मी २८ वर्षांची आहे. पण तरीही अजूनही मी माझ्या करिअरबाबत संभ्रमात आहे. मी कुठेही जॉबसाठी (कामासाठी) गेली की मी त्या ठिकाणी जास्त काळ टिकून राहत नाही. सध्याच्या घडीला मी एम.एस.सी. शिकत आहे, सोबतच यूपीएससीची तयारीही सुरू आहे. पण काही खासगी आणि आर्थिक कारणांमुळेतर मी ते करू शकत नाही, असं मला वाटत आहे. मी अभ्यासाला सुरुवात केली होती, अगदी चांगला अभ्यासही झाला होता, पण आता त्या गोष्टीसाठी मला फार उशीर झाला आहे असं वाटत आहे. मला प्लीज मदत करा; कारण मला ध्येयहीन आणि गोंधळल्यासारखं वाटत आहे.
-अनामिका
हॅलो,
तुझं कन्फ्यूजन तुझ्या प्रश्नातही दिसतंय. साधारणपणे शिक्षणात खंड न पडता वयाच्या २३-२४ वर्षांपर्यंत एम.एस.सी. व्हायला पाहिजे, पण तुझं वय २८ वर्ष आहे. स्पर्धा परीक्षा करायची म्हणतेस. स्पर्धा परीक्षांसाठी ३०-३५ वयोमर्यादा असते, मग उशीर झाला असं कशासाठी वाटतं? हे समजत नाही. तुझ्या खासगी कारणांमुळे तुला नोकरी करावी लागली का? आणि तसं असलं तरीही अशी बरीच मुलं रेल्वे, बँक, इन्शुरन्सच्या परीक्षा नोकरी सांभाळतच देत असतातच की!
तुझ्या प्रश्नामधून तुझ्या सध्याच्या निर्णयशक्तीबद्दल अडचण आहे हे दिसतंय. जेव्हा वैफल्य आणि नैराश्य यात आपण अडकलेले असतो तेव्हा भल्याभल्यांनाही निर्णय घेणं कठीण जातं. तुझ्या घरी, भोवताली कोणी तुझ्या विश्वासातलं मोठं असेल ना.. तुझे शिक्षक, ऑफिसात काम करत असणारे सीनियर ज्यांनी तुझ्याहून अधिक पावसाळे पाहिले असतील ती माणसं तुला अतिशय व्यवहारी सल्ला देऊ शकतील. तुझ्या स्वास्थ्याची काळजी घे. निर्णय घेण्यासाठी मनस्वास्थ्य लागतं. स्वच्छ विचार लागतात आणि स्वच्छ विचार संतुष्ट मनातच येऊ शकतात. मन निरोगी ठेवण्यासाठी रोजचा आहार, व्यायाम, आप्त- मित्रांचा संपर्क, छंद जोपासण्यातील आनंद, पुरेशी झोप हे घटक महत्त्वाचे असतात.
बघ, यामध्ये तू कुठे मागे पडते आहेस का? आपल्या जीवनशैलीत थोडाफार बदल करणं सहज शक्य असतं. त्यासाठी समविचारी मित्रांची मदत घे. कठीण असतं ते स्वत:च्या विचारात बदल घडवून आणणं. विंदा करंदीकरांची एक कविता आठवतेय तुला?
‘सुखाच्या शोधात फिरते पृथ्वी
हातात घेऊन चोर कंदील!’
बरेचदा अनाकलनीय अपेक्षांचं ओझं स्वत:वर लादून आपण जीवनात अडथळे अनुभवत असतो. आपल्या मनासारखं झालं की, आपल्याला खूप बरं वाटतं; पण एखाद्या गोष्टीचा अट्टहास केला तर स्वप्नभंगाचं दु:खसुद्धा तितकंच जोरकस असतं. लहानपणापासून आपल्याला जे हवं आहे ते आपण मिळवायला पाहिजे असं सांगितलं जातं. जे मिळालंय तेच वाटून घेण्यासाठी, त्यातच समाधान मानण्यासाठी फार क्वचितच शिकविलं जातं. हे शिकणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुला एकच सांगणं आहे, एका वेळी एकाच दगडावर पाय ठेव. एकेक परीक्षा देऊन बघ काही फरक पडतोय का. कदाचित शांतपणे विचार करताना तुला तुझी वाट आपोआपच सापडेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा