वेदवती चिपळूणकर परांजपे
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या संकल्पनेबद्दल आपण सगळेच ऐकून आहोत, मात्र त्याचाच पुढचा आविष्कार म्हणजे ‘चॅट जीपीटी’सारखे बॉट्स जे आपल्याला हव्या त्या प्रश्नांची उत्तरं देतात आणि वेळप्रसंगी आपल्याला मदतही करतात. मात्र असे बॉट्स भविष्यात कदाचित आपली जागासुद्धा घेऊन टाकतील, अशी अनेक उलटसुलट मतं आणि विचार आजच्या तरुणाईच्या मनात घोळत आहेत.
मानवाला विचार करण्याची शक्ती दिली आहे म्हणून मानव इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरवला गेला आहे. माणूस विचार करू शकतो, आपले विचार मांडू शकतो, त्यावर चर्चा करू शकतो, अधिक माहिती गोळा करू शकतो, इतरांचे विचार ऐकून घेऊ शकतो आणि या सगळय़ानंतर स्वत:चे मतदेखील मांडू शकतो. मात्र माणसासारखी बुद्धीची कामं करणारा इतर कोणता सजीव निर्माण झाला तर माणसाचे भवितव्य काय असेल? हा प्रश्न अनेकांना अनेकदा पडला असेल. मात्र आता सजीव नव्हे तर निर्जीव बुद्धिमत्ता माणसाच्या विचारशक्तीच्या वैशिष्टय़ाला धक्का लावू पाहते आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या संकल्पनेबद्दल आपण सगळेच ऐकून आहोत, मात्र त्याचाच पुढचा आविष्कार म्हणजे ‘चॅट जीपीटी’सारखे बॉट्स जे आपल्याला हव्या त्या प्रश्नांची उत्तरं देतात आणि वेळप्रसंगी आपल्याला मदतही करतात. मात्र असे बॉट्स भविष्यात कदाचित आपली जागासुद्धा घेऊन टाकतील. अशी अनेक उलटसुलट मतं आणि विचार आजच्या तरुणाईच्या मनात घोळत आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तरुणाईचं भविष्य याबद्दल बोलताना ‘युजर एक्सपीरियन्स डिझाइन आणि तंत्रज्ञान क्षेत्रा’त कार्यरत असलेले सौरभ करंदीकर म्हणतात, ‘तरुणाईच्या दृष्टीने या विषयात तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्या म्हणजे रोजगारनिर्मिती, FOMO आणि या तंत्रज्ञानाचे उपद्रवमूल्य.’ तरुण मुलांच्या डोक्यात चांगल्या-वाईट अनेक कल्पना कायम घोळत असतात. आतापर्यंत तंत्रज्ञानातून जो उपद्रव तरुणाई स्वत: डोकं चालवून निर्माण करत होती, ज्या खोडय़ा स्वत:च्या बुद्धीने काढत होती तेच सगळं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून केलं जाणार आहे. म्हणजेच तरुणाईला नवनवीन मार्ग सापडणार आणि चुकीच्या गोष्टी करण्यातदेखील तरुणाई शॉर्टकट शोधणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे FOMO ‘फियर ऑफ मिसिंग आऊट’. त्याबदद्ल सौरभ करंदीकर सांगतात, ‘सगळय़ांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल माहिती आहे, चॅट जीपीटी म्हणजे काय, कसं वापरायचं, काय उपयोग आहे? हे सगळं माहिती आहे आणि मलाच काही माहिती नाही, मलाच काही येत नाही, असाही एक न्यूनगंड यातून वाढीस लागू शकतो. ज्यांचा या तंत्रज्ञानाशी खरोखरच काही संबंध नाही, त्यांनासुद्धा हा ट्रेण्ड बघून कॉम्प्लेक्स येणार. अशा वेळी येत नसूनही कॉन्फिडन्स बाळगणं किंवा शिकून घेण्याची तयारी असणं हे दोनच पर्याय तरुणाईपुढे असू शकतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रोजगारनिर्मिती. असं सगळीकडेच म्हटलं जातं की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे प्रॉडक्टिव्हिटी वाढेल. पण कोणाची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल त्याबद्दल चर्चा होत नाही. कंपनीज, इन्व्हेस्टर असे सगळे यामुळे नक्की खूश होतील, कारण प्रत्यक्षात त्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल. माणसांवरचा खर्च कमी होईल आणि काम कमी वेळात पूर्ण होईल. त्यामुळे नोकरदार वर्गाची प्रॉडक्टिव्हिटी मात्र सहजासहजी वाढणार नाही. रोजगार नक्की निर्माण होईल, मात्र त्यासाठी आपल्याला नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या फायद्यासाठी उपयोग कसा करून घ्यायचा हे समजलं पाहिजे.’
या संपूर्ण वस्तुस्थिती आणि भविष्याबद्दलच्या विचारानंतर प्रत्यक्षात मात्र चॅट जीपीटीसारखं तंत्रज्ञान अनेक तरुणांना माहितीदेखील नाही आणि त्यावाचून त्यांचं काही अडतानासुद्धा दिसत नाही. कॉलेजच्या असाइनमेंट्स करणं, निबंध लिहून घेणं, अनॅलिसिस करून घेणं अशा कामांसाठी ते सध्या ‘चॅट जीपीटी’सारख्या टूल्सची मदत घेतात. ‘क्रिएटिव्ह लिखाणासाठी चॅट जीपीटीची मदत होते, पण केवळ मुद्दय़ांसाठी. प्रत्यक्षात माझ्या शैलीत, माझ्या शब्दात, माझ्या विचारानुसार मीच लिहिणार असते. आपल्या डोक्यात न आलेला एखादा मुद्दा आपल्याला त्याच्याकडून मिळू शकतो, मात्र आपल्या लिखाणाचं उद्दिष्ट काय, त्याचा मुख्य फोकस काय, त्याचा वाचकवर्ग कोण हे सगळं आपल्याला माहिती असतं आणि त्यामुळे प्रत्यक्षात काम आपणच करायचं असतं,’ असा अनुभव कंटेंट रायटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीने सांगितला. चॅट जीपीटीसारख्या माध्यमांचा उपयोग आपल्या मदतीसाठी करून घेणारे असे अनेक तरुण प्रोफेशनल्स आहेत. फ्रीलान्सर सोशल मीडिया एक्स्पर्ट आणि कंटेंट क्रिएटर असलेली निहारिकादेखील हेच सांगते, ‘योग्य पद्धतीने वापर करता आला तर फ्रीलान्सर्ससाठी चॅट जीपीटीसारखी टेक्नॉलॉजी मोठं वरदान ठरू शकते.’
चॅट जीपीटीसारख्या बॉट्सचा वापर भविष्यात काय बदल घडवून आणणार आहे याबद्दल तरुणाई अनभिज्ञ आहे. मात्र त्याचा वापर तरुणाईकडून अनेक प्रकारे रोजच्या अभ्यासात-कामात शॉर्टकट म्हणून केला जातो आहे. कॉलेजमधले अनेक विद्यार्थी अभ्यासासाठी, संकल्पना समजावून घेण्यासाठी चॅट जीपीटीचा उपयोग करतात. अर्थात अभ्यासासाठी चॅट जीपीटीचा वापर तितका सहज केला जाऊ शकत नाही, हाही त्यांचा अनुभव आहे. जितकी जास्त स्पेसिफिक माहिती हवी असते, तितकी जास्त स्पेसिफिक कमांड द्यावी लागते, असं तरुणांचं निरीक्षण आहे, कारण आपण सांगू तेवढीच उत्तरं चॅट जीपीटी देतं आणि आपल्याला नेमकं काय हवं आहे ते आपल्यालाच त्यातून शोधून समजून घ्यावं लागतं. गूगलप्रमाणेच चॅट जीपीटीदेखील माहिती पुरवण्याचं काम करतं. मात्र त्याचसोबत क्रिएटिव्हिटी, अॅनालिसिस, लॉजिक अशा काही क्षमता त्याच्याकडे अधिकच्या असल्यामुळे काही प्रमाणात माणसांचं कामदेखील ते करतं. तरीदेखील टीका, प्रशंसा, मते, विचार यापैकी कोणत्याच गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला समजत नाहीत. त्यामुळे स्वत:ची अभ्यासाची, कामाची पद्धत योग्य पद्धतीने बदलली तर चॅट जीपीटीला आपल्या मदतनीसासारखं वागवता येणं शक्य आहे, हे तरुणाईला पुरतं उमगलं आहे. आणि त्यामुळेच चॅट जीपीटी आणि अन्य आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टुल्स वापरून रोजच्या दैनंदिन आयुष्यात, अभ्यासात वा तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढवाल हे शिकवण्याची टुमच सध्या समाजमाध्यमांवर पाहायला मिळते. इतर ट्रेण्डप्रमाणे चॅट जीपीटी आणि (AI) शिकून घेण्याचा हा ट्रेण्ड लवकरच रुळेल यात शंका नाही. बाकी सध्या कामापुरता वापर करण्याइतपत तरुणाईला चॅट जीपीटीची जुजबी ओळख नक्कीच झाली आहे.
viva@expressindia.com