचा संबंध वयाशी जोडणं योग्य नाही. सध्या जमाना फेक न्यूजचाच आहे. त्यामुळे आपल्या पाहण्यात येणाऱ्या प्रत्येक बातमीचा स्रोत काय, हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. भारतासाठी हे वर्ष निवडणुकांचं आहे. साहजिकच गेल्या चार वर्षांत जितक्या ‘फेक न्यूज’ला तुम्हाला तोंड द्यावं लागलं नाही, तितक्या खोटय़ा बातम्या पुढील सहाआठ महिन्यांत तुमच्या वाचनात येणार आहेत. प्रत्येक बातमीवर विश्वास ठेवून तुम्ही बनवलेलं मत चुकीचं ठरू शकतं. त्याच वेळी तिची खातरजमा न करता ती फॉरवर्ड करणं तर आणखी घातक ठरू शकतं. हे सर्व रोखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपनं फॉरवर्डिगवर मर्यादा आणली खरी; पण जोपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप वापरणारे स्वत:च्या आततायीपणावर मर्याद आणणार नाहीत, तोपर्यंत फेक न्यूजचा प्रसार थांबणार नाही, हे नक्की!

फरक किती पडणार?

रीकोड’ या संकेतस्थळाने व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या नियमांचा किती प्रभाव पडेल, हे गणितीय आकडेवारीतून मांडले आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’ची सुरुवात झाली तेव्हा एखादा मेसेज एकावेळी २५६ व्यक्ती वा ग्रूपना पाठवता येऊ शकत होता. एका ग्रूपमध्ये जास्तीत जास्त २५६ सदस्य असतात. हा हिशोब केल्यास एक संदेश एकाच वेळी ६५ हजार ५३६ लोकांना पाठवता येत होता. म्हणजेच, एक फेक न्यूज एकावेळी इतक्या लोकांपर्यंत पोहोचत होती. ही मंडळी पुढे इतक्या ग्रूपना किंवा व्यक्तींना पाठवत असतील, तर ती संख्या वेगळीच! या सुविधेचा गैरफायदा घेऊन खोटय़ा बातम्या किंवा अफवा पसरवण्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने एक मेसेज एकावेळी २० व्यक्ती किंवा ग्रूपमध्ये पाठवण्याची मर्यादा केली. या हिशोबानेही एक मेसेज एकावेळी सुमारे ५१२० लोकांपर्यंत पोहोचवता येत होता. पण यानेही फेकन्यूजचा प्रसार कमी झाला नाही. त्यामुळे आता व्हॉट्सअ‍ॅपने एखादा मेसेज एका वेळी केवळ पाच जणांना किंवा ग्रूपना पाठवण्याची मर्यादा आणली आहे. त्यामुळे एक संदेश एकावेळी १२८० जणांपर्यंतच पोहोचवता येईल. व्हॉट्सअ‍ॅपच्या या मर्यादेचा फेकन्यूजचा प्रसार कमी होण्यात फार उपयोग होईल, असे नाही. मात्र, त्यामुळे फेक न्यूज पसरवणाऱ्यांना थोडी अधिक मेहनत करावी लागेल, हे खरं!

viva@expressindia.com